वैष्णवी वैद्य

परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्याचा निर्णय तसा बराच धाडसी असतो. जीआरई, जीमॅट, टोफे लसारख्या महाकठीण स्पर्धा परीक्षांची तयारी करणे, त्या दिव्याला सामोरे जाऊन कटऑफचे मार्क्‍स मिळवणे, आर्थिक नियोजन करणे, मानसिक तयारी करणे, एक ना अनेक गोष्टींची जुळवाजुळव अनेक वर्षे मुलं करत असतात. पण येत्या काही वर्षांंत परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची ही वहिवाटही बदलणार का? विशेषत: केंद्र सरकारने जाहीर के लेल्या नवीन शिक्षण धोरणानुसार परदेशी विद्यापीठांना भारताचे दालन खुले करण्यात आले असल्याने विद्यापीठेच आली दारी.. अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. या बदलामुळे शिक्षणासाठी विलायतेची वाट विद्यार्थी धरतील की आपल्याच देशात विलायती विद्यापीठात शिक्षण घेणे त्यांना सोपे जाईल..

नव्या शैक्षणिक धोरणानुसार परदेशी विद्यापीठांचे शिक्षण भारतातही उपलब्ध होणार असले तरी ते प्रत्यक्षात येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. पण म्हणून शिक्षणाचा हा प्रवाहो थांबलेला नाही. आताही अनेक परदेशी विद्यापीठे आणि महाविद्यालये भारतीय विद्यापीठांबरोबर संलग्न प्रशिक्षण किं वा अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत. स्वप्निल दामले हा आयटीएम इन्स्टिटय़ूटमधून हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षांचे शिक्षण घेतो आहे. तो सांगतो, ‘माझे कॉलेज मुंबई विद्यापीठ व स्कॉटलंडच्या क्वीन मार्गरेट विद्यापीठाशी संलग्न आहे. आमची सध्या ऑनलाइन लेक्चर्स सुरू असून उत्कृष्ट शिक्षक आणि अभ्यासक्रम आम्हाला मिळालेला आहे. प्रत्येक शिक्षक मुलांकडे वैयक्तिक लक्ष देतात जे आपल्या देशात सरकारमान्य महाविद्यालयात शक्यतो पाहायला मिळत नाहीत. मी सध्यातरी बाहेर जाऊन शिक्षण घेण्याच्या विचारात नाही कारण मला इथे उत्तम शिक्षण मिळते आहे. आणि पदवी मिळाल्यावर कॅम्पस प्लेसमेंटसुद्धा मिळणार आहे’. परदेशी विद्यापीठातून मिळणारे उत्कृष्ट शिक्षण आणि नोकरीच्या संधी या दोन गोष्टी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांच्याशी बोलताना लक्षात येते.

अमेरिकेतल्या ‘सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ मिसूरी’त कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या श्वेता शेठ या तरुणीच्या मते, अभियांत्रिकी क्षेत्रात सगळ्यात कठीण असतं ते म्हणजे तुमच्या गुणवत्तेला न्याय देणारी नोकरी मिळणं. येत्या काळात भारतीय विद्यापीठांमध्येही त्या दर्जाचे कॅ म्पस प्लेसमेंट मिळणार असेल आणि प्राध्यापकांचे शिकवणेही उत्कृ ष्ट गुणवत्तेचे असेल तर नक्कीच फायद्याचे आहे. अर्थात, परदेशात शिक्षण घेणं प्रत्येकासाठी तितकं सोपं नसतं. ‘अमेरिकेत येण्यासाठी तुम्हाला प्रचंड आर्थिक नियोजनाची गरज असते. इकडे प्रवेश मिळवण्यासाठीच्या प्रक्रियेपासून ते दर सहामाहीच्या फीपर्यंत सगळंच खर्चीक असतं. भारतात जर त्या पद्धतीचे शिक्षण असेल तर इथे येण्याची काहीच गरज नाही’, असंही ती स्पष्ट करते.

मुळातच भारताबाहेर जाऊन शिक्षण घेण्यामागचा उद्देश किंवा मानसिकता काय असते हे तरुणांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय शिक्षणात मिळणारे ज्ञान आणि विविध क्षेत्रात उपयोगी पडणारे ज्ञान यात बरीच तफावत आढळते. स्पर्धा सगळ्याच क्षेत्रात वाढताना दिसते आहे. आयटी, अर्थशास्त्राशी संबंधित इतर क्षेत्रांमधील नोकरी- व्यवसायात तग धरून राहणे जोखमीचे बनले आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानावरही तिथे जास्त भर दिला जातो. त्यामळे शिक्षणातून सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास, चांगली कॅम्पस प्लेसमेंट याचबरोबरीने पूर्णपणे संशोधनावर अवलंबून असणारी अशी काही क्षेत्रं आहेत ज्यांना आपल्याकडे वाव मिळत नाही त्यासाठीही परदेशी विद्यापीठांचीच निवड करण्याकडे तरुणाईचा कल दिसतो.

