वेदवती चिपळूणकर

आताच्या तरुण पिढीला भातुकलीचा खेळही लहानपणी कधी खरा वाटायचा नाही आणि तरुणपणी मतदान मनापासून करत असले तरी, निवडणुकाही खऱ्या वाटत नाहीत. हंगामी फुलं फुलतात तशा या निवडणुका येतात, माहौल तयार करतात आणि ऋतू बदलल्यासारख्या निघून जातात, अशी भावना तरुणाईत जोर धरते आहे.

मूल जेव्हा लहान असतं तेव्हा, मुलगा असो किंवा मुलगी भातुकलीचा खेळ त्यांनी कधी ना कधी खेळलेलाच असतो. अर्थात आताची मुलं खेळत असतीलच असे सांगता येत नाही; पण आता तरुण असलेली मंडळी नक्कीच लहानपणी भातुकलीचा खेळ निश्चितपणे खेळली होती. या भातुकलीत आणि निवडणुकांच्या हंगामात विलक्षण साम्य आहे. वरवर बघायचं झालं तर भातुकली हाही खेळ आणि निवडणूक हाही खेळ. दोन्ही खेळ आयुष्यभराचा प्रश्न असल्यासारखे मांडायचे आणि झेपले नाहीत, कंटाळा आला, की मोडून निघून जायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आताच्या तरुण पिढीला भातुकलीचा खेळही लहानपणी कधी खरा वाटायचा नाही आणि तरुणपणी मतदान मनापासून करत असले तरी, निवडणुकाही खऱ्या वाटत नाहीत. हंगामी फुलं फुलतात तशा या निवडणुका येतात, माहौल तयार करतात आणि ऋतू बदलल्यासारख्या निघून जातात, अशी भावना तरुणाईत जोर धरते आहे.

खोटी भांडी, दाणे-चुरमुरे आणि काही चादरी-ओढण्यांनी बांधलेलं घर अशा थाटात भातुकलीचा संसार थाटला जायचा. खोटी आश्वासने देऊ नच निवडणुकांच्या हंगामाला सुरुवात होते. आपली आश्वासने खरी आहेत हे दाखवण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. भातुकलीत जसं चिवडा, पोहे, उपमा, भात इत्यादी अनेक पदार्थासाठी तेच दाणे-कुरमुरे हातावर टेकवले जातात तसंच आपली आश्वासनं खरी आहेत हे सिद्ध करण्यासाठी सगळ्या आश्वासनांच्या बदली एकच कोणतं तरी काम केलं जातं आणि त्याचा मनसोक्त गवगवाही केला जातो. आधी खड्डय़ांमुळे अ‍ॅडव्हेंचर असलेला रस्ता आता खड्डे भरून तयार झालेल्या टेकडय़ांमुळे अ‍ॅडव्हेंचर बनतो. रस्ते रोज झाडले जातात, झेब्रा क्रॉसिंग आणि डिव्हायडरच्या पट्टय़ांना नव्याने रंगाचा चांगला जाड थर देऊन रस्ता उंचसखल राहील याची दक्षता घेतली जाते, पाच वर्षांपासून लटकत असलेली जुनी पोस्टर्स काढून नवी चढवली जातात. इतकंच काय, नसलेल्या डासांना हाकलण्यासाठी गावभर धूर पसरवला जातो, लोकांच्या जेवायच्या वेळीच गटारांची साफसफाई केली जाते आणि रात्री सोडून भरदिवसा पोलिसांच्या गस्ती घातल्या जातात. कबूल केलेल्या सगळ्या कामांच्या बदलात फक्त रस्त्याच्या तात्पुरत्या कामाचे दाणे-कुरमुरे हातावर पडतात. आधीची पिढी जराशी भोळी होती, दाणे-कुरमुऱ्यांना ‘खाऊ’ म्हणून खायची. आताची तरुण पिढी कदाचित ‘अति’ असेल, पण ‘शहाणी’ आहे. दाणे-कुरमुरे कोणते आणि पक्वान्न कोणतं यातला फरक त्यांच्या चांगलाच लक्षात येतो. त्यामुळे ही पिढी अधिक डोळसपणे मतदान करते, असं म्हणायला हरकत नसावी.

