दिवाळी आणि खरेदी हे समीकरण बदललं नसलं तरी गेल्या काही काळात या समीकरणात डाव्या-उजव्या बाजूला थोडी भर पडली आहे. ती म्हणजे पर्सनल शॉपर आणि ऑनलाइन शॉपिंगची. गर्दीतला बाजार टाळून कमी कटकटीत चांगलं डील मिळवण्यासाठी हल्ली एका ‘क्लिक’ची मदत होतेय आणि बाजारू गर्दीतही ‘क्सास’ शोधून देण्यासाठी ‘पर्सनल शॉपर’ मदत करतोय. खरेदीच्या समीकरणातल्या या ‘एक्स्ट्रा एक्स्पिरिअन्स’विषयी..
viv03दिवाळीची चाहूल पहिल्यांदा लागते ती बाजार फुलायला लागल्यावर. खरेदी करायला हल्ली दिवाळीचं निमित्त लागत नसलं तरीही दिवाळीची खरेदी चुकत नाही, हे निश्चित. ‘वर्षभर शॉपिंग चालूच असतं, तरी दिवाळीची खरेदी स्पेशल असते’, असं कुठल्याही वयाची मुलगी कबूल करेल. केवळ सणासुदीला केली जाणारी खरेदी आता मनोरंजनाचा एक भाग झाली आहे. कंटाळा घालवण्यासाठी कुणी खरेदी करतं, वेळ आहे म्हणून कुणी करतं तर कुणी मूड छान करण्यासाठीही शॉपिंगला पळतं. तरीही दिवाळीची मजा खरेदीशिवाय अपुरी आहे, हे निश्चित.
बदलता शॉपिंग एक्स्पिरिअन्स
अगदी काही वर्षांपूर्वीची दिवाळी आठवा किंवा आपल्या आई-मावशी किंवा ताईला त्याबद्दल विचारा. दिवाळीच्या आधी बाजारात कितीही गर्दी असली तरी आपण खरेदीला जायचो. दुकानदाराला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशा परिस्थितीतही एका दुकानातून दुसऱ्या दुकानात आपल्या आवडीच्या वस्तूसाठी आपण फिरायचो. अजूनही आपण दिवाळीच्या गर्दीत दादरच्या मार्केटमध्ये जातो, पुण्याच्या लक्ष्मी रोडला किंवा ठाण्याच्या गोखले रोडला आवर्जून चक्कर टाकतो.  पण तो आपला ‘चॉईस’ असतो. पूर्वी याला पर्यायच नव्हता. कारण तेव्हा शॉपिंग मॉलच्या ऐसपैस शॉपिंगची सोय नव्हती. शॉपिंग मॉल आले आणि खरेदीचा अनुभव पहिल्यांदा बदलला. आता तेही जुने झालेत आणि घरबसल्या खरेदीचा पर्याय लोकप्रिय व्हायला लागला आहे.
ऑनलाइन शॉपिंग
viv04ऑनलाइन शॉपिंगची संकल्पना आता आपल्याला नवीन राहिलेली नाही. पण ती कधी नव्हे ती गेल्या वर्षभरात अंगवळणी पडायला लागली आहे. याचं कारण कदाचित आपल्या खिशात असलेला स्मार्ट फोन असेल किंवा बॅगेत असणारा टॅब असेल. दुकानातली गर्दी, एकीकडून दुसरीकडे होणारी पायपीट, चांगली वस्तू आणि रास्त किंमत यासाठी होणारी वणवण यावरचा हा इलाज सापडल्यानं अनेकजण याकडे वळलेत.
