18 September 2020

News Flash

नकारात्मक पोपट

टेकजागर

|| आसिफ बागवान

लहानपणी ऐकलेली ही गोष्ट. एकदा लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या लाकूडतोडय़ाला झाडाच्या ढोलीत पोपटाची दोन पिल्ले सापडतात. तो ती पिल्ले घरी घेऊन येतो. त्याच वेळी लाकूडतोडय़ाने घेतलेले कर्ज वसूल करण्यासाठी गावचा सावकार त्याच्या दारी येतो. लाकूडतोडय़ाकडे देण्यासाठी पैसे नसतात म्हणून तो सावकाराला पोपटाचे एक पिल्लू देतो आणि पुढच्या तारखेचा वायदा करतो. काही महिन्यांनंतर सावकार पुन्हा लाकूडतोडय़ाच्या घरी येतो तेव्हा तेथे पिंजऱ्यात ठेवलेला पोपट ‘या मालक, तुमचे स्वागत आहे’ असं बोलून सावकाराचं स्वागत करतो. अतिशय गोड, नम्रपणे बोलणारा पोपट पाहून सावकाराला राग येतो. ‘तुझ्या घरी असलेला पोपट किती अगत्यशीलपणे बोलतो आणि माझ्याकडचा पोपट नेहमी शिव्या घालत असतो. तू जाणूनबुजून मला तसा पोपट दिलास. आता मी तुझ्याकडील पोपट घेऊन जातो,’ असे सांगून सावकार लाकूडतोडय़ाचा पोपट घेऊन जातो आणि स्वत:कडील ‘शिवराळ’ पोपट लाकूडतोडय़ाला देतो. आणखी काही दिवस लोटल्यानंतर सावकार पुन्हा कर्जवसुलीसाठी लाकूडतोडय़ाकडे येतो. तेव्हा दाराजवळच पिंजऱ्यात बसलेला पोपट त्याला पाहून ‘या मालक, तुमचे स्वागत आहे’ असे बोलतो. सावकाराला आश्चर्य वाटते. तो लाकूडतोडय़ाला विचारतो, ‘जो पोपट मी तुझ्याकडून घेऊन गेलो होतो, तो आता शिव्या देऊ लागला आहे आणि मी तुला दिलेला पोपट मात्र आता एकदम नम्रपणे बोलतो. हे कसं?’ सावकाराचा प्रश्न ऐकून लाकूडतोडय़ा उत्तरला, ‘मालक, यात पोपटाचा दोष नाही. तो जे ऐकतो तेच बोलतो.’

उद्धट, गर्विष्ठ सावकाराच्या घरातली शिवीगाळ, आरडाओरड ऐकण्याची सवय लागलेला पोपट तेच बोलायला शिकला, उलट लाकूडतोडय़ाच्या घरातली सभ्य, नम्र भाषा दुसऱ्या पोपटावर तसेच संस्कार करत होती. तात्पर्य काय तर, चांगली संगत असेल तर संस्कार चांगलेच होतात. आता एवढी लांबलेली गोष्ट इथे सांगण्याचं कारण काय तर, या पोपटांसारखीच परिस्थिती आज सोशल मीडियाची होऊ लागली आहे. फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर पानोपानी ओतप्रोत भरलेली नकारात्मकता हे याचेच उदाहरण आहे. आपण फेसबुक सुरू करताच कुठल्या तरी भयंकर रस्ते अपघाताचा व्हिडीओ समोर येतो, पुढे ‘स्क्रोल’ करताच एखाद्या बलात्कार वा हत्येची बातमी झळकते, आणखी खाली स्क्रोल केल्यावर कुठे तरी कोंबडीच्या ऐवजी कुत्र्याचे मांस कसे विकले जात आहे, याची बीभत्स छायाचित्रे अंगावर येतात, आणखी खाली कुणा कार्यकर्त्यांने विरोधी पक्षाच्या नेत्याची आईबहीण काढून लिहिलेली पोस्ट फिरत असते. जसंजसं आपण ‘स्क्रोल’ करत जातो, तसंतसं आपल्यावर नकारात्मक, द्वेषमूलक, किळसवाण्या, संताप आणणाऱ्या पोस्ट, चित्रफितींचा भडिमार होत जातो. इतकं सारं पाहिल्यानंतर या जगात काही चांगलं घडतंय की नाही, अशी शंकाच येऊ लागते. पण हे असं का होतं, याचा तुम्ही कधी विचार केलाय?

