03 August 2020

News Flash

अपरिचित तरी उपयोगी!

‘न्यायवैद्यक दंततज्ज्ञ’ म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. हेमलता पांडे यांच्याशी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून संवाद

(संग्रहित छायाचित्र)

टीव्हीवरचे क्राइम शोज सगळ्यांनाच आवडतात आणि त्याबद्दल कुतूहलही वाटतं. एखाद्या अगदी छोटय़ाशा पुराव्यावरून अख्खं प्रकरण धसास लावणाऱ्या पोलिसांचं सगळ्यांना कौतुक वाटतं. या सगळ्यात सर्वाधिक कुतूहल कोणाबद्दल असेल तर ते फॉरेन्सिक एक्स्पर्ट्सबद्दल, कारण त्यांच्याबद्दल पुरेशी माहितीच मिळालेली नसते. केस, डीएनए, बोटांचे ठसे, इत्यादी बाबींवरून गुन्ह्यचा मागोवा घेणारे ते फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स ऐकून तरी माहिती असतात. मात्र दातांच्या अभ्यासावरून गुन्हे सोडवण्यात अमूल्य मदत केली जाते ही गोष्ट तशी अपरिचितच ! ‘फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी’ या क्षेत्रात शिक्षण घेत ‘न्यायवैद्यक दंततज्ज्ञ’ म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. हेमलता पांडे यांच्याशी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी पुणेकरांना मिळाली. मुळात ‘फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी’ म्हणजे काय इथपासून ते त्याचं महत्त्व काय अशा अनेक पैलूंवर त्यांना बोलतं केलं ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी रेश्मा राईकवार आणि भक्ती बिसुरे यांनी..

‘फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी’ म्हणजे काय?

फॉरेन्सिकमध्ये ज्या बाबी अभ्यासल्या जातात किंवा ज्या निर्णायक ठरवल्या जातात त्या गोष्टी या व्यक्तिगणिक ‘युनिक’ असाव्या लागतात. डीएनए, बोटांचे ठसे अशा गोष्टी या प्रत्येक व्यक्तीच्या युनिक असतात. एखाद्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे हे हुबेहूब दुसऱ्याच्या बोटांच्या ठशांसारखे नसतात. त्यामुळे बोटांचे ठसे किंवा डीएनए या गोष्टींवरून एखाद्याची ओळख पटवणं किंवा आरोपी दोषी की निर्दोष आहे हे ठरवणं शक्य होतं. जशा या दोन बाबी प्रत्येकाच्या युनिक असतात तसेच प्रत्येकाचे दातही युनिक असतात. कोणत्याही एका माणसाचे दात हे वैज्ञानिकदृष्टय़ा दुसऱ्या माणसासारखे नसतात. प्रत्येकाचा जबडा वेगळा असतो. याच तत्त्वाचा आधार घेऊन ‘फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी’ हे शास्त्र काम करतं. जेव्हा एखाद्या मृत व्यक्तीचं शरीर जळलेल्या अवस्थेत सापडतं किंवा त्याच्या मृत्यूला बराच काळ लोटल्यामुळे शरीराचं विघटन व्हायला सुरुवात झालेली असते किंवा शरीर पूर्ण सडून केवळ सांगाडाच हाती लागतो, अशा वेळी बोटांचे ठसे आणि डीएनए या दोन्ही गोष्टी मिळणं जवळजवळ अशक्य होऊन जातं. तिथे हे न्यायवैद्यक दंतशास्त्र कामी येतं. त्याचं कारण म्हणजे दात ही गोष्ट सांगाडय़ासोबतही तशीच राहते. दातांचं विघटन होण्यासाठी किंवा संपूर्ण नाश होऊन जाण्यासाठी बराच काळ जावा लागतो. त्यामुळे अशा अडचणीच्या केसेसमध्ये दातांच्या अभ्यासाद्वारे ओळख पटवून देणारं हे शास्त्रच सर्वाधिक उपयोगी ठरतं.

ऑप्शनला टाकलेल्या धडय़ातून सापडली वाट!