ऑफर्सची गर्दी
निवांत बसून खरेदी करायची आणि वर वेगवेगळे डिस्काउंट, फायदेही घ्यायचे ही ऑफर उत्तमच म्हणायची. पण ई-कॉमर्सच्या साइट्स सुरुवातीला भारतात आल्या तेव्हा काही अशीच परिस्थिती नव्हती. ऑनलाइन शॉपिंग आपल्यासाठी नाही, असं म्हणणारा वर्गही होता. वस्तू प्रत्यक्षात न बघता तिची पारख कशी करणार असं त्यांचं म्हणणं होतं. आता या स्मार्टफोनच्या जमान्यात हा वर्गही ऑनलाइनकडे वळायला लागला आहे. सुरुवातीला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डनं ही ऑनलाइन खरेदी करायला लागायची. ‘कॅश ऑन डिलीव्हरी’चा पर्याय सार्वत्रिक नव्हता. आता मात्र बहुतेक सगळ्या शॉपिंग साइट्स हा पर्याय देऊ लागल्यानंतर आणि ‘रिटर्न पॉलिसी’देखील आल्यानंतर ‘रिस्क नाही’ असं म्हणत अनेक जण ऑनलाइन शॉपिंगकडे ओढले गेले आहेत.
viv08ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांमध्ये अर्थातच तरुणाई पुढे आहे. सुरुवातीला पुस्तकं, अॅक्सेसरीज यापुरती असलेली ही ऑनलाइन खरेदी आता मोठय़ा इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, दागिने यांच्यापर्यंत पोचली आहे. ‘फ्लिपकार्ट’चा ‘बिग बिलियन सेल’ दिवाळीपूर्वी चांगलाच गाजला होता. अनेक लोकांनी या जाहिराती बघून वेबसाइटवर डल्ला मारला. पण खूप कमी लोकांच्या हाती अपेक्षित वस्तू आल्या. अनेकांना या ऑनलाइन ‘गर्दी’मुळे निराश व्हायला लागलं. ‘अॅमेझॉनवर’चा ‘दिवाली बझार धमाका’सुद्धा गाजला. स्नॅपडील, मिन्त्रा, जबाँग अशा इतरही अनेक ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरची गर्दी दिवाळीदरम्यान वाढली असल्याचं सांगण्यात आलं.
अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष आणि कंट्री मॅनेजर अमित अग्रवाल म्हणाले, ‘‘आमच्या दिवाळी धमाका वीकला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आम्हालाही एवढय़ा मोठय़ा प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. या काळात वेबसाइटवरची ट्रॅफिक २०० टक्क्य़ांनी वाढली होती. अॅमेझॉनवरून इलेक्ट्रॉनिक्स, किचन अप्लायन्सेस, शूज, पुस्तकं आणि कपडे या पाच विभागांत याच क्रमानं विक्री झाली. गंमत म्हणजे दिल्ली, मुंबईसारख्या मेट्रो शहरांप्रमाणेच पुणे, नागपूर, अहमदाबाद, सुरत आदी टियर टू सिटीजमधूनही ऑनलाइन शॉपिंग करणारा वर्ग वाढतो आहे.’’

viv06‘‘कपडे आणि फॅशन अॅक्सेसरीज ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या दिवाळीच्या तुलनेत तिपटीने वाढ झाली आहे. दिवाळीची चाहूल लागल्यानंतर आमच्या वेबसाइटवरून कपडे आणि फूटवेअरची खरेदी वाढू लागली आहे.’’
