‘मेरे दिल, जिगर, लिवर में हो तुम, व़क्त-बेव़क्त आया फिवर हो तुम..’ असं म्हणत स्टेजवर उभं राहून तुम्ही प्रपोज केलंय कधी? किंवा ‘मोहब्बतें’सारखं कागदांचा तुटवडा असल्याप्रमाणे सुकलेल्या पानावर प्रेमपत्र लिहिलंय? ‘बर्फी’सारखं शर्टाच्या आतून हृदय काढून तुडवण्यासाठी तिच्या पायाशी ठेवलंय? किंवा कहर म्हणून ‘रब ने’ तुमची जोडी बनवावी म्हणून संपूर्ण शहराचे दिवे घालवण्याचं धाडस केलंय? या फिल्मी (म्हणजे अतक्र्य) नाहीतर त्याच त्या ‘घिसेपिटे डीम लाइट डिनर स्टाइल’मध्ये प्रपोज करायचा विचार करताय? नाही ना? अहो, करू पण नका.. ते त्यांचं पेटंट (म्हणजे सिनेमा-सीरियलवाल्यांचं) आहे. आता आपल्या डोकॅलिटीची वेळ आहे.
आज भी ‘घिसेपिटे स्टाइल’मध्ये प्रपोज करणार आहात, की सरळ, स्पष्ट बोलून मोकळं व्हायचा विचार आहे? आमच्या सवंगडय़ांना तरी नाही.. थोडंसं हटके, थोडंसं थ्रििलग, थोडंसं वेडसर प्रपोज करण्याची ऊर्मी असलेली लोक क्रिएटिव्हिटी दाखवायला तयार होऊन बसले आहेत. कदाचित तुमच्याही आजूबाजूला असे किस्से घडले असतील. ‘तुम्हाला कोणत्या प्रकारे प्रपोज करायला (किंवा करवून घ्यायला) आवडेल?’ असं विचारल्यावर काही कॉमन उत्तरं सगळीकडेच मिळतात. ‘कॅन्डल लाइट डिनर, पेटल्स, चॉकलेट्स आणि थोडा रोमॅन्टिक मूड.. बस्स! बाकी काही नाही.’ पण थोडं विश्वासात घेऊन त्यांना बोलतं केलंत तर कित्येक
सुप्त गोष्टी हळूहळू ओठांवर येतील.
नुकताच एका सुगरण मत्रिणीला हा प्रश्न विचारला. वाईनमधून अंगठी द्यायची म्हणजे थेट लग्नाची मागणी होईल आणि प्रपोजलसाठी फॉच्र्युन कुकीज काही कामाच्या नाहीत. त्यामुळे साधंसं प्रपोजल मांडायचं झाल्यास कबाबमध्ये एक छोटीशी टय़ूब टाकून त्यातल्या कागदात मनोभावना लिहायची कल्पना तिला सुचली. अर्थात, ते नळकांडं घशात अडकलं तर काय करशील हा माझा प्रश्न लगोलग आलाच! तर ‘तिथं काटा-चमचा ठेवून देईन गं! म्हणजे हाताने खायचं नाही हे त्याला कळेल’, असं काहीसं उत्तर आलं. थोडंसं गमतीदार वाटलं; पण मला ही कल्पना हटके वाटली.
