News Flash

दसरा-दिवाळीपूर्वीची सप्तसूत्री

दिवाळीच्या फराळात नेहमी जास्तीचं मीठ घालून तळलेले पदार्थ केले जातात.

आता नवरात्र, दसरा मग दिवाळी.. सण-उत्सव म्हणजे सुट्टी. सुट्टी म्हणजे धमाल.. मस्त मिठाई, आवडता फराळ! पण या सुटीच्या कालावधीत आणि सणासुदीच्या दिवसात भरपूर तेला-तुपातला आणि गोडाधोडाचा फराळ, मिठाई खाऊन वजनही वाढतंच. काय करायचं मग? डोण्ट वरी! या उत्सवी काळात सणाची गंमत न गमावताही वजनावर कंट्रोल ठेवू शकता. त्याचसाठी या सात युक्तीच्या गोष्टी.

१. गोडावर थोडं नियंत्रण : गोड खाणं टाळणं या दिवसात शक्य नाही. पण मिठाई निवडताना तुमचा स्मार्ट चॉइस नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. दुधापासून बनवलेली, लो कॅलरी मिठाई सगळ्यात स्मार्ट चॉईस. रसगुल्ला, संदेश, रबडी, स्कीम्ड मिल्कपासून बनवलेला चक्का खायला हरकत नाही. तुपात घोळवलेले आणि तळलेले लाडू, काजू-कतली टाळायला हवी. तुम्ही घरीच स्वीट्स बनवणार असाल तर स्कीम्ड मिल्क, गूळ, खजूर, अंजीर आणि मध यापासून मिठाई बनवा. साखरेमध्ये काहीही जीवनसत्त्वे नसतात. फक्त पुरेपूर कॅलरीज असतात. त्यामुळे पचनक्रियेत शरीरातील मिनरल्सच खर्ची होतात. आर्टिफिशिअल स्वीटनर्सदेखील टाळणेच योग्य. मिठाईऐवजी ताजी फळं, ज्यूस, सुकामेवा याचा चॉइस पार्टीमध्ये असायला हरकत नाही. घरामध्ये कधीही जास्त चॉकलेट्स किंवा मिठाई आणून ठेवू नका. समोर दिसलं की, खायचा मोह होतो आणि अकारण कॅलरीज वाढू लागतात.

२. सुक्यामेव्यावर ताव :
शक्य असेल तिथे मिठाईऐवजी मूठभर सुकामेवा तोंडात टाका. त्यातून १०० किलो कॅलरीज मिळतात आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असा हा खुराक असतो. फॅट्स, प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्सचा हा चांगला स्रोत असतो. पण केवळ मूठभर खाणंच रास्त आहे, हे लक्षात घ्या. सणानिमित्त गिफ्ट देतानादेखील मिठाई किंवा चॉकलेटऐवजी ताजी फळं आणि सुकामेव्याचं गिफ्ट हॅम्पर देणं चांगलं.

३. भरपूर पाणी :
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटतं आणि ऊर्जा कमी होते. पुरेसं पाणी प्यायल्याने वजन आटोक्यात राहतं, हे सिद्ध झालं आहे. आपल्यातले अनेक जण तहान लागलेली असताना भूक लागली आहे, असं समजून खातात आणि अकारण जास्त अन्न पोटात जातं. बऱ्याचदा पाणी प्यायलं नाही तर, पोट भरलं नाही, असं वाटून जास्तीचं खाल्लं जातं. दोन घास कमी जेवून त्यावर पाणी पिणं हा वजन कमी करण्याचा चांगला उपाय आहे. हे थंडीचे दिवस असल्याने तहान कमी लागते. तरीही शरीराला पाण्याची आवश्यकता असते. शहाळ्याचं पाणी, सूप, लोणीविरहित ताक, ग्रीन टी हे अधूनमधून पीत राहावं. यातून चांगलं हायड्रेशन होतं.

४. आरोग्यपूर्ण फराळ :
दिवाळीच्या फराळात नेहमी जास्तीचं मीठ घालून तळलेले पदार्थ केले जातात. असे खारावलेले आणि तळकट पदार्थ आरोग्याला अपायकारक. फरसाण, शेव, चिवडा याला थोडा बरा पर्याय म्हणजे तळण्याऐवजी बेक करण्याचा. बेक्ड चकली, पुरी, लो फॅट खाकरा आणि रोस्टेड चिवडा ट्राय करून बघा. तळलेल्या फराळापेक्षा हा पर्याय नक्कीच चांगला.

५. सावकाश खा, चवीनं खा :
तुमच्या जेवणाचा वेग जेवायचं प्रमाण ठरवतो. म्हणजे भराभर खाताना गरजेपेक्षा जास्त अन्न पोटात जातं. सावकाश, चवीचवीने खाताना खाल्ल्याचं समाधान मिळतं आणि योग्य तेवढंच अन्न पोटात जातं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या संदर्भानुसार, सावकाश खाल्ल्यानं १२ टक्के कमी कॅलरीज पोटात जातात. शिवाय तुमच्या पानात पदार्थ दिसत असल्याने कुणाच्या आग्रहाला बळी पडायची शक्यताही नसते.

६. व्यायाम.. फक्त ४५ मिनिटं महत्त्वाची :
सणासुदीला आपला फोकस बदलतो. नातेवाईक, मित्रमंडळींकडे जाण्यायेण्याच्या धावपळीत रुटीन व्यायामाला वेळ होत नाही. पण दसरा-दिवाळीच्या दिवसात नेहमीपेक्षा १५ मिनिटं जास्त व्यायाम आवश्यक असतो. किमान ४५ मिनिटं चालणं आवश्यक आहे. व्यायामानंतर थोडा वेळ स्ट्रेचिंग आणि काम डाऊन केलंच पाहिजे. त्यातूनच शरीर आणि मनाला नवी उभारी मिळू शकते.

७. निवांत झोप :
शरीराला व्यवस्थित विश्रांती मिळाली तरच घेतलेल्या अन्नाचं व्यवस्थित शोषण होतं आणि आपलं पोषण होतं. पचनक्रियेसाठी व्यवस्थित झोप आवश्यक असते. पचनक्रिया बिघडली की वजन वाढतं. त्यामुळे अपुऱ्या झोपेचा वजन वाढण्याशी असा संबंध आहे. त्यामुळे नवरात्री जागल्या तरी पुरेशी झोप मिळतेय, याकडे लक्ष द्या.
थोडक्यात, अन्न हे पाहुणचाराचं, माणसं जोडण्याचं माध्यम आहे आणि सण हे त्याचं निमित्त. या सणासुदीला मनसोक्त खा पण वेळेवर, योग्य तितकं आणि शरीराला-मनाला समाधान देणारं अन्न महत्त्वाचं, हे ध्यानात ठेवा. एन्जॉय!
viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2015 1:05 am

Web Title: diet plans during festivals
टॅग : Diet
Next Stories
1 ‘लव्ह हँण्डल्स’ कसे झाकायचे?
2 स्वीट फ्यूजन
3 स्मार्ट डंगरीज
Just Now!
X