vv11डाएटिंगच्या नावाखाली उपवास करणाऱ्या काही मुली आपल्या ग्रुपमध्ये हमखास आढळतील. वजन कमी करण्यासाठी उपवास आवश्यकच आहे, असंही त्यामुळे वाटू शकतं. पण आहारशास्त्राला हा समज मान्य नाही. उपवासामुळे दुष्परिणामच जास्त होतात. 

डाएटिंग करणे म्हणजे उपवास करणे असा समज आपल्याकडे अनेक वर्षे होता. आत्ता कुठे त्यामध्ये थोडा बदल व्हायला सुरुवात झाली आहे. आरोग्यदायी आणि चविष्ट खाद्यपदार्थ बनवण्याच्या रेसिपी शिकल्यास, खाणे हा एक गमतीचा भाग होऊन जातो. खाण्याचा आनंद घेत राहणे महत्त्वाचे असून वजन घटविण्याच्या नावाखाली उपाशी राहणे गर आहे. विशेषत तरुण वयात डाएटच्या नावाखाली उपाशी राहणे हानीकारक ठरते. तरुणींनी उपवास का करू नये हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. असा समज आहे की उपवासामुळे वजन कमी होते आणि वजन घटविण्यासाठी ते सातत्याने करणे गरजेचे आहे. परंतु, आम्हा डाएटिशिअन आणि संशोधकांना हा समज मान्य नाही.
उपवासाने होतं काय ?
उपवास म्हणजे दीर्घकाळापर्यंत काहीही न खाता राहणे किंवा खाद्यपदार्थाऐवजी पाण्याचे, द्रवपदार्थाचे सेवन करणे. पण हे समजून घेणे गरजेचे आहे की, उपवासादरम्यान शरीरावर खूप ताण पडतो. उपवासादरम्यान, शरीर साठवलेली चरबी वापरण्यास सुरुवात करते जे शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषकद्रव्यांइतकेच महत्त्वाचे असते. उपवासादरम्यान स्नायूंची झीज होते, पाणी आणि मूलद्रव्यांच्या शरीरातील प्रमाणाबाबतही तडजोड केली जाते.
आपले शरीर दोन मुख्य घटकांपासून बनलेले आहे, ज्यामुळे शरीराला वस्तुमान येते. ते म्हणजे चरबी आणि स्नायू. चरबी ही नॉन मेटाबॉलिकली अ‍ॅक्टिव्ह टिश्यू आणि स्नायू हे मेटाबॉलिकली अ‍ॅक्टिव्ह टिश्यू आहेत. स्नायू असतील ते अधिक कॅलरी जाळतात आणि त्यांना सर्वाधिक बीएमआरसोबत अधिकची चरबीही असते.
उपवासादरम्यान शरीर चरबी आणि स्नायूंच्या बाबतीत तडजोड करते. त्यामुळे बीएमआरमध्ये घट होऊन चरबी घटण्याची गतीही कमी होत जाते. चरबी कमी करण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे मूळ काबरेहायड्रेट्स आणि प्रोटिन्स या पोषकद्रव्यांचा एकत्रित पूरक पूरवठा.
उपवासाचे दुष्परिणाम
उपवासामुळे होणाऱ्या चयापचयातील बदलांमुळे डोकेदुखी, मळमळ आणि स्नायूदुखी हे दुष्परिणाम उद्भवू शकतात. शरीरात उपलब्ध असलेल्या विषारी पदार्थाच्या प्रमाणावरच प्रत्येकजण निर्वशिीकरणाला प्रतिसाद देतो. उपवास सुरू केल्यानंतर एखादी व्यक्ती चटकन आजारी पडते तर एखाद्याला ऊर्जा मिळाल्यासारखे किंवा ताजेतवाने वाटते. सुरुवातीच्या काही बदलांमध्ये चांगले वाटणे आणि विचारांमध्ये स्पष्टता येणे यांचा समावेश होतो. परंतु, दीर्घकाळ उपवासादरम्यान काळजी न घेतल्यास गंभीर गुंतागुंतीची शक्यता असते.
असे अनेकदा पाहण्यात आले आहे की उपवासामुळे रोगप्रतिकारकशक्ती क्षीण होते त्यामुळे व्यक्ती सातत्याने सर्दी, खोकला, कमी क्षमतेचा ताप तसेच रक्तदाबात घट आणि रक्तशर्करेची पातळी घटणे आदी समस्यांनाही तोंड देते. पोषकद्रव्यांच्या नियमित आणि सातत्यपूर्ण पुरवठय़ामुळे रक्तदाब, रक्तशर्करा आदींना स्थिर ठेवण्याबरोबरच संसर्गाशी झगडण्याची शक्तीही शरीराला मिळते.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून परिणाम उपवासामुळे मनावर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विपरीत परिणाम होतो. धार्मिक कारणांसाठी किंवा केवळ प्रयोगाखातर कडकडीत उपवास केल्यानंतर घटणारे वजन पाहून अनेक तरुणी उपवास एक पथ्य म्हणून स्वीकारतात हे अनेकदा पाहण्यात येते. उपवास हा चटकन अंगवळणी पडणारा प्रकार असून दीर्घकाळापर्यंत उपवास करत राहणे अशास्त्रीय आहे. भूक मेलेल्या व्यक्तीप्रमाणेच दीर्घ काळ उपवास करणाऱ्या व्यक्तींच्या मनोवस्थेवर विपरीत परिणाम घडू शकतो. शरीर दीर्घकाळ सुरू राहणाऱ्या उपवासाला समजून घेते आणि जर उपवास सातत्याने सुरू असेल तर त्याला प्रतिकूल उत्तर देते. दीर्घकाळ उपवास केल्याने अ‍ॅनिमिया, यकृताच्या कार्यावर दुष्परिणाम, मुतखडे, खनिजांचे असंतुलन आणि इतर दुष्परिणाम उद्भवू शकतात.
उपवासाविषयी अखेरचे शब्द..
जेव्हा ग्लायकोजन आणि चरबी वापरले जाते तेव्हा शरीर प्रथिनांतील अमिनो अ‍ॅसिडचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करते ज्यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते. त्यानंतर शरीरात साठविण्यात आलेल्या चरबीचे किटोन्समध्ये रूपांतर होऊन त्याचा वापर मेंदूला इंधन म्हणून करण्यात येतो. हृदय, मूत्रिपड, यकृत आणि त्वचेतून प्रथिने मिळवून शरीर वापरते. उपवासामुळे तुमच्या दैनंदिन कार्यपद्धतीत मंदपणा येतो.
(लेखिका फिटनेस न्यूट्रिशिनिस्ट आणि वेट मॅनेजमेंट एक्स्पर्ट आहेत.)
जान्हवी चितलिया