तव्यावर पडणारं डोशाचं पीठ, ते वाटीने गोलगोल फिरवून तयार केलेला डोसा, तो तयार होत असतानाच कालथ्याने त्याचे तुकडे करून नंतर त्याच्या केलेल्या सुरळ्या.. घाटकोपरच्या खाऊगल्लीत खाबू मोशायने जिनी डोसा खाताना ही कारागिरी बघितली होती. पण ठाण्यात एका आइस्क्रीम पार्लरमध्ये चक्क आइस्क्रीम तसंच तयार करताना पाहून खाबू चकित झाला.

कालचक्राच्या या अनाद्यंत गतीने खाबू मोशायला सध्या चक्रावून सोडले आहे. जगाचा साक्षीदार असलेला सूर्य पूर्वेला आगमन करताना काळ्याभोर ढगांच्या पडद्याआड तोंड लपवून येतो. दिवसभर आपल्या प्रखर तेजानं आसमंतच नाही, तर पृथ्वीचा प्रत्येक कण झळाळून सोडतो आणि मावळतीला जाताना आपल्या सहस्ररश्मींनी पश्चिमपटलावर शतरंगांची उधळण करतो.. कालचक्राचं भांबावून सोडणारं हे गणित गेले काही दिवस खाबू मोशाय नियमानं पाहतो आहे. या चक्राची गती कधी त्याला विस्मयचकित करून सोडते, तर कधी समृद्ध करते. तो या गतीमुळे अस्वस्थ होऊन अंतर्मुख झाल्यासारखा खाली मान घालून फिरत राहतो.. थोडक्यात खाबू मोशाय उन्हाळ्यामुळे हैराण झाला आहे.
गेल्या तीन चार खेपांना (हा शब्द लिहिला की, खाबू मोशायला पूर्वीच्या बायकांच्या बाळंतपणाची आठवण होते. कारण ‘गेल्या खेपेला’ किंवा ‘गंपूच्या खेपेला किनई..’ अशा वाक्यांमध्येच हा शब्द खाबूने वाचला किंवा ऐकला आहे) तर गेल्या तीन-चार खेपांना खाबू मोशायने उन्हाळ्यात खाण्यायोग्य अशा काही हटके पदार्थाची चव घेतली होती. पण मुंबईसारख्या ठिकाणी उन्हाळा म्हणजे कायमस्वरूपी पाचवीला पुजलेला! त्यामुळे बाराही महिने थंड होण्यासाठी खाबूला काहीतरी हवंच होतं. तसे गेल्या खेपेचे पदार्थही बारमाही थंडावा देणारेच होते. पण तरीही खाबू यावेळी सर्वमान्य आणि तरीही काहीतरी वेगळेपण असलेल्या पदार्थाच्या शोधात मुंबई महानगर प्रदेश पालथा घालत होता. या खाद्यभ्रमंतीमध्ये त्याला ठाण्यातील एका आइस्क्रीम पार्लरमध्ये एकदम हटके आइस्क्रीम बनवून देतात, अशी कुणकुण लागली. वास्तविक आइस्क्रीमबरोबर खाबूसकट सगळ्यांचंच एक भावनिक नातं आहे. पुण्यातल्या मारुतीच्या मंदिरांसारखी गल्लोगल्ली आइस्क्रीम पार्लर्स झाली नव्हती, त्या वेळी आइस्क्रीम ही चैनीची गोष्ट होती. रजिस्टर्ड लग्न केलेल्या अनेक जोडप्यांनी त्या काळी आपल्या मित्रांची बोळवण आइस्क्रीम पार्टीवर केली आहे. मॅट्रिकला चांगले टक्के मिळाले, ऑफिसात प्रमोशन मिळालं, लग्न ठरलं अशा काही खास कारणांसाठीच आइस्क्रीम हा ठेवणीतला पदार्थ होता. पण गेल्या काही वर्षांत, जागतिकीकरणामुळे म्हणा किंवा आणखी कशामुळे म्हणा, आइस्क्रीम मध्यमवर्गीयांच्याच नाही, तर कोणत्याही स्तरातील लोकांच्या आवाक्यात आलं. याच आइस्क्रीमची पुढली पायरी खाबूने ठाण्यात चाखली.
