News Flash

आला खादीचा सण…

एकीकडे सुट्टय़ांचा माहोल आहे, दुसरीकडे लग्नसोहळे आणि अन्य समारंभांनाही उधाण आलं आहे.

|| गायत्री हसबनीस

एकीकडे सुट्टय़ांचा माहोल आहे, दुसरीकडे लग्नसोहळे आणि अन्य समारंभांनाही उधाण आलं आहे. यावेळी प्रत्येक प्रसंगात एथनिक, ट्रॅडिशनल, कॉलेजवेअर, ऑफिसवेअर आणि अगदी कॅज्युअल वेअरमध्येही खादीच्या कपडय़ांनी सजलेला देसी लुक पाहायला मिळतो आहे.

यूटय़ूबवर काही दिवसांपूर्वी खादीच्या कपडय़ांबरोबरच खादीच्या इतरत्र वस्तूंचा व्यापार मोठय़ा प्रमाणात वाढला आहे, असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. सामान्य तरुण-तरुणींपासून ते बडय़ा सेलेब्रिटींपर्यंत खादीच्या कपडय़ांना जोरदार मागणी आहे आणि वाढत्या मागणीसोबत खादीची प्रसिद्धीही मोठय़ा प्रमाणावर केली जाते आहे. हे सगळं कानावर पडत असलं तरी प्रत्यक्षातही सध्या खादी खरंच किती लोकप्रिय आहे याची प्रचीती बाजारात डोकावल्यावर येते आहे. एकीकडे सुट्टय़ांचा माहोल आहे, दुसरीकडे लग्नसोहळे आणि अन्य समारंभांनाही उधाण आलं आहे. यावेळी प्रत्येक प्रसंगात एथनिक, ट्रॅडिशनल, कॉलेजवेअर, ऑफिसवेअर आणि अगदी कॅज्युअल वेअरमध्येही खादीच्या कपडय़ांनी सजलेला देसी लुक पाहायला मिळतो आहे.

या मे महिन्याच्या उन्हाळ्यात खादीचा सदरा, लेहेंगा, अंगरखा, कुर्ता, जॅकेट, धोती, पॅन्ट असे प्रकार बाजारात आले आहेत. खादीचा हा ट्रेण्ड फक्त मोठय़ा शहरांमधूनच नव्हे तर सध्या देशभरातील छोटी शहरे आणि गावांमधूनही पाहायला मिळतो आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्याच्या या काळात गावागावांतही खादीच्या कपडय़ांचे सेल लावले जातात, प्रदर्शने भरवली जातात. त्यामुळे एरव्ही फक्त मेन्सवेअरमध्ये दिसणारी खादी यावेळी स्त्रियांसाठी फॅ शनच्या वेगवेगळ्या पर्यायांची नांदी ठरली आहे. खादीचे कपडे म्हटले की मुलींच्याही मनात फारतर जीन्स आणि खादीची कुर्ती किंवा क्रॉप टॉप असा तोच तोच लुक नजरेसमोर येतो. मात्र सध्या जीन्समध्येही एवढे पर्याय उपलब्ध झाले आहेत ज्यावर खादीचे वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स आजमावून कॉम्बिनेशन्स साधली जाऊ शकतात. क्लिंग आणि फेरेड जीन्स जी हल्ली जास्तीत जास्त मुलं-मुली घालतात त्यावर खादीच्या कुर्त्यांचा किंवा क्रॉप टॉपच्या स्टाईलचा मिलाफ आजमावून पाहिला जातो आहे. यंदा खादी मेड क्रॉप टॉप्समध्येही बरेच विविधांगी प्रकार आले आहेत. त्यामुळे क्रॉप टॉप्सवर जीन्सच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीच्या पॅण्ट्सचाही विचार केला जातो आहे.

