माझा रूममेट हल्ली खूप विचित्र वागतो. तो सकाळच्या ऐवजी दुपारी उठतो आणि जवळजवळ रात्रभर जागा असतो. त्यामुळे माझी झोप डिस्टर्ब होतेय. तो कॉलेजसुद्धा अटेंड करत नाही आजकाल. इन फॅक्ट, परवा कॉलेजकडून निरोप गेला म्हणून त्याचे आईवडील गावाहून आले, तेव्हा मला हे कळलं, कारण आमची कॉलेजेस वेगवेगळी आहेत. आमचं एकमेकांशी दिवस-दिवस बोलणं होत नाही. सगळेजण म्हणतात की तो ड्रग्ज घेतो. मलाही तसंच वाटायला लागलंय. त्याला मी एकदा तसं विचारलंही, पण तो चिडलाच माझ्यावर. पण परवा रात्री त्याचे दोन नवीन मित्र आले होते रूमवर. त्यांच्या बोलण्यावरून आता माझी खात्री झालीय. त्यांनी मला स्मोक करायचा खूप आग्रह केला. मला आता रूममध्ये राहाणं धोक्याचं वाटायला लागलंय. मी काय करू?- सुबोध
हाय सुबोध, तुला दोन फ्रंट्सवर विचार करायचाय. एक म्हणजे तुझी स्वत:ची सेफ्टी आणि दुसरं म्हणजे तुझ्या रूममेटचं वेलबीइंग.
खरं सांगायचं तर तुमच्या वयाच्या मुलांबरोबर काम करण्याआधी माझाही विश्वास बसत नसे की, अ‍ॅडिक्शन इतकं कॉमन असेल म्हणून. पण अनेक जणांशी बोलल्यावर कळलं की हॉस्टेलमध्ये, कॉलेजेसच्या बाहेर ड्रग्ज अगदी सहज उपलब्ध असतात. तरुण वयात वाटणाऱ्या बेदरकार, क्युरिअस, क्रांतिकारी अ‍ॅटिटय़ूडचा परिणाम असेल किंवा मित्रांचा प्रभाव असेल किंवा नव्यानं मिळालेलं स्वातंत्र्य असेल किंवा या सगळ्याचा एकत्रित परिणाम असेल. पण या सगळ्यामुळे ड्रग्जकडे मुलं वळतात. एकदा घेऊन तर पाहू, टेस्ट कशी असते ते तरी बघू. एवढे सगळे आग्रह करतायत तर घेऊ एकदा, आपल्याला नेहमी थोडंच घ्यायचंय, अशाप्रकारे सुरुवात होते. त्यातून सवय लागते, मग चटक लागते आणि हळूहळू ते घेतल्याशिवाय चैन पडेनासं होतं. शेवटी-शेवटी तर अशी परिस्थिती येते की ड्रग्ज घेतले नाहीत तर त्रास व्हायला लागतो. कुणीही ठरवून काही अ‍ॅडिक्ट होत नाही, पण आपला फुल कंट्रोल आहे असं वाटता-वाटता कधी ड्रग्ज आपल्यावर कंट्रोल गाजवायला लागतात, आपल्याला गुलाम बनवतात ते लक्षातच येत नाही. हे ड्रग्ज वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्या डिटेल्समध्ये आपण जाणार नाही आहोत. पण सगळ्यांचे साधारण दुष्परिणाम सारखे असतात. वेगवेगळे भास, जजमेंट न राहणे, शरीरावरचा ताबा सुटणे, शुद्ध हरपणे, भुकेचं, झोपेचं चक्र कोलमडणे, खोकला, चक्कर येणे असं अनेक प्रॉब्लेम्स येतात. शिवाय व्यसनासाठी पैसे हवेत म्हणून ही मुलं गुन्ह्य़ांच्या आहारी जातात. स्वत:वर ताबा नसल्यामुळे अपघात, बलात्कार, गुन्हेगारीच्या आवर्तात सापडतात. सतत आभासी जगात राहिल्यानं आत्मविश्वास गमावून बसतात. मेनस्ट्रीमच्या बाहेर फेकली जातात. एकंदर आपलं भविष्य काळंकुट्ट बनवण्याची सोय करून ठेवतात.
एका मुलानं मला त्याच्या ड्रग्ज घेण्याचं खूप अनबिलिव्हेबल कारण सांगितलं. तो म्हणाला की, त्याचे आईवडील त्यांच्याकडे असूनही पुरेसे पैसे देत नाहीत (ते त्याला महिना पाच हजार रुपये देत होते). एवढय़ाशा(?) पैशात रिलॅक्स होण्यासाठी त्याला दुसरं काही परवडत नाही, म्हणून ड्रग्ज घ्यावे लागतात असं त्याचं म्हणणं. म्हणजे बघ, ड्रग्ज घेणारी मुलं ते जस्टिफाय करायला काय वाटेल ती कारणं द्यायला लागतात. शिवाय त्यांची खात्री असते की त्यांच्या मनात आलं की ते केव्हाही ही सवय सोडू शकतील. पण असं म्हटलं जातं की  Once an addict, always an addict. . एकदा व्यसन लागलं की ते सोडविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आपण व्यसनी झालो आहोत हे अ‍ॅक्सेप्ट करणं ही त्यापासून सुटका मिळविण्याची पहिली पायरी आहे. शिवाय हे एफर्ट्स आयुष्यभर चालू ठेवावे लागतात.
तुझ्या मित्राला यातून बाहेर येण्यासाठी शक्य ती मदत तू देशीलच. ड्रग्जचा, ते पुरवणाऱ्या व्यक्तीचा आपण कितीही रागराग केला, तिरस्कार केला तरी चालेल पण ते घेणाऱ्या व्यक्तींना मात्र आपण मदतीची गरज असलेल्या आजारी व्यक्तीसारखं ट्रीट करायला हवं. तुझ्या मित्राला आत्ता मनाच्या आजारावरच्या उपचारांची गरज आहे. यासाठी तुम्हाला मानसोपचारतज्ज्ञाची आणि समुपदेशकाची मदत घ्यावी लागेल. त्याचे आईवडील आले आहेत आणि तुला अनकम्फर्टेबल वाटतंय तर तू तुझी राहण्याची जागा बदलायचा विचार करायला हरकत नाही. या सगळ्यात तू आपलं डोकं ठिकाणावर ठेवून योग्य निर्णय घेतोयस याबद्दल तुझं कौतुक करावंसं वाटतं मला. तुला आणि तुझ्या मित्राला भविष्यासाठी शुभेच्छा.
You will never leave where you are until you decide where you will rather be!

तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.