02 June 2020

News Flash

फॅशनिस्टांचा प्रभाव

इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव आणि इन्फ्लुएन्स करणं म्हणजे प्रभावित करणं.

|| वेदवती चिपळूणकर

फॅशन इन्फ्लुएन्सर कोणाला म्हणतात? इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव आणि इन्फ्लुएन्स करणं म्हणजे प्रभावित करणं. अगदी शब्दश: बघायचं तर ज्यांच्या स्वत:च्या फॅ शनने इतरांची फॅशन प्रभावित होते त्यांना फॅशन इन्फ्लुएन्सर म्हणायचं. आपल्या सगळ्या नायिका आणि नायक, काही वेळा तर खलनायिकासुद्धा, कायमच फॅशन इन्फ्लुएन्सर होत्या. आताच्या फॅशन जगतात त्यातल्या त्यात तरुण पिढीतल्या फॅशन इन्फ्लुएन्सर्सना वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे.

कोणे एके काळी फॅशन ही चित्रपटानुसार बदलत जायची. नूतनचे ब्लाऊज, झीनत अमानचे गाऊन्स, हेलनची हेअरस्टाइल, शर्मिला टागोरच्या साडय़ा, देवानंदचे स्कार्फ, अमिताभच्या बेलबॉटम, ऋषी कपूरचे स्वेटर्स इत्यादी इत्यादि अनेक गोष्टी तंतोतंत कॉपी केल्या जायच्या. आजही त्या केल्या जातातच. ही फॅशन आपल्यापर्यंत थेट त्यांच्या सिनेमातूनच पोहोचायची, मग मार्केटमध्ये दिसायची आणि मग टेलर्सच्या पॅटर्नबुकमध्येही यायची. फॅशन ही अगदी आजच्यासारखीच तेव्हाही केसातल्या पिनपासून ते पायातल्या सँडलपर्यंत फॉलो केली जायची. फॅ शनसाठी अनेक चित्रपट बघितले जायचे. आताच्या आणि तेव्हाच्या ट्रेण्ड सेटिंगमध्ये फरक इतकाच की तेव्हा त्याला असा विशेष दर्जा मिळालेला नव्हता. आज ट्रेण्डसेटर्सकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं, त्यांना वेगळ्या पद्धतीची वागणूक डिझायनर्सकडून मिळते आणि हे त्यांच्या उत्पन्नाचं साधन म्हणूनही पाहिलं जातं. ‘फॅशन इन्फ्लुएन्सर’ म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं, पूर्वीच्या काळी मात्र सिनेमाचे नायक आणि नायिकाच फॅशन इन्फ्लुएन्सर असायचे. आता मात्र कलाकारच नाही तर फॅशन इंडस्ट्रीमध्ये ‘इन्फ्लुएन्सर’ ही संकल्पना गेल्या काही वर्षांत हळूहळू उदयाला आली आहे.

सोशल मीडिया एवढा फोफावण्याच्या आधी या फॅशन इन्फ्लुएन्सरचं काम जरा अवघड होतं. याआधी ज्यांनी स्वत:चा फॅशन सेन्स जपला आहे आणि एका ठरावीक पद्धतीनेच तो कायम जगासमोर प्रेझेंट केला आहे असे फॅशन डिझायनर्स, हिरो-हिरोइन्स, अ‍ॅक्टर्स स्वत:च्या स्टायलिंगबद्दल स्वत:च काही इंटरेस्टिंग गोष्टी लिहीत असत आणि पेपरमध्ये किंवा इंटरनेटवर ते वाचायला मिळत असे. साधारणपणे २००० साली फॅशन ब्लॉगिंगला सुरुवात झाली, असं फॅशन इतिहास सांगतो. तेव्हा फॅशन ब्लॉग लिहिणं हा एक गमतीचा, विरंगुळ्याचा भाग होता आणि अगदी कोवळ्या अवस्थेत असलेला उद्योग होता. केवळ ब्लॉग लिहून पोट भरणं हा ट्रेण्ड त्या काळात नव्हता. सहज जाता जाता सुचलं म्हणून केलेलं लेखन इतकंच महत्त्व तेव्हा फॅशन ब्लॉग या लेखन प्रकाराला होतं. सोशल मीडिया प्रभावी झाल्यापासून फॅशन इन्फ्लुएन्सर या संकल्पनेने खऱ्या अर्थाने मूळ धरलं आहे.

