गायत्री हसबनीस viva@expressindia.com

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुटिन सुरू  होण्याच्या मार्गावर असतानाच परत थांबलं. यानिमित्ताने, उभ्या राहिलेल्या प्रश्नांचा सामना करताना मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आहे. अशा प्रसंगी केवळ करोनाबरोबरच युद्ध नाही तर मानसिक ताणतणावाला सामोरं जात त्यावरही मात करायची आहे. सध्या एका वेगळ्याच मानसिक तणावाशी आपण सामना करतो आहोत. आपल्या घरात करोनाचा रुग्ण असल्यास येणारा एक मानसिक तणाव, करोनामुळे जवळच्या व्यक्तीचा किं वा परिचितांपैकी एखाद्याचा घडलेला दुर्दैवी मृत्यू, कामाचा ताण, परीक्षांचा ताण, नोकरीची संधी जाणं अशा एक ना अनेक समस्यांनी सध्या सगळ्यांनाच घेरून टाकलं आहे. विशेषत: तरुणाईलाही विविध आघाडय़ांवर लढावं लागतं आहे. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मानसिक ताणतणावांचा सामना कशा पद्धतीने करता येईल, या संदर्भात तज्ज्ञांशी बोलून जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

‘सध्या सगळेच खूप टेन्शनमध्ये आहेत. अशा वेळी या प्रचंड तणावाला छूमंतर कसं करायचं हा प्रश्न आपल्याला साहजिकच छळतोय. तेव्हा अशा वेळेस काय करायचं, तर सर्वप्रथम एक वही घ्या, पेन घ्या आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची यादी करा आणि त्यानुसार कसलाही विचार न करता कामाला लागा. ती यादी पूर्ण करायला सुरुवात करा. तुम्हाला काय आवडतं? गाणी ऐकायला आवडतात तर गाणी ऐका, व्यायाम करायला आवडत असेल तर वेळ काढून व्यायामही करा. कोणी आवडती व्यक्ती असल्यास तिला / त्यांना कॉल किंवा व्हिडीओ कॉल करा, पण आपल्याला जे आवडतं ते करणं थांबवू नका. सोडू नका. अगदी सोप्पा मार्ग म्हणजे स्वत:च्या भावना लिहून काढा’, असा सल्ला ‘दिशा काउन्सिलिंग सेंटर’च्या समुपदेशक नेत्रा खेर देतात. त्यांनी यानिमित्ताने आलेले अनुभवही सांगितले. ‘माझ्या ओळखीतील एक गृहस्थ, त्यांची बहीण आणि आई तिघांनाही करोना झाला होता. त्यात त्यांची आई मृत्युमुखी पडली. त्यामुळे घरातील वातावरण तणावाचे होते. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी स्तोत्र पठणाचा कार्यक्रम झूमवर सुरू के ला. त्यात इतरही लोक सहभागी झाले. त्यांच्या बहिणीला गाण्याची आवड आहे त्यामुळे यानिमित्ताने तिनेही त्यात आपले मन रमवले. दोघांनी प्राणायामचा आधार घेत, ध्यानधारणा करून मन स्थिर करण्यात यश मिळवले’, हे प्रत्यक्षातील अनुभव सध्या तरुणाईसाठी खूप महत्त्वाचे आहेत असं त्या सांगतात.

