X
X

त्रिकोणी तनाचा चटकदार मनाचा!

कुठले पदार्थ कधी खावेत याचे काही ठोकताळे आहेत. प्रहरानुसार पदार्थ खाण्याची पद्धत आहे.

कुठले पदार्थ कधी खावेत याचे काही ठोकताळे आहेत. प्रहरानुसार पदार्थ खाण्याची पद्धत आहे. जसं अगदी सकाळी भूक लागली असेल तर नाश्त्याला गरमागरम पोहे, शिरा, उपमा, इडली, डोसा असे पदार्थ खावेसे वाटतात. दुपारी पोळीभाजीवर ताव मारला जातो. रात्री मात्र वरण भात आणि तुपातून स्वर्गसुख अनुभवलं जातं. मात्र दिवस आणि रात्रीच्या मधील तिन्हीसांजेला भूक लागली असेल तर मात्र चटकन गरमागरम समोसा खाण्याची इच्छा कोणत्याही व्यक्तीला होतेच होते. समोस्याचं मध्य आशिया हे जन्मस्थान! प्रवासासाठी निघालेले अरब व्यापारी रात्रीच्या वेळी मुक्कामास थांबायचे तेव्हा त्यांच्यासोबत सारण भरलेले कच्चे समोसे शिदोरीच्या रुपात सोबत असायचे. रात्री जेवणाच्या वेळी हे समोसे तेलात तळले की त्यांची निशा सहज सरायची. त्याकाळी गरजेपोटी निर्माण झालेले समोसे आज धावपळीच्या जीवनात कित्येक चाकरमान्यांची भूक भागवत आहेत. स्थळ, वेळ, काळ याच्या पलीकडे जाऊ न पोहोचलेल्या समोस्यांचा देखील एक हक्काचा दिवस आहे. नुकताच ५ सप्टेंबरला ‘जागतिक समोसा दिन’ साजरा झाला आहे. अशा या चटकदार समोस्यांवर ताव मारण्यासाठी शेफ आदिती लिमये यांनी आजच्या तरूणाईला आवडतील अशा समोस्यांच्या हटके पाककृती खास व्हिवा वाचकांसाठी दिल्या आहेत.

* ग्लुटेन फ्री समोसा रोल

साहित्य : उकडून कुस्करलेला एक मोठा बटाटा, हिरव्या मिरच्या २, बारीक चिरून तळलेला १ कांदा, लाल तिखट पाव चमचा, कोथिंबीर, धणे पावडर, गरम मसाला पावडर, जिरे पूड, बडीशेप पावडर (पाव चमचा), तळलेले काजू ४-५, मीठ, कापलेली सिलेंट्रो, राईस पेपरम

कृती : एका भांडय़ात कुस्करलेल्या बटाटय़ात सर्व मसाले, कोथिंबीर, मीठ, हिरवी मिरची, तळलेला कांदा व तळलेले काजू घालून सारण एकजीव करून बाजूला ठेवा. त्यानंतर एका भांडय़ात पाणी गरम करून त्यात राईस पेपर बुडवा. राईस पेपर २० सेकंदात शिजतील. राईस पेपर किचन टॉवेलवर ठेवा. हळूच उचला व त्यात तयार बटाटय़ाचे सारण भरा. दोन्ही बाजूने घडी करून त्याचा रोल तयार करा. रोल एकमेकांजवळ ठेवू नका ते एकमेकांना चिकटू शकतात. ऑलिव्ह ऑइलमध्ये डीप फ्राय करून सव्‍‌र्ह करा क्रंची ग्लुटेन फ्री समोसा रोल.

* इटालियन समोसा

समोसा पट्टी साहित्य : मैदा १ कप, तेल आवश्यकतेनुसार, मीठ स्वादानुसार

सारण साहित्य : बारीक चिरलेला कांदा -१, १ कप मक्याचे दाणे, १ कप लाल-हिरवी-पिवळी शिमला मिरचीचे तुकडे , दीड चमचा आले लसूण पेस्ट, १ हिरवी मिरची, १ छोटा चमचा इटालियन हर्ब्स, बेसिलची पाने, मेयोनीज, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, एक कप मोझरेला चीज, तेल, मीठ स्वादानुसार, साखर, दीड कप टोमॅटो प्युरी

