तेजश्री गायकवाड

आपला सर्वात बोलका अवयव म्हणजे डोळे. कधी कधी काही न बोलताही डोळे बरंच काही बोलून जातात. आता तर करोनामुळे विकसित होत असलेल्या या ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैलीत तर डोळ्यांनी साधल्या जाणाऱ्या या संवादाला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. सध्या मास्कचा वापर अनिवार्य झाला असल्याने साहजिकच चेहरा झाकला जाऊन आँखो आँखो में होणाऱ्या संवादाला धार चढते आहे. या बोलक्या डोळ्यांकडे पहिल्यांदा लक्ष वेधलं जाणार म्हटल्यावर त्यांच्या सौंदर्यावर भर देणारे मेकअप ट्रेण्डही येणारच. जीवनशैलीतील हे बदल लक्षात घेत काही नवीन आय मेकअप ट्रेण्ड सध्या मार्के टमध्ये रु जू पाहत आहेत.

देशभरात सगळीकडे सध्या हळूहळू का होईना अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लोक सावधतेने का होईना पण आपल्या नातेवाईकांकडे, आजूबाजूच्या घरी जाऊन  वेगवेगळे सण साजरे करताना दिसू लागले आहेत. अनेक खासगी कं पन्यांमध्येही कर्मचारी कामावर दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे एकाच वेळी सणासुदीचा मूड सांभाळण्यासाठीचं नटणं-सजणं आणि कॉर्पोरेट कल्चरचा लूक जपणं या दोन्हींची तयारी करावी लागणार आहे. मास्कमुळे सध्या चेहऱ्यावरच्या बाकीच्या मेकअपला फार महत्त्व राहिलेलं नाही. नेहमीच्या चेहऱ्याच्या मेकअपपेक्षा फक्त डोळ्यांच्या मेकअपला महत्त्व आहे. कुठेही बाहेर जाताना विदाऊट मेकअप जाण्यापेक्षा किमान आय मेकअप केला तरी आपल्या गेटअपमध्ये वेगळी शान येते. एक काजळाची रेघसुद्धा आपल्या सौंदर्यात भर टाकते. त्यामुळे सोशल मीडियासह अन्य अनेक मेकअप साइट्सवर आय मेकअपचे वेगवेगळे ट्रेण्ड्स टाकण्याच्या प्रकाराला उधाण आलं आहे. व्हिडीओ बघून अनेक जण नवीन प्रयोग करत आहेत. यामध्ये नक्की कोणती स्टाईल आणि मेकअप उत्पादने ट्रेण्डमध्ये आहेत याबद्दल ‘अ‍ॅमेझॉन ब्युटी’च्या सोबिया मोघुल सांगतात, ‘चमकदार आयलाइनरपासून ते कट—क्रीझ आयश्ॉडो आणि मोठय़ा आयलॅशपर्यंत अनेक गोष्टी ट्रेण्डमध्ये आहेत. वॉटर कलर आयचा ट्रेण्ड म्हणजे मऊ परंतु अगदी हॅपनिंग असा प्रकार आहे. यात तुम्ही अनेक रंग वापरू शकता किंवा केवळ एकाच टोननेही आय मेकअप करू शकता. ब्राइट सनसेट, पेस्टल गेलाटो, रेनबो ब्लशर या स्टाईल्स वॉटर कलर आय मेकअपमध्ये ट्रेण्डिंग आहेत.  ‘रिफ्लेक्टिव लिड्स’ या प्रकारात डोळ्यांवर हलकासा शिमर लावला जातो. शिमर लावण्याआधी प्राईमरचा एक लेअर लावायला विसरू नका. नेहमीची मेकअप पद्धत बाजूला ठेवून नवीन प्रयोग करत तुम्ही  मिक्समॅच श्ॉडोज करून पाहा. वेगवेगळ्या रंगांना मिक्समॅच करत तुम्ही नवीन स्टाईल  स्टेटमेंट तयार करू शकता’.

