|| विनय नारकर, तेजश्री गायकवाड

आपल्याकडे प्राचीन, समृद्ध अशी वस्त्रपरंपरा आहे, ज्याचे प्रतिबिंब आजही केवळ देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय फॅशनमध्येही उमटते आहे. भारतीय वस्त्रपरंपरा सातासमुद्रापार पोहोचवण्यात भारतीय फॅशन डिझायनर्सचा मोठा वाटा आहे. डिझायनर्सच्या प्रयत्नांमुळे भारतीय फॅशनला एक मोठी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध झाली असली तरीही ‘मेड इन इंडिया’चा हा ठसा पूर्णपणे जगावर उमटलेला नाही..

भारतीय वस्त्रे एकेकाळी जगातील अनेक भागांत वापरली जायची. भारतातील समृद्ध वस्त्रपरंपरेचे जगभर आकर्षण होते. भारताच्या अर्थकारणात येथील वस्त्र व्यापाराचा मोठाच वाटा होता. भारतीय वस्त्रपरंपरांच्या जगभरातील लोकप्रियतेच्या अनेक रम्य आणि सुरस कथा आहेत.

कालांतराने, औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंडमध्ये मोठय़ा प्रमाणात कापड गिरण्या सुरू झाल्या. त्या गिरण्यांमधून होणारे प्रचंड कापड उत्पादन खपवण्यासाठी इंग्लंडने आपली वसाहत असणाऱ्या भारतातील अद्वितीय अशा वस्त्रपरंपरांचे खच्चीकरण सुरू केले. इंग्रजांनी पद्धतशीरपणे भारतातील वस्त्र-व्यापार मोडकळीस आणला. भारतातील वस्त्रपरंपरा कित्येक वर्षे अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. जागतिकीकरणानंतर, म्हणजे इतक्या वर्षांनी भारतीय वस्त्रपरंपरांना जागतिक बाजारात मिरवण्याची स्वप्ने पडू लागली.

जसजशी बाजारपेठ खुली होत गेली, तसतसा अनेक भारतीय गोष्टींबद्दल जगात आकर्षण वाढत गेलं. भारतीय गोष्टी अचानक ‘हॅपनिंग’ व्हायला लागल्या. हिंदी चित्रपटांचाही त्यात महत्त्वाचा वाटा आहे. खुल्या बाजारपेठेमुळे भारतातील इतर व्यवसायांप्रमाणे फॅशन क्षेत्रातही सर्व प्रकारची देवणघेवाण जागतिक स्तरावर सुरू झाली. भारतातील वस्त्रपरंपरांप्रमाणेच, पोषाखांमध्येही प्रचंड वैविध्य आहे. भारतीय डिझायनर्सनी इथल्या वस्त्रपरंपरा आणि पोषाखांमध्ये प्रयोग करून त्यामध्ये पाश्चात्त्य शैली आणण्याचे प्रयोग सुरू केले. अशा प्रयोगांना भारतात आणि जागतिक बाजारपेठेतही उत्तम मागणी येऊ  लागली.

भारतीय डिझायनर्सचा आत्मविश्वास वाढू लागला. ते अधिक उत्साहाने काम करू लागले. सन २००४ मध्ये सब्यासाची मुखर्जी या डिझायनरला ‘मिलान फॅशन वीक’ या प्रतिष्ठित फॅशनसोहळ्याचे आमंत्रण आले. भारतीय डिझायनरनी अशा आंतरराष्ट्रीय इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती.

भारतात भरतकामाचेही प्रचंड प्रकार देशाच्या वेगवेगळ्या भागांत पाहायला मिळतात. डिझायनर्स आणि विविध खासगी संस्थांनी या प्रकारांमध्येही प्रयोग सुरू केले. या पारंपरिक कलाकुसरींना आधुनिक स्पर्श देऊन त्यांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून दिले. हे प्रयोग फक्त पोषाखांपुरते मर्यादित न ठेवता, फर्निचर, बॅग्ज, शूज, घरगुती वापराच्या व प्रसाधनाच्या अनेक वस्तू यांमध्येही हे प्रयोग करण्यात आले. त्यामुळे या वस्तू बनवणाऱ्या कारगिरांना नियमित काम व योग्य सन्मानही मिळाला. काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात त्यांच्या शाखा सुरू करून भारतीय वस्त्रकौशल्यांच्या रचनेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा कसा आणता येईल, यावर काम सुरू केले आणि त्यांना नवीन स्वरूप देऊन त्या कारागिरांना उत्तम मोबदलाही ते देत आहेत. या प्रकारेच भारतात विणल्या जाणाऱ्या अनेक प्रकारचे गालिचे व जाजम हेही निर्यातक्षम बनविले जात आहे. मात्र, त्या प्रमाणात भारतीय कं पन्या परदेशात जाऊन आपले ब्रॅण्ड तिथे प्रस्थापित करण्यात मोठय़ा प्रमाणावर यशस्वी ठरल्या आहेत, असे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरेल.