क्रॉप टॉपमध्ये हाय कॉलर क्रॉप टॉप आहे ज्याखाली खादीचा प्लिटेड स्कर्ट किंवा प्लिटेड पॅन्ट मॅच होते. यामध्ये मोनोक्रोमचे कॉम्बिनेशनही करता येते. उदाहरणार्थ, क्रॉप टॉपचा रंग फिकट गुलाबी, केशरी, निळा, पांढरा असेल तर पॅन्टचा रंग अनुक्रमे ब्राऊन, राखाडी, मरून आणि काळा असा असावा. ओव्हरलॅप क्रॉप टॉप तर सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. यात तुम्हाला जास्तकरून डाय केलेले रंग मिळतील. म्हणजेच गडद रंगांचे ओव्हरलॅप क्रॉप टॉप, यात प्रामुख्याने डार्क चॉकलेट, मरून, ग्रीन, यल्लो या रंगांचा समावेश आहे. या ओव्हरलॅप क्रॉप टॉपला साईडला लेसिंग आणि गळ्याभोवती व्ही शेपचं डिझाइन असेल तर उत्तम. यात तुम्हाला कम्फर्टही मिळेल आणि लुकही. ओव्हरलॅप क्रॉप टॉपखाली लाइट रंगातील हाय वेस्ट पलाझो पॅन्ट योग्य ठरेल. याऊलट स्ट्राईप आणि लेस ट्रििमग असलेल्या खादी क्रॉप टॉपमध्ये फिकट रंग आणि पांढरा रंग विशेष करून पाहायला मिळतो. पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉप्समध्ये चिकनकारी वर्कही आहे. या स्ट्राईप क्रॉप टॉपखाली डार्क किंवा थोडय़ा मळकट रंगाच्या शेड्समध्ये म्हणजे मडी ग्रीन, सॉईल ब्राऊन किंवा अगदी नॅचरल रंगात म्हणजे ऑलिव्ह ग्रीनमधील ड्रॉस्ट्रींग खादी पॅन्ट घालता येऊ शकते.

अगदी कम्प्लीट लूक हवा असेल तर कॅज्युअल वेअरमध्ये बरेच प्रकार आहेत. बॉगी क्लाफ लेन्थ पॅन्ट्सवर टास्सेल खादी टॉप असा लुक विचारात घेऊ  शकता. याशिवाय धोती पॅन्ट आणि टी – शर्ट व त्यावर जॅकेट असाही लुक मिळेल. या लुकसाठी शक्यतो एकाच रंगाच्या शेड्सचा विचार करता येईल. म्हणजे धोती पॅन्ट गडद लाल रंगाची असेल तर त्यावर फिकट लाल टी शर्ट जाईल. याव्यतिरिक्त गडद हिरव्या फॉरेस्ट रंगांच्या धोती पॅन्टवर पिस्ता कलरचा टी शर्ट मॅच करता येईल. जॅकेट्स हे धोती पॅन्टवर जास्त उठून दिसतात. त्यामुळे एकाच रंगाच्या शेड्सच्या पूर्ण लुकवर जॅकेट निवडताना ते मेगा कॉलर आणि स्लिवलेस निवडा. जॅकेट्समध्येही पोलका डोट्स, डॉग फूटप्रिंट, मिलिटरी, पांडा प्रिंट असे नानाविध स्टाईलिश पर्याय उपलब्ध आहेत.

खादीचे ऑफ शोल्डर टॉप्सही ट्रेण्डमध्ये आहेत. या टॉप्सला विविध प्रकारच्या एम्ब्रॉयडरी आणि एम्बलिशमेंटची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे या टॉप्सवर टास्सेल, लेस, हँगिंग्ज असतेच आणि असे शोल्डर टॉप्स हे एथनिक वेअरबेल आहेत. लॉन्ग खादी स्कर्ट्स आणि त्यावर ऑफ शोल्डर टॉप हा एक परफेक्ट लुक आहे. लॉन्ग खादी स्कर्टमध्ये देखील यंदा प्लिटेड स्कर्ट्सच जास्त ट्रेण्डी आहेत. त्यावर जूट हॅगिंग, कॉटन लटकन, बिडेड लेस, कापडी टास्सेल आहेत. ऑफ शोल्डर टॉपसोबत लॉन्ग स्कर्ट डार्क पण वेगवेगळ्या रंगांचे ठेवून पूर्ण लुक कॅरी करता येईल. उदाहरणार्थ, डार्क मरून खादी स्कर्टवर डार्क नाइट कलरचा ऑफ शोल्डर टॉप ट्राय करू शकता. यात पर्पल/ व्हॉयलेट ऑफ शॉल्डर टॉपवर वाईन किंवा बरंगडी लॉन्ग खादी स्कर्ट जाऊ  शकतो. धोती स्कर्टचाही एक वेगळा पर्याय हवा असेल तर धोती स्कर्टवर कॉलर असलेला क्रॉप टॉप ट्राय के ल्यास वेगळा लुक मिळेल.

