‘जिंदगी..’ दुनियादारीमधलं हे गाजलेलं गाणं कंपोज करणारा ‘से’ बँड जमून आला मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये.. एका एकांकिकेची तयारी करत असताना! तीन मित्रांच्या म्युझिकल दुनियादारीची कहाणी..
उत्साहाचं दुसरं नावच तरुणाई असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हाच उत्साह कधी जोशात डान्स करणाऱ्या पावलांतून वाहतो, तर कधी कॉलेज कट्टय़ावर हातात एखादी मस्त गिटार घेऊन गाण गुणगुणण्यातून वाहतो. थोडक्यात म्युझिक आणि यंगीस्थान यांच नातंच अतूट आहे. त्यात ते रॉक किंवा पॉप्युलर म्युझिक असेल तर ते तुम्हाला उत्साहात नाचायलाच लावतं. उत्फुल्लपणे बेभान व्हायला लावण्याची जादू या संगीतात नक्कीच असते. हल्लीच्या पिढीचं संगीत म्हणजे नुसतं ढँण ढँण, असं काही जण म्हणतात. पण बदलत्या जीवन शैलीप्रमाणे सध्याच्या फास्ट लाइफचा संगीतात चांगला उपयोग करून नवीन आणि मेलडी जपणारे प्रयोग तरुणपिढी करून पाहतेय आणि त्यासाठी स्वत:चे म्युझिक बँडही काढतेय!!
ब्रेक अप के बाद, गच्ची अशी एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी देणारा ‘से बँड’ (रअ) समीर साप्तीस्कर, सचिन पाठक ऊर्फ यो आणि अभिषेक खनकर या तीन मित्रांच्या नावांच्या आद्याक्षरांवरून ‘से’ हा ग्रुप तयार झाला. या ग्रुपबद्दल अधिक सांगताना समीर म्हणाला, ‘से नावाने म्युझिकचा बँड काढायचा असं सुरुवातीला काहीच डोक्यात नव्हतं. पाच वर्षांपूर्वी रुईया कॉलेजमध्ये एका एकांकिकेचं मी म्युझिक करत होतो. तेव्हा त्या एकांकिकेचं दिग्दर्शन यो म्हणजेच सचिन करत होता. एक सीन बसवायचं काम चालू होतं. त्यामुळे माझा ब्रेक टाइम सुरू होता. एवढय़ात ‘ब्रेक अप के बाद’ या ओळी माझ्या मनातून चालीसह वाहत होत्या. मी योकडे गेलो आणि त्याला हे ऐकवून त्यावर शब्द लिहायला सांगितले. अभिषेक आणि मी मिळून त्या गाण्याच्या संगीताची, गाण्यातल्या आवाजाची जबाबदारी पाहत होतो. मग ते गाणं असंच रेकॉर्ड करून मोबाइल टू मोबाइल पास झालं आणि लोकांना आवडतंय याची पावती आमच्यापर्यंत पोहोचू लागली. यानंतर लगेचच चार वेगवेगळी गाणी घेऊन आम्ही एक अल्बम अर्जुन खामकर यांच्या मदतीने काढला आणि मग त्यातून खऱ्या अर्थाने भजन एक्स, बॅक टू स्कूल, ब्रेक अप के बाद आणि गच्ची ही गाणी लोकांनी उचलून धरली आणि आम्हाला से बँड म्हणून ओळख मिळाली.’
बँड म्हटलं की, अनेक वाद्य, जुन्या गाण्याचं रिमिक्स करणं असं स्वरूप असतंच; पण से बँडचं वैशिष्टय़ म्हणजे तरुणाईच्या मनातल्या भावना शब्दबद्ध करून त्यांना नवीन रूपात म्युझिकची जोड देत पेश करणं हा या बँडचा हातखंडा आहे आणि म्हणूनच मुळात तुम्ही काहीतरी बोला, व्यक्त व्हा असं आवाहन करत ‘से’ हे नाव त्यांनी आपल्या ग्रुपला दिलंय. कट्टय़ावर बोलली जाणारी िहदीमिश्रित मराठी भाषा चपखलपणे ‘यो’ने आपल्या गीतांत बसवली. त्यामुळे मूळ गाणं मराठी आणि त्याचा कोरस िहदी अशा हल्लीच्या भाषेतला से बँड प्रत्येक तरुणाला आपला वाटला. तरुणांच्या समस्या, सामाजिक संदेश आपल्या म्युझिकद्वारे से बँडने सर्वांपर्यंत पोहोचवले.
तरुण मुलांना गिटारचं जास्त कुतूहल असतं. त्यामुळे बहुतेक सगळी गाणी से ग्रुपने गिटार या वाद्याला फोकस करून बसवली आणि म्हणूनच ती जास्त कनेक्ट झाली. दैनंदिन जीवनातील एखादी दु:ख देणारी गोष्ट हलक्या-फुलक्या शब्दांत मांडून त्याचा सीरिअसनेस वेगळ्या प्रकारे पोहोचवायचा हा से बँडचा फंडा आहे. दुनियादारी या गाजलेल्या चित्रपटातील तुफान लोकप्रिय ‘जिंदगी’ या गाण्यानं तुफान लोकप्रियतेची चव से बँडनं चाखलीय. या गाण्याचा गीतकार आहे यो म्हणजेच समीर. आता सचिन आणि त्याच्या बँडचा नवीन अल्बम ‘पाऊस, छत्री आणि ती ’ घेऊन येतोय. नवीन फ्रेश साऊंड क्वॉलिटीसह येणारा हा अल्बम तरुणाईला नक्की पसंत पडेल, अशी आशा समीरने व्यक्त केली.