वर्षांतून दोनदा मुंबईत रंगणारा ‘लॅक्मे फॅशन वीक’ मंगळवारपासून सुरू झाला असून प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा या सोहळ्याचा शेवट करणार आहे. फॅशन वीकमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटीजमुळे या फॅशन महोत्सवाला वेगळी झगमग लाभते. यंदाही हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक तारे रॅम्पवर अवतरले. रविवारी होणाऱ्या ‘ग्रँड फिनाले’साठी मनीषची ‘शो-स्टॉपर’ म्हणून करीना कपूर-खान रॅम्पवर येणार आहे . लॅक्मे फॅशन वीकचा बिगूल मंगळवारी (दि.१९) संध्याकाळी वाजला. यंदा हा फॅशन महोत्सव – ‘विंटर फेस्टिव्हल 2014’ परळच्या पॅलेडियम हॉटेलमध्ये साजरा होत आहे. यंदाच्या फॅशन वीकचं वैशिष्टय़ म्हणजे इथे अनेक गोष्टींचा शुभारंभ होत आहे.
पहिला हेअर शो
लॅक्मे सलोनतर्फे यंदा प्रथमच फॅशन वीकदरम्यान हेअर शो होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्टायलिस्ट विनी लू आणि लिटिल शिल्पा आज संध्याकाळी हा शो सादर करणार आहेत. आतापर्यंत केवळ कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजवर लक्ष केंद्रित करणाऱ्या लॅक्मेमध्ये पहिल्यांदाच हेअर स्टाइल्सवर भर देणारा हेअर शो सादर झाला. ‘इल्युजन’, ‘मेटामोफरेसिस’ आणि ‘मुलान रुश’ या थीम्सवर आधारित या शोमध्ये हेअर स्टाइल्सचे नवीन लुक सादर केले गेले.
चार पाकिस्तानी डिझायनर्स
यंदाच्या फॅशन वीकमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानमधील फैझा सामी, रिझवान बेग, सानिया मस्कातिया आणि झारा शाहजहान हे चार पाकिस्तानी डिझायनर्स आपलं कलेक्शन सादर करत होते. त्यांच्या कलेक्शनमध्ये पाकिस्तानी संस्कृतीची झलक होतीच, पण त्याच वेळी त्यात नावीन्य, युथफुलनेससुद्धा होता.
पहिला किड्स शो
यंदा फॅशन वीकमध्ये पहिल्यांदा किड्स शो सादर करण्यात आला. या शोमध्ये मॉडर्न जगातील छोटय़ांसाठी खास कलेक्शन सादर करण्यात आले होते. हॅमलेज या जगप्रसिद्ध खेळण्यांच्या दुकानातर्फे हा फॅशन शो प्रेझेंट करण्यात आला.
दीड वर्षांनी लॅक्मे फॅशन वीकमध्ये परतलेली डिझायनर मसाबा गुप्तानं अमित अग्रवालसमवेत फॅशन वीकची सुरुवात केली. गुरुवारचा दिवस वस्त्रोद्योग मंत्रालयानं साजरा केला. फॅशन वीकमधला हा हँडलूम्स डे होता. हँडलूम फॅशनसाठी प्रसिद्ध कृष्णा मेहता, संजय गर्ग तसंच श्रुती संचेती, सौमित्र मंडल, वैशाली एस., स्वाती विजयवर्गी, हर्षिता चॅटर्जी- देशपांडे यांनी हँडलूम आणि इतर पारंपरिक विणकामामधली आधुनिक डिझाइन्स सादर केली. डिझायनर पूर्वी दोशीने आफ्रिकन पिंट्र्स आणि कच्छ एम्ब्रॉयडरी यांचा मेळ तिच्या कलेक्शनमध्ये घातला होता तर, उज्जल दुबेने माणसातील भावनिक गुंतागुंत त्याच्या कलेक्शनमधून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. डिझायनर अनाविला मिश्राने मोहेंजोदडोपासून प्रेरणा घेतलेलं वेगळं कलेक्शन सादर केलं. तर डिझायनर स्वाती विजयवर्गी व्हिएतनामच्या संस्कृतीपासून प्रेरित झाली होती.
ग्लोबल टच
भारतीय फॅशन वीकमध्ये देशाबाहेरचे डिझायनर्स आपली डिझाइन्स सादर करतात. यामध्ये प्रामुख्याने मोठे ब्रँड्स असतात. पण आपल्या डिझायनर्सनाही बाहेरच्या देशात फॅशन वीकची निमंत्रणं येत असतात. सेलिब्रिटीजमधील लाडका डिझायनर ‘रॉकी एस’ नुकताच आपल्या कलेक्शनसह हाँगकाँगला जाऊन आला. हाँगकाँग टूरिझम बोर्डतर्फे ‘हाँगकाँग फॅशन वीक’ला त्याला आमंत्रित करण्यात आलं होतं. हा मान मिळणारा तो पहिलाच भारतीय डिझायनर होता. याबद्दल बोलताना रॉकी म्हणाला, ‘या निमित्तानं तिथल्या अनेक डिझायनर्सची कलेक्शन्स पाहण्याची संधी मला मिळाली. भारताप्रमाणेच तिथल्या डिझायनर्सच्या कलेक्शन्समध्ये स्थानिक संस्कृतीचा मोठा प्रभाव दिसून येतो. त्यामध्ये त्यांची लिपी, भित्तिचित्रं यांचा समावेश मोठय़ा प्रमाणात असतो. त्यांच्या कलेक्शनमध्ये तुम्हाला िपट्र्सचा वापर जास्त दिसून येतो. फ्युचरिस्टिक फॅशनचा प्रभाव मला हाँगकाँगच्या कलेक्शन्समध्ये दिसून आला. हाँगकाँगमध्ये वस्त्रोद्योग मोठय़ा प्रमाणात आहे. जगभरातल्या अनेक नामवंत ब्रँड्सचे कपडे तिथे तयार होतात. त्यामुळे हा ‘ग्लोबल टच’ इथल्या स्थानिक फॅशनमध्येही दिसून येतो. तिथे फॅशनसोबतच आर्किटेक्चरलादेखील महत्त्व दिलं जातं. माझ्या आगामी कलेक्शनचं डिझाइन करताना हाँगकाँग भेटीचा फायदा होईल.’ रॉकी दरवेळीप्रमाणे यंदाही लॅक्मेमध्ये त्याचं कलेक्शन सादर करणार आहे. या वेळच्या डिझाईन्समध्ये त्यानं त्याचा ट्रेडमार्क असलेल्या काळ्या रंगावर भर दिला आहे. हे कलेक्शन बॉलीवूडमध्ये नेहमीप्रमाणेच लोकप्रिय होईल यात शंका नाही.    – मृणाल भगत