05 August 2020

News Flash

अराऊंड द फॅशन : ‘फॅशन’ अ‍ॅवॉर्ड गोज टू ..

सध्या रॅम्पवरून ते सोशल मीडियापर्यंत विस्तारत जाणाऱ्या फॅशनइंडस्ट्रीतही मोठय़ा स्तरावर आंतरराष्ट्रीय फॅशनअ‍ॅवॉर्ड बहाल केले जातात.

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

पुरस्काराचा मान आज प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोठय़ा व्यक्तीला आनंदाने बहाल केला जातो. आज होणारे कौतुक हे उद्याच्या तरुण आणि होतकरू मंडळींना एक नवं प्रेरणास्थान देतं. फॅशनविश्वातही असे विविध पुरस्कार दिले जातात आणि एक नवे फॅशनरोल मॉडेल उभे राहतात. अशाच वेगवेगळ्या पातळ्यांवर होणाऱ्या फॅशन पुरस्कार सोहळ्यांविषयी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

आपल्या आयुष्यात आपण निष्ठेने केलेल्या कामाची थाप आणि पोचपावती मिळते ते नामांकित पुरस्कारांतून. आज प्रत्येक क्षेत्रात विविध प्रतिष्ठित पुरस्कार सोहळे साजरे होतात. मनोरंजन, विज्ञान, उद्योग, क्रीडा, वैद्यकीय, तंत्रज्ञान, कला अशा नानाविध क्षेत्रांत दरवर्षी सातत्याने पुरस्काराचे मानकरी ठरलेले अनेक दिग्गज आपल्यासमोर येतात. सध्या रॅम्पवरून ते सोशल मीडियापर्यंत विस्तारत जाणाऱ्या फॅ शनइंडस्ट्रीतही मोठय़ा स्तरावर आंतरराष्ट्रीय फॅशनअ‍ॅवॉर्ड बहाल केले जातात.

फॅशनविश्व हे गेल्या दोन दशकांपासून झपाटय़ाने बदलत गेलं. त्यात येणारे नवे विचार, तंत्रज्ञान, धाडसी प्रयत्न, प्रयोग, डिझाईन आणि लोकप्रिय स्टाइल्स यांचा समावेश होतो. त्यातून फॅशनच्या रूपाने आकाराला आलेल्या त्या विचारांचा आणि ते विचार घडवण्यामागे अहोरात्र मेहनत करणाऱ्या त्या फॅशनप्रेमींचा सत्कार हा महत्त्वाचा भाग ठरतो. त्यामुळेच गेल्या दशकापासून फॅशनअ‍ॅवॉर्ड्स याक्षेत्रातील दिग्गजांना दिले जातात. फॅ शनच्या बाबतीत त्याच्या संपूर्ण किमयेचा आढावा या फॅशनअ‍ॅवॉर्ड्समधून घेता येतो. कारण हे अ‍ॅवॉर्ड्स फक्त फॅशनडिझायनर किंवा स्टायलिंगपुरते निश्चितच मर्यादित नसतात. ज्वेलरी डिझायनर, फॅशन डिझायनर, फॅशनस्टायलिस्ट, मेकअप, मॉडेल्स, सेट डिझायनर, शो डिरेक्टर, फॅशन कोरिओग्राफर, हेअर स्टायलिस्ट, फॅशन फोटोग्राफर अशा फॅशनने परिपूर्ण प्रत्येक विभागातील दिग्गज मंडळींना हे फॅशनअ‍ॅवॉर्ड्स दिले जातात.

