इव्हनिंग गाउन्स कुठल्या कापडापासून शिवावेत आणि घागऱ्यासाठी कुठलं कापड निवडावं? हेमलाइन, नेकलाइन कशी शिवावी? ‘डिझायनर वेअर’ आपल्या नेहमीच्या टेलरकडून शिवून घ्यायचं असेल तर थोडं होमवर्क केलंच पाहिजे.

तुमच्याबरोबर असं काही कधी घडलंय का : ताई-दादाच्या लग्नासाठी किंवा मग एखाद्या पार्टीसाठी शॉपिंग करताना सगळ्यांसमोर करिना कपूर, दीपिका पदुकोनसारखं मिरवायचं असतं, म्हणून खास तुमच्या आवडत्या फॅशन मॅगझीनमधून तुम्हाला आवडलेल्या ड्रेसचा फोटो तुम्ही कापून घेता. कौतुकाने टेलरला दाखवतासुद्धा. तो थोडीफार त्याची गणितं करतो. त्या ड्रेसमध्ये तुमच्या बॉडीटाइपनुसार (आणि त्याच्या शिवणकलेच्या मर्यादांनुसार) काही बदल सुचवतो आणि आपल्या गळी उतरवतो. आठवडय़ाभराने ड्रेस हातात आल्यावर मात्र लक्षात येतं की ड्रेसची नेकलाईन व्यवस्थित शिवली गेली नाहीये किंवा स्लीव्हज खूप घट्ट झाल्यात. टेलरला आपण दिलेल्या ड्रेसच्या पॅटर्नचा फोटो आणि त्याने शिवलेला ड्रेस यातलं साम्य शोधावं लागतंय. मग नाराज होऊन शेवटच्या क्षणी घाईघाईने बाजारातून एखादा ड्रेस आणला जातो आणि त्या दिवसापुरती अडचण सोडवली जाते. कौतुकाने शिवलेला ड्रेस मात्र वर्षांनुर्वष कपाटात तसाच पडून राहतो. ड्रेस कितीही आकर्षक दिसत असला तरी तो शिवताना वापरलेल्या क्लृप्त्या आपल्याला ठाऊक नसतात. टेलरसुद्धा या क्लृप्त्यांकडे सहज दुर्लक्ष करतो. परिणामी तुमच्या स्वप्नातला एक ड्रेस शहीद होतो.
18
मुळात वेगवेगळं कापड, पॅटर्न, शिवण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येक ड्रेससाठी एकच पद्धत वापरली तर कुठेतरी चूक होणार हे निश्चित असतं. पण सगळेच टेलर या छोटय़ा छोटय़ा बाबींकडे लक्ष देतातच असं नाही. त्यामुळे त्यांना या गोष्टींची जाणीव करून देणं गरजेचं आहे. सुरुवात होते कापडाच्या निवडीपासून. कतरिनाने फोटोमध्ये घातलेला ड्रेस जर शिफॉनचा असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी कॉटनमध्ये तो लुक मिळवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या कापडानुसार पॅटर्न निवडा किंवा फोटोमध्ये उल्लेख केलेल्या कापडाशी मिळतेजुळते कापड शोधा. इंडियन वेअरमध्ये शक्यतो कॉटन, सिल्क, वेल्वेट, जॉर्जेट, ब्रोकेड या कापडांचा अधिक वापर होतो. हे कापड टेलरच्या रोजच्या हाताळणीतलं असल्यानं यांच्याबाबत चुका होण्याच्या शक्यता कमी असतात. बलून स्टाइल गाउन्ससाठी शक्यतो टफेटा, क्रेप, चायना सिल्क, वेल्वेट कापड वापरतात. हे कापड वजनाला हलकं असतं, पण गाऊनला अपेक्षित फॉल तुम्हाला मिळतो. या कापडांना सेल्फ-शाइन असते. त्यामुळे गाऊन्समध्ये यांची निवड करण्यामागचं मुख्य कारण आहे. ए -लाइन, स्ट्रेट ड्रेससाठी शिफॉन योग्य असतं. शिफॉनमुळे ड्रेसला एलीगन्स मिळतो आणि बल्कीनेससुद्धा जाणवत नाही. तसंच या कापडाला कितीही घेर दिला तरी त्याचा फॉल सरळ रेषेत असल्याने फुगीरपणा दिसत नाही. फिटेड ड्रेसेससाठी जर्सी कापड उत्तम असते. जर्सी शरीराच्या आकारानुसार वळण घेतं जेणेकरून फिटेड ड्रेसचा बॉडी हगिंग लुक मिळतो. डे-ड्रेस किंवा समर ड्रेससाठी मलमल, सुती, लिनन अशी वजनाने हलकी आणि आरामदायी कापडांची निवड करावी.