गणेश सुब्रमण्यम, सीओओ, मिन्त्रा.कॉम

viv07‘‘हेवी ज्वेलरीसाठी अजूनही ग्राहक प्रत्यक्ष दुकानात येणं पसंत करतो, हे खरं आहे; लाइट वेट ज्वेलरी आणि अत्याधुनिक डिझाईन्सचे पॅटर्न यांची विक्री ऑनलाइनवर जास्त होते.’’- सौरभ गाडगीळ,
व्यवस्थापकीय संचालक,
पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स

viv05‘आपल्या बजेटमध्ये आपल्याला चांगलं दिसेल असं काय घ्यावं हा मोठा प्रश्न अनेकांच्या चेहऱ्यावर असतो. अनेक पुरुषदेखील आपल्या गर्लफ्रेंड, बहीण, बायको किंवा मैत्रिणीला गिफ्ट द्यायचा विचार करतात तेव्हा पूर्ण गोंधळलेले असतात. अशा वेळी पर्सनल शॉपर मिळाला तर खूपच फायदा होतो. येणाऱ्या काळात पर्सनल शॉपरसारख्या सेवा रिटेल दुकानांमधून द्याव्याच लागणार आहेत.’        मौशमी मित्रा, पेरिअन, मुंबई</strong>

 पुस्तकांपासून कपडय़ांपर्यंत
ऑनलाइन शॉपिंग करणारे सुरुवातीला पुस्तकं, अॅक्सेसरीज, ब्रॅण्डेड इलेक्ट्रॉनिक वस्तू या गोष्टीच घेत होते. याचं कारण या गोष्टी प्रत्यक्ष हात लावून, पारखून घेतल्या नाहीत तरी फरक पडत नाही. पण मौल्यवान दागिने कसे असे न पारखता घेणार? दिवाळीच्या निमित्ताने दागिन्यांची खरेदी आवर्जून केली जाते. ऑनलाइन बाजार कितीही तेजीत असला आणि अनेक ज्वेलर्सनी आपापल्या वेबसाइट सुसज्ज ठेवल्या असल्या तरीही दागिन्यांच्या खरेदीसाठी अजूनही तरुणी प्रत्यक्ष दुकानात जाणं पसंत करतात. पण इथलं चित्रही  हळूहळू बदलतं आहे. पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ ‘व्हिवा’शी बोलताना म्हणाले, ‘‘हेवी ज्वेलरीसाठी अजूनही ग्राहक प्रत्यक्ष दुकानात येणं पसंत करतो. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी ऑनलाइन करायला अनेक मंडळी सहज तयार होत नाहीत, हे खरं आहे; पण आमच्या ऑनलाइन स्टोअरला तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळतोय. लाइट वेट ज्वेलरी आणि अत्याधुनिक डिझाईन्सचे पॅटर्न यांची विक्री ऑनलाइनवर जास्त होते.’’
कपडय़ांच्या बाबतीत मात्र ट्राय न करता कसं घेणार, हात लावून पोत बघण्याचा तर चान्सच नाही. मग ऑनलाइन शॉपिंगमध्ये व्हच्र्युअल ट्रायल रूम्स आल्या. तुम्ही किमान व्हच्र्युअल तरी कपडे अंगावर चढवून बघण्याची शक्यता निर्माण झाली. आपल्याकडे कपडय़ाच्या ‘साइझ’ची परिभाषा ब्रॅण्डनुसार बदलणारी आहे. एकाचा ‘मीडियम साइझ’ दुसऱ्याचा ‘लार्ज’असू शकतो. त्यामुळेही अडचण होते. ऑनलाइन शॉपिंग साइट्सनी दिलेल्या आकडेवारीनुसार सुरुवातीला कपडय़ांना फारसा ग्राहक नसायचा. पण हल्ली मात्र इकडेही तरुणाई वळू लागली आहे.
फॅशन ब्रॅण्डच्या शॉपिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘मिन्त्रा.कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश सुब्रमण्यम ‘व्हिवा’शी बोलताना म्हणाले, ‘‘गेल्या वर्षभरात आमच्या साइटला मिळणारा प्रतिसाद प्रचंड वाढला आहे. कपडे आणि फॅशन अॅक्सेसरीज ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या दिवाळीच्या तुलनेत तिपटीने वाढ झाली आहे. दिवाळीची चाहूल लागल्यानंतर आमच्या वेबसाइटवरून कपडे आणि फूटवेअरची खरेदी वाढू लागली आहे. एथनिक वेअर आणि डिझायनर वेअर कॅटॅगरीत ही वाढ दिसते.’’
