26 May 2020

News Flash

क्षण एक पुरे! : प्रॅक्टिकल फिलॉसॉफर

सामान्य नजरेतून पाहिलं तर ती हुशार आहे, पीएच.डी. के लेली डॉक्टर आहे आणि प्रोफेसर आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

तत्त्वज्ञान म्हणजे पुस्तकी विद्या नव्हे, दोन भिंतींच्या आत बसून घेता येणारे शिक्षण तर नाहीच नाही, हा वेगळा दृष्टिकोन बाळगल्यानेच डॉ. हिमानी चौकर या सर्वसामान्य तरुणीने इतरांपेक्षा वेगळी वाट निवडण्याचे धाडस केले. आपल्या आवडीच्या विषयात प्रत्यक्ष फिरून संशोधन करणारी, जे शिक्षण घेतलं आहे ते प्रत्यक्ष आयुष्यात कशा प्रकारे उपयोगी ठरतं आहे हे समजून घेणारी हिमानी म्हणूनच चारचौघींपेक्षा वेगळी आहे.

सामान्य नजरेतून पाहिलं तर ती हुशार आहे, पीएच.डी. के लेली डॉक्टर आहे आणि प्रोफेसर आहे. मात्र त्या पीएच.डी.साठी तिने चौकटीच्या बाहेर जाऊन मेहनत घेतली आहे. आपण शिकलेल्या आणि शिकवत असलेल्या विषयाचा प्रत्यक्ष आयुष्यातला उपयोग शोधण्याची तिची धडपड तिला सगळ्यांपेक्षा जरा वेगळं ठरवते. पाच वर्षांच्या शब्दश: खडतर परिश्रमांनंतर तिला ‘डॉक्टर हिमानी चौकर’ ही ओळख मिळाली. तत्त्वज्ञान हा तिचा विषय आणि प्रत्यक्षात त्याची ‘मार्के ट व्हॅल्यू’ खरं तर शून्य! पण त्यातूनही जीवनाशी जोडणारं तत्त्व शोधण्याच्या तिच्या सकारात्मक अट्टहासाने तिला ‘टेड एक्स’सारख्या मंचावर बोलण्याची संधी मिळवून दिली. अरुणाचल प्रदेशात जाऊन तिने केलेल्या या रिसर्चमुळे तिचं स्वत:चं अनुभवविश्व तर समृद्ध झालंच, मात्र त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एका प्रमुख धार्मिक दिवशी हिमानीचा टेड टॉक स्वत:च्या फेसबुकवरून शेअर करत तिचं कौतुक केलं.

एक मुलगी घरापासून एवढय़ा लांब, अनोळखी प्रदेशात जाऊन राहणार आणि रिसर्च करणार हा धोपटमार्गाला न पटणारा आणि न पचणारा निर्णय होता. मात्र हिमानी तिच्या निर्णयावर ठाम होती. घरी टेबल-खुर्चीवर बसून रिसर्च करण्यासारखे अनेक विषय असतानाही एवढा अवघड विषय निवडल्याबद्दल अनेकांनी तिला वेडय़ातही काढलं. याबद्दल सांगताना हिमानी म्हणते, ‘मी पदवीला फिलॉसॉफी हा विषय घेतला तेव्हा मला त्यात इंटरेस्ट वाटला हे त्याचं प्रमुख कारण होतं. स्वत:चा विचार करणं हे या विषयात अपेक्षित आहे. त्यामुळे त्यात पुढे स्कोप किती, वगैरे याचा विचार न करता मी माझा विषय निवडला. तेव्हाही थोडय़ाफार लोकांनी मला प्रश्न विचारले. मात्र जेव्हा मी अरुणाचलला जाऊन रिसर्च करण्याचा निर्णय सांगितला तेव्हा प्रत्येकाने मला वेगवेगळ्या बाबतीतले प्रश्न विचारून भंडावून सोडलं’. इतक्या शंकाकुशंकांनंतरही मी माझ्या निर्णयावर ठाम होते आणि मला माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता, असं हिमानी सांगते.

