हाय,
मी सायन्समध्ये सेकंड इयरला आहे. माझं वय आहे एकोणीस. माझी गर्लफ्रेंड मेडिकल करते आहे दुसऱ्या शहरात, ती पण सेकंड इयरला आहे. आमच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झालं. पण ती लांब असल्यामुळे आमच्यात खूप स्पेस निर्माण झाली. त्यामुळे आमची दररोज भांडणं होतात. खरंतर एक वर्षांच्या आधीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो पण तेव्हा तिनं नुसताच टाइमपास केला. आता ती बोलतेय की टाइमपास नाही करत, ती सीरिअस आहे. पण आता असं झालंय की माझा तिच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. मी तिला कोणत्याही मुलासोबत बोलायला अलाऊ करत नाही, पण ती तिथे काय करत असेल, आय डोण्ट नो. माझा तिच्यावर ट्रस्ट कसा बसेल? आमची भांडणं कशी थांबतील?     
शंतनू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाय शंतनू,
रिलेशनशिपमधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या फॅक्टरविषयी प्रश्न उपस्थित केलायस तू. तो फॅक्टर म्हणजे विश्वास, ट्रस्ट. कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो, नाहीतर ती कोसळायची शक्यता असते. नातीसुद्धा या विश्वास नावाच्या पायावर उभी असतात, तो भक्कम असेल तर ठीक, नाहीतर सगळं कोलॅप्स व्हायला वेळ लागत नाही. विश्वास आपल्याला आश्वस्त करतो, आधार देतो. एक प्रकारचं सुरक्षित फीलिंग देतो. शिवाय विश्वास टाकण्याइतकं जवळचं आपलं कुणीतरी आहे ही भावनाच मनाला खूप सुख देणारी असते.
आपली लोकांवर विश्वास टाकण्याची लेव्हल आपल्या अनुभवांवरून ठरते. तू एखादं लहान मूल पाहिलंस तर ते किती बिनधास्तपणे आपल्या आईबाबांवर विसंबून असतं! त्यांनी त्याला हवेत फेकलं तरी ते खिदळतं. त्यानंतर हळूहळू आपण वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जातो. कधी कुणी आपला विश्वासघात करतं, दिलेला शब्द मोडतं. कधी आपल्या कुणा नातेवाईकाचे, मित्र-मैत्रिणीचे अनुभव ऐकतो. आपल्या स्वाभिमानाला तडा जाईल, कॉन्फिडन्सला धक्का पोहोचेल अशाही काही घटना घडतात. मग मनात शंका यायला लागतात. एस्पेशली किशोरवयात आलेले अनुभव आपल्याला कधीकधी जरुरीपेक्षा जास्त कडवट बनवतात. तुला असे काही अनुभव आठवतायत का? तुझ्या मैत्रिणीनं इतर मुलांशी बोलूही नये असं तुला वाटावं इतकी असुरक्षितता, इतका अविश्वास तुझ्या मनात का निर्माण झाला असेल? स्वत:शी आपण कम्फर्टेबल असलो, कॉन्फिडण्ट असलो तर कुणी कसंही वागलं तरी आपल्याला काही वाटत नाही. पण तसं नसेल तर मनात सारखी धाकधूक राहते की आपल्याला ती व्यक्ती फसवत तर नाहीये ना? ट्रस्ट संपला की अनेक निगेटिव्ह भावना मनात येतात. राग येतो, असं कसं तिनं मला वागवलं? वाईट वाटतं नात्याचा असा शेवट झाला म्हणून. भीती वाटायला लागते की आपण जे सगळं शेअर केलं होतं तिच्यापाशी, त्याचा तिनं गैरवापर केला तर? यापुढे कुणावरही मनापासून विश्वास टाकला जाणार नाही याची खंत वाटते. स्वत:विषयी डाऊट वाटायला लागतो, आपली लायकीच नाही की काय? बरं, एकानं ‘सॉरी’ म्हणून टाकलं आणि झालं असंही होत नाही. त्या ‘सॉरी’मधून जर जेन्युइन पश्चात्ताप व्यक्त झाला, हे वागणं पुन्हा रिपीट होणार नाही याची खात्री पटली तरच काही बदल घडण्याची शक्यता असते या नात्यात.
तुझं पत्र तू बारकाईनं वाचलंस तर तुझ्या लक्षात येईल की तू तिच्यावर काही बंधनं, काही अटी घातल्या आहेस, याला काही तरी बेसिस नक्की असणार तुला पूर्वी आलेल्या अनुभवांचा. सतत एक प्रकारची शंका आहे तुझ्या मनात तिच्याबद्दल. तुमच्यामध्ये खरोखरच काही सीरियसनेस असेल, नातं टिकवण्याची दोघांचीही जेन्युइन इच्छा असेल तर तुम्हाला एकमेकांशी नीट संवाद साधून यातून मार्ग काढायला हवा. तुमच्या कॉमन मित्रमैत्रिणींशी बोलून बघा, कदाचित तुमच्या लक्षात न आलेल्या गोष्टी त्यांनी नोटीस केल्या असतील. सतत फक्त तिच्याबद्दल विचार करत न बसता तुझा अभ्यास, करिअर, इतर फ्रेंड्स, छंद याही गोष्टींमध्ये इंटरेस्ट घे. अगदी अंधविश्वास नाही तरी थोडा बेसिक विश्वास तुला तिच्यावर ठेवायला लागेल, शंतनू. सुरुवातच अविश्वासानं नको. नाहीतर त्यातला ओलावा जाऊन दोघंही फक्त पोलिसाची भूमिका वठवायला लागाल. तसं असेल तर आताच एकमेकांना गोल्डन हँडशेक केलेला बरा.
I’m not upset that you lied to me, I’m upset that from now on I can’t believe you”. – Friedrich Nietzsche.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Faith in relationship
First published on: 28-11-2014 at 01:07 IST