|| सारंग साठय़े

खरेतर जी धमक एका स्त्रीमध्ये असते ती कुठल्याच पुरुषात असू शकत नाही. पण तरीही आज हे लोक मलाच भाडिपाचा सर्वेसर्वा म्हणतात. कारण मी एक पुरुष आहे.  हे ऐकायला कितीही लाजिरवाणं वाटलं तरीही एक कटू सत्य आहे.

माझ्या कंपनीत ती फाउंडर्स आहेत. पॉला, अनुषा आणि मी. अनेकदा मी गमतीत असं म्हणतो, की मला ३३ कोटय़ातून अ‍ॅडमिशन मिळाली आहे. कारण मी एकटा पुरुष संस्थापक. विनोद म्हणून ऐकला ठीक आहे. पण खरंच परिस्थिती अगदी याच्या उलट आहे. खरंतर भाडिपा सुरू करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात कोणाचा असेल तर तो पॉला आणि अनुषाचा. कारण माझ्याकडे आयडिया हजारो असतील पण जी धमक या दोघींमध्ये आहे, ती माझ्यात नाही. खरेतर जी धमक एका स्त्रीमध्ये असते ती कुठल्याच पुरुषात असू शकत नाही. पण तरीही आज हे लोक मलाच भाडिपाचा सर्वेसर्वा म्हणतात. कारण मी एक पुरुष आहे. हे ऐकायला कितीही लाजिरवाणं वाटलं तरीही एक कटू सत्य आहे.

पाच वर्षांपूर्वी जेव्हा आणि गुलबदन टॉकीज या नावाने आमची पहिली कंपनी सुरू केली तेव्हा आम्ही अनेकदा मोठाल्या ब्रँड्सकडे जाहिरातीच्या आयडिया घेऊन जायचो. एकतर माझं इंग्लिश कच्चं आणि त्यातून प्रेझेंटेशन्सची सवय नाही. त्यामुळे या सर्व मीटिंग्जला मी गप्प बसून राहणंच योग्य असायचं. पण एकदा का पॉला किंवा अनुषाने आयडिया प्रेझेंट केली की लगेच मीटिंगमधले सर्व जण माझ्याकडे वळायचे आणि पुढचा संवाद माझ्याबरोबर सुरू करायचे. ती माझी स्क्रिप्ट असो वा नसो. त्या अ‍ॅड फिल्मचा डायरेक्टर मी असो वा नसो. पुरुष असल्याने त्या कंपनीचा मीच प्रमुख आहे, असं गृहीत धरलं जायचं. सुरुवातीला आम्हाला हे जाणवलं नाही. पण मग हे असं दरवेळी होऊ लागलं. आश्चर्याची गोष्ट ही की ब्रँड टीममधील हेड स्त्री असली तरी तीसुद्धा तेच करायची. आपल्या समाजात ‘पॅट्रिआर्चल थॉट्स’ अर्थात पुरुषसत्ताक विचार किती खोलवर रुजले आहेत, याचं हे प्रमाण. भारतात अनेक प्रबळ स्त्रिया होऊन गेल्या. अनेक प्रभावी स्त्रिया सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. पण तरीही पुरुषी संकुचितपणा तिळमात्रही कमी झालेला नाही. कदाचित काही पुरुषांमध्ये बदल झाला असेलही, पण समाजात फरक पडावा इतकी त्यांची संख्या नक्कीच नाही.