एकीकडे आपण प्रत्यक्ष न बघताही कपडे खरेदी करायला सरावतोय. त्याच वेळी पारंपरिक दुकानांची बाजारपेठ मात्र वेगळा शॉपिंग एक्स्पिरिअन्स द्यायला तयार झाली आहे.

पर्सनल शॉपर
ऑनलाइन साइटवर सुंदर दिसणारे कपडे किंवा प्रत्यक्ष दुकानातही लक्ष वेधून घेणारे कपडे आपल्याला किती शोभतील, आपल्या अंगावर कसे दिसतील याची चिंता असतेच. दुकानात किंवा मॉलमध्ये ट्रायल रूम्स असल्या तरीही आपल्यापेक्षा जास्त माहीतगार असलेला, फॅशन सेन्स असणारा कुणी तरी आपल्याबरोबर सल्ला द्यायला असेल तर.. आपल्याला शोभेल असे आणि आपल्या बजेटमध्ये बसेल असे कपडे, अॅक्सेसरीज सुचवणारे ‘पर्सनल शॉपर्स’ ही एक नवीन जमात खरेदीच्या समीकरणात बसण्याचा प्रयत्न करत आहे. अजून काही ठरावीक दुकानांपुरती ही संकल्पना मर्यादित असली तरीही ती लवकरच रुजणार आणि हिट होणार असं दिसतंय.
सेलिब्रिटींसाठी कपडे, स्टाइल सुचवणारा स्टायलिस्ट असतो तसं तुमचं वॉर्डरोब सजवण्यासाठीही स्टायलिस्ट मिळाला तर? असे प्रोफेशनल स्टायलिस्ट असतातच. फक्त सर्वसामान्यांना त्यांची फी परवडणारी असतेच असं नाही. आता मात्र रिटेल मार्केटमध्ये छोटय़ा, डिझायनर बुटिकमध्ये असे स्टायलिस्ट उपलब्ध होऊ लागले आहेत. ते कोणत्याही फीशिवाय तुम्हाला सल्ला देतात. कारण त्यांना त्या दुकानांमधूनच नोकरी मिळालेली असते. त्यांनाच हल्ली ‘पर्सनल शॉपर’ म्हणायची पद्धत आली आहे. ब्लूमिंगडेल्स, डेबेनहॅम्स अशा युरोप-अमेरिकेतल्या मोठय़ा डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये हे पर्सनल शॉपर हल्ली सर्रास उपलब्ध असतात. आपल्याकडेही मुंबईतल्या काही दुकानांमध्ये ही सेवा द्यायला सुरुवात झाली आहे. सांताक्रूझच्या पेरिअन लाइफस्टाइल या आऊटलेटमध्ये पर्सनल शॉपर तुम्हाला मदत करोत. ‘पेरिअन’च्या संस्थापिका मौशमी मित्रा म्हणाल्या, ‘शॉपिंगला आल्यावर स्त्रिया खूप एक्सायटेड असतात पण रेस्टलेसही होतात. आपल्या बजेटमध्ये आपल्याला चांगलं दिसेल असं काय घ्यावं हा मोठा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर असतो. अनेक पुरुषदेखील आपल्या गर्लफ्रेंड, बहीण, बायको किंवा मैत्रिणीला गिफ्ट द्यायचा विचार करतात तेव्हा पूर्ण गोंधळलेले असतात. अशा ग्राहकांना पर्सनल शॉपर मिळाला तर खूपच फायदा होतो. येणाऱ्या काळात अशा सेवा रिटेल दुकानांमधून द्याव्याच लागणार आहेत.’ मालाडच्या बेन्झ या बुटिकच्या तानिया सांगतात, ‘स्वत:चा स्टायलिस्ट असल्याची भावना पर्सनल शॉपरमुळे ग्राहकाला मिळते. अॅडेड सव्र्हिस म्हणून ही सेवा आम्ही देत आहोत.’
