गायत्री हसबनीस

बदल करण्याची गरज आहे हे समजतं तेव्हा दुसरीकडे कुठेतरी होणारा बदल खुणावत राहतो. ई मार्केट क्षेत्रात सतत बदल होतात, कारण त्यांचा ग्राहकही तितकाच पारखून खरेदी करणारा, अधिक तरुण व चोखंदळ आहे. तरुणांना ऑनलाइन खरेदीला जास्त वेळ लागत नाही, कारण त्यांच्या प्रायोरिटीज कित्येक प्रमाणात बदलल्या आहेत. त्यामुळे तरुण वर्ग ऑनलाइन खरेदी कशी करतो, का करतो, कोणत्या गोष्टींच्या खरेदीला जास्त प्राधान्य देतो?, असे कित्येक प्रश्न पडल्यावाचून राहत नाहीत.

ई मार्केट क्षेत्रात सतत नवे तंत्रज्ञान दर वर्षांला येतच असते. त्याचे फायदे आणि तोटे आज प्रत्येक वयोगटातील स्त्री-पुरुषांना लागू होतात. गमतीचा भाग असा की ई मार्केटवरून उपलब्ध होणारं नवं तंत्रज्ञान हे पालकांकडून मुलांकडे आणि मुलांकडून पालकांकडे अशा दोन्ही प्रकारे पोहोचत असते. त्यामुळे सतत नवनवीन मार्गाने ई मार्केट हे बदलत जाते आणि तो बदल नमूद करण्यासाठी दरवर्षी सर्वे केले जातात. त्यातून ग्राहकांच्या सवयी, आवडनिवड, उपभोगाची क्षमता, व्यवहार आणि कन्झ्यूमर टेस्ट आणि प्रेफरन्स अशा गोष्टी तपासता येतात. मुळात ई मार्केटची वाढ ही ग्राहकांवरच अवलंबून असते. ऑनलाइन मार्केट हे पूर्णत: तरूण पिढी व त्यांच्या आधीच्या पिढीपासून ते बिझनेसमन्स, कॉर्पोरेट क्षेत्रातील मंडळी यांनी व्यापलेले आहे. अर्थातच, इथे सगळीकडे तरुणांचा वावर जास्त आहे. तरुण पिढीच्या गरजा या काळाप्रमाणे सतत बदलत्या असतात. त्यांचे शिक्षण, करिअर, रोजगार आणि लाइफस्टाइलचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे त्यांच्या खरेदीवर परिणाम होतोच. त्यामुळेच प्रत्यक्ष शहरोशहरीचे बाजार पालथे घालण्यापेक्षा ऑनलाइनवर तीच भ्रमंती करून सहज खरेदी करणे त्यांना जास्त सोपे वाटते.

प्रत्येक क्षेत्रातील तरुण पिढी, महाविद्यालयीन तरुणाई यांचा वावर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर त्यांच्या गरजांनुसार कसा बदलतो आहे याचा काहीसा अंदाज ‘यूगव – मिन्ट मिलेनियन’ने केलेल्या सव्‍‌र्हेतून येतो. ऑनलाइनचा प्रभाव तरुण पिढीवर कसा पडतो आहे हे जाणून घेण्यासाठी ऑनलाइन मार्केटमध्ये खरेदीचे ट्रेण्ड्सही जाणून घेणे आवश्यक आहेत. कोणताही कन्झ्यूमर सव्‍‌र्हे करताना जेव्हा तरुण पिढीचा विचार केला जातो, तेव्हा प्रामुख्याने त्यांच्या उपन्नाचा विचार केला जातो. रोजगार असणारी आणि नसलेली (शिक्षण घेत असलेला तरुण वर्ग) यांचा यात समावेश असतो. हल्ली सगळा तरुण वर्ग हा गुगल पे, पेटिएम, क्रेडिट कार्ड, रूपे कार्ड इत्यादीद्वारे शॉपिंग करतो, त्यामुळे सतत बदलत जाणाऱ्या पेमेंट पद्धतीचाही यात विचार केला जातो. या सगळ्याची गणितं लक्षात घेऊन जे सव्‍‌र्हे केले गेले, त्यात प्रामुख्याने तरुणाई ऑनलाइनवर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची खरेदी जास्त करते असे दिसून आले आहे.

इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची खरेदी ही नवे कुठले तंत्रज्ञान येते आहे आणि त्यासाठी ई मार्केटवर काय नवनवीन ऑफर्स आहेत त्या आधाराने सुरू होते. त्यामुळे कुठलं नवीन मॉडेल लॉन्च होतंय इथपासून ते त्याच्या सतत खाली-वर होत राहणाऱ्या किमती यावर ऑनलाइन लक्ष ठेवत ही खरेदी करणे सोपे जाते. स्मार्टफोन, टॅबचा विचार करायचा झाला तर जेव्हा नवे फीचर्स किंवा अ‍ॅप्स लॉन्च होतात तेव्हा स्मार्टफोनची खरेदी तरुणांना जास्त आकर्षित करते. या विविध अ‍ॅप्सचा एक ठरावीक प्रेक्षक आहे. उदा, मनोरंजन, बातम्या, चॅटिंग, वेब सर्फिंग, मेल, आणि सोशल नेटवर्किंग. यामध्ये मनोरंजन विश्वात युटय़ुब, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार, वूट, झी फाईव्ह आणि अल्ट बालाजी अशा ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश असतो तर चॅटिंगमध्ये स्काइप, व्हीडिओ कॉल, व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅप चॅट, डेटिंग अ‍ॅप्स अशा गोष्टी येतात. सोशल मीडियात तरुण पिढी बराच वेळ व्यग्र असते. ऑनलाइन खरेदीत अ‍ॅप्सची खरेदीही मोठी असते, जी आपल्या सहज लक्षातही येत नाही. सध्या तरुणाई फेसबुकपेक्षा इन्स्टाग्राम आणि ट्विटरला जास्त प्राधान्य देते आहे. याशिवाय न्यूजअ‍ॅप्सच्या खरेदीवरही भर दिला जात असून यात जगभरातील वॉल स्ट्रीट जर्नल, द गार्डियन, द इकॉनॉमिस्ट, सीएनएन, बीबीसी न्यूज तसेच द वायर, प्रोएक्सओ, स्क्रोल, द प्रिंट, फस्टपोस्ट, टेलिग्राफ, ट्रायबून इंडिया, अमर उजाला, जागरण अशा नानाविध न्यूज अ‍ॅप्सची प्राधान्याने खरेदी होताना दिसते. किंबहुना भारतात आणि पाश्चात्त्य देशात न्यूज अ‍ॅप्सना प्राधान्य दिले जाते, असं एका सव्‍‌र्हेतून समोर आलं आहे. त्यासोबत मॅप्स, उबर-ओला आणि टाइमली, हार्वेस्ट, ऑफिस टाइमसारख्या अति गरजेच्या आणि उपयुक्त अ‍ॅप्सचाही वापर तरुण पिढीकडून वाढला आहे. त्यामुळे असे फीचर्स असलेले स्मार्टफोन्स हे विविध ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर विविध रेंजमध्ये मिळतात.

मार्केटमध्ये काय नवीन येतंय आणि ई-मार्केटमध्ये किती वेगवेगळ्या किमतीत ते मिळतंय याचे पुरेपूर ज्ञान सध्याच्या तरुण वर्गाला आहे. सध्या वेब सर्फिग, चॅटिंग, फोटो, शॉपिंग अशा विविध पर्यायांमध्ये देखील वेगाने बदल होत आहेत. सोशलाइझ होणं ही सध्याच्या पिढीची वृत्ती झाली आहे आणि त्यातून जेन एक्स, जेन व्हाय आणि जेन झेड यांच्या शॉपिंगच्या सवयींमध्ये भयंकर तफावतही दिसून येते. दिवसेंदिवस आयुष्यात उत्साह वाढवणं हा आता एक आवश्यक भाग झाला आहे. त्यामुळे सध्या गॅजेट्सच्या ट्रेण्डमध्ये अ‍ॅप्स हे परिपक्व होतायेत. स्मार्टफोन अ‍ॅप्समध्ये पॉकेट कास्ट्स, पेरीस्कोप, साऊंड क्लाऊड, फेसटय़ून २, प्रोकॅमेरा, फोरस्क्वेअर स्वार्म, रेस्क्यू टाइम, कॅमेरा एमएक्स हे अ‍ॅप्स सध्या धामाकूळ घालत आहेत. अशी अ‍ॅप्स आता स्मार्टफोनमध्ये उपलब्ध झाली आहेत आणि त्याप्रमाणे तरुणाई शॉपिंगही करते आहे. यामध्ये ‘प्रोकॅमेरा’ हे अ‍ॅप फक्त आयफोनमध्ये आहे आणि इतर सर्व अ‍ॅप्स हे सगळ्या स्मार्टफोन्समध्ये दिसतील. त्यामुळे इतर फीचर्ससह अ‍ॅप्स असलेले अनेक ब्रॅण्ड्सचे स्मार्टफोन्स विकत घेतले जातात. स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉप, व्हिडिओ गेम्स, ट्रेकिंग स्मार्टवॉच, स्पीकर्स,  ब्लुटुथ इअरकॉड्स, इअरफोन्स, चार्जर, डिजिटल कॅमेरा, पोर्टेबल एसडीडी, रिप्लेसेबल बॅटरी, वायरलेस साऊंडट्रेक इत्यादी उत्तोमोत्तम गॅजेट्स ई मार्केटमध्ये प्रवेश करू लागले आणि त्याची खरेदी ही तरुणाईला जास्त मोहित करत गेली. २०१२ च्या एका सव्‍‌र्हेनुसार फोन्सची खरेदी ही १८ टक्के होती व इतर गॅजेट्सची २२ टक्के. आताच्या सव्‍‌र्हेनुसार ही खरेदी ४५ ते ५० टक्क्य़ांनी वाढली आहे. त्यातून मुलींची इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची खरेदी ४५% व मुलांची ५०% एवढी वाढली आहे. मुलांमध्ये शूज, क्लोदिंग, आयवेअर, अ‍ॅक्सेसरीज, स्पोर्ट्सवेअर आणि इक्विपमेनट्समध्ये वैविध्य व खरेदीचे पर्याय उपलब्ध झाल्याने शॉपिंग मॉल्स सोडून मुलंदेखील गेल्या पाच वर्षांत अधिक खरेदी ही ऑनलाइन साइट्सवरून करू लागले आहेत. ऑनलाइन खरेदीच्या प्रमाणाच्या बाबतीत तरी मुले आणि मुलींमध्ये समानता साधली गेली आहे. फरक इतकाच की फुटवेअर मुलं जास्त खरेदी करतात तर मुली मुलांच्या ५% कमी प्रमाणात फुटवेअरची खरेदी करतात. तर कपडे खरेदीला मुली जास्त पसंती देतात. मुलं मुलींपेक्षा ऑनलाइन कपडे खरेदी कमी करतात. झारा, रिलायन्स ट्रेण्ड्स, ग्लोबल देसी इत्यादी कित्येक शॉपिंग साइट्ही खरेदीसाठी पसंतीची मानली जातात.

