तेजश्री गायकवाड

फॅशन आणि टेक्नॉलॉजीचा उत्तम मेळ नुकत्याच झालेल्या ‘लॅक्मे फॅशनवीक विंटर फेस्टिव्ह’ या सीजनमध्ये बघायला मिळाला. आपले कलेक्शन लोकांसमोर प्रभावीपणे सादर व्हावे, यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर डिझायनर्सच्या पथ्यावर पडतो आहे.

एखाद्या फॅशन वीकमध्ये टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर साऊं ड सिस्टीम आणि लाइट्सच्या वापरापर्यंतच केला गेलेला आपल्याला आजवर पाहायला मिळाला आहे. पण वेगाने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रभाव हा फॅशन इंडस्ट्रीवरही पडतो आहे. नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशनवीक विंटर फेस्टिव्ह या सीझनमध्ये फॅशनआणि टेक्नॉलॉजीचा उत्तम मेळ बघायला मिळाला. ‘लॅक्मे’ यंदा त्यांचं विसावं वर्ष साजरं करते आहे. २० वर्षांपासून सुरू असलेल्या या फॅशनवीकने नेहमीच गरजेनुसार बदल केलेले सहज दिसून येतात. त्यातलाच एक बदल म्हणजे वेगवेगळ्या उत्तम टेक्नॉलॉजीचा वापर.

फॅशनवीकमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्थातच त्यांचा रॅम्प. पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या रॅम्पची जागा यंदा स्क्रीन रॅम्पने घेतली होती. प्रत्येक शोनुसार त्या डिजिटल रॅम्पचे रंग, डिझाइन यात बदल केला जात होता. फॅशन डिझायनरच्या कलेक्शनला, त्यामागच्या प्रेरणेला साजेशा अशा रॅम्पमुळे वेगळाच उठाव मिळत होता. अर्थात, त्यामुळे कलेक्शन आणि त्यामागची डिझायनरची संकल्पना लोकांना समजायला सोपी जात होती. डिजिटल रॅम्पच्या सुरुवातीला म्हणजेच बॅकड्रॉपलाही यंदा टेक्नॉलॉजीचा साज चढला होता. अनेक फॅशनवीकमध्ये बॅकड्रॉपवर निव्वळ डिझायनरचं नाव, कलेक्शनचं नाव एवढीच माहिती असते. परंतु यंदा त्या जागेचाही वापर उत्तम प्रेझेन्टेशनसाठी करण्यात आला होता. डिझायनर नेहमीच त्यांच्या कलेक्शनमधून काही ना काही गोष्ट सांगायचा प्रयत्न करत असतो. हेच प्रयत्न यंदा या डिजिटल बॅकड्रॉपमुळे रंगतदार झाले होते. एखाद्या कलेक्शनमागची कथा आधी या बॅकड्रॉपवर दाखवली जात होती. पाठोपाठ त्यांचे कलेक्शन सादर होत होते. या सगळ्या प्रयत्नांमुळे डिझायनर्स, त्यांच्या कलेक्शनमागची त्यांची मेहनत सगळेच जिवंत झाले होते. काही डिझायनर्सच्या कलेक्शनमध्येही त्या बॅकड्रॉपचा हटके पद्धतीने वापर करण्यात आला होता. नचिकेत बर्वे या डिझायनरने यंदा त्याचं कलेक्शन ‘कप्रेसी’ या बॅगच्या कं पनीसोबत हातमिळवणी करत सादर केलं. त्यासाठी त्याने बॅकड्रॉपच्या स्क्रीनवर संपूर्ण शो दरम्यान वेगवेगळ्या जागेचे फोटो, व्हिडीओ क्लिप्स दाखवल्या. तर डिझायनर लेबल रितू कुमार यांचं ‘स्ट्रक्चर्ड पेस्टरल’ हे कलेक्शनघोडे  आणि घोडेस्वारीवरून प्रेरित झालं होतं. हे कलेक्शन सादर होताना बॅकड्रॉपवर संपूर्ण वेळ खास शूट केलेला व्हिडीओ दाखवला गेला.

डिजिटल रॅम्प आणि डिजिटल बॅकड्रॉपप्रमाणे अजून एक आगळावेगळा प्रयोग पहिल्यांदाच फॅशनवीकमध्ये करण्यात आला. ‘फुल सर्कल : अ होलोग्राम बाय रुटेड ऑब्जेक्ट’ हा फॅशन वीकच्या दुसऱ्या दिवशी सादर झालेला शो. ‘रुटेड ऑब्जेक्ट्स’ या भारतातील पहिल्या सस्टेनेबल लक्झरी ऑनलाइन बाजारपेठेने एकदम युनिक स्टाइलने डिजिटल इंस्टॉलेशन सादर केलं. या शोसाठी मोठा होलोग्राम तयार करण्यात आला होता. होलोग्राम असल्यामुळे तुम्ही कोत्याही बाजूने सादर होणारं कलेक्शन सहज बघू शकता. होलोग्रामवर एका कथेच्या स्वरूपात ते कलेक्शन आणि त्यामागचा उद्देश सादर झाला. रॅम्प, त्यावर रॅम्पवॉक करणारे मॉडेल, साऊंड आणि प्रेझेन्टेशनसाठी तयार केलेलं डेकोरेशन हे सगळंच एकत्रितरीत्या त्या होलोग्रामवर डिजिटली सादर झालं. अशा पद्धतीने डिजिटली एखाद्या ब्रॅण्डचं कलेक्शन सादर झालेलं पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. असं फॅशनवीकमध्ये डिजिटल पद्धतीने कलेक्शन सादर करणाऱ्या या ब्रॅण्डचे मुख्य डिझाइन अधिकारी आणि सहसंस्थापक किन्नरी ठक्कर सांगतात, ‘आम्ही तंत्रज्ञान आणि डिझाइनमधील आमच्या कौशल्यातून आमच्या ग्राहकाला काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आमच्या ग्राहकांसाठी एक सर्वोत्तम, तितकाच लक्झरी अनुभव देण्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतीने डिझाइन सादर करणं, त्याला तंत्रज्ञानाची जोड देणं आम्हाला गरजेचं वाटलं. आम्ही पहिल्यांदाच फॅशनवीकमध्ये आमचं ब्रॅण्ड कलेक्शन सादर करत होतो. त्यामुळे ‘रुटेड  ऑब्जेक्ट्स’ला आम्ही डिजिटल पद्धतीचा वापर करत सादर केलं. होलोग्रामसारख्या टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला क्रिएटिव्ह आणि आकर्षक व्हिज्युअल कथेद्वारे आमच्या ब्रॅण्डविषयी सगळ्यांना सांगायची हटके संधी मिळाली. फक्त असं काही हटके  सादर करणं एवढाच आमचा उद्देश नसून आमच्या ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठीचा उतम प्रयोग आम्ही केलाय’, असं विश्वासाने त्या सांगतात. होलोग्रामसारखा एक सहज, प्रभावी टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करत कलेक्शन सादर करण्याचा हा प्रयत्न यशस्वीच म्हणायला हवा.

आजची पिढी किती टेक्नोसॅवी आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. सध्याच्या काळात डिजिटली सादर होणारी प्रत्येक गोष्ट तरुण पिढीला आवडते, पटकन माहिती होते. म्हणूनच अशा पद्धतीने डिजिटली सादरीकरणाचे प्रयोग अनेक फॅशन डिझायनर आणि फॅशन ब्रॅण्डसाठी आर्थिकदृष्टय़ा नक्कीच फायदेशीर ठरत आहेत, हे खात्रीने सांगता येईल.