|| स्वप्निल घंगाळे

इंग्लंडमध्ये आयोजित क्रिकेट विश्वचषकात पावसाबरोबरच चर्चा आहे ती खेळाडूंच्या फॅशनची. पूर्वी खेळाकडे केवळ एक खेळ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या क्रिकेटला आता ग्लॅमरस लूक आला आहे. केवळ खेळावर लक्ष्य केंद्रीत करण्याचे दिवस मागे राहिले असून आता खेळाडू त्यांच्या लूक्सचीही बरीच काळजी घेताना दिसत आहेत. अगदी हेअरस्टाइलपासून ते टॅटूपर्यंत अनेक गोष्टी क्रिकेटपटू फॅ शनेबल झाले आहेत याची झलक दाखवून देतात.

नेट्समध्ये प्रॅक्टीस करताना असो किंवा मैदानावर सामना सुरु असताना असो सध्या परदेशी खेळाडूंबरोबरच भारतीय खेळाडूंनी काढलेले टॅटूजही प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहेत. तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या खेळाडूंचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळेच अगदी हेअरस्टाइलपासून ते टॅटूज काढण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला शक्य त्याप्रकारे फॉलो करत असतात. यात अगदी टॅटू काढून घेण्यापासून बाजूला छोटे आणि मध्यभागी मोठे असे ‘मोहॉक’ स्टाइलच्या हेअरकटपर्यंत अनेक गोष्टींचा चाहत्यांवर प्रभाव दिसून येतो.

‘गोंदवणे अ‍ॅण्ड ऑल किती विचित्र आहे हे ..’ अशा एकेकाळी कमेन्ट करणाऱ्या तरुणाईला आज टॅटू काढून घेणे कूल वाटू लागले आहे. मात्र ज्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूने काढून घेतलेल्या टॅटूला काहीतरी महत्व आहे तसेच काहीसे तरुणाईचे आहे. म्हणजे आपल्या आवडत्या खेळाडूची सरळ कॉपी करण्यापेक्षा टॅटूमधून व्यक्त होण्याला तरुणाई जास्त प्राधान्य देते आहे. परदेशात मागील अनेक दशकांपासून असणारे टॅटूचे ‘फॅड’ भारतामध्ये मागील दशकभरापासून लोकप्रिय झाले आहे. सुरवातीपासूनच पालकांना टॅटू म्हणजे अंगावर काहीतरी चित्रविचित्र आकार काढून घेणे असे वाटत असले तरी टॅटू काढून घेणाऱ्या प्रत्येकाला त्या चित्रातून काहीतरी सांगायचे असते. अगदी स्वत:च्या स्वभावापासून ते आई वडिलांवर असणाऱ्या प्रेमाबद्दल किंवा एखाद्या स्फूर्तीदायक शब्दापासून ते कोट्सपर्यंत अनेक प्रकारचे टॅटू तरुणाईला व्यक्त होण्यास मदत करत आहेत. हे टॅटू काढून घेण्यामागे अनेक कारणे असतात. प्रोत्साहन मिळवण्यासाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी, स्वत:च्या ध्येयाबद्दल जागरुक राहण्यासाठी, कोणाच्या तरी आठवणीत किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी इतरांप्रमाणेच हे खेळाडूही टॅटू काढून घेतात.

