|| विशाखा कुलकर्णी

गुणपत्रिकेतील गुणांची मात्रा जास्त असेल तर फार विचार न करता विज्ञान शाखेची वाट धरायची. कालांतराने डॉक्टर किं वा इंजिनीअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडायचे आणि एक तर खासगी दवाखाना घालायचा किं वा एखादी गलेलठ्ठ पगाराची नोकरी धरायची, हा आजवरचा विज्ञान शिक्षणाचा सरधोपट मार्ग किं वा मळलेली वाट म्हणता येईल. ही वाट पुरती पुसली गेली आहे हे म्हणणे धाडसाचे धरेल. मात्र किमान विज्ञानातील इतरही अनेक शाखांबद्दल तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून वाढतो आहे. या शाखांमध्ये शिक्षण घेणे आणि विशेषत: संशोधनाकडे वळण्याचा क ल मुलींमध्ये अधिक वाढलेला दिसतो आहे…

सध्या भारतामध्ये सरकारी तसेच खासगी क्षेत्रांत जैव विज्ञान अर्थात लाइफ सायन्सेसच्या विविध शाखांमध्ये संशोधन करण्यासाठी विविध संशोधन प्रकल्प उपलब्ध आहेत. तसेच खासगी कंपन्यांमध्येदेखील ‘रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ विभागात अनेक संधी उपलब्ध असतात. सजीवांच्या जीवनपद्धतीचा अभ्यास ज्या शाखांमध्ये होतो त्या शाखांना एकत्रितपणे लाइफ सायन्सेस किंवा जैव विज्ञान म्हणतात. जैव विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत, ज्यात मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, मॉलेक्युलर बायोलॉजी, इम्युनॉलॉजी अशा अनेक विषयांचा समावेश होतो. जैव विज्ञानाच्या विविध शाखांना माहिती तंत्रज्ञानाची जोड देत, आधुनिक तंत्रज्ञानाचा  वापर करत सध्याच्या काळात या विषयांमध्ये प्रगत संशोधन केले जाते आहे. भारतात या प्रत्येक शाखेसाठी बेसिक सायन्समधील पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण हे आपल्याला ज्या शाखेमध्ये पुढील शिक्षण घ्यायचे आहे अशा शाखेचे असावे. मास्टर्स केल्यानंतर संशोधन क्षेत्रात करिअरसाठी तरुणाईला विविध पर्याय खुले होतात. संशोधन क्षेत्रातील करिअर आणि येणाऱ्या अनुभवांसंदर्भात बोलताना ‘इंडियन नॅशनल सोसायटी’चा यंग सायंटिस्ट अ‍ॅवॉर्ड, ‘सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग बोर्ड’चा ‘वुमन एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ असे अनेक प्रथितयश पुरस्कार मिळालेल्या वैज्ञानिक डॉ. ऋचा पाटील म्हणतात, ‘सध्याच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानात होणारे संशोधन हे खूप रंजक आहे. यात मुलींची संख्यादेखील वाढती दिसून येते आहे. त्याचे कारण म्हणजे एक तर बदलत्या काळानुसार आता मुलींना त्यांचे पालक यशस्वी होण्यासाठी शक्य ती सगळी मदत आणि प्रोत्साहन देताना दिसतात, शिवाय मुलींनाही अगदी शाळेपासूनच आपल्याला भविष्यात काय करायचे आहे याची कल्पना असते.’

संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’, ‘सायन्स फेस्टिव्हल्स’ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन, दैनंदिन घडामोडी सगळ्यांची माहिती सहज उपलब्ध होऊ लागली आहे. या वर्षी महिला दिनाची संकल्पनाच ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’अशी होती. शिवाय, सध्या महिलांना विज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षण तसेच संशोधन क्षेत्रात येण्यासाठी अगदी पूरक वातावरण आहे आणि करिअर संधीदेखील आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम कु ठे तरी संशोधनात महिलांची संख्या वाढण्याकडे होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या क्षेत्रात संशोधन करू इच्छिणाऱ्या तरुणींना डॉ. पाटील सांगतात, आपल्याला आपल्या विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी कायम ठेवून, आपले ज्ञान समाजाच्या विकासासाठी कसे वापरता येईल, असा दृष्टिकोन या क्षेत्रात येताना ठेवायला हवा. संशोधन क्षेत्रात झोकू न देऊन काम करणे गरजेचे असते. इथे कामाच्या वेळाही अनिश्चित असतात, असे सांगताना करोनाकाळात प्रसंगी कार्यालयात मुक्काम करून काम पूर्ण करावे लागल्याचा आपला अनुभवही त्यांनी सांगितला. सध्या त्या मुंबईतील ‘आयसीएमआर’च्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमेटॉलॉजी’ येथे कार्यरत आहेत.

