14 August 2020

News Flash

श्वानप्रेमी

समोरच्याचं मन ओळखणं ही गोष्ट कोणालाच कधीच सोपी नव्हती.

(संग्रहित छायाचित्र)

|| वेदवती चिपळूणकर

माणसाचं प्राणीप्रेम आगळंवेगळं खरं. पोटच्या मुलागत प्राण्यांना माया लावणारी, त्यांचे संगोपन करणारी, हरतऱ्हेने त्यांची सेवा करणारी मंडळी आपण आजूबाजूला पाहतो. मात्र, याच प्राणीप्रेमाचा करिअरच्या दृष्टीने विचार करण्याची कल्पना वाटते तितकी सोपी नाही. त्यातही प्राण्यांना पाळणे किंवा त्यांच्यासाठीही पाळणाघरं विकसित करणारी मंडळी आपण पाहिली आहेत. पण प्राण्यांचे मन ओळखून त्यांना काय हवं-नको ते समजावून घ्यायचे आणि त्यांच्या पालकांना नीट सांगायचे. थोडक्यात प्राण्यांचे मानसशास्त्र समजून घेऊन त्यात कारकीर्द घडवणारा हा तरुण अवलिया आहे..

समोरच्याचं मन ओळखणं ही गोष्ट कोणालाच कधीच सोपी नव्हती. माणसं माणसांचं मन ओळखू शकत नाहीत, त्यांच्या भावना समजू शकत नाहीत, त्यांची गरज ओळखू शकत नाहीत. मात्र विक्रम होशिंग हा तरुण थेट कुत्र्यांच्या मनातलं ओळखतो. त्यांना नेमकं काय हवं आहे हे त्याला समजतं, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे हे तो सांगू शकतो, त्यांना कसली गरज आहे ते तो ओळखू शकतो. तो फक्त कुत्र्यांचं मन ओळखतो असं नाही तर पाळीव कुत्र्यांच्या पालकांनाही समजावतो. त्यांचं समुपदेशन करतो. ‘डॉग बिहेविअर सायकोलॉजिस्ट’ अशी विक्रमची ओळख आहे आणि लौकिकही आहे. त्याची ख्याती अशी की कोणत्याही जातीचे कुत्रे, कितीही जास्त अ‍ॅग्रेसिव्ह असणारे कुत्रे आणि कोणाचंही न ऐकणारे कुत्रेही त्याचं बरोबर ऐकतात. त्यामुळे कितीही बिघडलेल्या कुत्र्याला तो सहज वळण लावू शकतो.

प्रत्यक्षात प्राण्यांसाठी काम करणं आणि त्यातही एखाद्या प्राण्यावर फोकस करून त्याच्यावरच विशेषत्वाने मेहनत घेणं या गोष्टींसाठी खूप अभ्यास आणि त्या अभ्यासाचा प्रॅक्टिकल उपयोग या दोन्हीचा मेळ साधणं गरजेचं असतं. प्राण्यांवर नुसतं प्रेम असणारे अनेक लोक असतात, पण प्रत्यक्ष त्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा बाळगून तसा प्रयत्न करणारे फार थोडे! विक्रमने आधी निवडलेला करिअरचा मार्ग सोडून या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल तो म्हणतो, ‘माझे एक मामा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समधले इंजिनीअर आहेत. त्यामुळे साहजिकच मलाही तोच सल्ला मिळाला. एक सर्टिफिकेट मिळालं की नीट नोकरी मिळेल, चांगले पैसे मिळतील आणि आयुष्य सेटल होईल. सुरुवातीला सगळ्यांचं ऐकून मी त्या मार्गाने गेलो. मात्र त्याची दोन र्वष झाल्यावर माझ्या लक्षात आलं की हे मला आवडत नाही आहे. इलेक्ट्रॉनिक्स मला आवडत होतं, पण आयुष्यभर त्यातच करिअर करावं इतकंही नाही!’ आपलं प्राणीप्रेम हेच आपलं उत्तम करिअरही होऊ  शकेल हेही आपल्याला तेव्हाच लक्षात यायला लागलं, असं सांगणारा विक्रम त्यानंतर मात्र घरच्यांना स्पष्टपणे मला हे आवडत नाही आहे, असं सांगून मोकळा झाला. मी ‘इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स’ सोडून दिलं आणि प्राण्यांच्या बाबतीत काहीतरी करायचं आहे या दृष्टीने प्रयत्न करायला लागलो, असं तो सांगतो.

