|| तेजश्री गायकवाड

कॅलेंडरमध्ये आपण काही महत्वाच्या तारखा मार्क करून ठेवतो. कारण काहीही करून आपल्याला ती तारीख किंवा त्या दिवशी असलेलं आपलं काम चुकवायचं नसतं. असंच काहीसं चित्र वर्ल्ड कप सुरु होतो तेव्हा अनेकांच्या घरात दिसतं. ज्या दिवशी भारतीय टीमची मॅच असेल तेव्हा रस्त्यावर शुकशुकाट असतो. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मॅच बघता येत नसली तरी टीव्हीवरच बघून प्रत्यक्ष मॅच बघितल्याचं सुख अनुभवलं जातं. आपल्या देशात क्रिकेट म्हणजे अति महत्वाचा खेळ आणि वर्ल्ड कप म्हणजे एक सणच असतो. या सणाच्या सेलिब्रेशनमध्ये अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच सामील असतात. त्यामुळेच की काय पण या वर्ल्ड कप सामन्यांसाठी जे केलं जातं तो एक ट्रेण्ड बनतो..

वर्ल्ड कप जरी पाच वर्षांनंतर येत असला तरी त्याची क्रेझ वर्षांनुवर्षे कायम आहे आणि असतेच. वर्ल्ड कप आणि त्याच्याशी निगडित अनेक गोष्टींबद्दल सोशल मीडिया, कॉलेज कट्टे, ऑफिस, कॉफी शॉप आणि अशा अनेक ठिकाणी  चर्चेला  उधाण आलेलं आहे. मग या चर्चेत महेंद्रसिंग धोनीने घातलेले ग्लोव्हज असोत  किंवा मग अमूक अमूक टीम भारतीय टीमला कशी हरवूच शकत नाही हे असे विषय असतात. यावेळी मात्र सामन्यांदरम्यान असलेल्या आणि त्या पलिक डच्या वादांपेक्षाही एक वेगळा विषय चर्चेत आला आहे, जो फॅ शन आणि पर्यावरण दोन्हीला जोडून घेणारा आहे. टाकाऊतून टिकाऊ किंवा रिसायकल पध्दतीने वापरले गेलेले टीशर्ट्स हे या स्पर्धेत महत्वाचे ठरले आहेत.

दर सीझननुसार वर्ल्ड कपशी निगडित अनेक नवीन गोष्टी समोर येत असतात. अशीच एक यंदाची महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीलंका या राष्ट्राने त्यांच्या क्रिकेट टीमच्या जर्सीमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. वर्ल्ड कप सुरू होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी त्यांच्या टीमच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून नवीन जर्सीच्या बदलाची घोषणा केली. श्रीलंकेच्या क्रिकेट टीमची जर्सी ही समुद्रातील साठलेल्या प्लास्टिकला रिसायकल करून बनवण्यात आली आहे. समुद्रातील वाढतं प्रदूषण हा खरंच पर्यावरणाला हानिकारक असलेला मोठा प्रश्न आहे. समुद्रातील वाढणारी घाण कमी करण्यासाठी जगभरात अनेकांचे वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने श्रीलंकेने आपल्या क्रिकेट टीमच्या जर्सीमध्ये अमूलाग्र बदल केले आहेत. या जर्सी एमएएस (टअर) होल्डींग्स यांनी डिझाईन केल्या आहेत. यासाठी वापरल्या गेलेल्या प्लास्टिकला ‘ओशन प्लास्टिक’ असं संबोधलं जातं. प्लास्टिकचा कमी वापर व्हावा आणि समुद्रातील जलजीवांना प्रदूषणापासून वाचवता यावे यासाठी हे पाऊल उचलल्याचं टीमने स्पष्ट केलं आहे.

अशाच प्रकारे २०१५ साली भारतीय क्रिकेट टीमने सुद्धा उत्तम पर्यावरणासाठी आपलं योगदान दिलं होतं. आपल्या क्रिकेट टीमच्या जर्सीचा रंग फिक्कट निळ्या रंगावरून अचानक २०१५ साली गडद निळ्या रंगाचा झाला. या बदलाचं उत्तर अजूनही अनेकांना माहिती नाही. २०१५ साली प्लास्टिक बॉटल्स रिसायकल करून आपली भारतीय जर्सी बनवली गेली होती. या जर्सीची उत्तम स्ट्रेचेबलिटी, मॉईश्चर रिटेन क्वॉलिटी ही खासियत आहे. वर्षांनुवर्षे अनेक स्तरावर खेळ खेळले जातात. अनेक स्पर्धा होतात. पण गेल्या पाच वर्षांपासून खेळांसाठी घातल्या जाणाऱ्या कपडय़ांमध्ये अर्थात स्पोर्ट वेअरमध्ये अनेक बदल झालेत. खेळाडू कोणता खेळ खेळतोय, खेळाडूंची हालचाल कोणत्या पद्धतीने होतेय, किती वेळासाठी खेळ खेळला जातोय, खेळाडू किती वेळानंतर थकू शकतो अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन आता खेळासाठी त्यांचे कपडे डिझाईन केले जातात. आधी स्पोर्ट्स वेअर म्हणजे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट असंच मानलं जायचं पण आता प्रत्येक खेळानुसार वेगवेगळया पध्दतीने त्यांचे कपडे डिझाईन केले जातात. या सगळ्या गोष्टींचा फायदा सहाजिकच खेळाडूंना होतो. आपल्या खेळानुसार कपडे घातल्यामुळे आपला खेळ उत्तम झाला, असं अनेक खेळाडू आता सांगताना दिसत आहेत. यामुळे खेळाडूची तब्येतही उत्तम राहतेय आणि त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होत आहे. क्रिकेट विश्वात अनेक गोष्टी घडत असतात काही आपल्या सहज लक्षात येतात तर काही सामन्यां पलिकडे घडणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपल्यला अनेक वर्ष क्रिकेट बघूनही माहिती नसतात. अशीच एक गोष्ट म्हणजे, प्रत्येक देश किती वेळ वर्ल्ड कप जिंकला हे ओळखता यावं म्हणून जर्सीवर असलेले स्टार..

अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे बदल किंवा काहीएक विचाराने आवर्जून केले जाणारे बदल अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी येत आहेत. वर्ल्ड कप ही अशी स्पर्धा आहे ज्याचे जगभरात अनेक चाहते आणि फॉलोअर्स प्रत्येक देशात आहेत. त्यामुळे असे सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे उपक्रम लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते आणि लोक आपल्या रोजच्या जीवनातही ते अनुसरण्याच्या दृष्टीने विचार करतात.

viva@expressindia.com