News Flash

डाएट डायरी : आहाराची परीक्षा आणि परीक्षेचा आहार

डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची डायरी

डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!

आई! शेजारची स्नेहा दिसली का गं? मी आईला विचारलं. बारावीची परीक्षा संपत आलीय आता तिची. वर्षभरात दिसलीच नव्हती स्नेहा. दहावीच्या परीक्षा पण अगदी तोंडावर आल्या आहेत ना? आईशी हे बोलत असताना मागची काही र्वष डोळ्यांपुढे येऊन गेली. माझी पण अशीच वाट लागली होती. अभ्यासाचा बागुलबुवा, लोकांचे आंबटचेहेरे, तीच कंटाळवाणी पुस्तकं आणि तेच पेपर, तोच संवाद, तीच बोरिंग टेप.. ‘परीक्षा जवळ आलीय, काय कसा चाललाय अभ्यास?’ प्रत्येकाला तेच उत्तर द्यायचं.. कसनुसं हसून.. मनात मात्र मी म्हणत असे – कसला अभ्यास बोर झालंय दीड वर्ष तेच तेच करून आणि ऐकून. कुणी विचारायचं – प्रिलिममध्ये किती मार्क मिळाले? मनात यायचं ‘तुम्हाला दहावीत किती मार्क मिळाले होते हो.. मला हा प्रश्न विचारताय ते’. अरे वा! काही आयुष्यात बनायचं असेल तर ९० टक्क्य़ांपेक्षा जास्त मार्क हवेत.. हे असं ऐकलं की डोकं फिरायचं माझं अक्षरश. आधीच आम्ही टेन्शननं अर्धमेले त्यात हे असे नसते सल्ले, चौकशा.. आवरा!

या दोन वर्षांत आईने माझ्या आहाराकडे बारीक लक्ष दिलं होतं. माझा स्वभाव बघून तुमच्या लक्षात आले असेलच, की मी पटकन ऐकणाऱ्यातली नाही. बरोबर ही दोन- तीन र्वष आईने माझं वेळापत्रक वगरे आखायचा प्रयत्न केला. मी तो जीव तोडून प्रयत्न करून हाणून पाडला. अभ्यासाचा मनस्वी कंटाळा केला. टेन्शन आलं की, काहीतरी वेगळं खावंसं वाटतंच ना.. मग कधी श्रीची तर कधी टिब्सची फ्रॅन्की, कोक, गोळा या सर्वाचे यथेच्छ सेवन केले आणि बरोबर दहावीच्या सुरुवातीला टायफाईड झाला. लक्षण – डोकं दुखणं, उजेड नकोसा वाटणं व पोट दुखणं. लक्षणं सर्व होती ती अभ्यास न करण्याची. कळायला बराच वेळ गेला आणि कळलं तेव्हा टायफाईड खूपच जास्त झालेला. सणसणून ताप आला. १०-१५ दिवस तापाचे. पण पूर्ण बरं व्हायला लागले पाच आठवडे. क्लासमध्ये वेगळं शिकवतात, शाळेत वेगळं. सर्व क्लास बुडाले. आई स्वतच डॉक्टर त्यामुळे तांदळाचे पदार्थ, हलका पचनशक्तीला झेपेल तो आहार वगरे देण्यानं ते प्रकरण एकदाचं मिटले. कानाला खडा लावला. खरंच ती दोन र्वष घरचं जेवले. दर तीन तासांनी आई काहीतरी करायची. अर्थात पौष्टिक आणि तरी चमचमीत. कधी मोड आलेल्या कडधान्यांची भेळ, कधी शेंगा उकडलेल्या, कधी नाचणीचं सत्त्व तर रात्री जागरणाचा प्लॅन असल्यास गरमगरम शिरा! जे लाड झाले की काही विचारू नका. चणे- शेंगदाणे- सुकामेवा तर अमाप होता. पोटाला शांतता वाटावी म्हणून फळंपण पोटात जावीत म्हणून मस्त मौसमी फळांचा मिल्कशेक. त्यात कधी रात्री कोल्डकॉफी व चक्क आयस्क्रीमही. पण लगेच गरम पाणीपण द्यायची प्यायला. जरा सर्दी झाली किंवा खोकला आला की हळदीचं गरमागरम दूध असायचं, तर कधी गवती चहाची पात-आलं घातलेला फक्कड चहा असायचा.

आई सतत माझ्या अवती-भवती फिरत असायची. मला टेन्शन आलं की मी रडायला लागायची. रडणं हा माझा आवडता छंद आहे असं ती म्हणते. मग मला समजावून सांगताना तिचे हे उदाहरण एकदम धासू आहे. ‘अगदी चार भिंतीशिवायची शाळा असणाऱ्या गावातला मुलगा, आदिवासी पाडय़ातली मुलगी, दिवसभर काम करून रात्रशाळेत जाणारे यांच्यासाठीसुद्धा दहावीचा पेपर काढला जातो. ही मुलं ना क्लासला जातात ना त्यांना असा १२-१२ तास अभ्यास करता येतो. तरीही जिद्द, परिश्रम आणि प्रेरणा यामुळे ही मुलं पास होतात. चांगले मार्क मिळवतात. तू नक्की पास होणार. पण किती टक्के मिळवायचे ते मात्र तुला ठरवायला लागणार. थोडक्यात परिश्रम आणि जिद्द याला पर्याय नाही.’

आईने आवडीनं केलेलं खाणं-पिणं, सतत दिलेलं प्रोत्साहन, अभ्यास का करावा याचं महत्त्व सांगितल्यामुळे यश आलं. अर्थात मला जास्त क्रेडिट जातं, कारण आईचं कधीकधी जेवण किंवा नवीन पदार्थ फसायचे तेही मी निमूटपणे खायची. मी स्वत अभ्यास केला आणि चक्क थोडंसं मोठय़ांचं ऐकलं. (थोडंच हं!) हवं तेवढाच वेळ टीव्ही पाहिला. इंटरनेटला राशिनग केलं होतं. आईने पण थोडा वेळ टीव्ही- इंटरनेटला काही हरकत घेतली नाही. एकूणात आमची दहावी फत्ते झाली. तिही चांगल्या मार्कानी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:20 am

Web Title: diet information and some tips
टॅग : Diet
Next Stories
1 बावरा मन : अभ्यासक्रमाआधीची कलचाचणी
2 चॅनेल Y : चला गोष्टी सांगू या..
3 नवशब्दकर्ते
Just Now!
X