कृती : समोसा पट्टीचे सर्व साहित्य एकत्र करा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठाचा गोळा मळा. तयार गोळा १५ मिनिटं ओल्या कपडय़ाने झाकून ठेवा. पॅनमध्ये तेल गरम करून कांदा परतून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, रंगीत शिमला मिरची, मक्याचे दाणे, चिली फ्लेक्स, बेसिलची पाने, मीठ व साखर घालून मिश्रण एकजीव करा. त्यानंतर त्यात दीड कप टोमॅटो प्युरी व कोथिंबीर घालून मिश्रण घट्ट करावे. सारण घट्ट झाल्यावर गॅस बंद करून घ्यावा. व सारण थंड होऊ  द्यावे. मळलेल्या पिठाचा गोळा एकदा पुन्हा मळून घ्यावा. त्याचे छोटे गोळे तयार करून प्रत्येक गोळ्याची ४़ २ इंच एवढी पोळी लाटावी. पोळीचे दोन समान भाग करून एका भागावर मेयोनीज पसरवावे. पोळीच्या कडेला पाणी लावून त्याचा कोन तयार करावा. त्या कोनात तयार थंड सारण भरून वरून चीज घालून कोणाच्या सर्व कडा बंद करून घ्याव्यात. एका कढईत तेल गरम करून सर्व समोसे खरपूस तळून घ्यावेत. गरमा गरम इटालियन समोसा तयार आहे.

* मशरूम ओट्स समोसा

समोसा पट्टी साहित्य : मैदा २ कप, गव्हाचे पीठ १ कप, तेल, आवश्यकतेनुसार, चवीनुसार मीठ

सारण साहित्य : बारीक चिरलेला कांदा -१, पाव कप कोथिंबीर, १ कप बारीक चिरलेले मशरूम, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे, पाव चमचा जिरे पूड, पाव कप ओट्स

कृती : समोसा पट्टीचे सर्व साहित्य एकत्र करा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठाचा गोळा मळा. तयार गोळा १५ मिनिटं ओल्या कपडय़ाने झाकून ठेवा. एका कढईत २ चमचे तेल गरम करूम त्यात कांदा व मीठ परतून घ्या. परतलेल्या कांद्यात पाव कप कोथिंबीर, १ कप बारीक चिरलेले मशरूम, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे, पाव चमचा जिरे पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मशरूम शिजले की त्यात पाव कप ओट्स घालून सारण एकजीव करा. गॅस बंद करून घ्या व सारण थंड होऊ द्या. मळलेल्या पिठाचा गोळा एकदा पुन्हा मळून घ्यावा. त्याच्या पातळ पोळ्या लाटून केवळ एक सेकंद पोळी गरम करून घ्या. प्रत्येक पोळीच्या कडा कापून त्याचे लांब भाग करून घ्या. प्रत्येक शीट मध्ये तयार मिश्रण भरून त्याला समोस्याचा त्रिकोणी आकार द्या. गरम तेलात सोनेरी रंग येइपर्यंत समोसे तळून घ्या व सव्‍‌र्ह करा गरमागरम मशरूम-ओट्स समोसा.

* चीज स्टफ ब्रेड समोसा

साहित्य : ४ ब्रेड, मोझरेला चीज अर्धा कप, कांदा उभा चिरलेला अर्धा कप, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ स्वादानुसार

कृती : अर्धा कप मोझरेला चीजमध्ये अर्धा कप उभा चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर व स्वादानुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा. ब्रेडच्या कडा कापून घ्या. एका पसरट ताटात हलकाच ब्रेड बुडवून घ्या व त्यातील पाणी काढून टाका. तयार मिश्रण ब्रेडवर पसरवून ब्रेडचा रोल करा. तयार रोल तुटणार नाही याची काळजी घ्या. सर्व रोल तेलात डीप फ्राय करा व सव्‍‌र्ह करा झटपट चीज स्टफ ब्रेड समोसा..

