20 January 2021

News Flash

खणखणीत फॅशन!

खणाचे सिम्पल टॉप्सही तुम्ही जीन्सवर घालू शकता.

(संग्रहित छायाचित्र)

|| गायत्री हसबनीस

 

खण खण खणातच सगळी फॅशन सामावली असावी जणू… अशी अवस्था सध्या मार्केटमध्ये पाहायला मिळते आहे. साडीपासून ते कंदील आणि तोरणांपर्यंत सगळंच खणाने सजलं आहे. या खणखणीत फॅशनचा धावता आढावा…

सध्या ‘खण’ या कापडाला भाव आहे असंच म्हणाव लागेल, कारण निमित्त काहीही असो पण फॅशनच्या अनुषंगाने खणाच्या कापडावर प्रयोग करायला प्रचंड वाव आहे, हे सातत्याने येणाऱ्या नवनवीन खणाच्या साडींचे प्रकार, इंडो-वेस्टर्न ड्रेसेस, अ‍ॅक्सेसरीज आणि चपला पाहिल्यावर आपल्याला हमखास लक्षात येईल. मुळात खणाच्या साडीची खरेदीही खूप रसिकतेने के ली जाते. खणाच्या साड्या, ड्रेस, दागिने आणि त्यामुळे उठून दिसणारे व्यक्तिमत्त्व… याची भुरळ सध्या तरुणींनाही पडली आहे.

अनमॅच ब्लाऊज

बऱ्याच जणींना खणाच्या साड्यांमध्ये हिरवा किंवा गडद अबोली रंग अधिक आवडतो तर काहींना निळ्या आणि चॉकलेटी रंगाच्या खणाच्या साड्या आवडतात. खरं तर या रंगांच्या साड्यांवर खणाचाच मॅचिंग ब्लाऊज अधिक खुलून दिसतो. पण हल्ली खणाच्या साडीवर शोभेल असा लुक न ठेवता काहीसं अनमॅच करण्याकडे मुलींचा कल आहे आणि तो ब्लाऊजच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवतो. एकाच रंगाच्या साडीवर एकाच रंगाचा ब्लाऊज का? म्हणजे खणाच्या साडीवर खणाचा ब्लाऊज न घालता इतर फॅब्रिकचा ब्लाऊज घातला जातो. हा रेट्रो लुक आहे त्यामुळे याला आधुनिक म्हणता येणार नाही. ब्लाऊजमध्ये हॉल्टर, फुल हातांचा, स्लिवलेस, मेगा स्लिवलेस, बलून आणि बॅकलेस नॉट असे प्रकार आहेत. पॅटर्नचा विचार केला तर स्ट्राईपपासून ते अगदी पोलका डॉटपर्यंतचे प्रकार वापरले जातात. ब्लाऊजच्या पॅटर्न आणि डिझाइनमध्ये वेगळेपण शोधून आवडत्या रंगाच्या आणि डिझाइनच्या खणाच्या साडीवर तसा तयार ब्लाऊज विकत घेण्यावर किं वा शिवून घेण्यावर मुलींचा भर आहे. असे प्रयोग आधी इरकल साडीच्या बाबतीतही केले जायचे. खणाच्या साडीला आधुनिक पेहराव देणं अगदी सोपं आहे. वर म्हटल्याप्रमाणे, अनमॅच ब्लाऊज घालून तुम्ही क्लासी आणि मॉडर्न दिसू शकता. परंतु बऱ्याचदा साडीच्या रंगानुसार तुम्हाला ब्लाऊजचा विरुद्ध रंग ठरवायचा असतो तेव्हा त्याची फॅशन साडीशी जुळवून पाहण्यात बराच वेळ खर्च होतो. अशा वेळी अनमॅच ब्लाऊजच्या ट्रेण्डसोबत तुम्ही डिझायनर खणाचेच ब्लाऊज शिवून अथवा विकत घेऊ शकता. ब्लाऊजमध्येही तुम्हाला विविध नक्षी, पॅचवर्क करून मिळतात. हा लुक सध्या प्रचंड आधुनिक आहे, कारण यामुळे खणाच्या साडीच्या पदरापासून ते ब्लाऊजपर्यंत एकसुरीपणा जाणवत नाही. यात प्रयोगाला भरपूर वाव आहे, उदाहरणार्थ साडीला खिशाची फॅशन. ‘तेजाज्ञा’ या ब्रॅण्डने केलेला हा आगळावेगळा प्रयोग चांगलाच गाजला आहे. साडीचा पदर खणाचाच पण पॅचवर्क करून तो वेगळ्या रंगाचा ठेवणे, तसेच साडीचे काठ घेऊन त्याची पदरावर आणि ब्लाऊजवर नक्षी करणे, असे चिक्कार पर्याय यात आहेत.