नाशिकमधील प्रवरा, लोणी इथे माझं डेंटल कॉलेज होतं. बीडीएसच्या तिसऱ्या वर्षांला असताना आम्हाला पुस्तकात एक लहानसा चॅप्टर ‘फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी’वर होता. मात्र त्यातली माहिती अत्यंत अपुरी होती आणि सीनिअर्सच्या गाइडन्सनुसार तो भाग परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा नव्हता. ऑप्शनला टाकायचा धडा असल्यामुळे तो कोणीही लेक्चरमध्ये शिकवला नाही. पण, मी लहानपणापासून ‘शेरलॉक होम्स’च्या कथा आणि ‘ब्योमकेश बक्षीं’नी सोडवलेली प्रकरणं हे सगळं वाचत आणि बघत मोठी झाले होते. त्यामुळे त्यातल्या फॉरेन्सिक या शब्दाने मला स्वस्थ बसू दिलं नाही. मी त्याबद्दल वाचायला लागले, शोधायला लागले आणि मग मला समजलं की भारतात हे कुठेच शिकवलं जात नाही. पण, इंटरपोलचा अभ्यास केला तर ही सगळ्यात सोपी आणि वैज्ञानिक प्रक्रिया म्हणून ‘फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी’ला मान्यता आहे. बऱ्याच शोधानंतर हे सापडलं की यूकेला या शास्त्राचं शिक्षण घेता येतं. त्यामुळे बीडीएस पूर्ण झाल्यावर पदव्युत्तर शिक्षण याच विषयात घ्यायचं हे मी नक्की केलं. कुटुंबात कोणीच डॉक्टर नसल्यामुळे कोणालाच यातल्या शिक्षणानंतरचा स्ट्रगल आधी लक्षात आला नाही आणि मी हसतखेळत शिक्षणासाठी यूकेला गेले.

थिअरी आणि प्रॅक्टिकलमधला फरक

एखाद्या विषयाबद्दल पुस्तकात किंवा इंटरनेटवर वाचून प्रभावित होणं आणि प्रत्यक्षात त्या लॅबमध्ये मृतदेहासमोर उभं राहून त्या गोष्टी शिकणं यात प्रचंड फरक आहे. पुस्तकात ते जितकं आकर्षक वाटतं तितकंच प्रत्यक्षात ते भीतिदायक वाटू शकतं. एकतर तो मृतदेह असतो, त्याला वास येत असतो, काही वेळा त्याला काही

इन्फे क्शन झालेलं असतं, कधी त्यात वम्र्स असतात आणि अशा सगळ्यात मन घट्ट करून तुम्हाला काम करायचं असतं आणि तेही पूर्ण लक्ष देऊ न! अनेकदा या क्षेत्राबद्दल नुसतं वाचून किंवा क्रॅश कोर्स करून अनेकजण यात उतरतात, मात्र त्यांना प्रॅक्टिकल अनुभव काहीच नसतो. त्यामुळे कामाच्या वेळी अनेकांना मृतदेह बघून उलटी होते, कामावर लक्षच केंद्रित होत नाही. त्यामुळे शिकत असतानाच या क्षेत्राचा प्रॅक्टिकल अभ्यास असणं गरजेचं आहे. आपल्या कामाच्या थिअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये किती फरक आहे हे तिकडे प्रत्यक्ष शिकायला लागल्यावर कळलं.

यूकेतला स्ट्रगल

माझ्यासोबतची इतर देशांतील मुलं ही त्यांना त्यांच्या सरकारने शिक्षणासाठी दिलेल्या फण्ड्समधून हे शिकायला आलेली होती. आपल्याकडे जिथे या शाखेबद्दल ज्ञानच नाही तिथे फण्ड्स वगैरे तर दूरच! माझ्या शिक्षणाची फी तर आईबाबांनी भरलेली होती, मात्र तिथे सव्‍‌र्हाइव्ह होण्यासाठी जे करायचं होतं ते मलाच तिथे राहून करावं लागणार होतं. रोजच्या दुधाच्या छोटय़ा ग्लाससाठी किती पाऊंड्स लागतायेत हे बघून ‘त्यापेक्षा बिनदुधाची कॉफीच पिऊया’ असंही अनेकदा वाटायचं. मी पहाटे पाच वाजता एका ग्रोसरी शॉपमध्ये काम करायचे, नऊ  वाजता लेक्चर्सना जायचे आणि संध्याकाळी एका वयस्कर बाईंची केअरटेकर म्हणून काम करायचे. या सगळ्यातच मला माझा अभ्यासही करायचा होता, कारण त्याचसाठी मी इथे आले होते.