भातुकलीत सामान्यत: एखादी बाहुली असायची जिला लहान मूल समजून खाणं, पाणी, औषध, आंघोळ, कपडे अशा सगळ्या गरजा पुरवायचे निरागस प्रयत्न केले जायचे. निरागसता इतकी असायची की, बाहुली खोटी असली तरी तिच्या पुढय़ात खरेखुरे दाणे ठेवले जायचे. निवडणुकांच्या काळात ही निरागसता इतक्या पराकोटीला पोहोचते की, समोर खोटी बाहुली नाहीत, खरी माणसं आहेत याच्याकडे लक्ष न देता रिकामी ताटलीच समोर ठेवली जाते. अर्थात आताची तरुणाई मात्र तेवढी निरागस राहिलेली नाही. ताटली रिकामी आहे की भरलेली आणि भरलेल्या ताटलीत दाणे आहेत की फुटाणे हे बघून निर्णय घेण्याइतकी ही पिढी स्मार्ट आहे. ताटलीत नक्की काय पडतंय यापेक्षाही ते कोण देतंय हे जास्त कुतूहलाने आणि चिकित्सेने बघितलं जातं. आपल्याला आवडता नेता देत असेल तर त्याने दिलेल्या दाण्यांनाही डोक्यावर घ्यायचं आणि आपला विरोध असेल तर त्याने पौष्टिक ड्रायफ्रुट्स दिली तरी त्यांना सागरगोटय़ांइतकीही किंमत द्यायची नाही, हा मनुष्यस्वभाव मात्र प्रत्येकच पिढीत दिसून आला आहे. ‘बेंबटय़ा, काय बोलतंय यापेक्षा कोण बोलतंय हे महत्त्वाचं!’ या पुलंच्या वाक्याला जणू ब्रह्मवाक्याचा दर्जा दिल्याप्रमाणे इमानेइतबारे कामाकडे न बघता माणसाकडे बघितलं जातं.

भातुकली आणि निवडणुकांमधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग साम्य म्हणजे आपण बहिणी-बहिणी, आई-मुलगी अशी सगळी नाती तात्पुरती जोडली जातात. खेळाच्या वेळासाठी त्या रोलमध्ये वावरलं जातं आणि खेळ संपला की एकमेकांच्या झिंज्या उपटायला मोकळे! शहाण्यांना मुद्दा लक्षात आलाच असेल. गठबंधन!!! सगळी खोटी नाती निवडणुकांच्या हंगामापुरती टिकतात आणि एकदा खातेवाटप झालं की, पुढची पाच वर्ष झिंज्या उपटायला मोकळे! आज बहिणी-बहिणी असलेल्या मुली उद्याच्या भातुकलीच्या डावात आई-मुलगी होतात आणि परवाच्या खेळात अगदी सासवा-सुनाही होतात! या सतत बदलत्या नात्यांमुळे साहजिकच ‘मी खेळतच नाही जा’ इथपर्यंत भांडणं पोहोचतात. काही रिलेट होतंय का?

खरं तर मुद्दा इतकाच की, हा सगळा केवळ खेळ आहे हे समजण्यासाठी भोळेपणा विसरून जरा डोळसपणे घडामोडींकडे बघावं लागतं. आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळात एखाद्याचं खोटं उघडं पडायला फार वेळ लागत नाही. आपली कामं कोण करतंय त्याला मत द्यायचं इतकं सोपं समीकरण कधीच नव्हतं; फक्त ही वस्तुस्थिती या तरुण पिढीला आत्ता कुठे लक्षात यायला लागली आहे. सत्ता कोणाची याने फरक पडणार हे जरी खरं असलं तरी नेमक्या कशावर विश्वास ठेवून सत्ता हाती द्यायची याबद्दल तरुणाई गांभीर्याने विचार करताना आणि व्यक्त होताना दिसते. या सगळ्या गदारोळात आणि कन्फ्यूजनच्या वातावरणात ‘सत्ता अमक्याची नाही, तमक्याची नाही, ढमक्याची नाही.. सत्ता आहे विश्वेश्वराची!’ हे पुलंच्या अंतू बव्र्याचं म्हणणंच तेवढं अंतिम सत्य वाटायला लागतं!