|| तेजश्री गायकवाड

‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘भूमी’, ‘राम लीला’, ‘गुलदस्ता’ आणि आता प्रदर्शित होणारे ‘पी. एम. नरेंद्र मोदी’ व ‘हाऊसफुल ४’ या सिनेमांसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करणाऱ्या चंद्रकांत सोनावणे यांच्या वास्तव आयुष्याची कथासुद्धा एखाद्या बॉलीवूड सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. एका लहानशा गावातून येऊन त्यांनी थेट बॉलीवूडमध्येच स्वत:ला कॉस्च्यूम डिझायनर म्हणून सिद्ध केलं.

कॉस्च्यूम डिझायनर म्हणून त्यांचा प्रवास कसा झाला याबद्दल ते सविस्तर सांगतात. माझा जन्म महाराष्ट्रातील एका लहान गावात भगवान नगर येथे झाला. एका शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यावर काय परिस्थिती असते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आमची परिस्थिती एवढी हलाखीची होती की, साधी शाळेची फीसुद्धा भरणं शक्य नव्हतं. त्यामुळे माझ्या वडिलांनी माझं शाळेत जाणंच बंद केलं; परंतु माझ्या आईच्या प्रयत्नांमुळे मी पुन्हा शाळेत जायला सुरुवात केली. मी माझं शालेय शिक्षण जवळजवळ ८ ते ९ शाळा बदलून पूर्ण केलं आहे, असं चंद्रकांत सांगतात. अनेकदा तर मला ४ ते ६ महिन्यांतच शाळा बदलावी लागायची. मी नववीत असताना फॅशन डिझायनिंगसंदर्भात एक लेख वाचण्यात आला. तो लेख वाचून मला त्या क्षेत्राकडे जाण्याची इच्छा झाली. दहावी झाल्यावर बाकीच्या मुलांना विचारतात तसं मलाही सगळे विचारायचे, की पुढे जाऊन तू काय बनणार? तेव्हा मी फॅशन डिझायनरच बनणार, असं सांगायचो. फॅ शन डिझायनिंग म्हणजे काय हेचअनेकांना माहिती नव्हतं. मी सुट्टीमध्ये माझ्या नातेवाईकाकडे राहायला जायचो. तेव्हा तिकडे एकाच्या घरी नृत्य शिकवायला जायचो. त्यांनी मला माझं ड्रीम शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली, असं चंद्रकांत सांगतात.

चंद्रकांत यांची आर्थिक परिस्थिती आधीपासूनच बिकट होती. त्यांच्या वडिलांना तर त्यांनी शालेय शिक्षणही घ्यावं असं अजिबात वाटत नव्हतं. मग आता बारावीनंतरचं शिक्षण घेण्यासाठी तरी ते कसे मदत करतील, असा प्रश्न चंद्रकांत यांच्यासमोर होता; पण तरीही त्यांनी प्रयत्न करून शिक्षण घ्यायचं ठरवलंच. त्याबद्दल ते सांगतात, ‘‘मला फॅशन डिझायनिंग या कोर्सची संपूर्ण माहिती मिळाल्यावर मी फीसाठी वडिलांना विचारलं, पण त्यांनी ती देण्यास नकार दिला. शेवटी मी खूप मागे लागल्यावर त्यांनी शेत विकलं आणि कर्ज फेडून उरलेले पैसे मला दिले, पण तेही पुरेसे नव्हते. तरी अर्धी फी भरून मी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. उरलेली फी भरण्यासाठी मी दिवसभर कॉलेज करून नंतर सायबर कॅफेमध्ये काम करायला सुरुवात केली. दिवसा कॉलेज, संध्याकाळी काम आणि रात्री कॉलेजचा अभ्यास असं माझं रुटीन असायचं आणि अशाच पद्धतीने माझं सगळं शिक्षण पूर्ण झालं.’’

