दसऱ्याचा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू आहे. पण आजची तरुणाई त्यात थोडे कालसुसंगत पर्यावरणस्नेही बदल करतेय. दसरा सेलिब्रेट करण्याच्या पद्धतीबद्दल काही मित्र-मैत्रिणींनी ‘व्हिवा’बरोबर गप्पा मारल्या. ‘सोनं घ्या.. सोन्यासारखं राहा..’ या आशयाच्या सोबतीला असतात झेंडूची गेंदेदार फुलं नि आपटय़ाची तजेलदार पानं.. दसऱ्याच्या शुभेच्छा या अशा सोनेरी असतात. आश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा, म्हणजेच ‘विजयादशमी’ – हा साडेतीन मुहूर्तापकी एक मुहूर्त मानतात. परंपरेनुसार या मुहूर्तावर नवीन कामांची सुरुवात करतात. सरस्वतीपूजन केलं जातं. कालमानाप्रमाणं यात बदल होऊन लॅपटॉपची, वाहनांची पूजाही केली जातेय. ‘जुन्या परंपरेत नवे विचार’ अंगीकारत तरुणाई दसऱ्याच्या सेलिब्रेशन मूडमध्ये भरच घालत्येय.. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून.. पर्यावरण रक्षणाचा विडा उचलून. कुणी आपटय़ाचं रोपटं रुजवतंय, कुणी स्त्रियांना स्वयंसिद्ध करू पाहातंय. कुणी शाळांतून जागृती करतंय, कुणी दसऱ्याच्या निमित्तानं जुन्या आठवणी जागवतंय. तेव्हा दसऱ्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनीच सकारात्मक ऊर्जेचं सोनं वाटायला सुरुवात करायला हवी. ‘अमूल्य पर्यावरणस्नेहाचं नि सामाजिक भानाचं वैचारिक सोनं लुटू या. दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आपापलं हट के दसरा सेलिब्रेशन काहींनी ‘व्हिवा’शी शेअर केलं.

महेश बनकर
आम्ही  ‘इको ड्राइव्ह यंगस्टर’च्या माध्यमातून गेली पाच र्वष पर्यावरण आणि पक्षी वाचवण्यासाठी काम करतोय. दसरा सण मोठा, पण पर्यावरणाचा होतो तोटा. मुंबई नि परिसरातील आपटय़ाची पानं विक्रीसाठी नेताना अक्षरश: झाडं ओरबाडून आणल्यानं काही झाडांची वाढ कायमची खुंटते, तर काही झाडं वाळून जातात. आपटय़ाची पानं कांचनाच्या पानांसारखी असून त्याच्या शेंगा लांबट असतात. आपटय़ाच्या फळं, पानं, सालं नि चिकाचा वापर औषधात करतात. पर्यावरणातलं आपटय़ाचं महत्त्व ओळखून आम्ही गेल्या वर्षीपासून पर्यावरणस्नेही दसरा साजरा करतोय. आपटय़ाचं रोप लावण्यास लोकांना प्रवृत्त करतोय. यंदा रोपवाटपासोबतच कल्याणच्या टिळक चौकात आपटय़ाचं झाड लावून, लघुपटाच्या माध्यमातून त्याचं महत्त्व सांगितलं जाईल. शाळा-शाळांतून आणि सोशल नेटवìकग साइटच्या माध्यमातूनही याविषयी जनजागृती करतोय. आमच्या उपक्रमाला तरुणाईचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.

सुचिता टेंबुरकर
आपटय़ाच्या झाडाचं वैज्ञानिक नाव बौहुनिया रेसामोसा आहे. ठरावीक जातीची फूलपाखरं ठरावीक जातींच्या झाडांवरच अंडी घालतात. तसं सनबीम फूलपाखरू आपटय़ाच्या झाडावर अंडी घालतं. सनबीमच्या अळ्या म्हणजे सुरवंट फक्त आपटय़ाचीच पानं खातात. फूलपाखरं, मधमाशा, भुंगे, पतंग इत्यादी कीटक आणि सूर्यपक्षी, मना इत्यादी पक्षी मकरंदासाठी आपटय़ाकडंच झेपावतात. कीटक खाण्यासाठी दयाळ, कोतवाल, खाटिक, नाचण, बुलबुल पक्षी त्यावर येतात. सातभाई, वटवटय़ा, िशपी, नाचण पक्षी त्यावर घरटं बांधतात. आपटय़ाचे वृक्ष प्रामुख्यानं पानगळीच्या वनांमध्ये आढळले, तरी ते सदाहरित वर्गात मोडतात. यामुळं उन्हाळ्यात जंगल उजाड न होता तिथं थोडीशी हिरवळ टिकवण्याची जबाबदारी आपटय़ाचा वृक्ष बजावतो. उन्हाच्या तलखीनं त्रासलेले प्राणी या झाडाखाली विश्रांती घेतात. आपटय़ाच्या झाडाचं जैवविविधतेच्या दृष्टीनं महत्त्वाचं स्थान गेली तीन र्वष आम्ही ‘नेचर वॉक’च्या माध्यमातून शाळांतून माहिती देऊन अधोरेखित करतोय. आपटय़ाच्या पानांसाठी होणारी वृक्षतोड थांबवत तरुणाई आपटय़ाची रोपं लावून सकारात्मक प्रतिसाद देतेय.