सध्या तरुणाईला करोना परिस्थितीचा अत्यंत वाईट प्रकारे सामना करावा लागतो आहे. कोणाचे शिक्षण ठप्प झाले आहे तर कोणाची नोकरी गेली आहे. कोणाचे करिअर सुरू होण्याआधीच त्याला ब्रेक लागला आहे.  अशा वेळी ते या स्ट्रेसशी कसं डील करू शकतात, याबद्दल सायकोलॉजिस्ट प्रज्ञा माने सांगतात, ‘ज्या मुलांच्या परीक्षा अडकल्या आहेत. पुढे काय करायचं, हा पेच आहे. नोकरी धंद्याबद्दल ज्यांना प्रश्न पडले असतील त्यांनी काही प्रमाणात तयारी आतापासूनच करायला घ्यावी असं मी म्हणेन. आपापल्या क्षेत्रानुसार लागणाऱ्या लहानमोठय़ा स्किल्सचा आपल्यातच विकास कसा करता येईल, यावर लक्ष द्या. करोना संपल्यावर नोकऱ्यांचा तुटवडा पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, मात्र त्याचबरोबरीने नवीन स्टार्टअप्स मोठय़ा प्रमाणावर सुरू होण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे नोकरी नाही म्हणून दु:खी होऊ नका. काळाची गरज ओळखून जो वागेल त्याला बरेच मार्ग मिळू शकतात. तुमच्या प्लॅन ‘अ’सोबत तुमचे प्लॅन ‘इ’, ‘उ’ आणि ‘ऊ ’देखील तयार करा. स्वत:ला बिझी ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे नवं काही शिकत, छंद जोपासत स्वत:ला जास्तीत जास्त बिझी ठेवा’.

मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग आणि व्यायामही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. आरती तावडे ही ऑनलाइन योगा क्लासेस घेते. ‘योगारती’ (ॠं१ं३्र) नावाने तिचं इन्स्टाग्राम पेज आहे. ‘सध्या शारीरिक ताण आहेच  आणि त्यातून मानसिक स्थैर्यही नाही. तेव्हा ‘सूर्यनमस्कार’ घालण्याचा सल्ला मी देईन; मात्र सूर्यनमस्कार हे रोजच्या रोज घातले गेले पाहिजेत. निदान रोज पाच मिनिटे तरी योगासनाला वेळ द्या. दहा मिनिटे दहा सूर्यनमस्कार  आणि ‘प्राणायाम’ करा. प्राणायाम हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे राग, भीती कमी होण्यास मदत होते. सध्याच्या काळात सतत करोनाच्याच वाईट बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे येणारा राग, भीती आणि ताण याचा श्वसनावर परिणाम होतो. इथे प्राणायाम हेल्पफुल ठरतो. नव्याने सुरुवात करताना दोन सूर्यनमस्कार आणि प्राणायामने करावी. ‘अनुलोमविलोम’ आणि ‘शवासन’ याचाही फायदा होतो. शवासनामुळे शरीराला आराम मिळतो. त्याने मन शांत राहते. ज्यांच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात त्यांनी रोजच्या रोज योगासन करणं गरजेचं आहे’, असं आरती सांगते. ‘डोळे बंद करून प्रथम काही सेकंद मनाला शांत करा. त्यानंतर प्राणायाम करा. योगासने करण्यासाठी वेळेचे नियोजन नक्की करा, सकाळी जमलं नाही तर किमान संध्याकाळी योगासनांसाठी वेळ नक्की राखून ठेवा, असं ती म्हणते.

योगासने आणि प्राणायाम यांच्याबरोबरीने स्ट्रेसबस्टर म्हणून फिटनेस फंडाही उपयोगी ठरतो. ‘क्लेनेटिक्स’ फिटनेसच्या डॉ. तेजल कनवार सांगतात, ‘आम्ही ऑनलाइन माध्यमातून फिटनेसच्या मदतीने स्ट्रेसमधून बाहेर पडणं शक्य करून दाखवलं आहे. याशिवाय, लहान मुलांच्या बरोबरीने त्यांची भावंडं आणि पालकांसोबत आम्ही ऑनलाइन गेम्स, गाणी, नाच अरेंज करतो. तबाटा, झुम्बासारखे नृत्यप्रकार ज्यातून फिटनेस साध्य होतो तेही आम्ही ऑनलाइन झूमवरून आणि फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून करतो. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळालाच, लोकांचा स्ट्रेस कमी व्हायलाही मदत झाली आणि नवी माणसं भेटल्याचा आनंदही त्याला जोडला गेला’.

करोनाकाळात आशेने साथ सोडलेली नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आपल्याकडे ताणतणावांचा सामना करत सकारात्मक विचाराने पुढे जाण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तज्ज्ञांनी सुचवलेले पर्याय कृतीत आणत आपण स्वत:ला या कठीण काळातही आनंदी ठेवू शकतो हे निश्चित!