वैष्णवी वैद्य

भटकंती आणि खवय्येगिरी या दोन गोष्टी तरुणांना अगदी भुरळ घालतात. रोड ट्रिप, सोलो ट्रिप, ट्रेकिंग अशा विविध प्रकारे तरुणांना नवीन जागा ‘एक्स्प्लोर’ करायला आवडतात. त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची खादाडीही आलीच. या भटकंतीबरोबर जोडलेली असते ती स्ट्रीट फूडची गंमत, पण ही दोन क्षेत्रं गेल्या वर्षी थंडावलेली होती. गेल्यावर्षीच्या परिस्थितीमुळे बराच तोटा आणि अनपेक्षित बदल या क्षेत्रांनी अनुभवले, पण तरुणप्रिय असलेली ही क्षेत्रं जास्त काळ कोमेजलेली राहणार नाहीत. नवनवीन प्रयोग ही तरुणांची आणि या क्षेत्रांची खासियत आहे.

ट्रॅव्हल-टुरिझम क्षेत्रात आता अनेक परिणामकारक बदल होतील जेणेकरून पुन्हा भटकंतीचा मनमुराद आनंद सगळ्यांनाच घेता येईल. अनेक तरुण स्टार्टअप किंवा जोडव्यवसाय  म्हणून ट्रॅव्हल— टुरिझमची निवड करतात. त्यातच आता वर्क फ्रॉम होम पॅकेज हा नवीन ट्रेण्ड येऊ शकतो. वर्क फ्रॉम होम हे गेल्यावर्षीपासून राहणीमानाचा अविभाज्य भाग झाले आहे. हा ट्रेण्ड पुढे नेत असताना एखाद्या वेगळ्या ठिकाणी राहून वर्क फ्रॉम होम करणं किंवा वर्केशन ही नवीन कल्पना टुरिझममध्ये जोर धरते आहे. त्यामुळे भटकं तीच्या ठिकाणी काम करण्याच्या या कल्पनेचे तरुणाईकडून नक्कीच स्वागत होणार आहे.

सोलो ट्रिप आणि रोड ट्रिपचा ट्रेण्ड आता बराच लोकप्रिय असला तरीही यावर्षी त्याला आणखी जास्त प्राधान्य मिळणार आहे. परिस्थिती सुधारत असली तरी काळजी घेतच भटकं तीचा आनंद घेणं

महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय ट्रिप्सपेक्षा तरुणाई देशांतर्गत भटकं तीत रमताना दिसते आहे. हम्पी, रन ऑफ कच्छ, उदयपूर—राजस्थान  या डेस्टिनेशन्सकडे तरुणाईचा कल जास्त आहे. गर्दी कमी असल्याने मुंबईच्या आसपासचे टुरिस्ट पॉइंट्ससुद्धा या काळात लोकप्रिय झाले आहेत. अ‍ॅग्रो टुरिझम हाही तरुणाईचा आवडता पर्याय होऊ पाहतो आहे. टुरिझमचे अनेक स्टार्टअप सोशल मीडिया तसेच स्वत:च्या संकेतस्थळाचा वापर करून पुन्हा नव्याने उनाडक्या करायला सज्ज होतायेत, ही या वर्षांतली सकारात्मक बाब आहे.

भटकं तीचा व्याप वाढतोय तसंच खाण्याचे ट्रेण्ड्सही  वाढतायेत. ‘व्हर्चुअल किचन’ ही संकल्पना गेल्या वर्षी भरपूर लोकप्रिय झाली. मोठमोठय़ा हॉटेल्समधील शेफ त्यांच्या खास रेसिपी घरी बनवून त्याची होम डिलिव्हरी करू लागले आहेत. त्यामुळे हॉटेल्स बंद असतानाही तरुणाईला त्यांच्या आवडीचे हॉटेलचे पदार्थ चाखायला मिळाले.

‘वर्क फ्रॉम होम स्पेशल’ कॉम्बोही तरुणाईला चाखायला मिळाले. भाजीपाला, मासेमारी, आंबे-फणस सगळे डिजिटली घरी पोहोचवण्याचा घाट तरुणाईने घातला आणि यशस्वी व्यवसायातही त्याचे रूपांतर के ले. लोकांना घरातच बसून सगळे समारंभ करायचे असल्याने बेकर्ससाठीही हा काळ पर्वणीच ठरला आहे.  ट्रॅव्हल आणि फू ड्स क्षेत्रातील हे सकारात्मक बदल तरुणाईने अगदी उत्साहात निर्माण केले आणि स्वीकारले देखील. पुन्हा तशीच भटकंती आणि खादाडी या नव्या वर्षी रंगत आणणार आहे.

viva@expressindia.com