फॅशनअ‍ॅवॉर्ड्सची सुरुवात ही साधारणपणे प्रस्थापित ‘फॅशनकाऊन्सिल’द्वारा झाली असे म्हणता येईल. त्यापैकी ‘काऊन्सिल ऑफ फॅशन डिझायनर ऑफ अमेरिका’ आणि ‘ब्रिटिश फॅशनकाऊन्सिल’ ही प्रमुख नावं आहेत. त्याबरोबरच ‘वर्थ ग्लोबल स्टाइल नेटवर्क’, ‘पेटा’, ‘मिडलॅन्ड’ अशा काही संस्थांनीही पुढाकार घेऊन फॅशनअ‍ॅवॉर्ड्स सुरू केले आहेत. ‘पर्ल ऑफ आफ्रिका फॅशन अ‍ॅवॉर्ड्स’, ‘अबर्याज स्टाइल अ‍ॅण्ड फॅशनअ‍ॅवार्ड्स’ जे खास करून युगांडा आणि आफ्रिका येथील फॅ शनक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामवंत व्यक्तींना देण्यात येतात, असे पुरस्कार सोहळेही मोठय़ा प्रमाणात साजरे होतात. मुख्यत: जेव्हा फॅशनअ‍ॅवॉर्ड्स सुरू झाले तेव्हा ते बऱ्यापैकी एकमेकांना समकालीन होते. आज जगभरात ‘सीएफडीए फॅ शनअ‍ॅवॉर्ड्स’, ‘द फॅशन अ‍ॅवॉर्ड्स’ आणि ‘डब्ल्यूजीएसएन ग्लोबल फॅशनअ‍ॅवॉर्ड्स’ हे मोठय़ा प्रमाणात आणि दिमाखात साजरे केले जातात. सध्या नवीन आणि उत्तमोत्तम विचारांचे फॅशनअ‍ॅवॉर्ड्सही देण्यास सुरुवात झाली आहे. यात मागच्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला ‘वर्ल्ड फॅशनअ‍ॅवॉर्ड्स’, ‘द ग्रीन कार्पेट फॅशनअ‍ॅवॉर्ड्स’ या पुरस्काराची अशी संकल्पना आहे ज्यातून सस्टेनेबल फॅशनपुढे येते. तसेच ‘इंटरनॅशनल वूलमार्क प्राइझ’, ‘ग्लॅमरस प्लस साइज फॅशन अ‍ॅवॉर्ड्स’, ‘कॅनेडियन आर्ट्स अ‍ॅण्ड फॅशनअ‍ॅवॉर्ड्स’, ‘इडेबल फॅशन अ‍ॅवॉर्ड्स’ आणि ‘र्रिडेस डिझाईन अ‍ॅवॉर्ड्स’ असे काही लक्षवेधी आणि वेगळी धाटणी असणारे पुरस्कारही नव्या मांडणीसह नावाजले गेलेले आहेत आणि सध्या चर्चेतही आहेत. भारताचा अशा पुरस्कार सोहळ्यात वाखाणण्याजोगा सहभाग असतो. जसे ‘एले ब्युटी अ‍ॅवॉर्ड्स’, ‘फिल्मफेअर ग्लॅमर आणि सरकारी अ‍ॅवॉर्ड्स’, ‘व्होग ब्युटी अ‍ॅवॉर्ड्स’ इत्यादी पुरस्कार हेसुद्धा चंदेरी दुनियेच्या फॅशनिस्टांना पुरस्कार देतात.