20
ड्रेस शिवण्यापूर्वी टेलरला तुमच्या सगळ्या अपेक्षा सांगणं गरजेचं असतं. केवळ मापं देऊन काम भागत नाही. तुम्हाला अति घामाचा त्रास असेल तर फिटेड स्लिव्ह वापरता येणार नाहीत. ड्रेसचा बॅक किती डीप हवा, याचा अंदाज हवा. पोटाला घेर असल्यास इलॅस्टिक लावून घेर देता येणार नाही. साडीचा पदर सुटा सोडणार की पिन लावणार यावर ब्लाउजची नेकलाइन किती खोल करायची हे अवलंबून आहे. पिन लावलेला पदराच्या वजनाने अति डीप ब्लाउज खाली झुकू शकतो. त्यामुळे या बारीकसारीक बाबींचा अंदाज टेलरला देणं गरजेचं आहे.

नेहमीच्या टेलरकडून खास डिझायनर टच ड्रेस शिवून घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?
* हेम शिवण्याची पद्धत या क्षुल्लक वाटणाऱ्या बाबीचा ड्रेसच्या लुकवर मोठा परिणाम होतो. प्रत्येक कापड अर्धा इंच दुमडून शिलाई मारून हेम शिवता येत नाही. शिफॉन, जॉर्जेट, क्रेपला बिडिंग केलं जातं. मलमलच्या समर ड्रेसला दोन -पाच इंचाची हेम दिली जाते. त्यामुळे ड्रेसला स्ट्रेट फॉल मिळतो.
* कुर्ता शिवताना शक्यतो लायनिंग मूळ कापडाच्या उंचीच्या एक इंच कमी असू द्यावे. त्यामुळे हेमलाइनला लायनिंग डोकविण्याचा प्रकार होणार नाही.
* सुळसुळीत कापडाला लायनिंग स्लीटपर्यंत मूळ कपडासोबत शिवावं. त्यानंतर मात्र मूळ कापड आणि लायनिंग असे दोन लेअर ठेवा. यामुळे कापडाचा मूळ फॉल खराब होणार नाही.
* फिटेड ड्रेसला बॅक डिटेलिंग असेल तर झीप लावता येणार नाही. अशा वेळी साइडला झीप असू द्यावी. त्यामुळे ड्रेस घालताना अडचण होत नाही.
* प्लंजिंग नेकलाइन खाली ओघळण्याचे प्रसंग अनेकदा होतात. हे टाळण्यासाठी नेक डीप असेल तर ब्रॉडनेस कमी ठेवा. बोट नेक, ‘व्ही’ नेकमध्ये हे लक्षात ठेवावं लागतं.
* बलून ड्रेस, घेरदार घागरा याच्या आत नेटचं वेगळं लायनिंग दिलं जातं. त्याला कॅन कॅन किंवा स्टिफ टय़ुल म्हणतात. त्यामुळे ड्रेसला फुगीरपणा येतो. प्रत्येक ड्रेससाठी वेगळं लायनिंग शिवण्यापेक्षा न्यूड शेडमध्ये एक स्कर्ट शिवून ठेवा. पण या स्कर्ट किंवा लायनिंगमुळे मूळ ड्रेसची उंची कमी होते. त्यामुळे ड्रेसची लांबी फुगीरपणा किती हवा त्यानुसार ठरवा.