आय श्ॉडोचा वापर शक्यतो फेस्टिव्हलमध्ये केला जातो. रोजच्या जीवनात आपल्याला हलका मेकअप हवा असतो. अशा हलक्या आय मेकअपमध्ये महत्त्वाचं ठरतं ते आयलाइनर आणि आय लॅशेस. ‘लेजिट लॉन्ग लॅशेस’ हा प्रकार सध्या फार ट्रेण्डमध्ये आहे, असं सोबिया सांगतात. ‘लांब आणि छान आय लॅशेससाठी त्यात चांगला व्हॉल्यूम असणं महत्त्वाचं असतं. यासाठी तुम्ही मस्कारा वापरा. योग्य पद्धतीने मस्कारा लावला तर डोळे अधिक आकर्षक आणि मोहक दिसतात. ६० च्या दशकातील फ्लोटिंग आयलाइनरची स्टाईल पुन्हा एकदा ट्रेण्डमध्ये आली आहे. अनेकांची ही आवडती स्टाईल आहे. यामध्ये तुम्ही काळा लाइनर किंवा सुंदर कलरफुल आइलाइनर वापरू शकता. ‘स्ट्रक्चर्ड ब्रोझ’ म्हणजे अधिक मेहनत न घेता केला जाणारा आय मेकअप. यामध्ये आयब्रो शार्प केले जातात. यासाठी नॅचरल गडद आणि फिक्कट ब्राऊन रंग वापरला जातो’, अशी माहिती त्यांनी दिली. या सगळ्या स्टाईल्ससाठी प्रामुख्याने लॅक्मे, मेबलीन, लॉरीएल पॅरीस अशा कंपनीची उत्पादनं लोकप्रिय आहेत.

ग्लिटर आणि बोल्ड आय मेकअपवरही सध्या भर दिला जातो आहे, असं मत सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट माधुरी खेसे यांनी व्यक्त के लं.  ‘ग्लिटर आणि बोल्ड आय मेकअपसाठी डार्क आणि शिमर आयश्ॉडोची निवड केली जाते, परंतु हे करताना तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी जाताय हे लक्षात घ्या.  आयश्ॉडोचा मूळचा रंग खूप गडद असेल तर त्याचा वापर जास्त करू नका. यामुळे संपूर्ण लूक बदलू शकतो. मास्कमुळे लिपस्टिक दिसत नसली तरी सणाच्या दिवशी लिपस्टिक लावली जाते. अशावेळी लिपस्टिक आणि आयश्ॉडोचा रंग सेम नसावा. आयश्ॉडो झाल्यावर सध्या ट्रेण्डमध्ये असलेला पांढऱ्या रंगाचा हायलाइटर नक्की वापरा’, असं त्या सांगतात. आपल्या डोळ्यांच्या आकारानुसार आयलाइनर लावला पाहिजे असं माधुरी सांगतात. ‘सध्या जाड किं वा ठळक अशा आयलाइनरचा ट्रेण्ड आहे. पण तरीही तुमच्या डोळ्यांचा आकार मोठा असेल तर बारीक लाइनर लावावे’, असा सल्ला त्या देतात. सेलिब्रिटी खूप बोल्ड आयमेकअप करतात, परंतु आपण त्यांचं अंधानुकरण न करता आपल्याला जे रंग सूट करतील तेच वापरावेत, असं माधुरी स्पष्ट सांगतात. प्रसंगानुसार आपण जसा बाकीचा मेकअप कमी-जास्त करतो, त्यात बदल करतो तसंच आय मेकअपच्या बाबतीतही करायला हवं, असं मेकअप आर्टिस्ट वैष्णवी रुद्रकार सांगतात. ‘प्रसंगानुसार बाकीच्या मेकअपमध्ये आपण जसा बदल करतो तसा बदल डोळ्यांच्या मेकअपमध्येही करायला हवाच. तुम्ही घरातच कोणत्या कार्यक्रमासाठी तयार होत असाल तर साधा, न्यूड आयमेकअप करा. यासाठी आपण कोणतीही न्यूड आयश्ॉडो वापरू शकतो. आपल्या त्वचेच्या रंगाशी मिळता जुळता आयश्ॉडो अशावेळी वापरावा. या स्टाईलमध्ये तुम्ही विंग आयलाइनर वापरू शकता. यामुळे एक उत्तम आय लूक तयार होईल. पार्टी लूकसाठी ‘स्मोकी आय’ अजूनही ट्रेण्डमध्ये आहेत. फक्त यामध्ये तुम्ही काळाच रंग न वापरता तुम्ही तुमच्या ड्रेसनुसार वेगवेगळे रंग नक्की वापरा. आणि त्याबरोबर आयलाइनर लावायला विसरू नका’, असंही त्या सांगतात. रात्रीच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी जाताना शिमर आय मेकअप करा. किंवा तुम्ही आयलाइनरमध्ये सध्या बाजारात उपलब्ध असलेले सुंदर रंगही वापरू शकता. काजळामध्येही तुम्ही फक्त काळ्या रंगाऐवजी वेगवेगळ्या रंगांचा वापर करू शकता, अशी माहिती खास रात्रीच्या कार्यक्रमांना आय मेकअप कसा करावा हे सांगताना वैष्णवी यांनी दिली. अशा अनेक ट्रेण्डसह तुम्ही तुमचा आय मेकअपचा ट्रेण्ड स्ट्राँग करून दमदार पद्धतीने या न्यू नॉर्मल जीवनशैलीत स्वत:ला सादर करू शकता.

viva@expressindia.com