‘मी लहान असल्यापासून बघत आले आहे की, माझे बाबा दर सुट्टीत ईशान्येकडच्या या राज्यांमध्ये जाऊन काम करतात. जेव्हा मला रिसर्चसाठी विषय सापडत नव्हता तेव्हा बाबांनीच मला ही कल्पना सुचवली. माझा विषय तत्त्वज्ञान असला तरीही मला कोणताही सैद्धांतिक विषय संशोधनासाठी घ्यायचा नव्हता. मला फिलॉसॉफी या विषयाचं प्रत्यक्षातलं उपयोजन अभ्यासायचं होतं आणि मांडायचं होतं. त्यामुळे एखाद्या दूरच्या भागात जाऊन तिथल्या लोकांच्या धार्मिक, सामाजिक विचारांवर संशोधन करणं हे मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं’, असं तिने सांगितलं. निर्णय पक्का करायच्या आधी तिने तिच्या डिपार्टमेंट हेडचं मार्गदर्शन घेतलं. प्रत्येक गोष्ट तत्त्वज्ञानाला आणून कशी जोडायची आणि प्रत्येक गोष्टीत तात्त्विक सिद्धांत कसे शोधायचे यावर त्यांनी मला अनेक कल्पना सुचवल्या आणि मी फायनली अरुणाचल प्रदेशला जाऊन माझी पीएच.डी. करायचं ठरवलं, असं हिमानी सांगते.

अर्थात, एक निर्णय घेणं आणि प्रत्यक्षात तो अवलंबणं यात खूप तफावत असते. याचा प्रत्यय हिमानीला अरुणाचलमध्ये गेल्यावर आला. बसल्या-बसल्या कागदावर प्लॅनिंग करणं जितकं सोपं आहे, तितकंच खरोखर त्या प्लॅनिंगनुसार कामं होणं जिकिरीचं आहे. जेव्हा ठरवल्याप्रमाणे काहीच होत नाही तेव्हा आपल्या निर्णयाबाबत शंकाही यायला लागते. या सगळ्या अनुभवाबद्दल हिमानी म्हणते, ‘पहिल्या खेपेस माझ्यासोबत माझे बाबाही आले होते. आमची सोय एका शाळेत केली होती. माझं प्लॅनिंग कागदावर अगदी व्यवस्थित होतं. एका दिवसात मी अमुक एक घरं पूर्ण करणार वगैरे माझं ठरलं होतं. पहिल्याच दिवशी मी संध्याकाळी बाहेर पडले. एका घराचा दरवाजा वाजवला. आतून एक बाई बाहेर आली आणि तिला मी तिच्या धर्माबद्दल विचारलं. तिथले बहुतांशी लोक दोनिपोलो या धर्माचे आहेत. त्या बाईला धार्मिक प्रश्न आवडला नसावा किंवा मी तिच्या कोणत्या भावना दुखावल्या वगैरे असं तिला वाटलं असेल, पण तिने माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. हाच अनुभव मला पुढच्याही दोन घरांमध्ये आला. मग मात्र माझा सगळा धीरच खचला आणि मी अजून एकाही घरी न जाता सरळ शाळेत परत गेले. मला चक्क रडायलाही आलं. तेव्हाही बाबांनी मला समजावलं.’ अशी आठवण तिने सांगितली. या अनुभवानंतर कदाचित माझ्या विचारण्याच्या पद्धतीत काही बदल हवा असेल किंवा कदाचित थेट धर्माबद्दल न विचारता कोणत्या दुसऱ्या पद्धतीने विचारणं गरजेचं असेल, अशा गोष्टींबद्दल बाबांनी मला विचार करायला सांगितला. कोणता विषय घेऊन फसलो असंही मला एकदा वाटलं. मात्र थोडा विचार करून स्वत:ला सांभाळल्यावर दुसऱ्या दिवशीपासून मी नव्या ऊर्जेने आणि नव्या पद्धतीने कामाला लागले. हळूहळू मला हवा तसा प्रतिसाद मिळायला लागला, असं हिमानी म्हणते.