खेळाडूंचे टॅटू फंडे

अनेक क्रिकेटर्सच्या अंगाखांद्यावर टॅटूच टॅटू दिसत असले तरी प्रत्येक टॅटूमागे काहीतरी कारण आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या डाव्या खांद्यावरील समुराय योद्धय़ाचा टॅटू त्याला शिस्त, कौशल्य आणि आपल्या खेळाप्रति अभिमानी असण्यास मदत करतो. उजव्या हातावर स्वत:चे झोडियाक साइन असणारा विंचू आहे. तर मनगटाच्या उलट बाजूला चायनिजमध्ये फेथ (विश्वास) असे लिहीले आहे. डाव्या खांद्यावरील समुराय योद्धय़ाचा टॅटू आपल्याला नेहमीच शिस्त आणि आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतो, असं कोहली म्हणतो. हार्दीक पांडय़ाने आपल्या लाडक्या कुत्र्यांसाठी मानेवर उजव्या बाजूला कुत्र्यांच्या पावलांच्या ठशांचा टॅटू काढला आहे. भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याच्या शरीरावर अनेक टॅटू आहेत. मी जेव्हा निराश होतो तेव्हा माझे टॅटू बघतो, असं चहलने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. हार्दिक पांडय़ाच्या शरीरावर सात ते आठ टॅटू आहेत. यामध्ये हातावर असलेला बिलिव्ह, डाव्या खांद्यावरील वाघ, उजव्या हातावरील नेव्हर गिव्ह अप, लिव्ह टू सक्सीड ऑर डाय ट्राइंग, मानेवरील पंजाचा टॅटू, मानेवर डाव्या बाजूला काढलेले शांततेचे चिन्ह अशा अनेक टॅटूंचा समावेश आहे.  हार्दिकप्रमाणेच पाकिस्तान विरुद्धच्या समान्यात चमकलेल्या के. एल. राहुलच्या अंगावरही पाच ते सात टॅटू आहेत. यामध्ये अगदी त्याचा लाडका कुत्रा सिम्बापासून ते डाव्या हाताच्या दंडावर काढलेले घडय़ाळ असे अनेक टॅटू आहेत. हे सर्व टॅटू राहुलच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असून त्यापासून त्याला प्रेरणा मिळते, असं तो सांगतो. भारताचा सलामीवीर शिखर धवनही टॅटूचा मोठा चाहता आहे. त्याच्या अंगावरही पाचहून अधिक टॅटू आहेत. त्याच्या खांद्यावरील टॅटू हा महाभारता संदर्भात आहे तर काही टॅटू ट्रायबल डिझाइन प्रकारातील आहेत. डाव्या पायावर पक्षाचा टॅटू आहे तर डाव्या हातावर त्याने पत्नीच्या नावाचा टॅटू काढला आहे. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीलाही टॅटूची तितकीच आवड आहे. भारतीय संघ्याच्या फॅ शनबद्दल बोलताना रविंद्र जडेजाला वगळून चालणार नाही. ‘इन आणि आऊट ऑफ मैदान देसी फॅशन’चा चेहरा म्हणजे जडेजा. जडेजाने आपल्या उजव्या हातावर जड्डू हे टोपणनाव लिहून घेतले असून मला माझे टोपणनाव आवडत असल्याने ते कोरल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे.

खेळाडूंच्या शरीरावरील टॅटू हे त्यांच्या खाजगी आयुष्याशी निगडीत आहेत. अशाच प्रकारे तरुणाई टॅटू काढून घेताना एखाद्या खेळाडूला सरसकट फॉलो करण्याऐवजी त्यामधून व्यक्त होण्याचा प्रयत्न करताना दिसते. खेळाडूंनी सुरू केलेला ट्रेण्ड तरूणाई फॉलो करताना दिसते आहे. कोणी आईवडिलांचे नाव, एखादे वाक्य, गुलाबाचे फूल, देवाचे चित्र किंवा चिन्ह, लव्हबर्ड, एखादा संदेश यासारख्या चित्राच्या माध्यमातून स्वत:बद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

‘बाल’ की बात

भारतीय खेळाडूंना ‘मोहॉक’ पद्धतीची हेअरस्टाइल खूपच भावली आहे. संघातील अनेक खेळाडूंनी हीच हेअर स्टाइल ठेवली आहे. ‘मोहॉक’च्या मूळ हेअरस्टाइलला आपला पर्सनल टच देत खेळाडू त्यात थोडा बदल करताना दिसतात. ‘मोहॉक’मध्ये कानाच्यावरील केस अगदी झिरो साईज करून मध्यभागी मोठे केस ठेवले जातात. अशा हेअरस्टाइलमुळे खेळताना अधिक कम्फर्टेबल वाटते. क्रिकेटर्सच्या हेअरस्टाइलपासून ते टॅटूपर्यंत सर्वच फॅ शनतरुणाई फॉलो करत असल्याने ही हेअरस्टाईलही तरुणाईत ट्रेण्ड झाली असली तरी एकाअर्थी आता ‘मोहॉक’ ही खूप कॉमन हेअरस्टाइल झाली आहे.