सब्यासाची मुखर्जीप्रमाणे फॅशनडिझायनर रॉकी एस. यानेही भारतीय फॅशनला त्याच्या ‘रॉकी स्टार’ या लेबलअंतर्गत पॅरिस, मिलान, लंडन अशा मानाच्या फॅशनवीकमध्ये सहभागी होत भारताचे नाव मोठे केले आहे. ‘मला भारताला जागतिक फॅशन नकाशावर ठेवायचे होते, खूप मोठे होताना बघायचे होते. आणि त्यासाठीच मी काम करतोय,’ असे रॉकी ठामपणे म्हणतो. युनायटेड स्टेटच्या ‘प्रोजेक्ट रनवे’ या रिअ‍ॅलिटी शोने मराठमोळ्या स्वप्निल शिंदे या डिझायनरला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली. तिथेही त्याने भारतीय टेक्स्टाइल आणि फॅशनला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या गोष्टीला मिशन २०२०च्या उंबरठय़ावर असताना अगदी वरच्या क्रमांकावर जागा आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण अजय कुमारसारख्या डिझायनरला नुकताच ‘बेस्ट डिझायनर ऑफ द इअर’ हा अवॉर्ड चीनमध्ये मिळाला. तर ‘व्होग’सारख्या नियतकालिकाद्वारे होणाऱ्या ‘द व्होग वेडिंग शो ‘इव्हेंटमध्ये मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, राहुल मिश्रा, शंतनू आणि निखिल, तरुण तहिलानी, फाल्गुनी शेख पिकॉकसारखे असे एक ना अनेक डिझायनर आपले कलेक्शन सादर करताना दिसतात. भारतीय फॅशन डिझायनर्स आणि त्यांच्या ब्रॅण्ड्सनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवली आहे, पण येत्या काळात भारतीय फॅशन तिथे लोकप्रिय करणे हे मोठे उद्दिष्ट असेल!

आग्रह मेड इन इंडियाचा!

फॅशन डिझायनर म्हणून मी जेव्हा वीस-पंचवीस वर्षांपूर्वी सुरुवात केली होती तेव्हा देशभरात आम्ही मोजून दहाच फॅशन डिझायनर्स होतो.भानू अथय्या ते विक्रम फडणीस अशी दहा निवडक डिझायनर्सची यादी होती. आमच्यातच सगळे अर्थकारण फिरायचे, कारण पर्यायच नव्हता. त्या वेळी फॅशन डिझायनर्सना ओळख नव्हती, त्यांना आदर मिळत नव्हता. त्यातही पुरुष डिझायनर्सना हा मुलींचा जॉब आहे, तुम्ही काय करता आहात?, असे विचारले जायचे. हे पुरुषांनी करायचे कामच नाही, अशी ठाम धारणा होती. मात्र आज चित्र कमालीचे बदललेले आहे. डिझायनर्सनी आपल्या कामातून भारतीय फॅशन विश्वाला एक ओळख मिळवून दिली आहे. भारतीय फॅशन, एम्ब्रॉयडरी आज जगभर पोहोचली आहे. आम्ही त्या वेळी डिझायनर म्हणून आपलं पारंपरिक नक्षीकाम, पोषाख आमच्या कलेक्शनमधून ठेवायचा कायम प्रयत्न केला. आज आंतरराष्ट्रीय डिझायनर्स कपडय़ांसाठी, एम्ब्रॉयडरी वर्कसाठी तिरुपूरला येतात. बंगळूरु, चेन्नई, रायपूर इथे येतात. पण, तरीही आपण प्रस्थापित नाही, कारण आपल्याकडे ‘मेड इन इंडिया’ हा टॅग मिरवायची लाज वाटते. आज ‘झारा’सारखा ब्रॅण्ड आहे जो ‘मेड इन इंडिया’, ‘मेड इन श्रीलंका’, ‘मेड इन जपान’.. जिथे जिथे पोहोचतो तिथली स्थानिक संस्कृती पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तेव्हा ‘मेड इन इंडिया’ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी प्रयत्न केले आहेत, मात्र आता हा मेड इन इंडियाचा आग्रह धरला जात नाही. आपली फॅशन जगभरात प्रस्थापित करायची असेल तर देशाभिमान तुमच्या कामातही उतरलाच पाहिजे. त्या वेळी इन्स्टाग्राम, फेसबुक काही नव्हते, पण डिझायनर्सनी भारतीय कलेक्शन बोलून-बोलून प्रसार करत जगभर पोहोचवले. आता सगळीकडे केवळ मिरवण्यापुरती समाजमाध्यमांचा वापर केला जातो. आज जो आपण एअरपोर्ट लुक, जिम लुक अशा फसव्या संकल्पनांचा आधार घेत फॅशन करतो आहोत. हे असे लुक्स आपण वास्तवात सातत्याने नाही करू शकत. हे लुक वगैरे हा एक फुगा आहे आणि तो कधी ना कधी फुटणार.. जे आपले आहे, जे सर्वोत्तम आहे त्याचा आग्रह धरायला हवा!    विक्रम फडणीस, फॅशन डिझायनर