गायत्री बर्वे-गोखले

कधी कधी आपल्याला अवेळी खूप जांभया येतात, कधी विनाकारण चिडचिड होते. कधी कधी बारीक डोकं दुखतं, कसं तरीच होतंय असं आपण म्हणतो. याचं कारण दुसरं तिसरं काही नसून आपल्या मेंदूतील पेशींना होणारा ऑक्सिजनपुरवठा कमी झालेला असतो. अशा वेळी शांत बसून ग्लासभर, वाटल्यास अधिक पाणी प्यायल्यास आपल्याला थोडय़ाच वेळात बरं वाटल्याचं जाणवेल.

गेल्या आठवडय़ात माझी मैत्रीण भेटली जी खूप अशक्त दिसत होती, कारण विचारल्यावर म्हणाली की सिव्हियर डिहायड्रेशनमुळे हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करावं लागलं होतं. डिहायड्रेशनमुळे चक्क तीन दिवस हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावं लागणं यावरून आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे हे लक्षात येऊ  शकतं. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची आणि त्याबरोबर स्वाभाविकच इतर इलेक्ट्रोलाइट्सची पातळी अतिशय कमी होणे. असं होण्यामागची कारणं अनेक आहेत, पण मुद्दा हा आहे की, शरीराला पाणी / द्रव पदार्थाची नितांत गरज आहे त्याशिवाय आपलं शरीर कोणत्याही क्रिया करू शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे.

पाण्यामुळे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित केलं जातं. आपल्या शरीरातील अनावश्यक पदार्थ उत्सर्जित केले जातात, ज्यामुळे आपण होणाऱ्या इन्फेक्शन्स्पासून दूर राहतो. आपल्या सांध्यांमध्ये नीट हालचाल होण्यासाठी पाण्याची गरज असते. पाणी प्यायल्यामुळे आपण उत्साही राहतो. श्वसन, उत्सर्जन आणि व्यायाम करताना शरीरातील पाणी कमी होते याशिवाय काही इन्फेक्शनमुळे जेव्हा डायरियासारखे आजार होतात अशा वेळीसुद्धा पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशन होते. डोकेदुखी, सतत दमल्यासारखे वाटणे, झोप न येणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, चिडचिड होणे हीसुद्धा डिहायड्रेशन झाल्याची लक्षणे आहेत. ती ओळखून योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

प्रत्येक व्यक्तीने सरासरी अडीच ते तीन लिटर पाणी (किंवा चार ते पाच लिटर द्रव पदार्थ म्हणजेच पाणी आणि इतर अन्नातील द्रव पदार्थ) पिणे गरजेचे आहे. इतर द्रव पदार्थ म्हणजेच आपण रोज पीत असलेले चहा, कॉफी, दूध, ताक, सरबत, सुप्स, फळांचे आणि भाज्यांचे ज्यूस आणि इतर पेय पदार्थ.

आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींच्या आतमध्ये आणि दोन पेशींच्या मधल्या जागेत द्रव पदार्थ असतो ज्यासाठी पाण्याची गरज असते. याच पाण्यातून पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. कधी कधी आपल्याला अवेळी खूप जांभया येतात, कधी विनाकारण चिडचिड होते. कधी कधी बारीक डोकं दुखतं, कसंतरीच होतंय असं आपण म्हणतो. याचं कारण दुसरं तिसरं काही नसून आपल्या मेंदूतील पेशींना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालेला असतो. अशा वेळी शांत बसून ग्लासभर, वाटल्यास अधिक पाणी प्यायल्यास आपल्याला थोडय़ाच वेळात बरं वाटल्याचं जाणवेल. ज्या वेळी अवेळी भूक लागलीये असं वाटतं अशा वेळी आपण कधी कधी लागलेली तहान आणि भूक यामध्ये गल्लत करतो. म्हणून भूक लागलीये असं वाटलं की, आधी एक ग्लास पाणी प्यावं, त्यांनंतरसुद्धा वाटलं तर मग काही तरी खावं. याचप्रमाणे जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं. जेवताना पाणी पिऊ  नये, जेवणाच्या आधी अर्धा तास व जेवल्यानंतर एक तास पाणी पिणे चांगले. यामुळे अन्नपचन नीट होण्यास मदत होईल.