दरवर्षी सुट्टीच्या दिवसांत अरुणाचलला जाऊन रिसर्च पूर्ण करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. शिकवण्यातून सलग सुट्टी घेऊन मोठय़ा कालावधीसाठी तिथे जाऊन राहणं प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. मात्र प्रत्येक वेळी सुट्टीत अरुणाचलला गेलं की ‘झीरो’ नावाच्या गावातल्या एका पुजारी कु टुंबाकडे राहून हिमानीने आपलं संशोधन पूर्ण केलं. त्यांच्या समाजाबद्दल, राहणीमानाबद्दल हिमानी म्हणते, ‘आपण स्वत:ला प्रगत म्हणवतो; मात्र खरे प्रगत तर ते लोक आहेत. त्यांना आदिवासी जमात म्हणायचं तर त्यांच्यात बायकांना व्यवस्थित मान आहे, त्यांच्याकडे इंटरनेटसारख्या सुविधा आहेत, ते स्वयंपूर्ण आहेत, त्यांना हिंदी भाषाही येते, जगात काय चाललंय याचं ज्ञान आहे आणि कोणत्याही टिपिकल विचारांचा प्रभाव त्यांच्यावर नाही. तिथल्या शाळेतल्या शिक्षकांनी मला विचारलं, मात्र त्या आदिवासींपैकी एकानेही मला कधी लग्न झालंय तर मंगळसूत्र का घालत नाहीस, वगैरे असं काहीही विचारलं नाही. ज्यांच्या घरी मी राहिले होते त्यांची आपुलकी इतकी होती की जितक्या वेळा जितके दिवस मी जाईन तितके दिवस ते मला त्यांच्याचकडे ठेवून घ्यायचे. स्वत: रोज मांसाहार करत असले तरी माझ्यासाठी कायम शाकाहारी जेवण तयार व्हायचं’. तिथल्या घरात तीन पिढय़ा नांदत होत्या, मात्र कधीच कोणत्या लहान मुलाने मला त्रास दिला नाही, दंगा केला नाही की अभ्यासात खोडय़ा काढल्या नाहीत. ते पुजारी काका रोज त्यांच्या पत्नीकडून पैसे घेऊन बाहेर पडायचे आणि त्यात त्यांना काहीही वाटायचं नाही. आपल्यातला आणि त्यांच्यातला कल्चरल डिफरन्स मला उलट पद्धतीने जाणवला, असं हिमानी सांगते. वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध होत जाणं हेच शिक्षणाचं आणि संशोधनाचं खरं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट हिमानीला कळलं आहे, पटलं आहे आणि तिने ते प्रत्यक्ष आयुष्यात आचरलंही आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष जगण्यातून तत्त्वज्ञान वेचून ते आत्मसात करू पाहणारी तिची वाट अधिक खरी आणि तेवढीच वेगळीही आहे.

मुलांनी कायम संशोधन असं करावं जे त्यांना स्वत:ला समृद्ध करणारं असेल. ‘द रोड लेस टेकन’ या मार्गाने जाण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. समाजाला काही तरी देता यावं, आपल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग समाजाला व्हावा आणि आपल्याला स्वत:लाही त्यातून काही मिळावं अशी उद्दिष्टं ठेवून रिसर्चकडे बघावं.

– डॉ. हिमानी चौकर

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2019 1:23 am

Web Title: dr himani chaukar practical philosopher abn 97
Next Stories
1 टेकजागर : गिऱ्हाईक बनू नका!
2 फिट-नट : शिव ठाकरे
3 जगाच्या पाटीवर : अभ्यासास कारण की..
Just Now!
X