अविनाश पुकळे
आपटय़ाच्या पानांऐवजी चॉकलेट, मिठाई, सुकामेवा द्यायला गेल्या वर्षीपासून मी नि माझ्या मित्रानं सुरुवात केल्येय. आपटय़ाची पानं तोडून होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आम्ही हा उपाय योजला. यंदा काही तरी विधायक करायच्या विचारातून आकारली ती परिसंवादाची कल्पना. काही मंडळांशी संपर्क साधून त्यांच्या नवरात्रौत्सवातल्या एका संध्याकाळी परिसंवाद आयोजित करायचं ठरलं. या प्रस्तावाचं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मकपणं स्वागत करून आम्हाला पािठबा दर्शवलाय. दसऱ्याला होणाऱ्या या परिसंवादांत राष्ट्रीय एकात्मता टिकण्यासाठी तरुणाईचा पुढाकार, विधानसभा निवडणुका इत्यादी विषय घ्यायचा विचार आहे. या विषयांवर प्राध्यापक, स्थानिक विचारवंतांसह सामान्यांनाही चर्चा करता येईल. सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फुटेल.  

तनुजा वर्तक
आम्ही म्हणजे आमचा वसई अ‍ॅडव्हेंचर ग्रूप गेली दहा र्वष राजगडावर दसरा साजरा करतोय. आदल्या दिवशीपासूनच आम्ही गडावर दाखल होऊन कामाला लागतो. संध्याकाळी देवीसमोरच्या घटाजवळ दिवे लावतो, रांगोळी काढतो. तेव्हाच्या आरतीत पर्यटक नि गावकरीही सामील होतात. दसऱ्याच्या दिवशी पहाटे उठून देवीची पूजाअर्चा करून पाली दरवाजाकडं रवाना होतो. तिथं उंबरठय़ाची साग्रसंगीत पूजा केली जाते. हार-पताका लावल्या जातात. पुन्हा देवळात जाऊन तिथंही हार-पताका लावतो. देवळासमोरच्या छोटय़ा तोफेचं पूजन केलं जातं. मग आपापल्या घरचा दसरा साजरा करण्यासाठी रवाना होतो. केवळ उत्सवातच न रमता देवळात कायमस्वरूपी प्रकाशाची सोय करण्याचा आमचा विचार चाललाय. आपल्या परीक्षांच्या वेळा अ‍ॅडजस्ट करून काही जण गडावर येतातच. अशा मोहिमांतूनच तरुणाईला इतिहासाचं भान येतं.. त्याचा वर्तमानाशी दुवा जोडत, भविष्य सुकर करण्याची स्वप्नं आपसूकच पाहिली जातात.

निकिता घाडगे
आमच्या बालमोहन विद्या मंदिरात (दादर, मुंबई) दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीपूजन अतिशय उत्साह नि थाटामाटात केलं जातं. आजी विद्यार्थ्यांचं पाटी-पूजन संपता संपताच माजी विद्यार्थी शाळेत येतात. आमचा ग्रुप गेली पाच वर्षे यानिमित्तानं एकत्र भेटतोय. कॉलेज लाइफमध्येही अजून शाळेची ओढ वाटतेय, यातच सारं काही आलं. दसरा भेटीचे हे सोनेरी क्षण कायमचे स्मरणात राहण्यासाठी शिक्षक नि ग्रुपसोबत फोटोसेशन होतंच. आमच्या आधीच्या विद्यार्थ्यांनी घालून दिलेली ही सॉलिड परंपरा आम्हीही फॉलो करतोय. कारण ती ‘लई भारी’ आहे. त्यानंतर आम्ही बंगाल क्लब देवीच्या दर्शनाला जातो. दर्शनानंतर कट्टय़ावर गप्पांची मफल रंगते. घरी परतताना प्रत्येकाच्या हातात असतं आपटय़ाचं पान. मी आपटय़ाची पानं देताना ती रंगवून, त्यावर डिझाइन काढून खास फ्रेण्ड्सनाच देते. त्या दिवशी सगळे जुने दिवस नव्यानं अनुभवल्यासारखे वाटतात.. एकदम अमेिझग फिलग.

आशीष जोशी
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार नि अन्यायांच्या वाढत्या प्रमाणासोबत वाढतायत, स्त्रियांसंदर्भातली बेताल वक्तव्यं. हे रोखायला कायदा नि सुव्यवस्था अपुरी पडतेय. त्यामुळं आता स्त्रियांनीच स्वयंसिद्धा होणं गरजेचं आहे. त्यासाठी दसऱ्याच्या निमित्तानं स्त्रियांसाठी ‘ऑन युवर गार्ड’ या सेल्फ डिफेन्सच्या कार्यशाळेचं आयोजन आमच्या ‘रेनसान्स’ या ग्रूपनं केलं होतं. पण जागेची उपलब्धता नि सगळ्यांच्या सोयीच्या वेळेनुसार ही कार्यशाळा २८ सप्टेंबरला घेण्यात आली. यावेळी प्रशिक्षकांनी सेल्फ डिफेन्स टेक्निक्स शिकवली. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद लाभला असून यानंतरही स्त्रीविषयक प्रश्नांवर जनजागृती करायचा आमचा मानस आहे. कारण केवळ समस्यांची चर्चा करण्यापेक्षा त्यावर उपाययोजना शोधून ती राबवणं नि समाजोपयोगी कृती करणं हाच आमचा उद्देश आहे.