काही वर्षांपूर्वी केवळ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या हेअरस्टाइलची चर्चा असायची. मात्र आता सर्वच संघातील खेळाडू भन्नाट हेअरस्टाइल करुन मैदनात उतरताना दिसतात. धोनी, डेल स्टेन, ख्रिस गेल, रविंद्र जडेजा यासारख्या खेळाडूंच्या सोप्या पण हटके दिसणाऱ्या हेअरस्टाइल्सही तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू कायमच त्यांच्या ऑफ बिट हेअरस्टाइलसाठी चर्चेत राहिले आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून अंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच आयपीएल वगैरेसारख्या स्पर्धांमधून भारतीय खेळाडूंनीही ‘डोक्यावर’ प्रयोग करण्यास सुरुवात केली असून या माध्यमातून स्वत:ला फॅ शनच्या बाबतीत अप टू डेट ठेवण्यात त्यांना चांगलेच यश आले आहे.

‘मोहॉक’ची मोहिनी

तरूणाई क्रिकेटर्सच्या या हेअरस्टाइल्स सरसकट फॉलो करत नाही. या हेअरस्टाइल्स फॉलो करण्यामागे त्यांची स्वत:ची अशी काही कारणेही आहेत. घाम कमी येणे, उन्हाळ्यात डोक्यावरील केसाचे ओझे कमी होणे यासारखी अनेक कारणांमुळे तरुणाई ‘मोहॉक’ या मोहक हेअरस्टाइलच्या प्रेमात पडली आहे. तसेच दोन्ही बाजूचे केस बारीक केल्याने पुढील दीड-दोन महिने केसांना पुन्हा कात्री लावण्याची गरज रहात नाही. त्यामुळे अनेकांचे पॉकेटमनीचे पैसेही वाचतात. तसंच बारीक केस असल्यावर श्ॉम्पू, कंडिशनर आणि जेलवरील खर्चही कमी होतो. तसेच हा लूक दाढी असणाऱ्यांच्या रफ लूकबरोबर दाढी नसणाऱ्यांच्या लूक्सलाही ही हेअरस्टाइल अगदी छान शोभून दिसते. ही सेमी फॉर्मल प्रकारातली हेअरस्टाइल असल्याने ती फॉर्मल कॅज्यूअल दोन्ही प्रकारच्या कार्यक्रम आणि कपडय़ावर शोभून दिसतो.

खेळाडूंच्या नावानेच नाव

फूटबॉलपटूंपासून क्रिकेटर्सपर्यंत अनेकजण फॉलो करत असणाऱ्या हेअरस्टाइल्सला औपचारीक नावे असली तरी क्रिकेट वेडय़ांनी या हेअरस्टाइल्सचे खेळाडूंच्या नावानेच बारसे केले आहे. धोनी हेअरस्टाइल (अल्ट्रा मोहॉक), कोहली हेअरस्टाइल (मोहॉक), मलिंग हेअरस्टाइल (अ‍ॅफरो), गेल हेअरस्टाइल (क्रोनरोज),  स्टेन हेअरस्टाइल (कॉम्बो कव्हर तसेच पॉम्पॉडोर) याबरोबरच पोनीमोहॉक, वेल लीग अशा हेअरस्टाइल्सही तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. हेअर स्टाइलबरोबरच दाढी मिशा ठेवतानाही तरुण आवडत्या क्रिकेटपटूंना फॉलो करताना दिसत आहेत.

टॅटूचे लोकप्रिय प्रकार

खेळाशी संबंधीत टॅटू, कलाकारांनी काढलेले टॅटू, ट्रायबल डिझाइन, कोट्स, धार्मिक श्रद्धेशी संबंधीत, फुले, फुलपाखरे, मासे, प्राण्यांच्या आकृत्या, देवनागरीत लिहिलेले संदेश, प्रिय व्यक्तींची नावे, प्रेमासंदर्भातील टॅटू.