‘युरोपियन युनियन’नं डिझाइन केलेल्या DOC NOMAD अभ्यासक्रमासाठी निवडली गेलेली पहिली भारतीय विद्यार्थिनी असणाऱ्या, सध्या हंगेरीत राहणाऱ्या आर्या रोठेच्या नजरेतून बघू या, तिचा करिअरपट..

विदेशिनी
आर्या रोठे, बुडापेस्ट

वयाच्या अकराव्या वर्षी मला ‘चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’च्या चित्रपटात काम करायची संधी मिळाली. त्यानंतर मी अनेक प्रादेशिक नाटक-सिनेमांत काम केलं. मला कलाकार व्हायचं होतं. पण मोठी होत गेले, तशी कॅमेऱ्यामागच्या जगाविषयीचं कुतूहल वाढलं आणि मी दिग्दर्शक व्हायचं ठरवलं. पण बॅचलर्स लेव्हलला डायरेक्शनचे कोस्रेस नसल्यानं, त्याजवळचं क्षेत्र म्हणून ‘सृष्टी’मध्ये जायचं ठरवलं. तोपर्यंत पुणंच माझं जग होतं. आईनं नेहमीच माझं मत ऐकलं आणि मला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं. ती स्वत इंजिनीअर असूनही माझी कलेची आवड समजून घेतली. ‘सृष्टी स्कूल ऑफ डिझाइन अॅण्ड आर्ट’मध्ये प्रवेश घेतल्यावर साडेचार वर्षांसाठी बंगलोर माझं घर झालं. तिथं जाताना मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण झाल्यानं इंग्रजीत बोलायची सवय नसल्याचं दडपण होतं. तिथल्या वास्तव्यात माझं जीवन आमूलाग्र बदललं. स्वत:ला इंग्रजीत व्यक्त करणं जमायला लागलं. भारतभरातले मित्र-मत्रिणी मिळाल्यानं माझं जग विस्तारलं. ‘सृष्टी’मधून ‘कम्युनिकेशन डिझाइन’ची पदवी घेऊन पुण्याला परतले. छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली. पण मला अजून शिकायचं होतं. जगभरातल्या चांगल्या कॉलेजांविषयी इंटरनेटवरून माहिती गोळा करायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं की, अमेरिकेतली फी आवाक्याबाहेरची असून तिथं माझ्या विषयात स्कॉलरशिपही नसल्यानं तिथली कॉलेजेस बघितली नाहीत.
युरोपातील चेक रिपब्लिकमधील प्रागमधल्याोअटव (फिल्म अॅण्ड टीव्ही स्कूल ऑफ अॅकॅडमी ऑफ परफॉर्मिग आर्ट्स)या कॉलेजविषयी माहिती मिळाली. तिथं वेरा खितीलोवा, एमीर कुस्तुरिचा, मिलॉश फोरमन हे माझे आवडते डिरेक्टर शिकले होते. तिथल्या ‘फिल्म डिरेक्शन’मधील मास्टर्स प्रोग्रॅमसाठी प्रयत्न करायचं ठरवलं. जगभरातून दरवर्षी सहा विद्यार्थी या कोर्ससाठी निवडले जातात. त्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून स्काईपवर मुलाखत दिली. तिथं प्रवेश मिळाला. प्रागचं शिक्षण महाग असलं, तरी एज्युकेशन लोनच्या आवाक्यातलं असल्यामुळं बँकेचं कर्ज मिळालं. पहिल्यांदाच भारताबाहेर जात होते. अपार्टमेंटपेक्षा युनिव्हर्सटिी हॉस्टेलमध्ये राहाणं स्वस्त होतं. रूममेट स्लावेनियामधली होती. दोघींच्या बेडव्यतिरिक्त शिल्लक राहिलेल्या जागेत एकीलाच वावरता येईल. घरी मत्रिणींशी स्काईपवर बोलताना तिला त्रास न होऊ देण्याची कसरत करावी लागे. हिटर बंद पडणं, कधी इंडक्शन शेगडी बिघडणं अशा अनेक अडीअचणी येत. प्राग अतिशय सुंदर असून हॅपििनग प्लेस आहे. कॉलेजमध्ये ओळखी वाढून आमचा ग्रुप झाला. आम्ही पब्लिक इव्हेंटचं शूटिंग करून देत असू. त्यातून मिळणाऱ्या पशांतून महिन्याच्या खर्चाचा काही हिस्सा भागवता येई.