याशिवाय कोणकोणते द्रव पदार्थ आपण सेवन करू शकतो आणि ते शरीरास कसा फायदा-तोटा करतात हे पाहू.

सॉफ्ट ड्रिंक्स / काबरेनेटेड बेव्हरेजेस :

बाजारात असंख्य प्रकारची सोडा असलेली ड्रिंक्स मिळतात, जी लहान मुलं आणि मोठे अगदी चवीने पितात. कधी तरी अशी पेय पिणे हानिकारक नसले तरी सतत या ड्रिंक्सचा वापर टाळावा. यात फारशी काहीही पोषक तत्त्वे नसून मोठय़ा प्रमाणात साखर आणि कार्बनडाय ऑक्साईड असतो जो शरीरास चांगला नाही. याशिवाय यात असलेले कृत्रिम रंग आणि प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् घातक ठरू शकतात. लहान मुलांमध्ये ओबेसिटी वाढण्याचं मुख्य कारण अशी ड्रिंक्स सतत पिणं हे आहे.

चहा / कॉफी : चहा-कॉफीमध्ये असलेल्या कॅफेनमुळे मेंदूला तरतरी येते. दिवसातून दोन वेळा चहा कॉफी घेण्यास हरकत नाही, पण त्याहून अधिक कॅफेन पोटात गेल्यास झोप न लागणे, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. ग्रीन टी हा चहा-कॉफीला एक चांगला पर्याय ठरू शकतो. यात साखर नसल्याने कमी कॅ लरीज पोटात जातात. यातील फ्लेवनोइड्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स शरीरातील पेशींचं ऑक्सिडेशन होण्यापासून रोखतात आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतात.

दूध / ताक : लाखो वर्षांपासून दूध हे आपल्या अन्नाचा अविभाज्य घटक आहे. पण नवीन आलेल्या ‘वेगन’ होण्याच्या ट्रेण्डमुळे अनेकांनी डेअरी प्रॉडक्ट्स घेणं बंद केल्याचं आपण पाहतो. खरंतर दूध / ताक हे शाकाहारी लोकांच्या जेवणातील प्रोटिन्सचा एक मुख्य स्रोत आहे. याउपर सुरू असलेल्या ए १ आणि ए २ मिल्कच्या वादात सामान्य व्यक्तीला नक्की कोणतं दूध प्यावं याचा संभ्रम पडलेला दिसतो. ए २ मिल्कबद्दल विस्तृतपणे पुन्हा कधी तरी लिहीनच, पण रोजच्या वापरात उकळून साय काढलेले गाईचे दूध किंवा टोण्ड / डबल टोण्ड   मिल्क हे कमी फॅट कन्टेन्टमुळे वापरास योग्य आहे. तसेच दह्यापेक्षा पातळ ताक हे पचायला हलके असल्याने त्याचासुद्धा आहारात समावेश आवश्यक आहे. उन्हाळ्यात पातळ ताकात चिमूटभर हिंग आणि जिरे पावडर घालून प्यायल्यास गॅसेस, अ‍ॅसिडिटीचा त्रास टाळता येईल, पण मीठ घालून ताक पिणे मात्र टाळावे.

सीझनल पेय : ऋतुमानाप्रमाणे आपल्याकडे अनेक पेय बनवली आणि प्यायली जातात. उन्हाळ्यात लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, नारळ पाणी, कैरीचे पन्हे ही उष्णता कमी करणारी, पित्तशामक आणि अँटीऑक्सिडंन्ट्सनी भरपूर अशी पेय आहेत. ज्यात साखर असली तरी कोणतेही कृत्रिम रंग, प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् वापरले जात नाहीत. याशिवाय यात मोठय़ा प्रमाणात व्हिटामिन सी असल्याने ते शरीरासाठी उत्तम आहे.

डिटॉक्स / इंफ्युज्ड वॉटर :

हल्ली आपण पाहतो की, अनेक जण भाज्या-फळांचे तुकडे घातलेले हे इन्फ्युजड वॉटर पिताना दिसतात. असे पाणी पिण्यात काहीच गैर नाही. यातून सगळी इसेन्शियल मिनरल्स पोटात जाण्यास मदत होईल. परंतु आधी म्हटल्याप्रमाणे आपला दिवसभरातील फळे आणि भाज्यांचा इनटेक माफक असल्यास असे पाणी पिण्याची गरज नाही. ही व्हिटामिन्स आणि मिनरल्स वॉटर सोल्युबल असतात. ती अधिक प्रमाणात घेतल्यास शरीराला आवश्यक तेवढी शोषली जाऊन उरलेली शरीराबाहेर फेकली जातात. त्यामुळे त्यांचा अतिरेक करण्यात काहीच फायदा नाही.

