08 July 2020

News Flash

फॅशनमधून जनजागृती

कंडोम इज फॅशनेबल असं म्हणत कंडोमचा वापर करून बनवलेल्या कपडय़ांचा फॅशन शो नुकताच मुंबईत झाला.

| February 20, 2015 01:07 am

कंडोम इज फॅशनेबल असं म्हणत कंडोमचा वापर करून बनवलेल्या कपडय़ांचा फॅशन शो नुकताच मुंबईत झाला. सेक्स्शुअली ट्रान्समिटेड डिसिझेस कमी करण्यासाठी अवेअरनेस या दृष्टीने या वेगळ्या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे मुंबईतल्या ११ मोठय़ा फॅशन इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांनी यासाठी आपली कला पणाला लावली होती.
‘धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे. धूम्रपानाने कर्करोग होतो.’ या गरजेच्या सूचनांकडे अगदी सहजरीत्या कानाडोळा केला जातो. मग जवळच्या पानवाल्याकडून सिगारेट घेताना लोकांना काहीही वाटत नाही. इतकंच काय दारू पितानाही लोक कचरत नाहीत. मात्र जेव्हा मेडिकलमधून कंडोम घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र जिगरबाज लोक सुद्धा लाजताना आणि ओशाळताना दिसतात. हाच ऑकवर्डनेस कमी करण्यासाठी स्कोर कंडोम आयोजित फॅशनिस्टा हा भारतातील पहिला कंडोम फॅशन शो सादर करण्यात आला. या फॅशन शोमध्ये मुंबईच्या ११ फॅशन इन्स्टिटय़ूटच्या ७८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या विद्यार्थ्यांच्या ३६ टीम या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. फॅशन शोची ‘शो स्टॉपर’ होती आघाडीची मॉडेल आणि अभिनेत्री मुग्धा गोडसे. दोन लाख कंडोमचा वापर करून त्यापासून स्त्रियांचे पोषाख तयार करण्यात आले होते. एड्स आणि सेक्स्शुअली ट्रान्समिटेड डिसिझेस (एस.टी.डी.)चं प्रमाण आपल्या देशात जास्त आढळतं. याबाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. कंडोमच्या वापराने ते नक्कीच कमी होऊ  शकतं. कंडोम वापराविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि खरेदी करताना तसेच याविषयी बोलतानासुद्धा वाटणारा संकोच दूर करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. त्यासाठीच फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
फॅशन शो म्हटलं की समोर येतं ते म्हणजे क्लासी डिझाइन, रंग, ग्लॅमर हे सगळं तर या फॅशन शोमध्ये होतंच पण त्या सोबत होता एक संदेश ‘कंडोम इज फॅशनेबल!’ ब्रायडल वेअर लेहंगा, साडी, क्रॉप टॉप, वनपीस, लाँग आणि शॉर्ट स्कर्ट्स, पार्टी गाऊन, ट्राऊझर यावर कंडोमचा वेगवेगळ्या स्टाइलने वापर या यंग डिझायनर्सनी केला. ग्लासवर्क, वेगवेगळ्या डिझाइन्स, रंगीत कंडोम्स कापून केलेली कलाकुसर, मॅचिंग हेअर अ‍ॅक्सेसरीज, हॅट यासोबत रेड रिबिनचा नेकभोवती वापर अगदी समर्पकरीत्या केला होता.
आर्ची सिंहल ही डिझायनर स्पर्धक म्हणाली की, ‘आमच्यासाठी हा खूप वेगळा अनुभव होता. आता आम्हाला याविषयी बोलताना लाजिरवाणं वाटत नाही. पालकांशी आणि मित्र-मैत्रिणींशी मोकळेपणाने आम्ही बोलू लागलोय. आम्ही स्कर्ट आणि बुस्टीअर किंवा ब्लाउझ विथ पल्लू यातून आम्ही भारतीय स्त्री आणि बोल्डनेस याची सांगड घातली. यामागची संकल्पना अशी होती की जर पुरुष कंडोम घेण्यास लाजत असतील तर स्त्रियांनी स्वत: पुढे येऊन कंडोम खरेदी करून स्वत:च्या सेफ्टीसाठी त्यांना वापरायला द्यायला हवं.’
दुसरी स्पर्धक एलिझा नीजाई हिने सांगितलं, ‘या फॅशन शोमध्ये पोषाखासोबत एक संदेशसुद्धा द्यायचा होता. त्यामुळे एक जबाबदारी होती. तुम्ही प्रेमाचा अनुभव नक्कीच घ्या, पण त्यासोबत काळजी. त्याने आयुष्य सुंदर आणि सुखकर होईल, असा संदेश मी देण्याचा प्रयत्न केला.’ तरुण पिढीच्या माध्यमातून फॅशनसोबत जनजागृतीचा संदेश देण्यासाठी केलेला हा उपक्रम वेगळा आणि धाडसी म्हणायला हवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2015 1:07 am

Web Title: fashion for public awareness
Next Stories
1 संस्कृती, परंपरा आणि प्रयोग
2 रेड कार्पेटचे तारे
3 क्लिक – नितिन दधीच,
Just Now!
X