09 August 2020

News Flash

‘फास्ट’ फॅशन?

जगभरात फॅशनची बाजारपेठ वाऱ्याच्या वेगाने विस्तारते आहे.

|| गायत्री हसबनीस

जगभरात फॅशनची बाजारपेठ वाऱ्याच्या वेगाने विस्तारते आहे. एकीकडे लोकल ते ग्लोबल या सीमारेषाही पुसट होत चालल्या असून आपल्याला हवे तसे फॅशनेबल कपडे, हव्या त्या वेळी आणि हव्या त्या ठिकाणी सहज उपलब्ध झाली आहे. हे खरे असले तरी दुसरीकडे अनेक संकल्पनाही फॅशनविश्वात रूढ होत आहेत. एकीकडे मार्केटची गरज आणि दुसरीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज यातून रूढ फॅशन म्हणजेच आजच्या भाषेत फास्ट फॅशन आणि सस्टेनेबल फॅशन असे द्वंद्व उभे राहिले आहे. मुळात या दोन्ही संकल्पना काय हे समजून घेण्याचा हा प्रयत्न..

फास्ट फॅशन ही संकल्पना जितकी गरजेची तितकीच लवचीक. फास्ट फॅशन सध्या सस्टेनेबल फॅशनला मारक ठरते आहे, हे तज्ज्ञांचे मत असून त्यावर विविधप्रकारे चर्चा सुरू आहे. फास्ट फॅशन ही संकल्पना जेव्हा अस्तित्वात आली तीच मुळात व्यवस्थापन नसलेली आणि रोज कचरा निर्माण करणारी अशी होती. परंतु त्याला अफाट मागणीची जोड होती आणि बाजाराच्या दृष्टीने लाभदायक अशी त्याची ओळख झाल्याने त्याचा विस्तार वेगाने होत गेला. मात्र त्याच वेळी आपल्याकडे सगळ्याच स्तरावर पर्यावरणस्नेही उत्पादनांचा विचार सुरू झाला होता. पर्यावरणाचे भान आल्याने का होईना सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून सस्टेनेबल उत्पादनाला मागणी वाढू लागली आहे. पण मुळात फास्ट फॅशनचे बस्तान आपल्या दैनंदिन आयुष्यात आणि मार्के टमध्येही किती घट्ट आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

फास्ट फॅशनला एक स्वतंत्र बाजू आहे. ग्राहकांच्या गरजा लवकर पूर्ण करण्याच्या उद्देशाने फास्ट फॅशनला बढावा मिळाला. फॅशन रिटेलर्सकडून फास्ट फॅशनही संकल्पना आली आहे. ज्याचा अर्थ रॅम्पवरून येणारी फॅशन सहजपणे फॅशनस्टोअर्समधून उपलब्ध होऊ  शकते आणि नव्या ट्रेण्ड्सला येथून एक वेगळी सुरुवात होते. ग्राहकांना सहज उपलब्ध असणारी ही फास्ट फॅशनडिझाइनच्या दृष्टीने एक वेगळा प्रयोग, नवनिर्मिती आणि उद्योगक्षेत्रातील बाजारीकरणाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून ओळखली जाते. ‘फास्ट फॅशनमध्ये बडय़ा सेलिब्रिटींच्या फॅशनला फॉलो करणं आणि त्यातूनही एक नवनिर्मिती साध्य करणं हा महत्त्वाचा टप्पा आहे. सतत येणारे समर-विंटर कलेक्शन्स, प्रत्येक ओकेजनसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे त्या अनुषंगाने येणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज असा हा पसारा जगभर वाढतच चालला आहे. फास्ट फॅशनमधून सतत वेगळ्या पद्धतीचे कपडे, साइज, डिझाइन आणि आवडीनुसार गार्मेट्स ग्राहकांना उपलब्ध होतात. फास्ट फॅशनने रिटेलर्स ऑनलाइन फॅशन ट्रॅफिकमध्ये वर्षभरात पन्नास टक्के जागा व्यापली आहे,’ अशी माहिती ‘स्पायकर लाइफस्टाइल’चे डिझाइन हेड अभिषेक यादव यांनी दिली.

‘एच् अ‍ॅण्ड एम्’, ‘झारा’, ‘फोरएवर’ २१’ असे विविध लोकप्रिय ब्रॅण्ड्स हे फास्ट फॅशनमध्ये मोडतात. घ्या, वापरा आणि फेका या मानसिकतेतून जन्माला आलेल्या फास्ट फॅशनमुळे१२ लाख टन कचरा निर्माण झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाखो टन फॅब्रिक हे वाया जाते तर दोन ते तीन लाखांच्या वर ग्राहकांनी वापरून फेकून दिलेले कपडे असतात. ज्यामुळे दिवसागणिक ढीगाने कचरा निर्माण होतो आहे. त्यामुळे याला एक मजबूत पर्याय आणि मदत म्हणून ‘स्लो फॅशन मूव्हमेंट’ सुरू करण्यात आली. यालाच आपण इको-फॅशन किंवा सस्टेनेबल फॅशन म्हणतो. या चळवळीत ग्राहकांनी कपडे न फेकता ते रिसायकल करावे, फास्ट फॅशनची खरेदी कमी करावी, आपली पारंपरिक वस्त्रं जपावी आणि दीर्घकालीन ट्रॅडिशनल टेक्सस्टाइल्स आपल्या दैनंदिन आयुष्यात आणावीत हा या स्लो फॅशन मूव्हमेंटचा प्रमुख हेतू आहे. गेल्या वर्षी ३० किलो फेकून दिलेल्या कपडय़ांमधून ४.५ किलो कपडे हे रिसायकल करण्याचा यशस्वी प्रयत्न इंग्लंडमध्ये करण्यात आला.

