|| गायत्री हसबनीस

एरव्ही लोक चेहऱ्यावर मुखवटे चढवून वावरत असतात आणि या मुखवटय़ांमागचा खरा चेहरा शोधणं ही कसोटी असते, असं सर्वसाधारण विधान के लं जातं. मात्र करोनाच्या काळात मुखवटा नाही पण मास्कच्या आड चेहरा दडवून वावरण्याची सक्ती सगळ्यांवर ओढवली आहे. घराबाहेर पडताना इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा महत्त्वाचा ठरतोय तो मास्क. हा मास्क आपल्या चेहऱ्याचा अविभाज्य भाग झाला आहे जणू.. आता तो पुढे किती काळ वापरावा लागणार इतका पुढचा विचार करण्यापेक्षा त्याआड लपलेला आपला चेहरा करोनापासून सुरक्षित कसा ठेवावा इथपासून ते मास्कधारी चेहऱ्यांशी होणारी संवादाची देवाणघेवाण नेमकी कशी असेल.. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागणार आहेत.

चेहऱ्यावर मेकअपचा साज चढवून त्याला परफेक्ट जुळून येईल असं आऊटफिट आणि इतर अ‍ॅक्सेसरीज हा सगळा शृंगाराचा भाग पूर्ण करून आपण घराबाहेर पडतो. सध्या या अपटुडेटच्या यादीत सॅनिटायझर, मास्क अशा गोष्टींचीही भर पडली आहे. त्यातल्या त्यात मैत्रिणीशी झालेल्या चर्चेनंतर थोडा फॅ शनेबल दिसेल आणि कम्फर्टेबल असेल असा ब्रॅण्डेड मास्कही आपण घेऊन ठेवलेला असतो. हे सगळं करूनही प्रत्यक्षात तो ब्रॅण्डेड मास्क चेहऱ्यावर चढवून आपण घराबाहेर पडतो तेव्हा रोजचा व्यवहार, एकमेकांशी होणारा संवाद इतकं च काय मास्कच्या आत कित्येक समस्यांशी झगडणारा आपला बदललेला चेहराही आपल्याला जाणवायला लागतो. आणि मग मास्कचं महत्त्व आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतं..

कुठला मास्क वापरावा,  कोणता मास्क किती फायदेशीर आहे,  याबद्दलचे समज—गैरसमज हा सध्या चर्चेचा विषय आहे, तेव्हा आपण मास्क खरेदी केल्यावर वैयक्तिक काळजी घेत मास्क कसे वापरावेत हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा, असं प्रसिद्ध  ईएनटी सर्जन डॉ. मिनेश जुवेकर यांनी सांगितलं. मास्कच्या नावाखाली रुमाल तोंडाला लावणं हे परिणामकारक नाही. घरगुती मास्क वापरतानाही त्याला तीन स्तर असायला हवेत. मास्कचा बाहेरील स्तर हा जलप्रतिरोधक  असावा. आतील दोन स्तर कॉटनचे असायला हवेत. याशिवाय हा मास्क दररोज मीठ घातलेल्या गरम पाण्याने धुऊन घेऊन मग वापरावा, असं त्यांनी स्पष्ट के लं. मास्क चेहऱ्यावर चढवतानाही नाकाकडील भाग व्यवस्थित झाकला जातो आहे ना हे पाहायला हवे. जेणेकरून नाकाच्या वरून आणि तोंडाच्या खालच्या बाजूनेही विषाणू जाणार नाही, अशा पद्धतीने चेहऱ्याला व्यवस्थित बसणारा मास्क असायला हवा. सध्या बाहेर वावरत असताना सर्जिकल मास्क किं वा फिल्टर नसलेले एन ९५ मास्कही उपयुक्त ठरू शकतात, असं ते सांगतात. मास्क चेहऱ्यावर चढवण्याअगोदर आणि काढल्यावरही हात स्वच्छ धुवावेत. ज्यांना सौम्य किंवा मध्यम परिणामांचे श्वसन विकार आहेत त्यांनी तीन स्तर असलेले कॉटनचे मास्क वापरावेत, असा सल्ला त्यांनी दिला. तर  सर्वसामान्यांनी रेस्पिरेटर असलेले मास्क वापरूच नयेत, असं ईएनटी सर्जन डॉ. बिन्ही देसाई सांगतात. कॉटन मास्कही दैनंदिन वापरासाठी योग्य आहेत, एन ९५ मास्क घेण्याआधी त्याचा आयएसओ क्रमांक तपासून घेणे गरजेचे आहे. मास्क कोणताही वापरा मुळात त्याची सवय आपल्याला लावून घ्यायची आहे हे स्वत:लाच बजावणं गरजेचं असल्याचंही त्या सांगतात.