फॅशन इन्फ्लुएन्सर कोणाला म्हणतात? इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव आणि इन्फ्लुएन्स करणं म्हणजे प्रभावित करणं. अगदी शब्दश: बघायचं तर ज्यांच्या स्वत:च्या फॅ शनने इतरांची फॅशन प्रभावित होते त्यांना फॅशन इन्फ्लुएन्सर म्हणायचं. आपल्या सगळ्या नायिका आणि नायक, काही वेळा तर खलनायिकासुद्धा, कायमच फॅशन इन्फ्लुएन्सर होत्या. आताच्या फॅशन जगतात त्यातल्या त्यात तरुण पिढीतल्या फॅशन इन्फ्लुएन्सर्सना वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ‘फोर्ब्स’सारखं मॅगेझिन फॅशन इन्फ्लुएन्सर्सची आवर्जून दखल घेतं, त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात, त्यांच्याविषयी सव्‍‌र्हे केले जातात. इन्स्टाग्राम आणि पिंटरेस्ट या दोन ‘फोटोप्रधान’ समाजमाध्यमांनी तर फॅशन इन्फ्लुएन्सर्सना चालना दिली, असं रिसर्चर एमिली हंड म्हणते. सोशल मीडियाने आधीपासून फॅशन ब्लॉगर्स नसलेल्याही अनेकांना फॅशन इन्फ्लुएन्सर बनण्याची संधी दिली आहे. मुळात फॅशन क्षेत्राशी थेट संबंध नसेलही, मात्र त्यांचं स्टायलिंग फॉलो केलं जातं आहे हे लक्षात आल्यावर मग त्यावर लक्ष केंद्रित करून स्वत:ला फॅशन इन्फ्लूएन्सर्स म्हणून घडवलेले असे अनेकजण आहेत. यातले काही युटय़ूबर्स आहेत तर काही केवळ इन्स्टाग्रामवर भरपूर फॉलो केले जातात म्हणून फॅशन इन्फ्लुएन्सर ठरले आहेत. अर्थात इन्स्टाग्राम आणि पिंटरेस्टवर या इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करणारी प्रामुख्याने तरुण पिढीच आहे, हे सहज दिसून येते. त्यामुळे खऱ्या अर्थाने फॅशन इन्फ्लूएन्सर्सचा प्रभाव किंवा त्यांचे महत्त्व हे तरुण पिढीला जास्त जाणवते.