सस्टेनेबल फॅशन एक मार्ग आहे आणि तो एक महत्त्वाचा घटकही आहे. खादीचे, कॉटनचे किंवा कुठल्याही पद्धतीने रिसायकल केलेले आणि रीयूज करून तयार केलेले कपडे म्हणजेच सस्टेनेबल फॅशन होत नाही. सस्टेनेबल फॅशनची एक मोठी चळवळ उभी आहे आणि सुदैवाने विविध प्रकारच्या प्रयोगांतून सस्टेनेबल फॅशनला सध्याच्या काळात वाव आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात येणारे कपडे हे फास्ट फॅशनमध्ये मोडतात आणि ते तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाला घातक ठरू शकतील अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्याचा निसर्गावर होणारा भयंकर परिणाम टाळण्याच्या दृष्टीने सस्टेनेबल फॅशनचा विचार वाढतो आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकात सस्टेनेबल फॅशनला उभारी मिळाली. तेव्हा त्याला ‘ग्रीन’ किंवा ‘इको’ फॅशन असं संबोधलं जाऊ  लागलं. परंतु तेव्हा फास्ट फॅशनचे मार्केट एवढे वाढले होते की, त्याला ‘ग्रीन’ करणं गरजेचं होतं. फॅशन इंडस्ट्रीमधून नैसर्गिक साधनांचा उपयोग समाधानकारकरीत्या होत नाही. एक इंडस्ट्री आणि एक ग्राहक म्हणून या सर्व गोष्टींची जाणीव आणि माहिती असणे आवश्यक ठरले. मात्र तोवर फास्ट फॅशन लोकांच्या अंगवळणी पडली होती.

आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे की, सर्वात घातक रसायन हे पीएफसी ( ढाउ) असून त्याचा निसर्गावरही वाईट परिणाम होतो. तसेच एक पेअर (एका व्यक्तीसाठी) जीन्स बनवण्यासाठी साधारणपणे ७,००० लिटर पाणी लागते आणि अशा २० करोड जीन्सचे दरवर्षी उत्पादन होत असते. म्हणजे अशा २० करोड जीन्ससाठी किती लिटर पाणी लागते याची कल्पनाच केलेली बरी. तसेच २,७०० लिटर पाणी हे एक टी-शर्ट बनवण्यासाठी लागते. वास्तविक, २,७०० लिटर पाणी हे एक व्यक्ती ९०० दिवस आरामात पुरवू शकतो. पण आपण जे कपडे दैनंदिन जीवनात वापरतो त्यासाठीच आपण किती प्रमाणात आपल्या नैसर्गिक स्रोतांचा अतिवापर करतो याचा अंदाज आपल्याला येईल. जागतिक पातळीवर पाण्याचे महत्त्व असताना फॅशन इंडस्ट्रीमध्ये पाण्याचा कसा आणि किती अतिरेकी वापर केला जातो आहे, याची जाणीव आता कुठे हळूहळू लोकांना होते आहे.

सस्टेनेबल फॅशनची ओळखच टिकाऊ  अशी असली तरी ती रीपेअर, रीडिझाइन, अपसायकल करता आली पाहिजे. मुळात त्याची रचना ही हाताने विणलेली, शिवलेली अशी हवी. सस्टेनेबल फॅशनमध्ये असलेले फॅब्रिक हे दीर्घकाळ टिकणारे हवेत. या फॅशनची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे ती ग्रीन आणि एथनिक असली पाहिजे. ‘सस्टेनेबल फॅशनचे कपडे हे फास्ट फॅशनच्या कपडय़ांपेक्षा पाच पटीने दीर्घकाळ टिकतात. फॅशनही सस्टेनेबल असणं अत्यंत आवश्यक असताना दुसरीकडे अशा अनेक गोष्टी फॅशनमध्ये मिसळतात ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. सस्टेनेबल फॅशन म्हणजे ज्यातून लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल आणि निसर्गाला अजिबातच धोका पोहोचणार नाही. सस्टेनेबल फॅशनला सामाजिक आणि पर्यावरणीय अशा दोन्ही बाजू आहेत. सध्या आपण जर पर्यावरणाचा विचार केला तर फॅशन इंडस्ट्रीतून नैसर्गिक स्रोतांचा जो ऱ्हास होतो आहे तो थांबवणे प्रथम गरजेचे ठरते. हे साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त इकोफ्रेंडली कपडय़ांची खरेदी करणे गरजेचे आहे,’ असं मत ‘बिर्ला सेल्यूलोज’च्या प्रमुख शारदा यूनियाल यांनी व्यक्त केले. लिवाइको सारखे फॅब्रिक कॉटन, व्हिस्कोस आणि वन्य सामग्रीपासून बनवलेले असते. ज्यामुळे हे फॅब्रिक जाळल्यानंतर संपूर्णत: राख होते किंवा मातीत मिसळल्यानंतर त्याचे पूर्णत: विघटन होते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

आपण कळतनकळत आपल्या दैनंदिन फॅशनमधून वास्तविकरीत्या फार ढोबळमानाने पर्यावरणाचा आणि त्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करतो, पण येत्या काही दिवसांत सामाजिक जबाबदारीतून आणि पर्यावरणाची न संपणारी गरज या भावनेतून आपल्याला आपल्या मुळाशी परत जाणं गरजेचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 12:09 am

Web Title: fast fashion mpg 94
Next Stories
1 नटबोल्टकडून फोटोशूटकडे
2 मोबाइल कॅमेऱ्याची गोष्ट
3 गौरव घाटणेकर   
Just Now!
X