प्रागमधल्या या कोर्ससाठी कोणतीही स्कॉलरशिप मिळणं शक्य नसल्याचं तिथं गेल्यावर पक्कं झाल्यानं दुसरा एखादा कोर्स घ्यावा का, याचा शोध घेऊ लागले. तेव्हा ‘युरोपियन युनियन’कडून चालवल्या जाणाऱ्या DOC NOMAD या ‘डॉक्युमेंट्री फिल्म मेकिंग’च्या दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाविषयी कळलं. हंगेरी, पोर्तुलाग आणि बेल्जिअममध्ये प्रत्येकी एक सेमिस्टर आणि शेवटचं सेमिस्टर या तीनपकी मिळेल त्या देशात प्रोजेक्ट करायचं, असं या अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे. तिथं मला प्रवेश मिळाला नि फी, प्रवास, राहाणं-खाणं, कॅमेरा-लॅपटॉप घेण्यासाठी पसे अशी संपूर्ण स्कॉलरशिपही मिळाली. आम्ही तेवीसजण निवडले गेलो असून, त्यातल्या नऊजणांना माझ्यासारखी संपूर्ण स्कॉलरशिप मिळालेय. निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एका देशाचे एकाहून अधिक विद्यार्थी नाहीत. आपल्याला युरोपभर िहडता येईल, फिल्म करता येतील म्हणून मी खूप उत्सुक होते.
9
गेल्या दोन वर्षांत युरोपभर खूप िहडले. वेगवेगळ्या देशांतील मित्र-मत्रिणींसोबत त्यांचे देश पाहिले. त्यामुळं खूप नॉनटुरिस्टिक जागा बघता आल्या. त्या जागांचा नि युरोपचा इतिहास सखोल समजून घेता आला. आपल्या आजूबाजूचे देशही वेगळ्या नजरेतून बघायला मिळाले. त्यातून जगाशी जवळीक निर्माण झाली. नेपाळी मित्राच्या गावाला भूकंप झाल्याचं कळल्यावर आम्हीही त्याच्या घरून सुखरूप असल्याचा फोन येईपर्यंत अतिशय अस्वस्थ होतो. एकदा एखाद्या देशाचा मित्र झाला की, तिथल्या घटना फक्त बातम्या राहात नाहीत.. मला पहिल्यांदा युरोपात घरचा खाना शेझरायकडं खायला मिळाला. ती पाकिस्तानातली असून केवळ तिच्याशीच मी िहदुस्थानीतून गप्पा मारू शकते. जुनी िहदी गाणी ऐकू शकते. सिनेमे बघू शकते. तिला ‘यार’ संबोधत प्रत्येक वाक्याची सुरुवात करू शकते. अमाझे प्रोफेसर खूप चांगले आहेत. अमुक गोष्ट कर किंवा करू नकोस, हे लादलं जात नाही. अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. शिक्षक मार्गदर्शन करतात. पण तुम्ही काय करायला हवं, हे सांगत नाहीत. तुम्हाला त्या प्रक्रियेतून जाऊ देतात. मला अशा प्रकारचं शिक्षण खूप समृद्ध करणारं वाटतं. मी शाळेपासून अशाच प्रकारे शिकलेली आहे. स्वत:ला उत्सुकता वाटते, समजून घ्यावंसं वाटतं म्हणून मी शिकत गेले. इथं मला जगभरातील मित्र-मत्रिणी आहेत. जगभर िहडायचं ठरवलं तर ब्राझील, घाना, सिरिया, सर्बयिा, लेबनॉन, मेक्सिको, कॅनडा अशा अनेक देशांमध्ये राहण्यासाठी एकेक घर आहेच. माझ्या फ्लॅटमेट इटली आणि रोमानियाच्या आहेत. बुडापेस्टमध्ये आम्हाला रोमानियातल्या ख्रिस्तिनाच्या आजीच्या शेतातून भाज्या, फळं, अंडी यायची. त्याचबरोबर जॅम, लोणची, मसाले अशा अनेक आधी कधी न पाहिलेल्या पदार्थानी आमचे फ्रीज भरून जायचे. माझे खाण्यापिण्याचे फारसे नखरे कधीच नव्हते. मी जाते, तिथलं खाणं टेस्ट करायला, ते कसं बनवायचं हे शिकायला मला आवडतं. एकमेकांना जेवायला बोलावण्याच्या छंदातून मी खूप मित्र-मत्रिणी जोडलेत. मी युरोपातल्या वेगवेगळ्या भागांतले पदार्थ आणि भारतीय पदार्थाचं कॉम्बिनेशन करून स्वयंपाक करते. सुरक्षिततेच्या दृष्टीनं भारतापेक्षा युरोपातला अनुभव खूप वेगळा आहे. प्राग, बुडापेस्ट, लिस्बनमध्ये खूप सुरक्षित वाटलं. रात्री ३-४ वाजता काम करून मी एकटीनं घरी येऊ शकत असे. असं रात्री-अपरात्री एकटीनं िहडताना कधी भीती वाटली नाही. पण त्या मानानं ब्रसेल्स मोठं शहर असल्यानं तिथं इतकं सुरक्षित वाटलं नाही आणि त्यात पॅरिसवरचा हल्ला झाल्यावर परिस्थिती आणखीन कठीण झाल्येय.