‘फॅशनिस्टा’ हा शब्दही खरं तर याच इन्फ्लुएन्सरसाठी वापरला जायचा. मात्र आता तो शब्द मागे पडला आहे. आता प्रत्येक जण इन्फ्लुएन्सर आहे. हे केवळ दोन वेगळे शब्द नाहीत तर त्या संकल्पनांमध्येही थोडासा फरक आहे. फॅशनिस्टा ही अशी व्यक्ती असते जिला फॅ शनची समज असते, तिला ती फॅशन कॅरी करता येते, मात्र ती इन्फ्लुएन्सर असेलच असं नाही. इन्फ्लुएन्सर या संकल्पनेत केवळ प्रभावी ठरणं हेच अपेक्षित आहे. त्यासाठी अनेक बिझनेस टूल्स वापरली जातात, कोलॅबोरेशन्स केली जातात, ब्रॅण्डिंग केलं जातं. यात ‘व्यवसाय’ या महत्त्वाच्या बाजूची भर पडलेली आहे. एखाद्या इन्फ्लुएन्सरचे फॉलोअर्स जेव्हा वाढत जातात तेव्हा अनेक फॅशन ब्रॅण्ड्स आणि डिझायनर्स त्यांच्याशी कोलॅबोरेशन्स करताना दिसतात. इन्फ्लुएन्सर आणि ब्रॅण्ड अशा दोघांचाही यातून फायदा बघितला जातो. यात फॅशन म्हणजे केवळ आऊ टफिट्स नव्हे तर घडय़ाळापासून चपलांपर्यंत सगळेच ब्रॅण्ड्स स्वत:ला या इन्फ्लुएन्सर्सशी जोडून घेतात. अनेकदा तर फॅ शनशी थेट निगडित नसलेल्या मात्र सेलेब्रिटी असलेल्या अनेकांशीदेखील फॅशन ब्रॅण्ड्स आणि डिझायनर्स कोलॅबोरेशन्स करतात, ते त्यांच्या फॅ शनचा इतरांवर असलेल्या प्रभावामुळेच.. फॅशन इन्फ्लुएन्सर हा केवळ हौसेपायी किंवा आपल्याला समजतंय म्हणून करण्याचा उद्योग हे स्टेटस बदलून एक बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणून त्याकडे सध्या बघितलं जातं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.

फॅशन इन्फ्लुएन्सर्सचं प्रस्थ आणि ग्लॅमर इतकं वाढलं आहे की ‘मिंत्रा’सारख्या ब्रॅण्डने ‘फॅशन सुपरस्टार’ या नावाने नव्या फॅशन इन्फ्लुएन्सरच्या शोधार्थ एक रिअ‍ॅलिटी शो सुरू केला आहे. सोनाक्षी सिन्हा या शोमध्ये जज म्हणून सहभागी होणार असून ‘मिंत्रा’च्या अ‍ॅपवर हा शो पाहता येणार आहे. फॅशन इन्फ्लुएन्सर्सचा वाढता प्रभाव पाहता भविष्यात फॅ शनमधली दिशा कोण दाखवणार यासाठी अशा फॅशन इन्फ्लुएन्सरचा शोध रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून घेतला जातो आहे, असं ‘मिंत्रा’च्या हेड अमर नागरम यांनी सांगितलं. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरातून ही फॅशन इन्फ्लुएन्सरची कल्पना बहरली आणि वाढली आहे.

आपला लूक कसा करायचा आणि तो कसा कॅरी करायचा, याच्या टय़ुटोरिअल्सपासून ते एकच स्कार्फ पाच वेगवेगळ्या पद्धतींनी कसा वापरायचा इथपर्यंत सगळ्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन करताना हे फॅशन इन्फ्लुएन्सर आपल्याला दिसतात. कधीकाळी आपल्याला भुरळ घालणाऱ्या नायक-नायिकांच्या फॅशन पासून हा प्रवास सुरू झाला होता आणि तो इन्स्टाग्रामवरच्या फोटोच्या माध्यमातून फॉलोअर्स वाढवण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. यातून सिनेमा इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी जसे जाहिराती, इतर ब्रॅण्ड्स असे मार्केट उभे राहिले. तसे मार्केट येत्या काळात या फॅशन इन्फ्लूएन्सरचेही उभे राहताना दिसते आहे. मात्र सध्याच्या इंटरनेट युगात फॅशन आणि फॅ शनिस्टांच्या गोष्टी अगदी काही सेकंदात आपल्या नजरेसमोर झळकतात. त्यामुळेते फॉलो करता करताहळूहळू प्रत्येकच माणूस स्वत:ला स्टायलिस्ट आणि फॅशन इन्फ्लुएन्सर समजायला लागला तर नवल नाही!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 3:24 am

Web Title: fashion young generation akp 94
Next Stories
1 ‘ऑनलाइन स्ट्रिमिंग’चा ओढा!
2 फिट-नट
3 ‘बेक’गुरू
Just Now!
X