18 January 2021

News Flash

वस्त्रप्रथा : वस्त्रांवेषी

वस्त्र समृद्धीसाठी चंद्राला साकडे घालणे ही आपल्या समाजाची एक खास गोष्ट आहे

विनय नारकर

लोककला, लोकसाहित्यातून उलगडणाऱ्या वस्त्रपरंपरांचा वेध घेणारे प्रसिद्ध फॅशन डिझाइनर विनय नारकर यांचे हे जुने सदर ‘वस्त्रांवेषी’ या नवीन नावाने वाचकांच्या भेटीला येणार आहे.

भारतीय समाज वस्त्रकलेमध्ये अग्रगण्य होता, हे सर्वज्ञात आहे. भारताने वस्त्रकलेमध्ये अशी प्रगती केली की इथल्या प्रांतागणिक अनेको वस्त्रपरंपरा विकसित होत गेल्या. शेकडो वर्षांच्या अविरत प्रयत्नांमुळे आपल्याला ही कला वेगळ्या उंचीवर नेता आली. भारताने जगभर आपल्या वस्त्रांमुळे ख्याती मिळवली व जगभर व्यापार करून संपत्तीही मिळवली. भारतीय समाजाचे वस्त्रांशी एक वेगळेच नाते आहे. शेकडो वर्षांंपूर्वीच इथली वस्त्र निर्मिती कलेचा दर्जा प्राप्त करू शकली. भारतात वस्त्र निर्मितीच्या विविध अंगांनी, म्हणजेच विणण्याच्या, तंतूंच्या, रंगलेपनाच्या, वस्त्र सजावटीच्या अशा सर्व प्रकारे अगणित प्रयोग झाले.

या सर्व गोष्टी वस्त्र परंपरा व समाजजीवन यांचा घनिष्ठ संबंध अधोरेखित करतात. यामुळे आपल्या समाजात वस्त्र नेसण्यासंबंधी काही संकेत रूढ झाले. कोणत्या प्रसंगी कोणती वस्त्रे नेसली जावीत, कोणत्या रंगांची वस्त्रे नेसली जावीत, कोणत्या ऋतूमध्ये कोणता वस्त्र प्रकार वापरला जावा, वस्त्रांच्या देवाणघेवाणीबद्दल काही संकेत, प्रथा निर्माण झाल्या. वस्त्रांबद्दल काव्य, लोकगीतं निर्माण झाली. महत्त्वाच्या साहित्यामध्ये, महाकाव्यांमध्ये वस्त्र संकेतांचे उल्लेख झाले. शास्त्रीय संगीताच्या बंदिशींमध्येही वस्त्र संकेतांवर आधारित रचना बनवल्या गेल्या, विविध नृत्यप्रकारांमध्ये विशिष्ट वस्त्रांचा वापर होऊ लागला. या सर्व बाबींमुळे आपल्या समाजात एक विशेष प्रकारची ‘वस्त्र संस्कृती’ निर्माण झाली. धार्मिक बाबी, राजकीय परंपरा, सांसारिक सोहळे, सण—उत्सव, कला विश्व अशा मानवी आयुष्यातल्या महत्त्वाच्या अंगांनी वस्त्र संस्कृती बहरत गेली आहे. या वस्त्र संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत, आपल्या समाजात वस्त्रांसंबंधी निर्माण झालेल्या प्रथा.

आपल्या मराठी समाजात निर्माण झालेली एक वस्त्र प्रथा आपली सौंदर्यासक्ती आणि वस्त्रांप्रति असलेल्या अभिलाषेचे रसरशीत प्रतीक वाटते. या वस्त्र प्रथेला, ‘सुताने चंद्राला ओवाळणे’ किंवा ‘दशी वाहणे’ असे म्हणतात. चंद्राच्या कलांचे सगळ्या जगाला अप्रूप व आकर्षण. प्रत्येक संस्कृतीत यामुळे काही संकेत, प्रथा, दंतकथा, पुराणकथा निर्माण होत आल्या आहेत. आपल्या समाजाने चंद्राच्या कलांचा संबंध वस्त्रांशी जोडला. शुद्ध प्रतिपदेच्या किंवा शुद्ध द्वितीयेच्या वर्धिष्णू चंद्राला आपल्या वस्त्राचे सूत किंवा दशा काढून अर्पण केली जाते. हा विधी करताना प्रार्थना केली जाते की,‘तू जसा पुन्हा नवा झालास तशी आमची वस्त्रे नवी होऊ दे !!’ किंवा असेही म्हटले जाते की, ‘जुने वस्त्र घे व नवे वस्त्र दे’. वस्त्र समृद्धीसाठी चंद्राला साकडे घालणे ही आपल्या समाजाची एक खास गोष्ट आहे. ही सुंदर प्रथा काळाच्या ओघात कधी लुप्त झाली कोण जाणे..!

आपल्याला परिचित आणखी एक वस्त्र परंपरा जी चंद्रासंबंधी आहे, ती म्हणजे ‘चंद्रकळा’. संक्रातीला नवपरिणित मुलीस चंद्रकळा साडी भेट दिली जाते.