तसेच ‘डिरेक्टर’गिरी करणाऱ्या मुलानेही एक वेगळा प्रयोग सुचवला. त्या दोघांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर एक अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म करून एखाद्या मिनी थिएटरमध्ये दाखवावी आणि शेवटच्या सीननुसार दोन्हीकडे ‘प्यार का इजहार’ व्हावा.. किती सुंदर आणि गोड असेल हे! असं प्रपोज केलं तर कोणालाही आवडेल. पण काही लोकांची भाषा ही त्या त्या क्षेत्रातील लोकांनाच समजू शकते. जसं की, हे एका क्रिकेटवेडय़ाचं प्रपोजल स्पीच- ‘सखे, २२ यार्डच्या खेळपट्टीवर तू माझ्यासोबत ७ रन्स काढशील का? मी कधीच तुझी विकेट घेणार नाही आणि तुझ्याबद्दल मी अम्पायरकडे कोणतं जजमेंटसुद्धा मागणार नाही. कधी भांडण झालंच तर चुकूनही बॉल फेकून मारणार नाही; पण तूसुद्धा षटकार मारून मला ग्राऊंडच्या बाहेर नको जाऊ देऊस..’ आता बऱ्याच मुली या क्रिकेटवेडय़ाचे पाय धरून ‘पुन्हा भेटू नकोस’ अशी विनवणीसुद्धा करतील,
तर एखादी त्यांच्यासारखीच क्रिकेटवेडी खरंच ते ‘७ रन्स’ काढायला राजी होईल.
मला आठवतंय.. शाळेत असताना माझ्या मत्रिणीला ८ पानांचं लव्ह लेटर आलेलं. (शालेय वयात ८ पानांचं पत्र म्हणजे खंडकाव्यासमान होतं.) ते पाहूनच तिने जागच्या जागी नकार दिलेला. आता त्याने ते पत्र साहित्याच्या विद्याíथनीला दिला तर कदाचित होकारसुद्धा आला असता. (प्रसंगी तिने पत्राची वेगळी समीक्षासुद्धा लिहिली असती.) पण तसं काही झालं नाही. तेव्हा प्रपोज करताना तुम्ही काय करू शकता यापेक्षा समोरील व्यक्तीला काय पेलू शकतं याचा विचार अगोदर करणं बरं!
अशा कित्येकांच्या सुपीक डोक्यातून अनेक भन्नाट कल्पना आल्या. एक वन्यजीवन अभ्यासक, रानात एका सुंदरशा ओढय़ाकाठी साप, कोळी, कोतवाल यांच्या सान्निध्यात प्रेमाच्या आणाभाका घ्यायला आवडेल असं म्हणाली. तर एक ट्रेकर अलंग-मदनसारख्या गडावर प्रपोज करण्याचा विचार करतोय. अर्थात, नकार आला तर खाली ढकलणार नाही तो; पण ढगांच्याही वर स्वर्गात उभा राहून प्रपोज करायची मजा काही औरच आहे.
चॉकलेट, गुलाबाची फुलं आणि कॅण्डल लाइट डिनरच्या पलीकडेही रोमान्स शोधू शकणारी जोडपी तशी थोडी स्पेशलच वाटतात. त्यांच्यातला वेगळेपणा जाणवतो. तुम्हीही असा वेडेपणा एकदा करून पाहा.. त्यात निराळेपणा असला तरी वेगळाच आनंद आहे. (होकार मिळेल याची खात्री असली तरच हे उपद्व्याप उपयोगाचे, हेदेखील लक्षात ठेवा.)
तेव्हा चला.. सज्ज व्हा.. होऊ दे प्रपोज!

काही गमतीदार (पण उपयुक्त) टीप्स (अर्थात मुलांसाठी!)
प्रपोज करताना तुम्ही काय करू शकता यापेक्षा समोरील व्यक्तीला काय पेलू शकतं याचा विचार अगोदर करणं बरं!
नुसतं डिओ वापरल्यानं पोरी मागे लागणार नाहीत, जाहिरातींवर भुलू नये.
शक्यतो गुलाबी कपडे टाळावेत. गैरसमज होऊ शकतो.
एका वेळी एक हाच नियम वापरावा. नाहीतर तेलही गेले नि तूपही गेले असे होईल.
सरतेशेवटी निराशा आल्यास ‘इदं न मम’ या तत्त्वाचा वापर करून पुढचा प्रवास करावा.
थोडक्यात पण महत्त्वाचं.. होऊ दे खर्च कारण ध्यान होणार आहे घरचं!
(संकलन साहाय्य- मानस बर्वे)