प्राण्यांची वर्तणूक, त्यांचं मानसशास्त्र वगैरे गोष्टी आपल्याकडे फारशा प्रचलित नाहीत आणि त्यामुळे साहजिकच त्याचे फारसे कोणते अभ्यासक्रमही आपल्याकडे नाहीत. आपल्याकडे केवळ काही सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत. माणसांना प्राण्यांबद्दलच्या असणाऱ्या जाणिवेतूनच आपल्याकडे अनेक गोष्टी केल्या जातात, मात्र त्याचं प्रोफेशनल असं शिक्षण आपल्याकडे फारसं मिळत नाही. विक्रम आणि त्याची पत्नी कौशलिका धर्माधिकारी हे दोघे पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर पौडच्या जवळ स्वत:चं फॅसिलिटी सेंटर चालवतात. सुरुवातीला ते तिथे बोर्डिग म्हणजेच हॉस्टेलिंगचीही सुविधा देत असत, मात्र हळूहळू हॉस्टेलिंगचं काम वाढल्याने कान्सेलिंगकडे लक्ष देणं अवघड व्हायला लागलं. त्यामुळे त्यांनी संपूर्ण लक्ष काउन्सेलिंगकडेच देण्याचं ठरवलं. सध्या त्यांच्या फॅसिलिटीमध्ये पाळीव कुत्र्यांच्या पालकांचं आणि कुत्र्यांचं असं दोघांचंही काउन्सेलिंग केलं जातं. याबद्दल बोलताना, आमच्याकडे बोर्डिग सुरू असताना एकदा तर एका वेळी आमचे स्वत:चे सहा-सात तर बाहेरचे वीस-एक कुत्रे होते. त्यांना सकाळी आणि संध्याकाळी फिरायला नेताना सव्वीस कुत्रे आणि बरोबर आम्ही दोघे अशी फौज असे. मात्र काउन्सेलिंगवर अधिक लक्ष देता यावं म्हणून आम्ही बोर्डिग बंद केलं, असं त्याने सांगितलं. सध्या आम्ही केवळ काउन्सेलिंगवर लक्ष केंद्रित केलं आहे. माझी पत्नी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असल्याने पेटच्या पालकांच्या काउन्सेलिंगची जबाबदारी तिने घेतली आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कुत्र्यांचं बिहेविअर अ‍ॅनालिसिस मी स्वत: करतो, असं विक्रमने सांगितलं.

माणसांचं काउन्सेलिंग केलं जातं ही गोष्ट सर्वानीच ऐकली आहे. मात्र डॉग काउन्सेलिंग असं काही अस्तित्वात आहे हेच मुळात अनेकांना माहिती नाही. माणसांना त्यांचे प्रॉब्लेम्स ओळखून त्यांच्या वागण्या-बोलण्यात बदल करायला सुचवले जातात. मात्र कुत्र्यांकडून वागण्यातल्या बदलांची अपेक्षा करणं अवाजवीच आहे. कुत्र्यांच्या एखाद्या वर्तणुकीमागचं कारण शोधणं, त्यावर उपाय म्हणून त्याच्या पालकांना काही सल्ले देणं आणि अंतिमत: कुत्रा व त्याचा पालक यांच्यातलं बाँडिंग दृढ करणं ही कार्यपद्धती साधारणत: अवलंबली जाते. या प्राणीप्रेमातून सुरू झालेल्या त्याच्या व्यवसायाबद्दल बोलताना विक्रम म्हणतो, ‘मला कायमच माणसांपेक्षा प्राणी जास्त आवडतात. मी वेगवेगळे कोर्सेस करून वेगवेगळ्या संस्थांसोबत कामही करतो. हे काम करत असतानाच ही स्वत:च्या फॅसिलिटीची कल्पना सुचली. कोणताही व्यवसाय सुरू करायचा किंवा स्वत:चं काहीतरी सुरू करायचं तर पहिली गोष्ट लागते ती म्हणजे भांडवल आणि इन्फ्रास्ट्रक्चर! भरपूर भांडवल उपलब्धही नव्हतं आणि कर्ज घेण्याची आमची इच्छा नव्हती. मुळातच प्रचंड खर्च करून काही करावं असं आम्हाला वाटतही नव्हतं. त्यामुळे आम्ही घर बघताना जास्तीत जास्त रिसायकल्ड गोष्टी वापरता येतील असा प्रयत्न केला. आपोआपच आमचा खर्च कमी झाला आणि पर्यावरणाचीही काळजी घेतली गेली’. अशा पद्धतीने व्यवसाय सुरू करताना चहुबाजूंनी त्याचा नीट विचार केल्याने एरव्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करतोय म्हणून सामान्यत: डोक्यावर जो ताण येण्याची शक्यता असते तो आलाच नाही, असंही विक्रमने स्पष्ट केलं.

प्राणी त्यांना काय हवंय किंवा काय वाटतंय हे बोलून व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर त्यांच्या बिहेविअरल पॅटर्नवरून अंदाज बांधूनच तो संवाद होऊ  शकतो. याबद्दल कोणताही ठोस अभ्यासक्रम आपल्याकडे सध्याच्या घडीला उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकांना माहितीच नसलेल्या या वाटेवर चालणारा विक्रम नव्या मार्गाचा वाटाडय़ा ठरू शकतो.

आपल्याला मनापासून जे आवडतंय तेच केलं की आपोआप आपल्याला वाटा दिसत जातात. न आवडणाऱ्या गोष्टीत आपला वेळही जातो, श्रमही जातात आणि हे सगळं वायाच गेल्यात जमा आहे. आपण आपलं शंभर टक्के देऊन काम करत नाही. मेकॅनिकल काम असल्यासारखी कामं होत राहतात आणि मग त्यांना काही अर्थ उरत नाही. त्यापेक्षा आपल्या आवडीनुसार काम निवडलं तर आपण आपला संपूर्ण जीव ओतून काम करतो.      – विक्रम होशिंग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2019 12:08 am

Web Title: dog lover mpg 94
Next Stories
1 ५ जीची प्रतीक्षा!
2 फुलवा खामकर
3 अनिकेतचे अनुभवरंग
Just Now!
X