सरत्या वर्षांसोबत कित्येक गोष्टी आल्या आणि गेल्या. फॅशनच्या भाषेत कितीतरी ट्रेंड आले आणि गेले. पण त्यातून तरुणाईच्या विचारांतले बदल जाणवले. वर्षभरात झालेल्या बदलांची तरुणाईच्या मनावर उमटलेली स्पंदनं त्यांच्या फॅशनवरून स्पष्ट झाली. सरत्या वर्षांत फॅशन बोलू लागली, व्यक्त होण्याचं माध्यम बनली.

vv31  फॅशन म्हणजे मिरवणं असंच आपण समजत असतो. पण फॅशनची खरी व्याख्या म्हणजे आपल्या पेहरावाची, आपल्या स्टाइलची पद्धत. खाण्याच्या बाबतीत कशी आपल्याला सहज लहर येते..‘आज काय मला बर्गरच खायचाय’, ‘बस्स, यार काम गरमागरम भजी आणि चहाची तल्लफ आली आहे’, ‘च्यायला, कसला वास येतोय शेजारच्या घरातून पापलेटचा..आज तर मच्छी झालीच पाहिजे, त्याशिवाय पोटात घास जाणार नाही.’ कपडे, अ‍ॅक्सेसरीज आणि एकूणच तुमच्या लुकबद्दल तेच असतं. तुमचा मूड, तुमचा स्वभाव, तुमचे विचार यावर तुमची स्वत:ची खास फॅशन अवलंबून असते.
या वर्षांत काही नवे ट्रेण्ड्स आले, फॅशन बदलली. सर्वात स्पष्ट बदल म्हणजे ‘लूझ फिट गारमेंट्स’. फॅशनेबल राहायचं तर शक्य तितके तोकडे आणि टाईट कपडे घातले पाहिजेत, असा काहीसा नियम आपण घालून घेतला होता. मग त्या घट्ट कपडय़ांत बसण्यासाठी जिममध्ये घाम गाळायचा, डाएटिंग करायचं आणि मग बारीक होऊन स्किन फिट ड्रेस घालायचा.. पण यंदा हा अलिखित नियम मोडला गेला. थँक्स टू सोनाक्षी सिन्हा, आलिया भट आणि सोनम कपूरसारख्या बॉलिवूड सेलेब्रिटीजना. ‘स्वत:च्या शरीरावर प्रेम करा’ हा मंत्र त्यांनी दिला.
vv32तुम्ही थोडे जास्त जाड, किंवा किडकिडीत किंवा बुटके आहात, म्हणून काय झालं ..‘सेलेबेट्र युअरसेल्फ’. त्याचाच एक प्रभाव म्हणजे लूझ फिट गारमेंट्स. टाईट फिट कपडय़ांमध्ये स्वत:ची घुसमट करून घेण्याऐवजी पलॅझो पँट्स, ओव्हरसाईझ टी-शर्ट्स, फ्री-साईझ ड्रेसेस या वर्षांमध्ये पाहायला मिळाले. शिफॉन, जॉर्जेट, लेस, नेट अशा कम्फर्टेबल फॅब्रिक्सनी हे वर्ष गाजवले. हॉट पँट्सनी चक्क डेनिम्सची जागा घेत धुमाकूळच उडवून दिला होता. बॉयफ्रेंड पँट्स, शर्ट्सचा ट्रेंड मागच्याच वर्षी आला होता, पण किती दिवस दुसऱ्यांचं वापरायचं ना.. म्हणून यंदा मुलींनी स्वत:साठीच तशा कपडय़ांची खरेदी केली.
रंगांच्या बाबतीत धोक्याच्या सूचना देणाऱ्या बिलबोर्ड्सची आठवण करून देणाऱ्या नियॉन कलर्सचा ट्रेण्ड गेल्या वर्षी होता. यंदा या ट्रेण्डला अलविदा करायची उपरती झालीय खरी, पण त्यांची जागा बोल्ड शेड्सनी घेतली आहे. vv33नािरगी रंग मुलींचा लाडका झाला होता. मँगो यल्लो, ब्राईट पिंक, चेरी रेड, जांभळा, ब्राईट ग्रीन अशा रंगांची होळी मुलींच्या कपडय़ांवर दिसून आली. त्यात वेगवेगळ्या प्रिंट्सची चलती होतीच. अगदी मोगलाई पेंटिग्जपासून ते कॉमिक कॅरेक्टर्सपर्यंत कोणालाच कपडय़ावरच्या प्रिंटमध्ये कुणालाच डिझायनर्सनी सोडलं नाही. कपडय़ांवरच्या पॉप आर्ट आणि प्रिंट्सनी यंदा धमाल उडवून दिली. तुमच्या मनात जे काही आहे, ते व्यक्त करण्याचं हक्काचं व्यासपीठ टी-शर्टची नव्यानं ओळख झाली. मनातल्या, आवडीच्या काव्यपंक्तींपासून ते शिव्याशापांपर्यंत प्रत्येक गोष्ट टी-शर्टवर यंदा उमटू लागली होती. त्यामुळे, मुलीनं घातलेल्या टय़ुनिकचा गळा किती डीप आहे, याची काळजी करण्याआधी त्यांच्या आया त्यावर नेमकं काय लिहिलंय ते तपासू लागल्यात.
‘शिअर ड्रेसिंग’चा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणारच नाही. हे वर्ष फॅशनमध्ये शिअर ड्रेसिंगची कन्सेप्ट रुजवणारं आणि ती फॅशन करणारं वर्ष होते. मगाशी म्हटल्याप्रमाणे, ‘स्वत:च्या शरीरावर प्रेम करायचं’ हा या वर्षीचा मूलमंत्र होता. त्यामुळे झिरझिरीत वस्त्र हल्ली मुली आत्मविश्वासानं वागवतात. ‘जिम -योगाने मी छान बॉडी मेन्टेन करतेय तर ते कव्‍‌र्हज आणि त्याची नजाकत झाकायची कशाबद्दल?’ हा प्रश्न मुलींनी विचारायला सुरुवात केली. ‘सेक्सी’ हा शब्द वाईट अर्थानं वापरण्याऐवजी कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यायला सुरवात झाली. अर्थात हे करताना, आपलं ड्रेसिंग कुठेही व्हल्गर होणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेतली. त्यामुळे योग्य इनर्स वापरून ‘शिअर’चं ‘शेम’ होणार नाही, ही दक्षताही घेतली गेली.
ज्वेलरीच्या बाबतीत बोलायचे झाले, तर आतापर्यंत अपशकुनी मानले जाणारे घुबड, कवटी अशी चिन्हं मुलींच्या गळ्यातील ताईत बनली. हे चायनीज ‘हॉर्स’ इअर होते, त्यामुळे युनिकॉर्न डिझाइन्स हिट होती. तुमच्या समोर दिसणाऱ्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीचा आकार ज्वेलरीमध्ये आणता येतो या नियमाला अनुसरून चप्पलपासून घरच्या खुर्ची-टेबलपर्यंत प्रत्येक सिम्बॉल ज्वेलरीमध्ये दिसू लागला.  
थोडक्यात, आजूबाजूच्या सामाजिक घडामोडींबाबत आवाज उठवायला, व्यक्त व्हायला आपला पेहराव हे एक उत्तम माध्यम बनू शकतं, याची प्रचीती देणारं हे वर्ष होतं. ‘मुलीला बाहुलीसारखं प्रमाणबद्ध आणि आखीव-रेखीव बनवून आदर्शाची व्याख्या बनवणाऱ्यांनो, आम्ही ढगळ कपडे घालून अजूनच ढग्गोबाई बनू’, ‘घराबाहेर आणि घरातही असुरक्षित वातावरण असताना मुलीनं गप्प बसावं, कुणाच्या नजरेत येऊ नये असं वागावं, असं वाटत असेल, तर आम्ही ब्राईट रंगाचे कपडे घालून अजूनच तुमच्या नजरेत भरण्याचा प्रयत्न करू’, अशी स्पष्ट मतं न बोलता कपडय़ांमधून मांडण्याचा प्रयत्न या वर्षी मुलींनी केला, असं म्हणायला जागा आहे. त्यामुळे यंदा फॅशनही बोलू लागली, व्यक्त होण्याचं माध्यम बनली, असं म्हणायला हरकत नाही.