आठवणीतील चंद्रकळेवर

हळदीकुंकू डाग पडे

संक्रांतीचे वाण घ्यावया

पदर होतसे सहज पुढे

संक्रांतीनंतर दिवस मोठा होत जातो व रात्र छोटी होत जाते. संक्रांतीची रात्र सर्वात मोठी. त्या रात्रीला दिलेली मानवंदना म्हणजे ‘चंद्रकळा’. या साडीमध्ये रात्रीचे गगन चित्रित केले जाते.

काळी चंद्रकळा

जसे रात्रीचे गगन

घेणाराचे मन मोठे

दादारायांचे

आपल्या समाजातील वारांचे महात्म्य आपण जाणतो. प्रत्येक वाराचा एखाद्या देवतेशी असलेला संबंध किंवा वारांचा आणि उपवासांचा संबंध इत्यादी. याचप्रमाणे वारांचा नवीन वस्त्र नेसण्याशीही संबंध आहे!  कोणत्या वारी नवीन वस्त्र नेसावे, कधी नाही शिवाय त्यांची कारणे, या ओळी आपल्यास छान सांगतात.

रवी फाळी, मंगळ जाळी ।

बुध बेसा, नवं नेसा ।

गुरूशुक्र पुसू नका (कारण ते शुभच !)

शनिवारी नेसू नका

नवीन वस्त्र नेसण्याबद्दलचे काही नियमही होते. जसे, ‘सोमवारी नवीन वस्त्र धारण केल्यास ते आद्र्र होते. मंगळवारची धारण केल्यास शोककारक होते. बुधवारी धारण केल्यास ज्ञानदायक होते. शुक्रवारी धारण केल्यास प्रियसंगतिदायक होते. शनिवारी धारण केल्यास मलदायक होते. नवीन वस्त्रे धारण करण्यासाठी काही विशिष्ट नक्षत्रंही सांगितली गेली आहेत, ती म्हणजे रोहिणी, हस्त, चित्रा, स्वामी, विशाखा, अनुराधा, अश्विनी, उत्तरा, पुनर्वसू, पुष्य, रेवती, धनिष्ठा.

 

नक्षत्राबाबत आणखी एक प्रथा म्हणजे, पैठणीला हस्त नक्षत्राचे ऊन दाखविणे. हस्त नक्षत्र हे अश्विन महिन्याच्या उत्तरार्धात येते. म्हणजे तेव्हा श्रावण—भाद्रपद महिन्यातील सणासुदीचे दिवस संपलेले असतात. पैठण्या वापरून त्या काहीशा आद्र्र झालेल्या असतात. त्यांना वर्षभर तसंच ठेवण्याने वस्त्रावर बुरशी येऊ शकते. अश्विन महिन्यातील ऊन हे सौम्य असते. त्याने वस्त्राच्या रंगावरही वावगा परिणाम होत नाही. म्हणून पैठणी आणि अन्य किमती वस्त्रांना हस्त नक्षत्राचे ऊन दाखवले जाते.

सुताने चंद्राला ओवाळणे, यामध्ये जसं सुताचा संबंध येतो, तशाचप्रकारे सुताशी, तंतूंशी संबंधितही काही प्रथा आपल्या समाजात आहेत. अनंत चतुर्दशीला पूजा करून उजव्या हातात चौदा गाठींचा रेशमी गोफ बांधला जातो, त्याला ‘अनंत’ म्हटले जाते, हेच ते ‘अनंत बंधन’. तसेच गौर आणायच्या दिवशी गणपती, कुमारिका व मुंज्या मुले आठ पदरी रेशमी दोरे घेऊन त्यास आठ गाठी देतात. तर, सवाष्णी व गौरी सोळा पदरी रेशमी गोफ घेऊन त्यास सोळा गाठी देऊन त्यात आघाडा, खोबरे, दुर्वा बांधून, ते हळदीने पिवळें करून गौरींपुढे ठेवून त्याची पूजा करतात आणि मग ते धारण केले जाते.

लग्नानंतर नवपरिणित वधूने महालक्ष्मीव्रत करण्याची रीत होती. त्यातही पूजेनंतर रेशमी गोफ धारण करणे हे महत्त्वाचे असते. त्या गोफावर लग्नाला जितकी वर्षे झाली असतील तितक्या गाठी दिल्या जातात. आपल्या समाजात मूल झाल्यानंतर त्याला पहिला दागिना कशाचा केला जात असेल तर तो धाग्याचा, करगोट. रेशमी धाग्याचा करगोटा हाच बाळाचा पहिला दागिना. वस्त्राच्या देवाणघेवाणीच्याही अनेक प्रथा आपल्या समाजात रूढ आहेत. विविध प्रकारच्या रिवाजांमध्ये, विधींमध्ये किंवा प्रथांमध्ये एक प्रतीक सामान्य असते, ते म्हणजे वस्त्र! अशा अनेक प्रथांबद्दल जाणून घेऊ या पुढच्या भागात.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:15 am

Web Title: fashion designer vinay narkar article on textile tradition zws 70
Next Stories
1 कृष्णरंगातली फॅशन
2 ‘देसी’ मीम्सचा बोलबाला
3 संशोधनमात्रे : ब्राह्मी रंगी रंगला हो!
Just Now!
X