ऑनलाईन शॉपर्ससाठीही हल्ली असे फॅशनविषयक  सल्ला देणाऱ्या ई कॉमर्स साईट सुरू होत आहेत. अनेक साईट्सवर पर्सनल शॉपरही उपलब्घ असतात. ‘फेस्टिव्ह सीझनमध्ये आम्ही पर्सनलाइज्ड स्टाइल हेल्पलाइन सुरू केली आहे. मिन्त्राची स्टायलिस्ट ग्राहकांच्या फॅशनविषयक प्रश्नांना उत्तरं देतील. त्यांना या वर्षी फेस्टिव्ह लूकसाठी साहाय्य करण्यात येईल’, असे मिन्त्राच्या वतीनं सांगण्यात आलं.
एकूणच ऑनलाईन शॉपिंगला बोटं सराईत झाल्यामुळे दिवाळीच्या शॉपिंग एक्सपिरिअन्समध्ये यंदा मोठा बदल झाला असं म्हणता येईल. त्यात पर्सनल शॉपरचा नवा ट्रेंड आता रुळला की हा अनुभव आणखी बदलेल यात शंका नाही.

ऑनलाइन शॉपिंग टिप्स
दिवाळी म्हणजे खरेदीसाठी एक निमित्तच. सध्या पारंपरिक दुकानांमधून खरेदी करण्याइतकंच ऑनलाइन शॉिपगचंही महत्त्व वाढत आहे. अनेक ऑफर्स, विविध डिस्काऊंट यांची ऑनलाइन रेलचेल असते. तेव्हा यंदा शॉिपग करताना काही टिप्स ध्यानात ठेवा. तसं केल्यास जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल.
* एखादी वस्तू, खासकरून इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची असल्यास त्याची जवळच्या दुकानातील किंमतही पाहून घ्या. काही वेळेस दुकानातील सेल हे ऑनलाइन सेल्सपेक्षा अधिक फायदेशीर असू शकतात.
* एखाद्या वस्तूची वेगवेगळ्या वेबसाइट्सवर काय किंमत आहे ते तुलना करून पाहा.
* ऑर्डर देण्यापूर्वी ‘शििपग चार्जेस’ आहेत का आणि असल्यास किती, ते तपासा. काही वेळेस वस्तूची दर्शनी किंमत सारखीच असते. पण काही साइट्स शििपग चार्जेस घेतात, तर काही घेत नाहीत. त्यामुळे ४०-५० रुपयांचा फरक पडू शकतो.
* एखादी वस्तू खरेदी केल्यावर त्यासोबत काही फ्री अथवा डिस्काऊंटमध्ये मिळते आहे का ते पाहा. त्या ऑफर्सची तुलनाही इतर वेबसाइट्सशी करा.
* सणाचे दिवस म्हणजे ऑनलाइन शॉिपग वेबसाइट्ससाठीसुद्धा घाईगर्दीचे दिवस असतात. तेव्हा दिलेली ऑर्डर येण्यास काहीसा उशीर होऊ शकतो. त्यामुळे कोणती वेबसाइट लवकरात लवकर शििपग करू शकते हे पण जाणून घ्या. त्यात त्या साइटचे ‘बिझनेस डे’ कोणते आहेत हे नीट बघून घ्या.
* काही वेबसाइट्स एखाद्या बँकेच्या क्रेडिट कार्डवर अधिक ५ ते १० टक्के सूट देऊ करतात. असे क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असेल तर त्याचा नक्की वापर करा, म्हणजे जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो.
* तुमच्याकडे एखादं व्हाऊचर असेल तर हे दिवाळी ऑफर्ससाठी चालू शकते का ते पाहा. काही वेळेस ही व्हाऊचर्स ऑफर्ससाठी चालत नाहीत.     (संकलन – संदेश सामंत)