‘अॅब्स्ट्रॅक्ट फॅशन’
साचेबद्धतेत गुरफटून टाकणाऱ्यांविरुद्ध बंड पुकारण्यासाठी मुलींनी यंदा नकळतपणे फॅशनचा आधार घेतला. या बंडाचं एक रूप म्हणजे ‘अॅबस्ट्रॅक्ट फॅशन’. दोन्ही कानात सारखेच कानातले हवे, एकावेळी एकाच रंगाचं नेलपेंट लावावं असे नियम यंदा पुसले गेले. मुळात अशा काही नियमांची तमा फॅशनमध्ये यंदा बाळगली गेलीच नाही. एकाच कानात इअररिंग घालायचा ट्रेंड आणला. एका वेळेस दहा बोटांना दहा वेगवेगळी नेलपेंट लावली जाऊ लागली. मध्यंतरी सोनम कपूरने एका समारंभात कानामध्ये दोन वेगवेगळ्या रंगांच्या मोठय़ा इअरिरग्स घातल्या होत्या. शूजमध्येसुद्धा दोन्ही पायात एका स्टाइलची पण वेगवेगळ्या रंगाची चप्पल वापरलेली दिसली.

‘डीआयवाय’ ट्रेंड
‘डू इट युअरसेल्फ’ ही संकल्पना सध्या सगळ्याच आघाडय़ांवर तरुणाईनं उचलून धरली. अर्थातच फॅशनमध्येही ती दिसली. मुख्यत्वे मेकअप, हेअरस्टाइल आणि अॅक्सेसरीजमध्ये ते बघायला मिळाली. नेलआर्ट आणि आय मेकअपच्या ट्रिक्स सांगणारे व्हिडीयोज  यूटय़ुबवर अपलोड होत राहिले. लिपस्टिक किंवा नेलपेंटची विशिष्ट शेड हवी असेल तर घरच्या घरी कशी बनवायची याच्या शिकवण्या सोशल मिडीयावर गाजू लागल्या आहेत.