याचं कारण तुमच्या कृतीतच दडलं आहे. फेसबुकच्या ‘न्यूज फीड’मध्ये तुम्ही जे पाहता, वाचता त्याची आपोआप नोंद फेसबुक करत असतं. हे सगळं एका संगणकीय ‘अल्गोरिदम’ने बांधलेलं असतं. संगणकाला आखून दिलेली नियतरितीच म्हणाना. वापरकर्ते जे पाहताहेत, वाचताहेत, ज्यावर अधिक वेळ चर्चा करताहेत, ज्याला अधिक लाइक्स किंवा कमेंट देत आहेत किंवा जे बघू इच्छिताहेत त्या गोष्टींची नोंद ही यंत्रणा सातत्याने करत असते. यातून जमा केलेल्या माहितीचे पृथ्थकरण करून त्यातून वापरकर्त्यांच्या आवडीनिवडीची एक चौकट बनवली जाते आणि मग याच चौकटीतलं जग वापरकर्त्यांच्या समोर ‘न्यूज फीड’मध्ये मांडलं जातं. याच अल्गोरिदमला आता ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ची जोड मिळाली आहे. फेसबुकवर आजघडीला जगभरात तीन अब्जांच्या आसपास वापरकर्ते आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षणाला फेसबुकवर लाखो पोस्ट, व्हिडीओ, छायाचित्रे अपलोड होत असतात. या अवाढव्य डेटाचं पृथ्थकरण करून त्यातून प्रत्येक वापरकर्त्यांला फेसबुकवर खिळवून ठेवेल, असा ‘कंटेट’ त्याच्या पेजवर मांडून ठेवणं, हे काम आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या मदतीने होत असतं. अगदी थोडक्यात सांगायचं तर, तुम्ही फेसबुकचं अ‍ॅप उघडताच क्षणभरात तुम्हाला अपेक्षित असा कंटेंट तुमच्यासमोर मांडून तयार असतो. तुम्ही ज्या नकारात्मक पोस्ट पाहत असता, त्याचं मूळ तुमच्याच पाहण्याच्या सवयींत दडलेलं असतं, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच.

हे सगळं त्या पोपटांसारखंच नाही का? आपण ज्या गोष्टी चवीनं पाहतो, वाचतो त्याचंच अनुकरण करून फेसबुक आपल्यासमोर तशाच गोष्टींचं ताट मांडतं. फेसबुकच कशाला, मोबाइलवर यूटय़ूब किंवा गुगलचं अ‍ॅप सुरू करताच तुम्हाला दिसणाऱ्या ठरावीक चित्रफिती किंवा बातम्या यांचंही कारण तेच असतं.

एवढंच कशाला तुम्ही एखाद्या वृत्तसेवा पुरवणाऱ्या अ‍ॅपवरही गेलात तरी, तुमच्या आधीच्या पाहण्याच्या सवयींतूनच प्रेरित झालेल्या बातम्या तुम्हाला प्राधान्याने दाखवल्या जातील.

दुर्दैवाने सध्या सोशल मीडियावर नकारात्मक किंवा भडक पोस्टचा भडिमार होताना दिसतो. अगदी गेल्या आठवडय़ातीलच गोष्ट. न्यूझिलंडमधील ख्राइस्टचर्च येथे मशिदीत बेछूट गोळीबार करणाऱ्या तरुणाने ‘फेसबुक लाइव्ह’द्वारे आपल्या नृशंस कृत्याचं थेट प्रक्षेपण केलं. हा हल्ला संपल्यानंतरही त्याची चित्रफीत सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी पसरली. या प्रसाराचा वेग इतका अफाट होता की, हल्ल्यानंतर काही तासांतच तो व्हिडीओ काही कोटी वेळा प्रसारित केला गेला. याची गंभीर दखल घेत फेसबुकने तातडीने तो व्हिडीओ ‘ब्लॉक’ करण्याचाही प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत हा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य माध्यमांतून जगभर पोहोचला. त्या काही तासांत फेसबुकने हल्ल्याच्या व्हिडीओच्या तब्बल १५ लाख कॉपीज डिलिट केल्या. त्यापैकी १२ लाख कॉपीज तर एकाच वेळी अपलोड होत असताना डिलिट कराव्या लागल्या. हिंसाचार किंवा प्रक्षोभक गोष्टींबद्दलचा सोस कसा वाढत आहे, त्याचं हे गंभीर उदाहरण.

हे टाळणं शक्य आहे का? तर नक्कीच आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या नको त्या आवडींना आवर घातला पाहिजे. गुन्हेगारी बातम्या, एखाद्याची हीन पातळीवर टिंगलटवाळी करणारी छायाचित्रे, बटबटीत व्हिडीओ यांना प्रतिसाद देणं पहिल्यांदा थांबवलं पाहिजे. त्यानंतरही ते समोर दिसत असेल तर, तुमच्या फेसबुकच्या न्यूजफीड संबंधी सेटिंग्जमध्ये जाऊन आवश्यक ते बदल केले पाहिजेत. बऱ्याचदा आपली मित्रमंडळी जे पाहतात किंवा शेअर करतात ते आपल्या ‘न्यूज फीड’मध्येही घुसवलं जातं. अशा वेळी संबंधित पोस्ट ‘ब्लॉक’ किंवा ‘रिपोर्ट’ करायलाच हवी. फेसबुकच्या न्यूजफीडमध्ये प्रदर्शित झालेल्या पोस्टखाली ‘गिव्ह युअर फीडबॅक’ असं फेसबुकने सुचवलेलं असतं. त्याचा पुरेपूर वापर करून तुम्हाला नको त्या पोस्ट प्रदर्शित होण्यापासून रोखा. सरतेशेवटी सोशल मीडियाचा सकारात्मक कारणांसाठी वापर करायला सुरुवात करा. तुमचं सोशल मीडियाचं जग आपोआप सकारात्मक होईल.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 12:06 am

Web Title: facebook video block
Next Stories
1 मयुरी देशमुख       
2 अवधी शाही खाद्यसंस्कृती
3 ८ तास, २०३ महिला..
Just Now!
X