07 July 2020

News Flash

पर्दे मे रहने दो..

ड्रेसला मॅचिंग होतील असे मास्क आता बनायला लागलेच आहेत.

वेदवती चिपळूणकर

पत्रास कारण की..

आज एक दु:खद बातमी द्यायची आहे. लॉकडाऊनमधला आपला वेळ आपण सत्कारणी लावला आहे असं आपल्याला वाटतंय. घरच्या घरी बसून अनेक जण अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकले आहेत. अनेक सेलेब्रिटींनी आपल्याला अवगत असलेल्या कला सोशल मीडियावरून आपल्याला शिकवल्या आहेत. काहींनी रेसिपी, तर काहींनी मेकअप.. अशीच ऑनलाइन मेकअप टय़ुटोरियल्स बघून अनेकींनी घरबसल्या आपली मेकअप स्किल्स सुधारली आहेत. नो मेकअप, मेकअप लुक, कॅज्युअल मेकअप, डेली मेकअप असे अनेक प्रकार आता अनेकींना अवगत झाले आहेत. आपापल्या स्किल्सबद्दल प्रत्येकीला आता आत्मविश्वास आहे. कॉलेज जेव्हा केव्हा सुरू होतील तेव्हा आपले हे कलागुण दाखवायला आता सगळ्याच जणी आतुर असतील.

मात्र आता एक रिअ‍ॅलिटी चेक.. सांगण्यास अतीव दु:ख होत आहे की, कॉलेजेस सुरू झाली तरी तोंडावर मास्क अनिवार्य असणार आहे. मास्क न लावल्यास दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आपण संपूर्ण सुट्टी सत्कारणी लावून जो मेकअप शिकलो तो आता मास्कच्या पलीकडे झाकून ठेवावा लागणार आहे. मेकअपसाठी मास्क न लावून दंड भरायची तयारी असली तरी तो दंड आपल्या पॉकेटमनीमधून जाणार आहे आणि मास्क न घातल्याने पत्करावा लागणारा धोका मेकअपपेक्षा महाग आहे. त्यामुळे आपली सुधारलेली सगळी स्किल्स आता घरापुरतीच मर्यादित ठेवावी लागणार आहेत. आत्तापर्यंत हे लक्षात आलं नसेल तर लक्षात आणून देण्यासाठीच हे सगळं सांगितलं.

आपला कॉलेजला जायचा एक महत्त्वाचा, किंबहुना सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे तयार होणं. पावसाळ्यामुळे अनेकदा कपडय़ांवर बंधनं येतात. मळखाऊ कपडे, भिजले तरी वाळणारे कपडे, रेनकोटला न चिकटणारे कपडे, अशा अनेक कसोटय़ा पार करून आपले कपडे ठरतात आणि मग त्यावर सुटेबल पण वॉटरप्रूफ मेकअप. आता मात्र मेकअप वॉटरप्रूफ घेतला तरी तो ‘पर्दे में रहने दो’च असणार आहे. बरं मेकअप करून मास्क लावावा म्हटलं, तरी वॉटरप्रूफ मेकअप मास्कच्या कपडय़ाला लागूच शकतो आणि तोंड झाकलेल्या मास्कमधून फक्त आय—मेकअपच दिसू शकतो. कदाचित आपल्याला आता फक्त आय—मेकअपवरच फोकस करावं लागेल. त्यामुळे बातमी दु:खद असली तरी त्यातून एक संधी आहे ती म्हणजे आपला आय—मेकअप परफेक्ट करण्याची आणि ‘आंखो ही आंखो में’ काही करून दाखवायची! आय श्ॉडो, आय लायनर, आयब्रो पेन्सिल, आय लॅशेस अशा गोष्टींवर ‘मास्टरी’ मिळवण्याची हीच ती वेळ, हाच तो क्षण!

पण खरं तर अजून एक आयडिया आहे. ड्रेसला मॅचिंग होतील असे मास्क आता बनायला लागलेच आहेत. तर पावसाळ्यात सूट होतील असे वॉटरप्रूफ आणि मेकअप दिसेल असे ट्रान्सपरंट मास्क बनवायला हरकत नाही. पावसाळ्यात मास्कची काळजी तशीही आपल्याला घ्यावी लागणार आहे. मग ते रेनकोटसारखे ट्रान्सपरंट आणि वॉटरप्रूफ करायला काय हरकत आहे? प्रयत्न करून बघितला तर आपली ही मास्कवरची नाराजी दूर व्हायला कदाचित मदतच होईल. आपण घेतलेल्या मेकअपच्या शिक्षणाचं सार्थक होईल. मात्र हे कधी होईल, कोणी खरंच करेल का आणि केलं तरी त्यात श्वास न गुदमरता आपण राहू शकू का, हा प्रश्न आहेच. त्यामुळे खरं तर हेही प्रॅक्टिकल नाहीच आहे, उगीच आपला आशेचा एक किरण म्हणून उल्लेख करून पाहिला! पातळ आणि सेफ मास्क हेच आपलं ब्रीद आहे

करोनाने बाकी काही केलं की नाही माहीत नाही, पण एक गोष्ट मात्र खरी, त्याने शब्दश: आपल्याला ‘तोंड दाखवायला जागा ठेवली नाही.’

बाकी काय. उजळ माथ्याने फिरायची संधी मिळेल तेव्हा मेकअप टिप्स घेऊ..

तोपर्यंत कळावे, लोभ असावा. हो, लोभ असावाच, कारण हा मास्कचा नियम मी केलेला नाही!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 1:26 am

Web Title: face masks will be mandatory even if colleges start zws 70
Next Stories
1 निसर्गराजा.. ऐक सांगतो
2 डिजिटल नाखवा प्रणित पाटील
3 सदा सर्वदा स्टार्टअप : स्टार्टअप्सचा पुनर्विचार
Just Now!
X