05 July 2020

News Flash

..पर अंडा है ये!

‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ या स्वास्थ्यवर्धक सल्ल्यापासून ते ‘अंडा हटेला’पर्यंतचा अंडय़ाचा प्रवास ‘जिव्हा’ळ्याचा आहे.

| March 20, 2015 01:16 am

vv27‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ या स्वास्थ्यवर्धक सल्ल्यापासून ते ‘अंडा हटेला’पर्यंतचा अंडय़ाचा प्रवास ‘जिव्हा’ळ्याचा आहे. त्यातही पुण्यासारख्या शहरात ‘रेश्मा बुर्जी पाव कॉर्नर’ या ठिकाणी अंडय़ाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन खाबू मोशाय खूश झाला नसता, तरच नवल!

‘पह्यले बैदा या पह्यले मुर्गी’ या सवालाने बचपनमध्ये खाबू मोशायचा भेजेशरीफ प्रचंड सरकवला होता. पण सध्या खाबू मोशाय ‘पह्यले बैदा या पह्यले मुर्गी’ सवालाचा जवाब ‘जल्दी क्या बनेंगा’ असा उल्टा सवाल विचारून देतो. पण पुण्यात कर्वे रोडवरील रेश्मा बुर्जी पाव कॉर्नरमध्ये खाबू मोशाय गेला आणि ‘आधी बैदाच’ असे बोलता झाला. या रेश्मा कॉर्नरमध्ये अंडय़ाचे विविध प्रकार आहेत. या प्रकारांच्या चवीपेक्षा सर्वात आधी खाबू मोशाय त्यांच्या नावानेच प्रसन्न झाला.
vn32कर्वे रोडवरून बसने कोथरूडच्या दिशेने जाताना अचानक गरवारे कॉलेजजवळच्या आयुर्वेद रसशाळेपाशी खाबू मोशायला अचानक झणझणीत वास यायला लागला. रसशाळेतून हा एवढा झक्कास वास कसा, याची चिकित्सा करत असताना, हा वास समोरच्या फुटपाथवर असलेल्या ‘रेश्मा कॉर्नर’मधील आहे, हे खाबू मोशायला कळले. बस सिग्नलला थांबली असताना तातडीने खाबू उतरता झाला आणि रस्ता ओलांडून मुकाटय़ाने या रेश्मा कॉर्नरमध्ये शिरला. समीर पठाण नावाचा तरुण हा कॉर्नर चालवतो. या पठाणी डोक्यातून ‘अंडा काश्मिरी’, ‘अंडा चमचम’, ‘अंडा टकाटक’, ‘अंडा हटेला’ असे एकापेक्षा एक सरस पदार्थ तयार झाले आहेत. हे पदार्थ केवळ नावासाठीच हटके नाहीत, तर खरोखरच चवीलाही वेगळे आहेत.
vn33 सर्वप्रथम खाबूने ‘अंडा चमचम’ मागवले. उकडलेले अंडे आणि त्यावर अंडय़ाच्या बलकाचाच तळलेला काही भाग आणि हे सगळे मिश्रण चायनीजसदृश ग्रेव्हीमध्ये खाबू मोशायसमोर आले. सोबतीला पावांची जोडीही होती. मग खाबू मोशायने नुसत्या वासावरच तृप्त होत पावाबरोबर त्याच ‘चमचम’चा घास तोंडात टाकला आणि समाधी लावून बसला. त्यानंतर आलेल्या ‘अंडा हटेला’ने तर खाबू मोशायची विकेट घेतली. अंडा बुर्जी, त्यावर सिंगल ऑम्लेट, त्यावर मोगलाई मसाला आणि त्यावर ग्रेव्ही असा हा चारपदरी कार्यक्रम होता. किमान तिघांमध्ये संपेल असा हा पदार्थ होता मात्र तेवढाच चविष्ट!
या ‘रेश्मा’कडे असे अनेक पदार्थ ५० ते १५०च्या आतबाहेर मिळतात. इथे चिकनचे पदार्थही मिळतात. त्यांचीही नावं अशीच मजेदार आहेत. समीर पठाण यांच्या डोक्यात अजून २५-३० नवीन पदार्थ शिजत आहेत. ते ‘रेश्मा कॉर्नर’च्या मेन्यू कार्डवर दिसतीलच. पण तोपर्यंत ‘अंडा चमचम’, ‘अंडा हटेला’, ‘अंडा टकाटक’ अशा झक्कास पदार्थाचा फडशा पाडायला पुण्याला जायला हरकत नाही.
खाबू मोशाय -khabumoshay.viva@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2015 1:16 am

Web Title: famous egg dish of reshma bhurji pav corner
Next Stories
1 सेलेब्रिटी फॅशन गॅलरी
2 क्लिक : सचिन बलगम, कळवा
3 व्हिवा दिवा : श्रद्धा वाकचौरे
Just Now!
X