13 July 2020

News Flash

ट्रेक फॅशन

प्रत्येक रविवारी कुठे जायचं, हे त्यांचं ठरलेलं असतं. ट्रेकला जायची एक बॅग नेहमी घरात भरलेली असते.

(संग्रहित छायाचित्र)

|| दीपेश वेदक

सह्यद्रीच्या कुशीत रमणारी माणसं सहज ओळखता येतात. प्रत्येक रविवारी कुठे जायचं, हे त्यांचं ठरलेलं असतं. ट्रेकला जायची एक बॅग नेहमी घरात भरलेली असते. ती खांद्याला लावली की भटकंतीला सुरुवात होते. पाठीवर भली मोठी बॅग, विस्कटलेले केस, मळके कपडे, पायात ट्रेकचे बूट, असं काहीसं दिसलं की हा मुलगा ट्रेकवरून आला आहे, हे समजलं जायचं. पण आता चित्र बदलतंय. ट्रेकला जाणारी मंडळी वेगवेगळे नवे कपडे आणि इतर साहित्य मोठय़ा प्रमाणात घेतात. त्यामुळे सह्यद्रीमध्ये भटकंतीसाठी जाणारे आता पूर्वीसारखे दिसत नाहीत. या कोणत्या नव्या गोष्टी ते विकत घेत आहेत, हे पाहूया.

सनग्लासेस

ट्रेकिंगसाठी सह्यद्रीमध्ये जा किंवा हिमालयामध्ये, डोळ्यांची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. हेच ओळखून अनेक जण ट्रेकला येताना सनग्लासेस घालून आलेले दिसतात. खास ट्रेकिंगला जाणाऱ्यांसाठी वेगळे सनग्लासेस बाजारात आले आहेत. हवी ती फ्रेम आणि यूव्ही किरणांपासून वाचवणारी काच, हे समीकरण आता भटक्यांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. ट्रेकला येताना चष्मा नको असे म्हणणारे आता ट्रेकला सनग्लासेस घालतात.

नेक वॉर्मर

गळ्याला थंड वारा लागू नये म्हणून नेक वॉर्मर हा एक खास रुमाल तुम्हाला अनेक ठिकाणी मिळतो. बाईकवरून प्रवास करणारे अनेक जण हा रुमाल घेतात. ट्रेकच्या वेळी थंडीमध्ये गळ्याला ऊब मिळावी म्हणून तर दिवसा सूर्यकिरणांपासून वाचवण्यासाठी तो चेहऱ्याभोवती किंवा डोक्यालापण लावता येतो. या एका रुमालाचे वेगवेगळे उपयोग लक्षात घेऊन अनेक जण ट्रेकला निघताना हे नेक वॉर्मर सोबत घेऊन निघतात.

ड्राय फिट टी शर्ट

ट्रेकला जायचं म्हणजे पाठीवर सामान घेऊन दिवसभर चालणं आलंच. अशा वेळी घाम आला तर शर्ट ओला होतो आणि भिजलेला शर्ट ट्रेकच्या वेळी पुन्हा वाळवणं, हे कठीणच होऊन बसतं. शिवाय थंडीच्या दिवसांत ओले कपडे घालून ट्रेक करणं म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे. अशा वेळी ट्रेकिंगला जाताना अनेकजण ड्राय फिट कापडाचे टी शर्ट घालून येतात. कृत्रिम कापडाचे बनवलेले हे शर्ट अवघ्या काही वेळात वाळतात. या शर्टची घडी केलीत की ते अगदी एका मुठी इतक्या जागेत मावतात. त्यामुळे सामानातली फार जागा हे घेत नाहीत. शिवाय हलकेही आहेत. त्यामुळे पाठीवरचं ओझंही कमी होतं.

 

ट्रॅक पॅन्ट

ट्रेकिंगच्या फॅशनमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक पॅन्ट. घरी घालायची मळकी पॅन्ट घेऊन ट्रेक करणारे आता फारसे राहिले नाहीत. ट्रेकला येताना काहींना महागडय़ा ब्रॅण्डच्या ट्रॅक पॅन्ट हव्या असतात. तर अनेकांना काळ्या-पिवळ्या-हिरव्या पट्टय़ा असलेल्या मिलिटरी ट्रॅक पॅन्ट हव्या असतात. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या या ट्रॅक पॅन्ट अनेकांसाठी ट्रेकिंगच्या यादीत मस्ट असतात.

घडय़ाळ

ट्रेकला येणाऱ्या अनेकांनी आता स्मार्ट घडय़ाळं घालून ट्रेकला येणं सुरू केलं आहे. आपण किती अंतर चाललो, किती कॅलरीज खर्च केल्या, इथपासून ते दिवसभरात किती उंची गाठली, हवेचा वेग, तापमान, तुम्ही जिथे उभे आहात ती अचूक जागा दाखवणारे असे अनेक वैशिष्टय़े, सुविधा असलेले तऱ्हेतऱ्हेचे फिटनेस बॅण्ड आणि स्मार्ट घडय़ाळं बाजारात आली आहेत. ट्रेकला येणाऱ्या अनेकांकडे सध्या ही घडय़ाळं पहायला मिळतात. तर रात्रीच्या काळोखात किती वाजलेत, हे कळावं म्हणून ट्रीटियमसारखे दुर्मीळ धातू वापरलेली काही घडय़ाळेही ट्रेकला येणाऱ्यांच्या हातावर पाहायला मिळतात. खास ट्रेकला वापरता यावीत अशी घडय़ाळंही आता अनेक कंपन्यांनी काढली आहेत.

साइड पॉकेट्स

पाठीवर भली मोठी रकसॅक घेऊन निघालं की मुक्कामाच्या ठिकाणी पोचेपर्यंत ती उघडली जात नाही. अशा वेळी मोजकं सामान हाताशी वरचेवर असावं, म्हणून अनेक जण ट्रेकला छोटेखानी साइड पॉकेट्स घेऊन येतात. केवळ मोबाइल फोन, पाकीट आणि काही औषधं राहतील इतकीच जागा या छोटय़ाशा बॅगमध्ये असते. ती कमरेला लावली की चालायला सुरुवात करायची. वाटेत प्रत्येक वेळी रकसॅक उघडून सामान काढायची गरज त्यामुळे राहत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 3:18 am

Web Title: famous for trekking mahogany sunglasses wanders akp 94
Next Stories
1 टेकजागर : समाजमाध्यमांवरील प्रभावाचा भाव
2 ‘इंटिरिअरवरही तत्त्वज्ञानाचा प्रभाव’
3 जगाच्या पाटीवर : अभ्यास  आहारशास्त्राचा
Just Now!
X