हा असा बदल लगेच होणारही नाही, याची मला जाणीव आहे. पण आपण पुरुषप्रधान आहोत, याची जाणीव असणं अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच आपण समानतेकडे वाटचाल करू शकतो. मी मध्ये एका मैत्रिणीच्या गाडीतून प्रवास करत होतो. दहा मिनिटं झाल्यावर ती मला म्हणाली, तू असा पहिला पुरुष आहेस की ज्यांनी हा विनोद माझ्यावर केला नाही की, स्त्री असून गाडी चालवता येते तुला? आय वॉज शॉक्ड्. अर्थात १५ वर्षांपूर्वी हे विनोद केले आहेत. तेव्हा बोटावर मोजण्याइतक्या स्त्रिया गाडी चालवायच्या. जसजशी वुमन ड्रायव्हर्समध्ये वाढ होत गेली तसतशी माझ्या बुद्धिमत्तेतही वाढ होत गेली. मुलींवर असे विनोद करणं हे मूर्खपणाचे आहे, हे मला समजू लागले. असा रिग्रेसिव्ह विचार अजूनही समाजात आहे. हे मात्र माझ्यासाठी शॉकिंग होतं. अर्थात काही महाभाग कुठला तरी वैचारिक तर्क लावून यावर वाद घालतील पण मी एवढं नक्की सांगू शकतो की माझ्या बऱ्याच मैत्रिणी उत्तमरीत्या कार चालवतात. मुलींना पुरुषाहून ‘मल्टिटास्किंग’ नक्कीच चांगलं जमतं आणि म्हणूनच त्या उत्तम ड्रायव्हर्स असतात.

माझ्या आयुष्यात आलेल्या सर्वात प्रबळ स्त्रियांमध्ये पॉला, अनुषा, राधिका आपटे, राजश्री देशपांडे यांच्या जोडीला अत्यंत महत्त्वाचे नाव म्हणजे सुमित्रा भावे. फेमिनिझमचे धडे त्यांनी मला नकळत जेवढे शिकवले आहेत, तेवढे त्या विषयाचा अभ्यास करूनही मला शिकता आले नसते. प्रसंगी मी या विषयावर त्यांच्याशी वादही घातले आहेत. परंतु माझे स्त्रीबद्दलचे विचार बदलण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मी त्यांना असिस्ट करीत असताना एक प्रसंग घडला. सुमित्रा मावशी आणि सुनील सुकथनकर हे दोघं राधिकाला घेऊन ‘घो मला असला हवा’ हा चित्रपट बनवत होते. एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मॉनिटर सतत बंद पडत होता. मावशीने कॅमेरा अटेंडन्टकडे चौकशी केली. त्यावर कॅमेरा अटेंडन्ट असं म्हणाला, की केबलचा प्रॉब्लेम आहे. थांबा सर येऊ दे. मी सांगतो नक्की प्रॉब्लेम काय आहे. मावशीने त्या क्षणी शूटिंग थांबवलं आणि कॅमेरा अटेंडन्टला सुनील सरांबरोबर खोलीत घेऊन गेल्या. त्यांचा प्रश्न साधा होता. तू मला ही माहिती का दिली नाहीस? मी स्त्री आहे म्हणून की सुनीलला केबलमधलं सगळं कळतं म्हणून? यावर अटेंडन्टनेही आधी टोलवाटोलवीची उत्तरे दिली, पण काही वेळात त्याला त्याची चूक कळाली आणि शूटिंग पुन्हा सुरू झालं. त्या दिवसानंतर त्यांच्याकडून एकही टेक्निकल गोष्ट मावशीपासून लपवली गेली नाही.

आपल्या घरातल्या स्त्रियांना अमुक एक गोष्ट समजणारच नाही. अत्यंत संकुचित विचार सोडायची वेळ आली आहे. टीव्हीवर स्त्रियांसाठी सासू-सुनेच्या पलीकडचा कन्टेन्ट बनावयची वेळ आली आहे. स्त्रियांनी सिगारेट ओढणं वाईट म्हणायचं थांबवून सिगारेट ओढणं वाईट असं ‘अनबायस्ड्’ विधान करायची वेळ आली आहे.

मी माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांना नुकतंच समानतेनं वागवणं सुरू केलं आहे. त्याचा फायदा मला आणि माझ्या कंपनीला किती चांगला होतोय, याची जाणीव मला आहे. सर्व पुरुषांना एवढंच सांगेन की स्त्रीला समान वागवा, आईशप्पथ सांगतो, आपल्याच फायद्याचं आहे!!

(शब्दांकन: गोविंद डेगवेकर)

viva@expressindia.com