जैव विज्ञानाशी निगडित, पशुवैद्यकशास्त्राकडेही मुलींचा कल पूर्वीपेक्षा वाढतो आहे. ‘मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालया’च्या प्राध्यापिका आणि विभागप्रमुख डॉ. सरिता गुळवणे यांनी सांगितले की, पूर्वी या क्षेत्रात येणाऱ्या मुलींचे प्रमाण अगदीच कमी असे, परंतु आता ही परिस्थिती बदलली आहे. मुलींचे पशुवैद्यकीय क्षेत्रात येण्याचे प्रमाण वाढते आहे, परिणामी पशुवैद्यकीय संशोधन क्षेत्रातही त्यांचा सहभाग वाढता आहे. करोनाकाळात भारतातील संशोधन क्षेत्राची क्षमता जगापुढे सिद्ध झाली असल्याने महिलांसाठी या क्षेत्रात निश्चितच उत्तम करिअर संधी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर संगणकशास्त्रात पीएचडी के लेल्या डॉ. रुपाली सुरासे-कु हिरे यांच्या मते संशोधन क्षेत्रात नियमितता महत्त्वाची असते. सुरुवातीला लग्न, मातृत्व अशा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत गेल्या की स्त्रियांच्या संशोधनात खंड पडत असे. काही काळ कामापासून दूर राहून पुन्हा संशोधन क्षेत्रात परतणे त्यांना अवघड जात होते, त्यांच्या कामातील रुचीवरही याचा परिणाम होत असे. मात्र सध्या सरकारी स्तरावर विविध शिष्यवृत्ती, पारितोषिके  देऊन स्त्रियांना संशोधन क्षेत्रात येण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जाते आहे. पालकांच्या मुलींच्या शिक्षणाबाबत बदलत चाललेल्या मानसिकतेचाही सकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

विज्ञान-संशोधन क्षेत्रातही के वळ एका अभ्यासविषयापुरतेच मर्यादित न राहता इतरही अभ्यासविषयांचे एकत्रित ज्ञान घेणे शक्य असल्याचे डॉ. रुपाली सांगतात. ‘माझं शिक्षण हे संगणकशास्त्रामधून झालेलं आहे, पण मूळची मी शेतकरी कुटुंबातून आलेली असल्याने कृषी/ वनस्पतिशास्त्रातही मला तेवढीच रुची असायची. कृषी क्षेत्रातील समस्या जवळून बघितल्या आहेत, त्यामुळे आपल्या शिक्षणाचा या क्षेत्रासाठी काय उपयोग करता येईल याचा मी कायम विचार करत आले. या कु तूहल आणि अभ्यासातूनच पुढे मी ‘हैपरस्पेक्टरल तंत्रज्ञाना’चा वापर करून पिकांचे वर्गीकरण आणि कीडरोग नियंत्रण हा विषय संशोधनासाठी निवडला.’ संगणकशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र यांचा संगम असलेला विषय निवडून आपण संशोधन के ले असल्याचे त्यांनी सांगितले. विविध शाखांमध्ये अभ्यास-संशोधनांच्या संधी उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींनाही याचा खरोखर फायदा करून घेता येईल, असेही डॉ. रुपाली यांनी सांगितले. ग्रामीण भागात दहावी-बारावीतील परीक्षेत उत्तम गुण मिळवून यशस्वी ठरणाऱ्या मुली अनेकदा इंग्रजीच्या न्यूनगंडापायी विज्ञानात गोडी असूनही या क्षेत्रापासून दूर राहताना दिसतात. मात्र कु ठलाही न्यूनगंड मनात न बाळगता संशोधन क्षेत्रात उतरलात तर विज्ञानाची गोडीच तुम्हाला या क्षेत्रातील दालने खुली करून देईल, असा सल्लाही त्यांनी दिला.

जगभरात करोना साथीने माजवलेला हाहाकार आणि त्याच काळात मूलभूत संशोधनावर दिला गेलेला जोर यामुळे के वळ आपल्या देशातच नाही तर जगात सगळीकडे संशोधन क्षेत्रावर भर देण्याची गरज वाटू लागली आहे. या परिस्थितीचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत करिअरसाठी सरधोपट मार्ग न निवडता विज्ञान-संशोधन क्षेत्रात अधिकाधिक महिलांनी उतरायला हवे. या क्षेत्रातील मुलींचे प्रमाण निश्चितच लक्षणीय आहे. पुढे जाऊन ही संशोधनमात्रा अधिक वाढीस लागली तर करिअरचे अनेक पर्याय आणि संधींची दालने खुली होतील, असा विश्वास व्यक्त के ला जातो आहे.

viva@expressindia.com