संवादातील अडचणी

मास्कमुळे संवाद साधताना अनेक अडचणी येतात. चेहऱ्यावर मास्क असल्याने समोरच्या व्यक्तीला नेमके  काय सांगायचे आहे हे लक्षात येणं अवघड जातं. अशावेळी समोरच्याकडून पुन्हा एकदा झालेल्या संवादाबद्दल खात्री करून घेतली पाहिजे, असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यश वेलणकर यांनी सांगितलं. मास्कमुळे समोरच्याच्या चेहऱ्यावरचे हावभावही लक्षात येणार नाही आहेत. अशावेळी आपण फोनवर बोलताना ज्या पद्धतीने ती व्यक्ती समोर नाही हे लक्षात घेऊन बोलत असतो त्याच पद्धतीने आता आपला संवाद प्रभावी करणं गरजेचं आहे. समोरासमोर संवाद साधताना एकू णच नजरेतील भाव, नजरेतून होणारा संवाद आणि त्याचवेळी देहबोलीचाही संवादासाठी वापर करायला हवा. मास्कमुळे  आवाजही नीट पोहोचण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे आवाजावरही मेहनत घ्यायला हवी. आवाजातील चढउतारांचा अभ्यास करून संवाद कशाप्रकारे होतो आहे हे लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे, असं डॉ. वेलणकर सांगतात.

लिपस्टिकला सोडचिठ्ठी?

मास्क असल्याने लिपस्टिक कितीही आवडत असली तरी त्याचा उपयोग नाही हे मुलींना कळून चुकलंय, मात्र त्यातूनही मार्ग काढत त्या आय मेकअपवर भर देत आहेत, असं मेकअप आर्टिस्ट हरप्रीत मनोचा सांगतात. ओठांवर लिपस्टिक आणि त्यावर मास्क चढवलात तर अनेकदा मास्कच्या कापडाला रंग लागून ओठांजवळ अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. दिवसभर मास्क चेहऱ्यावर राहणार असल्याने ओठांच्या भागाजवळ घाम येऊ शकतो. मेअकपच्या बाबतीतही तेलकट त्वचा असणाऱ्यांना नाकाखालच्या चेहऱ्याच्या भागाला घाम जास्त येणं, मेकअप ओघळणं यामुळे त्वचेचे विकार वाढण्याची शक्यता असते. याउलट, कोरडी त्वचा असणाऱ्यांना मास्कमुळे चेहऱ्याच्या या भागाला ऑक्सिजन मिळणं अवघड होऊन बसतं, असं त्या सांगतात.  यावर सध्या उपाय म्हणून हलका मेकअप, मॅट लिपस्टिकचा वापर, साध्या फाऊंडेशनऐवजी एचडी फोऊंडेशनचा वापर करून साजशृंगाराची हौसही भागवता येईल, असं त्या सांगतात.