युरोपात या काळात मला कोणतीच भाषा नीट शिकता आली नाही. आपल्याला एखाद्या ठिकाणची भाषा येत नसताना तिथं फिल्म बनवणं हे आव्हान असतं. अनेक अडसरांपलीकडं जाऊन माणसांशी कसं जोडले जाऊ शकतो, हे शिकायचा मी प्रयत्न केला. दोन व्यक्ती भाषेपलीकडं, सांस्कृतिक भेदांपलीकडं जाऊन एकमेकांना भेटतात, माणूस म्हणून एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतात, तेव्हा अशा अनुभवांतून गेल्यावर स्वत:कडं नि जगाकडं बघायची माझी दृष्टी खूप बदलली. वैश्विक झाली. मला मी खूप प्रिव्हिलेज्ड आहे, असं वाटतं. मला खूप िहडता आलं, खूप माणसं भेटली. प्रत्येक वेळी नवीन जग समोर आलं. शोधत गेले तितक्या नवीन गोष्टी मिळत गेल्या. एखाद्या गोष्टीकडं बघायचे निरनिराळे दृष्टिकोन असतात, हे कळलं.
मी ब्रसेल्समध्ये असताना एका कॅफेमध्ये बाहेर बसले होते. ब्रसेल्समध्ये सूर्य विशेष दिसत नाही. सतत मळभ असतं आणि पाऊस जास्त पडतो. असाच पाऊस पडायला लागल्यानं मी आणि एक बाई आडोशाला म्हणून कॅफेच्या आत गेलो. आम्ही दोघीच असल्यानं मी तिच्याशी गप्पा मारायला लागले. तिनं तिची गोष्ट सांगितली. तिचा नवरा १० वर्षांपूर्वी गेला. ते जर्मनीमध्ये राहात होते, पण मूळची ती पोलंडची. तो गेल्यावर तिला जर्मनीमध्ये करमेना, म्हणून ‘घर’ शोधण्यासाठी ती बाहेर पडली. गेली १० र्वष ती बॅग घेऊन िहडतेय. ज्या देशात जाईल, तिथं काम शोधते आणि राहाते. पण अजून तिला तिचं घर कुठंच मिळालेलं नाहीये आणि ते मिळेपर्यंत ती थांबणार नाहीये. मी म्हटलं की, ‘घर तर मनात असतं’. ती म्हणाली, ‘मनातलं कोलमडलंय, म्हणून कुणी बांधायला मदत करेल का, ते शोधतेय’.. आमच्या गप्पा संपेपर्यंत पाऊस थांबला आणि ती निघून गेली. तिचं नाव विचारलं नाही, म्हणून माझ्या मनाला चुकचुक लागली. दोन महिन्यांनंतर मी अॅमस्टेरडॅमला एक डॉक्युमेंट्री फेस्टिव्हलसाठी गेले. दिवसभर सिनेमा पाहून झाल्यावर आम्ही रात्री बार शोधत होतो, तेव्हा अचानक जोरदार वादळी पाऊस आला. आमच्या छत्र्या उलटल्या. आम्ही पळत सुटलो आणि दिसेल त्या बारमध्ये शिरलो. थोडं स्थिरावल्यावर आजूबाजूला पाहिलं, तेव्हा कोपऱ्यात तीच बाई दिसली. आश्चर्याचा धक्का बसला. मी तिच्याकडं गेले. तिनं मला ओळखलं नाही आधी. मग मी आठवण करून दिल्यावर तिला आठवलं. मी तिचं नाव विचारलं. ते न सांगता, ती म्हणाली, ‘आपण पुन्हा असंच भेटलो तर तुला सांगेन’. मी म्हणाले की, ‘असं पुन्हा होईल असं वाटत नाही’. तेव्हा तिनं मला तिचा जर्मनीतला पत्ता दिला. बेल्जिअममधून नेदरलॅण्डला प्रवास करताना तिचा पासपोर्ट चोरीला गेला म्हणून ती परत जर्मनीत जात होती. अॅमस्टरडॅम तिचा शेवटचा स्टॉप होता. मी तिला विचारलं, ‘घर नाही शोधणार आता?’ त्यावर तिनं काहीच उत्तर दिलं नाही.. अशा अनेक प्रकारच्या लोकांशी भेट झाली नि माझ्या कल्पनाशक्तीची सीमा विस्तारत गेली. मला वाटतं की, डॉक्युमेंट्री ही फक्त ज्यावर बनवतो, त्याच्याविषयी बोलत नाही, तर जो बनवतो त्यावरही भाष्य करते. पॉलिश न केलेल्या आराशासारखी ती कॅमेऱ्यामागचं आणि पुढचं जग तुमच्यासमोर मांडते. स्वत:विषयीची कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही. सिनेमा करताना तुम्ही बदलता, त्यामुळं जितके अनुभव तुम्ही गोळा करता तितके तुम्ही फिल्ममेकर म्हणून घडायला लागता. हे शिक्षण ही युरोपातून मला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे.
सध्या मी बुडापेस्टमध्ये माझ्या ग्रॅज्युएशन फिल्मवर काम करतेय. मी इथं असताना मोठय़ा हॉलीवूड चित्रपटांच्या सेटवर एक्स्ट्रा म्हणून काम करायला जाते. सेटवर माझे अनेक मित्र-मत्रिणी सीरिया, अफगाणिस्तान आणि इराकमधून आलेले निर्वासित आहेत. त्यांच्याबरोबर माझी डॉक्युमेंट्री बनवतेय. मी सहा महिन्यांनी भारतात परतेन. मग रोमेनिया आणि इटलीतल्या मत्रिणींबरोबर भारतात एक डॉक्युमेंट्री बनवायची आहे. त्यासाठी सध्या आम्ही निर्मात्याच्या शोधात आहोत. देश सोडला, त्यावेळी माझी माणसं आणि सुरक्षित जग सोडून जातेय, असं वाटत होतं. आता वाटतंय की, त्यावेळी घराची व्याख्या खूप मर्यादित होती, ती आता खूप विस्तारलेय. तीन र्वष युरोपात राहिल्यानंतर आता मी घरी परत येतेय, असं मला वाटत नाही. आता वाटतं की, मी नेहमी घरातच होते. कामाच्या निमित्तानं जगभर िहडत राहायला खूप आवडेल. आता पुणं सोडताना मी जाईन, तिथं माझं घरही सोबत असणारेय, हा विश्वास या तीन वर्षांनी मला दिलाय.
शेझराय – माझी पाकिस्तानी मैत्रीण. आम्ही बेल्जिअमचा व्हिसा काढला तेव्हा शेझराय पाकिस्तानातील असल्यानं तिला अॅथॉरिटीजनी खूप जास्त फायनान्शिअल स्टेटस दाखवायला सांगितलं. तिच्या खात्यात तेवढे पसे नव्हते नि तिच्या वडिलांना गॅरेंटर म्हणून राहाणं शक्य नव्हतं. म्हणून मी तिची गॅरेंटर बनले. बेल्जिअममध्ये राहण्याचा निधी कमी पडला, तर तिला डिपोर्ट करण्यात येईल आणि त्या डिपोर्टेशनची जबाबदारी मला घ्यावी लागेल. म्हणजे तिला लाहोरला मला पोहोचवावं लागेल, अशी ती अट होती. त्या वेळी आम्ही गमतीनं म्हणायचो की, मला पाकिस्तानचा व्हिसा मिळण्यापेक्षा तिला ब्रसेल्समध्ये लॉटरी लागण्याची शक्यताच जास्ती आहे. आमचे देश एकमेकांशी भांडत असले तरी त्याचा आमच्या नात्यावर काही परिणाम होत नाही. युरोपातल्या इतर मत्रिणींपेक्षा तिच्याशी असलेली मत्री वेगळ्या पातळीवरची आहे. त्याचं कारण आमचा इतिहास-भूगोल एक आहे, हे असेल का?

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com