प्रश्नाचे उत्तर मिळाले

मी सातारा येथून फॉरेन्सिकमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे. न्यायवैद्यक दंतशास्त्राबद्दल आमच्या क्षेत्रात अनेक मतप्रवाह आढळून येतात. हा विषय फॉरेन्सिक तज्ज्ञाने शिकवावा किंवा दंतवैद्यक केलेल्या प्राध्यापकाने याबद्दल अनेक वाद आहेत. या प्रश्नाचं उत्तर मला या कार्यक्रमात मिळालं. डॉ. हेमलता पांडे यांनी आपण हाताळलेल्या विविध प्रकरणांविषयी रंजक पद्धतीने माहिती सांगितली. यांसारखे गप्पांचे कार्यक्रम मुंबई-पुण्यासह राज्याच्या इतरही भागात व्हायला हवेत.

– सुश्मिता जैन

पर्यायी विषयात करिअर!

डॉ. हेमलता पांडे यांचे सत्र मनापासून आवडले. ‘लोकसत्ता’सारखे वृत्तपत्र यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेतो हीच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. मी फॉरेन्सिक क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतो आहे, या क्षेत्राबद्दल समाजात पाहिजे तशी जागरूकता नाही हे मी अनुभवले आहे. मी स्वत: ‘फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी’ या क्षेत्राविषयी प्रथमच ऐकलं. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात विषयांची निवड करावी लागते, इथे तर पर्याय म्हणून बाजूला टाकलेल्या विषयातही करिअर करता येते ही गोष्ट आज मला समजली. मला फॉरेन्सिकमधील विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असल्याचे माझ्या शंकाचे निरसन होण्यास मदत झाली.

– वैष्णव जाधव

प्रकरणातील बारकावे समजले

मी ‘लोकसत्ता’ आणि विशेषत: ‘व्हिवा’ पुरवणीचा नियमित वाचक आहे. खाद्यपदार्थ, फॅशन, पर्यटन याविषयी माहितीपर लेख असतात. मी बायोसायन्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. या कार्यक्रमात हेमलता पांडे यांनी कोपर्डी तसेच विमान अपघातासारखी प्रकरणे हाताळतानाचे अनुभव सांगितले. यामुळे यासारखी प्रकरणे हाताळतानाचे बारकावे समजण्यास मदत झाली. नैसर्गिक आपत्ती, बलात्कार तसेच मारहाणीसारख्या प्रकरणात नुसत्या दातांवरून कसे आरोपी आणि हरवलेल्या माणसांचा शोध घेतात हे जास्त आवडले.

– अथर्व आठवले

फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजीबद्दल जागरूकता

मी एक दंतवैद्य असून फॉरेन्सिकमध्ये पदव्युतर शिक्षण घ्यायचे आहे. या कार्यक्रमात माझ्या मनातील सर्व प्रश्नांचे निरसन झाले. एक महिला न्यायवैद्यक दंतशास्त्र या विषयाला आपले करिअर निवडते हीच माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. देशात फॉरेन्सिकबद्दल खूप  उदासीनता दिसून येते. या कार्यक्रमामुळे वाचकांमध्ये या क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. दंतशास्त्राच्या सहाय्याने आरोपीचा माग काढता येऊ  शकतो, याविषयीची अधिक माहिती मला या कार्यक्रमामुळे समजली.

– डॉ. केतकी देशमुख, दंतवैद्य.