पैठणीच्या मुखपट्ट्यांना मागणी

१९९२ पासून कार्यरत असणाऱ्या ‘राणेज् पैठणी’ यांचं वैशिष्टय़ म्हणजे पर्सेस, जॅकेट, बेल्ट, टाय, तोरणं हे सर्व पैठणीपासून बनवून ते ग्राहकांसाठी उपलब्ध करून देतात. त्यांच्या ‘पैठणी मास्क’ या संकल्पनेला देखील ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांचे १५ ते २० हजार पैठणी मास्क विकले गेले आहेत. पेशंट्ससाठी वेळोवेळी सक्रिय असलेले पोलीस, नर्सेस, डॉक्टर्स, बीएमसीचे कर्मचारी यांना त्यांच्याकडून पैठणी मास्क मोफत देण्यात आले. अमरावती, नागपूर, बंगलोर, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे ‘राणेज् पैठणी’ यांचे मास्क विकले गेले आहेत. पैठणी मास्क शंभर रुपये दरात आम्ही देतो, असे सांगतानाच पैठणी मास्कची रचना, त्याची क्रेझ याबद्दल बोलताना ‘राणेज् पैठणी’चे निनाद राणे म्हणतात, आम्हाला ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेचे पैठणी मास्क द्यायचे होते. ते स्वस्त दरात उपलब्ध करून द्यायचे होते. जेव्हा मास्क परिधान करणं अपरिहार्य झालं तेव्हापासून आमच्या ग्राहकांनी आपणहून पैठणी मास्कची मागणी करायला सुरुवात केली. हे मास्क मूळ पैठणीच्या काठांपासून बनवले आहेत. या मास्कला दोन स्तर आहेत. पैठणीचे मास्क हे पैठणीच्या काठांपासून बनवले जातात. अशी काढ असलेली साडी आम्हीच बनवतो.  यातून पैसे कमवायचा उद्देश न ठेवता ग्राहकांना स्वस्त दरात पैठणी मास्क देण्याचा निर्धार आम्ही के ला होता, असं त्यांनी सांगितलं.  फेसबुकवरूनही ग्राहकांनी पैठणी मास्कला चांगला प्रतिसाद दिला असून परदेशातून म्हणजेच ऑस्ट्रेलिया, अमेरिकतूनदेखील ग्राहकांनी पैठणी मास्कला पसंती दिली असल्याचं निनाद राणे यांनी सांगितलं.

प्रभावी संवादासाठी..

आय कॉन्टॅक्ट इथे प्रभावी ठरेल कारण समोरची व्यक्ती नजरेतून बोलते आहे की नाही याचा आपण अंदाज बांधू शकतो. अनेकदा आत्मविश्वास कमी असेल तर समोरची व्यक्ती नजरेला नजर देणं टाळते. अशावेळी समोरची व्यक्ती आपल्याशी बोलायला इच्छुक आहे की नाही हेही आपल्याला त्याच्या नजरेतून ताडून घेता येतं. देहबोली समजून घेतानाही अनेक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. देहबोली म्हणजे एकप्रकारे समोरची व्यक्ती आपला अंदाज घेते आहे. अनेकदा मास्क घातलेला असल्याने आपण समोरच्याच्या देहबोलीतून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आपल्याला जे त्याच्याबद्दल वाटतं आहे ते तसंच असेल असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर संवाद सुरू असताना एखादी व्यक्ती भरपूर हालचाल करत असते. अशावेळी त्या व्यक्तीच्या मनात असंख्य विचार सुरू आहेत हे आपल्या लक्षात येतं. आणि आपल्या संवादापेक्षा त्याला त्याचे विचार महत्त्वाचे आहेत अशी आपली भावना होऊ शकते. आपल्याला वरवरची उत्तरं मिळत आहेत, असा आपला समज होऊ शकतो. मात्र तो खराच असेल असं नाही. त्यामुळे आपणही संवाद साधताना मनात कितीही विचार सुरू असले तरी त्याक्षणी समोरच्या व्यक्तीशी सुरू असलेल्या संवादावर लक्ष के ंद्रित करणं महत्त्वाचं आहे.

– डॉ. यश वेलणकर

viva@expressindia.com