ट्रॅडिशनल किंवा एथनिक लुकसाठी खादी हा सध्या सर्वोत्तम पर्याय ठरतो आहे. यात अंगरखे ट्रेण्डमध्ये आहेत. लॉन्ग स्कर्टव्यतिरिक्त जर एक टू इन वन लुक हवा असेल तर खादीचे अंगरखे नक्कीच विविध प्रकारचे आहेत. यामध्ये फूड हॅन्ड आणि सिमेट्रिकल, एसिमेट्रिक असे अंगरखे मिळतील. या अंगरख्याखाली कॉटनच्या टाईट्स, केप्रीज किंवा थ्री फोर्थ पॅन्ट्स योग्य ठरतील. मल्टि एम्ब्रॉयडरीचा एक नवा लुक ट्रेण्डमध्ये आहे. पोन्चो टॉप हे खादीचे आणि आकाराने ओव्हरसाईज्ड असे टॉप्सही आहेत. ज्यावर सेमी सर्कल एम्बलिशमेंट आणि मल्टिपल कलर्ससह हेवी एम्ब्रॉयडरी आहे. याखाली तुम्ही शॉर्ट्सही घालू शकता. समर सीझनचा एक परफेक्ट एथनिक लुक म्हणता येईल. पार्टीवेअरसाठी खादीचे रफल्स, झिपर्स, टाय अ‍ॅण्ड डाय, प्रिन्टेड आणि किमोनो टॉप्स आहेत. खादी कपडय़ांवर अ‍ॅक्सेसरिजमध्ये नेकलेस, मेटल थिक इअररिंग्ज, कापडी कानातले, गळयातले, ओव्हरसाईज्ड लूप्स, शोल्डर बॅग्ज आणि फुटवेअरमध्ये कोल्हापुरी चप्पल, जूती किंवा स्निकर्स आणि लोफर्स घालू शकता.

खादी ड्रेसेस आणि दुपट्टेही यंदा वेगळ्या धाटणीचे आहेत. दुपट्टय़ामध्ये हॅण्डमेड आणि हॅण्डक्राफ्टेड फॅक्टर जास्त पाहायला मिळेल. यात जरीचे, हॅण्ड एम्ब्रॉयडरीचे, सिल्क खादीचे, रेशमाचे आणि विणलेल्या/ हॅण्डस्टिच पद्धतीचे पारंपरिक हेवी एम्ब्रॉयडरीचे दुपट्टे आहेत आणि त्यावर गोलाकार, आयताकार आणि त्रिकोणी अशी डिझाइन्स आहेत. खादी सिल्क दुपट्टय़ात लाईनर, मल्टिकलर, मोझॅक, पॉमपॉम पद्धतीचे पारंपरिक वर्क आहे. खादी ड्रेसेस हे आधुनिक पद्धतीच्या स्टाईल्समध्ये दिसतील ज्याला पॉकेट्स, कॉलर आणि बाहेरच्या पॅटर्नवर खिसे असतील. यामध्ये बऱ्यापैंकी बटण्स आणि बेल्ट्सची फॅशनही आहे.

सध्या समर सीझनला आधूनिक आणि अ‍ॅस्थेटिक लुकची गरज असल्याने ओव्हरसाईज्ड आणि हेवी एम्ब्रॉयडरी टॉप असेल तर लूझ आणि लाइट वेट पॅन्ट असा फंडा वापरला जातो आहे जेणेकरून अ‍ॅस्थेटिक लुकही मिळतो आणि कम्फर्टेबल लुकही. चोकर आणि नेकलाईन टॉप्स व त्याखाली शॉर्ट स्कर्ट असाही लुक लक्ष वेधून घेतो आहे. हे सगळं खादीमध्ये मिळत असल्याने गरजेनुसार खादीची मागणी जोरात वाढली आहे आणि त्यामुळेच यंदाच्या वर्षी समर सीझनला आधुनिक पण स्किन फ्रेंडली खादीला मोठय़ा प्रमाणात प्राधान्य मिळते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 12:09 am

Web Title: fashion in khadi garments
Next Stories
1 अभिनेत्रींना साडी नेसवण्याचे आगळेवेगळे करिअर
2 मोबाइल डेटाचं अर्थकारण
3 सुरुची आडारकर
Just Now!
X