डॉ. पांडे यांची कथा प्रेरणादायी

मी औरंगाबाद येथून फॉरेन्सिक विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. भारतात विद्यार्थी, तसेच पोलीस यांना या क्षेत्राविषयी माहितीची वानवा दिसून येते. प्रत्येक पोलीस ठाण्यात एक फॉरेन्सिक संशोधक असणे गरजेचे आहे, ही बाब पोलिसांच्या लवकर पचनी पडत नाही. डॉ. हेमलता पांडे यांची कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. दंतशास्त्र करून त्यांनी परदेशात शिक्षण घेतले. त्यांच्यासारख्या वेगळी वाट चोखाळणाऱ्या महिलांना व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’चे मनापासून आभार.

– रचना जाधव

मार्गदर्शनपर कार्यक्रम

न्यायवैद्यक दंततज्ज्ञ डॉ. हेमलता पांडे यांनी केलेलं मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचं ठरलं. मीसुद्धा बीडीएसच्या शेवटच्या वर्षांला असल्याने न्यायवैद्यक दंत शास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले आहे.  दंतशास्त्र करणारे खूप विद्यार्थी असून याचा उपयोग एखाद्या हरवलेल्या व्यक्तीचा अथवा आरोपीचा शोध घेण्यासाठी होऊ  शकतो ही गोष्ट मला जास्त आवडली. त्यांनी या विषयाची माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत दिली.

– चिन्मयी देवचके

काम मिळवण्याची धडपड

परदेशातलं शिक्षण पूर्ण करून इथे आले तर होते, पण इथे माझ्या शिक्षणाला अनुरूप कामच नव्हतं. अनेक ठिकाणच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये चौकशी केली, पण असा कोणताही विषयच त्यांच्याकडे नव्हता. भारतभरातल्या फॉरेन्सिक मेडिकल डिपार्टमेंट्समध्ये प्रयत्न केले. जवळजवळ एक ते दीड वर्ष मी केवळ काम शोधत होते. तेव्हा खूप ताण आला होता की आपण आपल्या पालकांचे एवढे पैसे खर्च केले आणि आता त्याचा प्रत्यक्षात काही उपयोगच होत नसेल तर सगळे पैसे वायाच गेले! एकदा मी केईएममधल्या फॉरेन्सिक विभागप्रमुखांशी बोलले. त्यांच्याकडे मी जायच्या आधी एक केस आली होती, पण त्यांच्याकडे एक्स्पर्ट नसल्यामुळे त्यावेळी त्यांना काहीच करता आलं नव्हतं. माझ्या कामाची फॉरेन्सिकसाठी गरज आहे हे त्यावेळच्या डीन कामत मॅडमनाही पटलं आणि त्यांनी तिथे काम सुरू करायला परवानगी दिली. साधारण सहा महिन्यांत याची उपयोगिता पटवून देण्याचं आव्हान माझ्यासमोर होतं आणि आज सहा वर्ष झाली हा विभाग आम्ही केईएममध्ये चालवतो आहोत.

मला माझं काम आवडतं

काम सुरू करून दोन आठवडे झाले तरी माझ्याकडे काही केसच नव्हती, कारण पोलिसांनाही या क्षेत्राची माहिती नव्हती. सुरुवातीच्या काळात वर्तमानपत्रातील बातम्या वाचून आम्हीच पोलीस स्टेशनला फोन करायचो आणि ‘आम्ही मदत करू शकतो’ हे सांगायचो. दोन आठवडय़ांनंतर एक केस आली जी रेप केस होती आणि बाइट मार्क्‍स हा एक पुरावा होता. त्या बाबतीत आम्ही जो अभ्यास केला आणि निष्कर्ष मांडला तो न्यायालयाने स्वीकारला आणि दोषींना शिक्षाही झाली. त्या पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्याच्या कामात आपला हातभार लागला याने खूप बरं वाटलं. व्हिक्टिम्सना न्याय मिळण्यासाठीच्या प्रक्रियेत आमचा सक्रिय सहभाग असतो आणि आमची त्यासाठी मदत होते याचं प्रचंड समाधान मला आहे. जिवंतपणी माणूस जो आशीर्वाद देतो त्यासोबत अपेक्षा जोडलेल्या असतात, पण मृत्यू झालेल्या या व्यक्तींना काहीच नको असतं, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद निरपेक्ष असतात असं मी मानते. पहिली केस आमच्याकडे आली ती आम्हीच त्यासाठी प्रयत्न केले म्हणून!