ठाण्यात उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंतांची एक खाऊ गल्ली आहे. पांचपाखाडी भागात पूर्वी ओपन हाउस नावाचं हॉटेल होतं. आता तो भाग प्रशांत कॉर्नर या मिठाईवाल्यासाठी प्रसिद्ध आहे, तर ओपन हाउसची गल्ली म्हणून ही गल्ली फेमस आहे. काही वर्षांंपूर्वी या गल्लीत चिटपाखरूही फिरकत नव्हतं. पण जसजसा ठाण्याचा विकास होत गेला, या गल्लीचं रूपडं पालटलं. नॅचरल्स, बास्कीन्स रॉबिन्स, डॉमिनोज, पिझ्झा हट, रिबन्स अँड बलून्स, मॉन्जिनीज अशा एकापेक्षा एक मोठय़ा ब्रँड्सबरोबरच इथे ‘मालवण’सारखं हॉटेलही ठाण मांडून बसलं. याच गल्लीत अगदी नव्यानेच ‘-३०१ फॅरेनहाइट’ नावाचं एक आइस्क्रीम पार्लर उघडल्याची कुणकुण खाबूला लागली. सांप्रतकाळी आइस्क्रीमचा हा काय नवीन अवतार आहे, हे पाहण्यासाठी खाबू एका रात्री या आइस्क्रीम पार्लरमध्ये प्रवेश करता झाला.
21
पार्लरमध्ये शिरल्याशिरल्या खाबू थंड पडला. पार्लरचं नाव आतमध्ये असलेल्या तापमानावरून तर नाही ना ठेवलं, अशी एक शंका खाबूच्या मनाला चाटून गेली. त्यातून सावरतो नाही तोच, ‘खड्खड्खड्खड्खड्’ असा आवाज आला. घमेल्यात थापी घालून कामगार सिमेंट एकजीव करतात, तेव्हा असा आवाज येतो. त्यामुळे आइस्क्रीमच्या दुकानात असा आवाज ऐकून खाबू आणखी हैराण झाला. पण लगेचच या आवाजाचा उलगडा झाला. काउंटरच्या मागे तीन-चार तवे होते. वास्तविक त्याला थंडगार तवेच म्हणायला हवं. कारण या तव्यांखाली ते गरम करण्यासाठी नाही, तर -२० अंश सेल्सिअस एवढे कमी तापमान ठेवून ते थंड करण्यासाठी विशिष्ट गॅस सोडला जातो. या तव्यांमागे उभी असलेली माणसं त्यांच्या हातातल्या थापीने तव्यावरचा ऐवज ‘खड्खड्खड्खड्’ करून एकजीव करत होती. खाबू आणखी थोडा वेळ थांबला, तर तव्यावरचा ऐवज त्यांनी तव्यावर पसरवला. तो थोडा घट्टं झाल्यावर त्यांनी त्याचे तीन भाग केले आणि आपल्याकडे सुरळीच्या वडय़ा करतात त्याप्रमाणे त्या घट्टं झालेल्या ऐवजाच्या वडय़ा केल्या. त्या तीन वडय़ा एका प्लेटमध्ये ठेवून खाबूशेजारी उभ्या असलेल्या माणसाच्या प्लेटमध्ये ठेवल्या.
22
ही रंजक क्रीडा बघताना खाबूची नजर समोरच्या मेन्यूकार्डवर गेली. त्या मेन्यूकार्डमध्ये वेगवेगळे फ्लेव्हर्स आणि त्यांच्यासमोरील नायट्रो आणि क्रीमलेट या दोन पर्यायांवर गेली. नायट्रो म्हणजे एका भांडय़ात क्रीम घेतात, त्या क्रीममध्ये तुम्हाला हवा तो फ्लेव्हर टाकतात. ते भांडं एका मशीनसमोर ठेवतात. त्या मशीनमधली नळी भांडय़ात जाते. खूप धूर होतो. अर्थात हा धूर कमी तापमानामुळे झालेला बर्फसदृश गोष्टीचा असतो. त्यानंतर त्या भांडय़ात आइस्क्रीमचा ताजा स्कूप तयार झालेला असतो. क्रीमलेट तयार करताना खाबूने मगाशी सांगितलेल्या तव्यावर क्रीम टाकले जाते. त्यात हवा तो फ्लेव्हर मिसळला जातो. थापीने हे मिश्रण एकजीव करून त्याच्या सुरळीच्या वडय़ांसारख्या सुरळ्या करून दिल्या जातात.