सुटसुटीत ‘पॅचवर्क’

खणाच्या साडीचे स्वरूप किती व कसे बदलले आहे हे त्यावरील नक्षीकामावरून लक्षात येईल. आज लोकल बाजारातही खणाची साडी ही तिच्या मूळ रूपात फार कमी पाहायला मिळते, कारण खणाच्या साडीवरही रंगीत पारंपरिक व आधुनिक नक्षीकाम करण्यावर भर आहे. यामध्ये नथ, कोयरी आणि मोराची नक्षी ट्रेण्डमध्ये आहे. अक्षरांची, नावांची, घोषवाक्यांची आणि इंग्रजी शब्दांची नक्षीसुद्धा खणाच्या साडीवर केली जाते. याहीपेक्षा सर्वात हटके बाब आहे ती पॅचवर्कची. हे पॅचवर्क मुख्यत्वे हॅण्डक्राफ्टेड कापडावर केले जातेय, म्हणजे या कापडाचे हवे तसे डिझाइन करून खणाच्या साडीच्या पदराला आणि बॉर्डरला त्याचे स्टायलिश नक्षीकाम केले जाते. पदरावरील पॅचवर्क, पदराच्या टोकाला लावलेली वेलबुट्टी, लटकन, टास्सेल आणि वर म्हटल्याप्रमाणे नानाविध रचनेची भरजरी नक्षी असे आज खणाच्या साडीचे सुरेख रूप पाहायला मिळते आहे. खणाच्या साडीला पॅचवर्क करण्याची कल्पना ही खूपच आधुनिक आहे. खणाच्या काठाचा विचार केला तरी तेथे प्रयोग करायला वाव मिळतो, हे लक्षात येईल. तोरणासारखे डिझाइन ठेवून किंवा अगदी मोती व मणी लावूनही आपण डिझाइन करू शकतो. अर्थात सध्या काठाचे डिझाइन हे कापडी जास्त असते, ज्यात भौमितिक आकृत्यांचे डिझाइन करू शकतो. उदाहरणार्थ गोल, अर्धगोल त्रिकोण. असे डिझाइन आपण तोरणासारखे बॉर्डरला लावू शकतो. हे जरी बाजारात हल्ली बऱ्यापैकी उपलब्ध असले तरी तुम्ही तुमच्या पसंतीप्रमाणे शिवूनही घेऊ शकता.

खणाच्या साडीचा ‘वेस्टर्न’ पेहेराव

साडीपासून वनपीस, स्कर्ट, मिडी, कुर्ता, साडी-पॅण्ट, टॉप्स आणि बरंच काही बाजारात उपलब्ध केलं जात आहे. हल्लीच्या मुलींना साडी परिधान करण्यापेक्षा खणाचे असे वेस्टर्न लुक फार जास्त आवडतात. मुळात हे खूपच कम्फर्टेबल असल्याने त्यावर कुठल्याही विशेष केशरचनेशिवाय आणि भरजरी दागिन्यांशिवाय तुमचा लुक पूर्ण करता येतो. वनपीस किंवा स्कर्टबरोबर पायात पैंजण घालणं हा एक वेगळा अनुभव आहे. बऱ्याच मुली स्कर्टला लटकन वा टास्सेल शिवून घेतात. काहींना पायघोळ तर शॉर्ट स्कर्टही आवडतो. वनपीस म्हणाल तर तुम्हाला सर्वात जास्त पर्याय येथे मिळतील, कारण खणाच्या काठ आणि पदरासोबत खूप खेळता येते. सिमेट्रिक, एसिमेट्रिक, प्लेन, स्ट्राइप्स इत्यादी पर्याय येथे उपलब्ध आहे. कुर्त्यांमध्ये बंदगळा, फुल हात, बॅकलेस, कॉलर असे अनेक पर्याय आहेत. खणाचे सिम्पल टॉप्सही तुम्ही जीन्सवर घालू शकता. खणाचे फक्त ड्रेसच नाही तर चपला, पर्सेस, कानातले, गळ्यातलेही आले आहेत. कानातल्यांमध्ये भरीव गोल लटकनचा तर गळ्यातल्यांमध्ये कापडी आकारांचा विचार केला आहे. चपलांमध्ये सॅण्डल्सपासून शूजपर्यंत खणाचं कापड पोहोचलं आहे. मोठ्या पर्सेसमध्ये आणि क्लचेसमध्ये खणाचे काठ वापरले जातायत. कोविड-१९ मुळे तर खणाच्या काठाचे आणि पदाचे मास्कही बाजारात उपलब्ध करून देण्यात आले होते. वुमन्सवेअरप्रमाणे मेन्सवेअरमध्येही कुर्ता, ब्लेझरमध्ये हटके असे खणाचे लुक इन झाले आहेत. ‘तेजाज्ञा’ आणि ‘सायली राजाध्यक्ष अ‍ॅण्ड सारीज’ असे ब्रॅण्ड्स खणाच्या साडीत अग्रेसर आहेत. ‘वैशाली एस’सारखे ब्रॅण्ड्स तुम्हाला खणाचे वेस्टर्न लुक देतात. याशिवाय ऑनलाइनही तुम्हाला खणाच्या ड्रेसेसचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे या खणखणीत फॅ शनकडे कानाडोळा करणं तुम्हाला परवडणारं नाही!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 12:16 am

Web Title: fashion viva article types of sarees indo western dresses accessories fashion market akp 94
Next Stories
1 सदा सर्वदा स्टार्टअप : तुलनात्मक अभ्यास करताना
2 भटकंतीचे नवे आयाम
3 वस्त्रांकित : ओवीतून लागलेला शोध
Just Now!
X