पोलिसांना मदत

या क्षेत्रासाठी सरकारने पुरेसे फण्ड्स कधी दिले नव्हते. मात्र आता आता सरकार त्याचा गांभीर्याने विचार करून त्याला महत्त्व द्यायला लागलं आहे. या गोष्टीचा पोलिसांना प्रचंड उपयोग होतो आणि त्यांना खूप मदत होते. एकवेळ एखादा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही फिरवला जाऊ  शकतो, पण वैज्ञानिक किंवा मेडिकल पुरावा कधीच बदलत नाही, जुना होत नाही. वैज्ञानिक पुराव्यांवर कोर्ट कधीही जास्त विश्वास ठेवतं आणि साहजिकच सगळ्या न्यायालयीन प्रक्रियाही वेगाने होतात. कोपर्डी बलात्कार प्रकरणात आम्ही न्यायालयात पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून आमची बाजू अगदी व्यवस्थितरित्या पटवून दिली होती. दिल्लीतल्या आरुषी प्रकरणात अनेक फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे पुसले गेले होते. असं होऊ  नये म्हणून सगळ्या स्तरांतल्या पोलीस ऑफिसर्सना फॉरेन्सिक एव्हिडन्स जपण्याबद्दल शिकवलं गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही रेग्युलर पोलीस ट्रेनिंग देत असतो आणि अवेअरनेस कार्यक्रमही घेत असतो.

दातांना फारसं काही होत नाही

कोणत्याही आपत्तीच्या काळात व्हिक्टिम्सची ओळख लवकरात लवकर पटवण्यासाठी याची खूप मदत होते. अगदी पूर किंवा भूकंपातही दात या गोष्टीला काही हानी पोहोचत नाही. मातीखाली गाडला गेलेला दातही अनेक दशकं तसाच राहतो. सांगाडे मिळाले तरी त्यासोबतही दात असतातच. त्यामुळे दात ही एक गोष्टच अशी आहे जी कित्येक काळानंतरही त्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात मदत करू शकते. अगदी उत्खननात मिळालेल्या ह्यूमन रिमेन्सवरूनही साधारण त्यांचं खाद्य कोणत्या प्रकारचं असेल, त्यांचे वय काय असेल याचाही अंदाज बांधता येतो. त्यामुळे दात ही गोष्ट एखाद्या व्यक्तीबद्दल खूप काही माहिती देऊ शकते.

आव्हानं असतातच!

मेल डॉमिनेटेड क्षेत्रात एका महिलेने एक विभाग नव्याने सुरू करून त्यात काही काम करायचा प्रयत्न करणं हे मुळातच किती चॅलेंजिंग आहे! त्यामुळे आव्हानं असतात आणि ती असणारच! आपल्याच सहकाऱ्यांकडून होणारा त्रास हेही एक मोठं आव्हान असतं. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला नशिबाने मिळाली आहे ती म्हणजे माझं कुटुंब! वर्क – लाइफ बॅलन्स ज्याला म्हणतात तो काही माझ्याकडून सांभाळला जात नाही. माझं सगळं लक्ष माझ्या कामाकडेच असतं. माझी फॅमिली मला प्रचंड समजून घेते आणि सपोर्ट करते हे माझं नशीबच आहे आणि त्यामुळे बाकी बाहेरच्या आव्हानांना तोंड द्यायला मला काही वाटत नाही.