खरं म्हणजे आपल्याकडे देखील खरेदीची व्याख्या फक्त चपला, बूट, कपडेलत्ते, अ‍ॅक्सेसरीज व गॅजेट्स नसून ऑनलाइन क्षेत्राचा पूर्ण आढावा घेतला तर ऑनलाइन तिकीट खरेदी, खाण्यापिण्याची ऑनलाइन खरेदी याचाही यात समावेश होतो. त्यातून तरुण वर्ग करत असलेल्या एकूण ऑनलाइन खरेदीचे मोजमाप करता येते. उदाहरणार्थ, एक खरेदी असते ती ऑनलाइन साईट्सवरची आणि दुसरी असते ती थेट अ‍ॅप्सवरून म्हणजे ऑर्डर-डिलिव्हरीची. फूड अ‍ॅप्सनादेखील तरुणांची तितकीच पसंती असते. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घेतले जातात. २०१२ मध्ये जगभरात फूड अ‍ॅप्सना ४ टक्के मागणी होती तर आता जगभरात त्याचा आकडा ४३ टक्के झाला आहे. विविध माध्यमातून केलेल्या जाहिराती, विविध प्रकारच्या सतत नव्याने उपलब्ध असणाऱ्या ऑफर्स, कॅश बॅक, १५,००० हून अधिक रेस्टॉरंट्समधील फूड, ४० हून जास्त विविध देशांतील फूड आणि रेटिंग्समुळे तरुण ग्राहक याकडे जास्त आकर्षित झाला आहे. यामध्ये स्विगी, फूडपांडा, उबर इट्स, फ्रेश मेनू आणि झोमॅटो इत्यादी अ‍ॅप्स लोकप्रिय आहेत. यामध्ये व्हेगन, इटालियन, मेक्सिकन, डाएट, ब्रेकफास्ट, इव्हिनींग स्नॅक, आणि स्वीट डिश यांचा प्रामुख्याने समावेश असतो. त्याचबरोबर तिकीट खरेदीला ऑनलाइन साइट्सवरून/अ‍ॅप्सवरून उधाण आलं आहे. बुक माय शोसारख्या अ‍ॅप्सवरून तरुण वर्ग सिनेमा, ओपन माईक, नाटक, आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तिकिटांची खरेदी करताना दिसतो.

तरुणांना सतत अपडेटेड ठेवण्यात ऑनलाइन खरेदीची गरज ही महत्त्वाची भूमिका बजावते. भविष्यात फूड शॉपिंगला मोठय़ा प्रमाणात वाव मिळणार आहे.  विविध शॉपिंग साइट्स हे ग्राहकांनाच ऑनलाइन शॉपिंग स्टोअर म्हणजेच स्टार्टअप्स सुरू करायला प्रोत्साहित करतायेत.  ९३ टक्के तरुण ग्राहक हा वेबरूमवरून शॉपिंग करतो. त्यामुळेच शोरूममध्ये हल्ली तरुण पिढीची गर्दी फार कमी झालेली दिसते. त्यामुळेच मिशो आणि कॅशकरोसारख्या साइट्स ग्राहकांकडूनच मौखिक प्रसिद्धी करून घेताना दिसतात. एकूणच खरेदीच्या गणितातून ई मार्केट क्षेत्राला तरुणाईमुळे एक वेगळी गती आणि दिशा मिळालेली येत्या काळात पाहायला मिळेल!