जगभरात फॅशनही वेगवेगळी आहे. प्रत्येक डिझायनरची धाटणी वेगळी आणि विचारही वेगळे. जगातल्या कानाकोपऱ्यातून जिथून कुठून फॅशनफॉलो केली जाते तेव्हा त्यापैकी कित्येक जणांना अमुक एका फॅ शनडिझायनरची फॅशन भावते अथवा अजिबातच पसंत पडत नाही. एक वेळ अशीही येते की, फॅशनबद्दल टोकाची भूमिका असणारेही आपली टिप्पणी त्यावर करतात. फॅशनमधून बंडखोरपणा, चुकीचे संकेत, स्वैराचार, बोल्डनेस, अतिशयोक्ती जी सामान्य माणसाला किंवा कुठल्याही बुद्धिजीवी वर्गाला पचनी पडणारी नसते ती सहजपणे जगासमोर येते. दुसरीकडे ज्याला वर्षांनुवर्षे कलात्मकता आणि सौंदर्याची जोड आहे, अशी फॅ शनही नेटाने जगासमोर येते. ‘फॅशन’च्या बाबतीत नक्की कोणता निकष लावून पुरस्कार ठरवले जातात हा एक कुतूहलाचा विषय आहे. फॅशन अ‍ॅवॉर्ड्सचे निकष दरवर्षी बदलते असतात का? मुख्यत्वे एका फॅशनब्रॅण्डची किंवा फॅशनडिझायनरची ख्याती कलात्मक आणि व्यावसायिक यशाचे गणित पाहून ओळखता येते? फॅशनपुरस्कार देताना या सगळ्याचा नाही म्हटला तरी विचार केला जातोच. फॅशनपुरस्कार विविध विभागांतून दिला जातो. अर्थातच पुरस्कारांसाठी तसे अर्ज करावे लागतात आणि त्यानंतर त्या त्या विभागातील पुरस्कारासाठी तसे फायनलिस्ट शोधले जातात. या फायनलिस्टची निवड करण्यासाठी स्पेशल ज्युरी नेमलेले असतात. काही अ‍ॅवॉर्ड्स हे थीम देतात तेव्हा नेमलेल्या स्पेशल ज्युरी यांना डिझाईनमधील ऑथेंटिसिटी, त्यामागचा विचार, उद्देश, डिझाईन क्वॉलिटी, क्राफ्ट्समनशिप, संरचना, व्यावसायिक दृष्टिकोन आणि दिलेल्या थीमचे परीक्षण करावे लागते. ब्रिटिश फॅ शनकाऊन्सिलद्वारा विविध विभागांतून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा क्रायटेरिया प्रत्येक विभागासाठी वेगळा असतो. म्हणजे उदाहरणार्थ एका मॉडेलला पुरस्कार द्यायचा झाल्यास त्या मॉडेलचा एक फॅ शनमॉडेल म्हणून असणारा इन्फ्लूएन्स हा फक्त रॅम्पपुरता न राहता इतरत्र माध्यमांतूनही उमटलेला असावा लागतो. खरं तर ढोबळमानाने समकालीन मांडणी, वेशभूषेतीला खरेपणा आणि व्यावसायिक यश या तीन हेतूंवर फॅशन अ‍ॅवॉर्ड्स प्रदान केले जातात.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याप्रमाणे इथेदेखील रेड कार्पेट सजतो आणि फोटोग्राफर्ससाठी एक मोठी पर्वणीच असते हे खरं. फॅ शनही एखाद्याला भुरळ तर घालतेच, पण त्याहूनही त्याची भूमिका ही एखाद्यावर प्रभाव पाडणारी आहे. या वर्षी कोणी सर्वाधिक आपल्या फॅ शनमधून कोणावर किती प्रभाव पाडला आहे याची प्रचीती वेगवेगळ्या विभागांतून देण्यात आलेल्या पुरस्कारातून सहज येते. ब्रिटिश फॅ शनकाऊ न्सिलचा ‘डिझायनर ऑफ द इयर’ हा पुरस्कार याच विचाराने दिला जातो. फॅ शनमधील लाइफ टाइम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड हा ‘सीएफडीए फॅ शनअ‍ॅवॉर्ड्स’द्वारा दिला जातो. याशिवाय ‘वुमन्सवेअर डिझायनर अ‍ॅवॉर्ड’, ‘मेन्सवेअर डिझायनर अ‍ॅवॉर्ड’, ‘अ‍ॅक्सेसरीज डिझायनर अ‍ॅवॉर्ड’, ‘फॅ शन आयकॉन अ‍ॅवॉर्ड’, ‘युथ डिझायनर अ‍ॅवॉर्ड’, ‘फॅशनमीडिया अ‍ॅवॉर्ड’ असे वेगवेगळे पुरस्कार देऊन फॅ शनक्षेत्रातील कर्तबगारांना सन्मानित करण्यात येते. २०१९ या वर्षीचा ‘एम टीव्ही फॅशनट्रेलब्लेझर अ‍ॅवॉर्ड’ हा मार्क जेकब्स या अमेरिकन फॅ शन डिझायनरला प्रदान करण्यात आला. हा अ‍ॅवॉर्ड या वर्षीपासून नव्याने सुरू करण्यात आला आहे आणि प्रामुख्याने वेगळ्या प्रवाहाच्या दिशेने जाणाऱ्या फॅशन डिझायनर्सना हा दिला जातो. मार्क जेकब्स याने रेडी टू वेअर कलेक्शन सादर केले आहे, १५० हून जास्त कपडे आपल्या पर्सनल कलेक्शनमधून लिलावास दिले आहेत. तो स्वत: एक फॅ शन आयकॉन आहे. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून तो या क्षेत्रात कार्यरत आहे. विविध फॅशन वीक्स, गाला आणि फॅशन शोमधून तो जगासमोर आला आहे.

पुरस्कारांची ही मांदियाळी दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि याची गरजही मोठय़ा फॅशन इंडस्ट्रींना फायदेशीर ठरते आहे. त्यामुळे येत्या काळात जशी फॅशनबदलती राहील तशी अ‍ॅवॉर्ड सोहळ्यांची ख्यातीही बदलत जाईल यात शंका नाही.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 4:33 am

Web Title: fashion award ceremony abn 97
Next Stories
1 शेफखाना : यूटय़ूबची फुडी दुनिया
2 छोटे टेक्नोवीर
3 व्हिवा दिवा : तानिया चितारी
Just Now!
X