डीएनएपेक्षा हा सुकर पर्याय

दात, डीएनए किंवा बोटांचे ठसे या सगळ्यासाठीच अ‍ॅंटी-मॉर्टेम आणि पोस्ट-मॉर्टेम असे दोन्ही रेकॉर्ड असावे लागतात. ज्याच्यामुळे व्यक्तीची ओळख पटवणं शक्य होतं. एका डीएनएच्या टेस्टसाठी जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो. ज्यावेळी तो डीएनए दुसऱ्या कोणाशी जुळवून बघायचा असतो त्यावेळी साहजिकच त्या माणसाची पण टेस्ट करावी लागते. त्यामुळे सगळं मिळून एकाची ओळख पटवणं हे साधारण पन्नास हजारांच्या घरात जातं आणि त्यातही व्हीआयपी केस असेल तर कमीत कमी आठ दिवस रिपोर्ट्स येण्यासाठी लागतात. या सगळ्यापेक्षा डेन्टल आयडेंटिफिकेशन स्वस्त आणि पटकन होतं. दाताचा केवळ एक्सरे काढला जातो आणि त्याचा खर्च शंभर रुपयांहून अधिक येत नाही, वेळही जास्त लागत नाही. एखाद्या व्यक्तीचा अ‍ॅंटी-मॉर्टेम डेन्टल रिपोर्ट नसेल तर त्या माणसाच्या फोटोवरून डेन्टल पॅटर्न ओळखता येऊ  शकतो आणि पोस्ट-मॉर्टेम डेन्टल रिपोर्ट त्याच्याशी जुळवून बघता येऊ  शकतो. घाटकोपर प्लेन क्रॅ श प्रक रणामध्ये आम्ही तपास करत होतो तेव्हा सगळे मृतदेह जळलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे अ‍ॅंटी-मॉर्टेम डेन्टल रेकॉर्ड कोणाचे शोधायचे ते कळायला मार्ग नव्हता. त्यावेळी आम्हाला त्यांच्या सेल्फीजचा उपयोग झाला.

मायदेशाची ओढ..

भारतात आता अनेक ठिकाणी या प्रकारचे कोर्सेस आहेत. मात्र जेव्हा मी शिकले तेव्हा भारतात काहीच नव्हतं. मी परत येण्याचं ते एक मोठं कारण होतं की मला हे सगळं भारतात आणायचं होतं. याबद्दलचं शिक्षणही सुरू करायचं होतं आणि या माध्यमातून आपल्यासारख्या मोठय़ा देशात गुन्हे सोडवण्यासाठी मदत व्हावी हाही माझा उद्देश होता. दोन वेगळ्या देशांतले कामाचे दोन वेगळ्या प्रकारचे अनुभव माझ्याकडे होते आणि त्यामुळे भारतात काम करणं थोडं अवघडही होतं. यूकेमध्ये माणसं ही जास्त प्रोफेशनल असतात आणि आपल्याकडे आपण जास्त भावनिक असतो. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी वेगळ्या पद्धतीने बोलावं लागतं, त्यांना वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं आणि खरं तर याचमुळे आपल्याकडे या पद्धतीच्या इन्व्हेस्टिगेशनची जास्त गरज आहे. या सगळ्यासाठी मी स्ट्रगल आहे, हे माहीत असूनही भारतात परत आले.

नेमकं  काय आणि कसं करतो?

जेव्हा एखाद्या मृतदेहाबद्दल काहीच माहिती मिळत नाही किंवा कोणती मिसिंग केसही सापडत नाही तेव्हा आम्ही त्याची बायोलॉजिकल प्रोफाइल तयार करून ठेवतो. हाडं, दात, चेहरा, डीएनए अशा सगळ्याचा रेकॉर्ड आम्ही त्या प्रोफाइलमध्ये ठेवतो. एखाद्या केसमध्ये ओळख पटू नये म्हणून चेहऱ्याची विटंबना केली जाते, अशा वेळी फेशियल रिकन्स्ट्रक्शन करावं लागतं. फेशियल रिकन्स्ट्रक्शनमुळे पोलिसांना एक चेहरा तर मिळतो, मग त्याची छायाचित्रे घेऊन ते त्यांच्या रेकॉर्डमधली मिसिंग लोकांची छायाचित्रे किंवा त्यांचे इन्फॉर्मर यांना पाठवून त्यांच्याकडून पडताळणी करून घेऊ शकतात. त्यांना तपास पुढे नेण्यासाठी याचा बराच फायदा होतो.

शब्दांकन : वेदवती चिपळूणकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 5:14 am

Web Title: dr hemlata pande forensic odontology lokasatta viva lounge abn 97
Next Stories
1 तरुणाईची अनोखी भटकंती
2 अराऊंड द फॅशन : प्लस फॅशन
3 टेकजागर : मित्र तोच जाणावा..
Just Now!
X