‘आपल्याकडे आयआयटी, आयआयएम या संस्था सोडल्या तर कला, सामाजिक विज्ञान, इतिहास यासारख्या क्षेत्रात अशा नामांकित संस्था मुलांना माहितीच नाहीत. म्हणून व्यावसायिक शिक्षणाला (व्होकेशनल एज्युकेशन) प्राधान्य देणारी शिक्षण पद्धती भारताला गरजेची आहे. ती उभी करण्यासाठी जर परदेशी विद्यापीठांशी सल्लामसलत झाली तर उत्तमच. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मुलांना मिळायला हवं’, असं साकी मलोसे सांगतात.  साकी मलोसे यांनी हार्वर्ड विद्यापीठातून ‘मास्टर्स इन एज्युकेशन’ ही पदवी प्राप्त केली असून भारतात सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सरकारी यंत्रणेसोबत त्यांनी काम केले आहे. सध्या त्या अमेरिकेत शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनात कार्यरत आहेत. ‘परदेशातले शिक्षण फक्त वर्गापुरते मर्यादित नसते, तिकडच्या कॅम्पस कल्चरचाही मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. पीअर ग्रुप्सची संगती मुलांच्या अभ्यासासाठी महत्त्वाची असते. शिक्षणासाठीचं असं पोषक  वातावरण जर आपल्याकडेही मुलांना मिळणार असेल, त्यांच्या दृष्टीने सशक्त अभ्यासक्रम तयार होणार असतील तर विद्यार्थ्यांनी भारतातच राहून परदेशी विद्यापीठातून शिक्षण घेण्याचा विचार करायला हरकत नाही’, असं त्या सांगतात.

आत्ताही अनेक नामांकित शैक्षणिक परदेशी संस्था भारतातील काही खाजगी शिक्षणसंस्थांशी संलग्नित आहेत, पण त्याचा खरोखरच विद्यार्थ्यांना फायदा होतो का?,  याबद्दल पुण्यातील ‘दिलीप ओक्स अ‍ॅकॅडमी’चे संचालक दिलीप ओक सांगतात, ही संलग्न पद्धती विशेषत: आयआयटीसारख्या अगदी उच्च वर्गाच्या शिक्षण संस्थांशी होत असते. त्यांच्याशी संलग्न होणाऱ्या परदेशी संस्थासुद्धा तेवढय़ाच उच्चस्तरीय असतात. ते सोडून जे इतर सहयोग होत असतात ते दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरच्या संस्था असतात, ज्यांची शिफारस शक्यतो आम्ही करत नाही. अशा पद्धतीचे शिक्षण जरी मुलांना फायद्याचे वाटत असले तरी त्याची व्याप्ती आणि करिअरच्या भविष्यासाठी ते उपयोगाचे आहे का? हा सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायला हवा, असं ते सांगतात. या संस्थांमध्ये पदवी घेऊन मुलं परदेशात नोकरीसाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे इथे पदवी घेऊन जर तिथे नोकरी मिळण्याची हमी असेल तरच मुलांनी त्याचा विचार करावा. यावर्षी थोडी अनिश्चितता नक्कीच आहे, पण भविष्यात मुलांना तिथे जाऊन शिकण्यातच जास्त फायदा आहे, असं ओक सांगतात.

तरुणाईत असाही एक गट आहे जे साशंक आहेत की, बाहेरच्या गुणवत्तेचे शिक्षण इथे मिळू शकेल का? परदेशात जाता येत नाही म्हणून घरबसल्या तिकडच्या महाविद्यालयांच्या ऑनलाइन कोर्सेसच्या शोधात बरेच जण आहेत. करोनानंतरही आपल्याला हवा तो कोर्स हव्या त्या  परदेशी विद्यापीठात मिळेल का याबद्दलही अनेकांचे गहन विचारमंथन सुरू आहे. जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच सारख्या परदेशी भाषा शिकणाऱ्या तरुण-तरुणींचीही यावर वेगवेगळी मतं आहेत. खुद्द त्याच देशात जाऊन शिकल्यावर अधिक वाव मिळतो तसेच शिकवणीतही फरक पडतो, असे अनेकांचे मत आहे.

परदेशी शिक्षण हा यशाचा मापदंड असू शकत नाही. प्रत्येक क्षेत्राच्या गरजेनुसार आणि अभ्यासक्रमानुसार शिक्षणातही काही पायंडे पडत असतात. भारतात परदेशी विद्यापीठांतून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली तर तीही एक मोठी संधी असू शक ते, हेही लक्षात घ्यायला हवे. जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक गोष्टींची पायाभरणी झाली. त्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे पाश्चात्त्य संस्कृती, अनेकविध व्यवसायांचे खाजगीकरण आणि बदलत्या शिक्षण पद्धती. परदेशात शिक्षणाचे धडे घेण्याची परंपरा तरुणांमध्ये लोकप्रिय होऊ लागली. हळूहळू महाविद्यालये आणि विद्यापीठांची धोरणेही नवनवीन वळणे घेऊ लागली. वेगळ्या पद्धती, धोरणे काळानुसार आणि परिस्थितीनुसार येतीलही पण गुणात्मक शिक्षण मिळायला हवं हाच आजच्या मुलांचा आग्रह आहे.

viva@expressindia.com