शिक्षण झाल्यावर सगळ्यांनाच पहिलं काम कधी मिळतंय याची उत्सुकता असते तशीच ती चंद्रकांत यांनाही होती. शेवटच्या वर्षांतील प्रोजेक्टमुळे त्यांना त्यांचं पहिलं काम मिळालं. माझा शेवटच्या वर्षांतील प्रोजेक्टचा विषय हा इराणी संस्कृतीवर होता. इराणची संस्कृती, तिथली वेशभूषा यांचा मी खूप खोलात जाऊन अभ्यास केला होता. कॉलेज संपता संपता माझ्या एका मित्राला इन्डो-इराणी चित्रपटाची ऑफर आली होती. तेव्हा त्याने मला माझ्या प्रोजेक्टमुळे आमच्याबरोबर काम करशील का, म्हणून विचारलं आणि अशा प्रकारे मला पहिलं काम मिळालं. मी त्या चित्रपटासाठी असिस्टंट वेशभूषाकार म्हणून काम बघितलं. या चित्रपटाच्या शूटनंतर पाचच दिवसांनी मला ‘गुलदस्ता’ या मराठी चित्रपटासाठी असिस्टंट फॅशन डिझायनर म्हणून बोलावण्यात आलं आणि त्यानंतर मी कधीही मागे वळून बघितलं नाही, असं चंद्रकांत सांगतात. त्यांनी पुढे त्यांचं स्वत:चं बुटिकही सुरू केलं. एकामागोमाग एक चित्रपटासाठी वेशभूषाकार म्हणून काम करताना फॅशन डिझायनिंगचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आल्याचं चंद्रकांत सांगतात.

वेशभूषाकार म्हणून काम करताना फॅशन डिझायनिंगचं शिक्षण असणं फार महत्त्वाचं असतं. वेशभूषाकाराचा हा छोटा कोर्स म्हणजे शॉर्ट कट आहे असं मला वाटतं. शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास नेहमीच फायदेशीर ठरतो. एखाद्या पात्रासाठी वेशभूषा ठरवताना त्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं असतं, कारण पात्राच्या कपडय़ावरून सिनेमामध्ये ते पात्र कसं आहे, काय आहे हे समजतं. सिनेमामधला काळ कोणता, पात्राचं वय, त्याचा पेशा असं सगळं समजण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा ठरतो, असं ते आग्रहाने नमूद करतात. बाकीच्या डिझायनर्सप्रमाणे वेगवेगळ्या फॅशन शोमध्ये स्वत:चं कलेक्शन लवकरच चंद्रकांत सादर करणार आहेत. आपली भारतीय संस्कृती त्यांना त्यांच्या कलेक्शनमधून लोकांसमोर आणायची असल्याचं त्यांनी सांगितलं.

फॅशन डिझायनिंग क्षेत्राची साधी तोंडओळखही नसताना,स्वत:च या क्षेत्राची माहिती घेऊन त्यात एवढय़ा मेहनतीने आपले करिअर घडवणारे चंद्रकात या क्षेत्रात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्यांना मेहनतीशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही, हे ठामपणे सांगतात. ‘‘जेव्हा आपल्याला सोपं आयुष्य मिळतं तेव्हा त्यात काहीच मज्जा नसते. नेहमी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. अवघड मार्ग स्वीकारा आणि त्यासाठी शंभर टक्के द्या. रोज सकाळी उठून त्याच जोशाने काम करायला सुरुवात करा. निगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहा,’’ असं ते वारंवार बजावून सांगतात. फॅ शन डिझायनिंगचं हे क्षेत्र बाहेरून खूप ग्लॅमरस आणि लवकर प्रसिद्धी मिळवून देणारं आहे असं वाटतं, पण या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. या क्षेत्रात अपयशाचीही तयारी असावी लागते आणि सातत्याने आपल्या कामातून नवीन देत राहात आपलं वैशिष्टय़ टिकवलं तर कष्टाने यश साध्य होतंच, असंही चंद्रकांत स्वानुभवावरून सांगतात.

viva@expressindia.com