vv19हाय मृण्मयी,
मी २२ वर्षांची विद्यार्थिनी आहे. माझं वजन ४७ किलो आणि उंची ५.४ फूट आहे. मी इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षांला आहे. मला ड्रेस कोड कसा असावा याबद्दल सांगा. मी सहसा जीन्स वापरते. सलवार सूट आणि कुर्तीबद्दल मला सल्ला द्या.
आम्रपाली.

प्रिय आम्रपाली,
तू दिलेल्या वर्णनावरून तू बरीच बारीक आहेस असं वाटतं. त्यामुळे खरं तर तू काहीही घालू शकते. कुठलीही फॅशन तुला सूट होईल. हे घातलं तर मी वाईट तर नाही ना fashion-passionदिसणार, यात मी जाड दिसणार नाही ना.. अशा मुलींना असणाऱ्या टिपीकल शंका तुला पडायचं कारण नाही. त्यातून तू सध्या कॉलेजला आहेस. एकदा कॉलेज शिक्षण सोडलं की, ऑफिसला जाताना फॅशन करण्यासाठी फारसे पर्याय नसतात. त्यामुळे माझ्या मते, तू कॉलेजलाइफ मस्त एन्जॉय करावंस. कपडय़ांमध्ये, फॅशनमध्ये प्रयोग करण्याचे हेच दिवस आहेत. अर्थात हे माझं मत झालं.

लेटेस्ट ट्रेण्डनुसार ड्रेसिंग असलं पाहिजे, हे तर खरं. तुला एखादी विशिष्ट स्टाइल आवडत असेल तर त्यातला लेटेस्ट ट्रेण्ड कोणता हे बघून तो प्रयोग करून बघ. सध्या कुठला ट्रेण्ड सुरू आहे, हे तुझ्या आसपासच्या मुलींकडे बघूनही तुला समजेल. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींची फॅशनच तर लेटेस्ट असते. तुला कुर्तीबद्दल जाणून घ्यायचंय. तुझ्या आसपास वावरणाऱ्या मुलींकडे बघून तुला कुर्तीच्या लेटेस्ट ट्रेण्ड्सचा अंदाज येईल. दर पंधरा दिवसाला किंवा महिन्याला हे ट्रेण्ड बदलू शकतात. त्यामुळे त्याबाबत जागरूक असलं पाहिजे. आऊटडेटेड फॅशनचे कपडे वापरू नकोस.

तू नेहमी जीन्स वापरतेस असं लिहिलं आहेस. त्यावर कसे टॉप्स वापरायचे ते तुला वेगळं सांगायला नको. तू सुयोग्य टॉप्सच वापरत असणार असं मी गृहीत धरते. आता तुझ्या प्रश्नानुसार इंडियन स्टाइलच्या ड्रेसिंगबद्दल बोलू या. तुला सलवार-कमीझबद्दल जाणून घ्यायचंय. माझ्या मताप्रमाणे जर टिपीकल सलवार-कमीझ वापरले तर त्यात नक्कीच निस्तेज दिसायला होईल. सलवार-कमीझच्या वेगवेगळ्या स्टाइल्स वापरल्यास तर वैविध्य येईल. इन- कट असलेली कुर्ती वापरून बघ किंवा स्पगेटी स्ट्रॅपवाला कुर्ता घे. यामुळे नेहमीच्या पंजाबी ड्रेसला नवी स्टाइल येईल आणि स्टाइलिश दिसशील. पण याचं फिटिंग योग्य असायला हवं. टय़ुनिक्स वापरता येतील. टिपीकल सलवार ऐवजी टय़ुनिक्सबरोबर धोती पॅण्ट वापरून बघ. पटियाला पॅण्ट किंवा हॅरम पॅण्ट्सदेखील तुला चांगल्या दिसतील. कुर्ती आणि लेगिंग्ज तुला आवडतात का? आवडत असतील तर लेटेस्ट स्टाइलच्या कुर्ती प्रिंटेड लेगिंग्जबरोबर वापरून बघ. लेगिंग्ज प्रिंटेड असतील तर कुर्ती शक्यतो प्लेनच हवी. टय़ुनिक्सची फॅशन खरं तर चांगली आहे. टय़ुनिक्स म्हणजे लाँग टॉपच असतात. वेस्टर्न स्टाइलचे हे टॉप्स जीन्सवरदेखील घालता येतात. त्यामुळे शॉर्ट टॉप किंवा शर्ट/टी-शर्ट घालायच्या ऐवजी टय़ुनिक्स जीन्सबरोबर वापरायला हरकत नाही. साध्या डिझाइननंदेखील स्मार्ट लुक येतो. लोअर्स – म्हणजे लेगिंग्ज, सलवार किंवा जीन्स प्लेन असेल तर प्रिंटेड टय़ुनिक वापरायला हवं. डिजिटल प्रिंट, जॉमेट्रिक प्रिंट, अ‍ॅबस्ट्रॅक्ट स्टाइल, पौराणिक चित्रे अशा वेगळ्या प्रिंट्स कुर्त्यांवर आणायचा सध्या ट्रेण्ड आहे. बहुतेक सगळ्या शॉपिंग सेंटरमध्ये अशा टय़ुनिक्स दिसतात.

कापडाबद्दल विचारशील तर जॉर्जेट, शिफॉन अजूनही सगळ्या वयोगटातल्या स्त्रियांना आकर्षित करताहेत. तू बारीक आहेस त्यामुळे निटेड टय़ुनिक्ससुद्धा वापरू शकतेस. असिमेट्रिक पॅटर्न मध्यंतरी लोकप्रिय झाला होता. त्या स्टाइलचं ड्रेसिंगही करता येईल. अनारकली ड्रेसची फॅशनसुद्धा अजून गेलेली नाही. पण रेग्युलर वेअर म्हणून अनारकली वापरण्याचा सल्ला मी देणार नाही. ऑकेजनल वेअर म्हणून अनारकली कट चांगला दिसतो. तू तुझ्या वर्णाबद्दल सांगितलं नाहीस. पण फॅशनमधले चलतीतले रंग कोणते ते आधी बघ आणि त्यातला आपल्याला कोणता सूट होईल ते ठरव. फॅशन-पॅशन या सदरात पूर्वी आलेले लेख बघितलेस तरी रंगांचा अंदाज येईल.
नवीन वर्षांच्या तुला शुभेच्छा!

तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com
(छायाचित्र सौजन्य – हायपरसिटी)