समोरच्या मेन्यूकार्डवर नायट्रोच्या खाली ७० आणि क्रीमलेटच्या खाली ८० रुपये किंमत बघूनच खाबू सुखावला. शंभर रुपयांच्या आत हा ऐवज मिळतो, ही गोष्ट खाबूला काहीशी आश्चर्यचकित करणारी होती. फ्लेव्हर्सवर नजर टाकताना खाबूला त्यात ‘ग्वाव्हा चिली’ हा फ्लेव्हर दिसला. खाबूने लगेचच तो क्रीमलेट स्वरूपात ऑर्डर केला. समोरच्या कारागिराने क्रीम, ग्वाव्हा फ्लेव्हर एकत्र करून त्याच्या छान सुरळ्या केल्या. त्या एका प्लेटमध्ये ठेवल्या आणि त्यावर चक्कं मीठ आणि तिखट यांची पूड टाकली. खाबूने गपगुमान पहिला घास तोंडात टाकला आणि खाबू थेट शाळेबाहेरच्या ‘संत्र-लिंबू पैशापैशाला’ विकणाऱ्या बाईच्या पालासमोर पोहोचला. शाळेत असताना खाबू या बाईच्या पालाशी कित्येक तास उभा राहायचा. त्याचं कारण तिच्याकडे येणाऱ्या शाळेतल्या तमाम मुली आणि तिच्याकडे मिळणारा जंगलचा मेवा. त्या बाईकडे हिरवेगार पेरूही विकायला असायचे. खाबूनेही ते अनेकदा खाल्ले होते. पेरूच्या फोडीत तिच्याजवळचा लाल तिखट व मीठ एकत्र केलेला मसाला त्यात भरायची. अगदी तश्शीच चव, फक्त थंडगार स्वरूपात आणि पेरूच्या बिया दातात न अडकता खाबूला या आइस्क्रीम पार्लरमध्ये मिळाली. त्या चवीवर खुश होऊन खाबूने ते आइस्क्रीम गट्टम् केलं, पुन्हा पुन्हा त्यावर तो मसाला टाकून घेत घेतच.. एकावरच थांबेल, तर तो खाबू कसला! म्हणून त्याने पान मसाला फ्लेव्हरचं क्रीमलेट मागवलं. तेदेखील अप्रतिम होतं. खाबूने त्यानंतर त्या पार्लरमध्ये जाऊन ओरिओ, हाँगकाँग कॉफी, फ्रेश मँगो, फ्रेश स्ट्रॉबेरी, पीच असे अनेक फ्लेव्हर्स ट्राय केले. वैयक्तिक आवड विचाराल, तर ग्वावा चिली, हाँगकाँग कॉफी, पान मसाला, ग्वाव्हा चिली, क्रश स्ट्रॉबेरी हे फ्लेव्हर्स त्याला खूपच आवडले. आता कधीही अंगाची काहिली झाली की, खाबू थेट ‘-३०१ डिग्री फॅरेनहाइट’ गाठणार आणि त्याचे आवडते फ्लेव्हर्स एकामागोमाग एक ट्राय करणार.

कुठे : ‘-३०१ डिग्री फॅरेनहाइट’
कसे जाल : ठाणे स्थानक पश्चिमेला उतरून रिक्षा करा. रिक्षावाल्याला पाचपाखाडी किंवा हरिनिवास सर्कल सांगा. हरिनिवास सर्कलजवळ तीन हात नाक्याला जाणाऱ्या रस्त्यावर एक हनुमानाचं मंदिर आहे. त्या मंदिरासमोरील रस्त्याला लागा. या रस्त्यावर उजवीकडे तुम्हाला मॉन्जिनीज दिसेल. मॉन्जिनीजसमोरच हे आइस्क्रीम पार्लर आहे. रिक्षाने गेलात, तर रिक्षाचे २०-२२ रुपये होतील. किंवा कोणालाही ओपन हाउस अथवा प्रशांत कॉर्नर पाचपाखाडी विचारा. तिथे आल्यानंतर हॉटेल मालवण डावीकडे ठेवून त्या रस्त्यावर चालायला लागा. उजव्या बाजूला नॅचरल्स वगैरेच्या रांगेतच हे आइस्क्रीम पार्लर दिसेल.