* चॉकलेट समोसा

साहित्य : १ कप बारीक केलेले डार्क चॉकलेट, दीड कप मैदा, ४ मोठे चमचे कॅस्टर शुगर, २ मोठे चमचे तूप, १ चमचा पिस्ता, १ कप साखर, तेल

कृती : दीड कप मैदा, ३ मोठे चमचे कॅस्टर शुगर आणि २ मोठे चमचे तूप एकत्र करून मळून घ्या. व ब्रेडक्रम्ससारखे तयार करून घ्या. त्यात योग्य तेवढे पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या. १० मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा. एक कप पाण्यात एक कप साखर घालून त्याचा पाक तयार करून घ्या. एका भांडय़ात चॉकलेट आणि पिस्ता एकत्र करून त्यात १ चमचा कॅस्टर शुगर टाकून समोस्याचे मिश्रण तयार करा. मळलेल्या गोळ्याचे समान ८ भाग करून प्रत्येक भागाची पोळी बनवा. प्रत्येक पोळीचे समान २ भाग करा. सर्व कडांना पाणी लावून त्याचे कोन तयार करा. त्यात चॉकलेटचे मिश्रण भरा. सर्व समोसे गरम तेलात तळून घ्या. तळलेले समोसे साखरेच्या पाकात बुडवून ठेवा.

* नूडल्स समोसा

समोसा पट्टी साहित्य : मैदा २ कप, गव्हाचे पीठ १ कप, १ चमचा तेल, १ चमचा ओवा, चवीनुसार मीठ,

सारण साहित्य : १ कप शिजवलेले नूडल्स, १ मोठा चमचा तेल, उभा चिरलेला कांदा – १, लसणाच्या पाकळ्या, १ कप शिमला मिरची, १ कप गाजर, अर्धा कप चिरलेला कोबी, पातीचा कांदा, सोया सॉस, १ चमचा व्हिनेगर, मीठ

कृती : समोसा पट्टीचे सर्व साहित्य एकत्र करा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठाचा गोळा तयार करा. एका पॅनमध्ये गरम तेलात लसूण व कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात गाजर,कोबी, शिमला मिरची टाकून मोठय़ा आचेवर मिश्रण शिजवून घ्या. नंतर त्यात स्वादानुसार मीठ, सोया सॉस, १ चमचा व्हिनेगर, शिजवलेले नूडल्स व पातीचा कांदा घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा पुन्हा एकदा मळून घ्यावा. त्याचे छोटे गोळे तयार करून त्याच्या पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. एका पोळीचे दोन भाग करा. व प्रत्येक भागाचा एक कोन तयार करा. प्रत्येक कोनात तयार मिश्रण घालून गरम तेलात समोसे तळून घ्या व सव्‍‌र्ह करा गरमागरम नूडल्स समोसा.

* खिमा समोसा

साहित्य : ३०० ग्रॅम मैदा, तेल आवश्यकतेनुसार, मीठ स्वादानुसार, पाणी आवश्यकतेनुसार, ५०० ग्रॅम मटण किंवा चिकनचा खिमा, आलं लसूण पेस्ट, १ मोठा चमचा दही, १० पुदिन्याची पानं, उभा चिरलेला कांदा – १, दीड चमचा गरम मसाला, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर

कृती : ३०० ग्रॅम मैद्यात तेल, मीठ व पाणी घालून पिठाचा गोळा तयार करा. या गोळ्यांचे मध्यम आकाराचे २० छोटे गोळे तयार करून त्याची पातळ पोळी करा. प्रत्येक पोळीचे दोन भाग करा. व या पोळ्या बाजूला ठेवा. २ चमचे मैद्यात पाणी घालून त्याची पातळ पेस्ट तयार करा व ती बाजूला ठेवा. एका कढईत तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट व हिरव्या मिरच्या घालून परता. त्यात खिमा व मीठ घालून खिमा शिजवून घ्या. शिजलेल्या खिम्यात १ मोठा चमचा दही, दीड चमचा गरम मसाला, कोथिंबीर व १० पुदिन्याची पानं घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रण पूर्णपणे शिजले की गॅस बंद करून मिश्रण गार करा. वर ज्या पोळीचे दोन भाग केले आहेत. त्यातील प्रत्येक भागाचा एक एक कोन तयार करा. प्रत्येक कोनात तयार मिश्रण भरा व कोन मैद्यच्या पेस्टचा हात लावत बंद करा. हे समोसे गरम तेलात तळून पुदिन्याच्या चटणीसोबत सव्‍‌र्ह करा खिमा समोसा.

संकलन : मितेश जोशी

23
Just Now!
X