एकंदरीत भरपूर पाणी प्यायल्याने आपला मूड चांगला राहतो आणि आपण उत्साही राहतो. त्यामुळे कधीही चिडचिड होतेय असं वाटल्यास आधी एक ग्लास पाणी प्यावे मगच पुढील काम करावे. काही विशिष्ट आजार जसे किडनी किंवा लिव्हरचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्याने योग्य तेवढय़ाच पाण्याचे सेवन करावे. कोणतेही आजार नसलेल्या व्यक्तींनी ठरावीक वेळाने पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवी. ऑफिसमध्ये एसीमध्ये बसलेले असताना नकळत शरीरातील पाणी कमी होत असते, परंतु थंड हवेत ते जाणवत नाही, तहान लागत नाही. अशा वेळी हल्ली उपलब्ध असलेल्या अनेक अ‍ॅप्सचा वापर करून पाणी पिण्यासाठी रिमाइंडर लावून योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केले जाऊ  शकते. कामाच्या जागी पाण्याने भरलेली बाटली समोर ठेवावी ज्यामुळे कामात असताना उठावे लागणार नाही. पाणी पिण्याबरोबरच दिवसेंदिवस आपण फेस करत असलेल्या पाण्याच्या टंचाईचा विचार करून कमीत कमी पाणी वाया घालवणेसुद्धा आवश्यक आहे. उदा. हॉटेलमध्ये जेवताना हवे तेवढेच पाणी मागून घेणे. पुढच्या पिढीला अधिक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू नये यासाठी आपण सर्वानी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. शेवटी पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय जगणं मुश्कील आहे. म्हणून आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या पर्यावरणाची काळजी घेणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

सुप्स, फळांचे ज्यूस आणि भाज्यांचे रस

सुप करून पिण्याची आपली संस्कृती नसली तरी अधून मधून घरी तयार के लेली भाज्यांची सुप्स प्यायला हवीत. यातून मिळणारे मिनरल्स आणि फायबर हे सुंदर त्वचा, केस यासाठीसुद्धा आवश्यक आहे.

भाज्यांचे रस पिण्याचा ट्रेण्ड सध्या ‘इन’ आहे. आपल्या रोजच्या जेवणात आपण दोन वेळा भाजी आणि कोशिंबीर / सॅलड खात असू तर अशा रसांची आपल्याला विशेष आवश्यकता नाही. त्यातही हे रस जर गाळून प्यायले जात असतील तर त्यातील फायबर फेकलं जात असल्याने त्यांचा म्हणावा तसा काहीच उपयोग शरीराला होणार नाही. हेच झालं फळांच्या बाबतीत. फळांमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी असते. कलिंगड, टरबूज, द्राक्ष या फळांमध्ये तर जवळजवळ ७० टक्के पाणी आहे. त्यामुळे ही फळे खाल्यास आपोआपच शरीराला पाणी मिळते. एक ग्लास संत्र्याचा ज्यूस बनवायला कमीत कमी ५ ते ६ संत्री लागतात, पण संत्री खायची झाली तर एका वेळी आपण दोन संत्र्याच्या वर खाऊ  शकत नाही. याचं कारण संत्र खाताना त्यात असलेलं फायबर पोटात जाऊन ते आपल्याला पोट भरल्याची जाणीव करून देतं पण ज्यूस काढताना सगळं फायबर फेकलं गेल्याने कितीही ज्यूस प्यायला तरी भूक भागत नाही. शिवाय त्यात असलेली अनावश्यक साखर पोटात जाते. डायबेटीस आणि ओबेसिटी होण्यामागच्या कारणांमध्ये सतत ज्यूस पिणे हे एक प्रमुख कारण आहे. तेव्हा जास्तीत जास्त फळं खावीत आणि भाज्यांचे ज्यूस प्यायचे झाल्यास ते न गाळता प्यावेत.

viva@expressindia.com