‘माय चॉइस’वरून सुरू असलेल्या चर्चेचा रोख नकळतपणे आधुनिक  स्त्रीवादाकडे झुकला. विशेषत: तरुणाईच्या मनातला फेमिनिझमबाबतचा गोंधळ यामुळे पुन्हा एकदा उघड झाला.
‘फेमिनिझम : यू नीड टू रीव्हिजिट युअरसेल्फ’ असा एका मैत्रिणीचा स्टेटस मेसेज वाचला आणि ही दीपिकाच्या ‘माय चॉइस’ या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओसंदर्भात व्यक्त केलेली काळजी होती, हे कळलं. अनेक कारणांनी चर्चेत राहिलेल्या या व्हिडीओमध्ये खरं तर स्त्रीवादाचा थेट असा उल्लेख नाही. तरीही अनेक जणांकडून ‘हिपोक्रिटिक फेमिनिझम’ किंवा ‘सेलिब्रेटिंग फेमिनिझम’ अशा प्रतिक्रिया दिल्या जाताहेत. स्त्रीवादाच्या मूळ संकल्पनेबद्दल अनेक गैरसमज आजही आपल्याकडे आहेत आणि त्यातूनच फेमिनिझम किंवा फेमिनिस्ट ही टर्म बऱ्याचदा तिरस्कारयुक्त स्वरात वापरली जाते. काही अँटी फेमिनिस्ट गटांचं प्रतिनिधित्व मुलीच करताहेत. याबद्दल पुण्याच्या स्नेहाला विचारलं असता ती म्हणाली, ‘फेमिनिझम आजवर खूप चुकीच्या पद्धतीने समजला गेलाय, परंतु अशा प्रकारचे व्हिडीओ जर फेमिनिझमच्या नावाखाली हिट होत असतील तर ही खूप भयंकर गोष्ट आहे. माझ्या मते स्त्री सक्षमीकरण हे समानतेसाठी झालं पाहिजे, श्रेष्ठतेसाठी नाही. फेमिनिझम म्हणजे पितृसत्ताक पद्धतीकडून मातृसत्ताक पद्धतीकडे केलेली वाटचाल नव्हे. स्त्रियांचे प्रश्न आणि तिच्यावर होणारे अन्याय याचा सगळ्यांनी एकत्र येऊन केलेला व समानतेकडे नेणारा विचार म्हणजे माझ्यासाठी फेमिनिझम आहे.’ स्नेहासारख्या अनेक मुलींकडून प्रचारकी, दिखाऊ फेमिनिझमला विरोध होतोय. अनेक मुलं-मुली फेसबुक-व्हॉट्सअॅपवर निरनिराळे ग्रुप्स बनवून याविषयी जाणीवपूर्वक व्यक्त होताना दिसताहेत.
साधारण १९ व्या शतकात अस्तित्वात आलेली फेमिनिझम किंवा स्त्रीवाद ही पाश्चात्त्य संज्ञा!! स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासोबतच, समान न्यायाच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न. स्त्रीच्या कामाला दर्जा किंवा किंमत मिळवून देणं हे या ‘इझम’चं उद्दिष्ट होतं. परंतु स्त्रीवाद म्हणजे स्त्रीहक्काची भूमिका घेतल्याने ‘पुरुषविरोधी’ असं काहीसं चित्र नकळत उभं केलं गेलं. त्यातूनच सध्याची तरुण पिढी फेमिनिझमपासून स्वत:ला दूर ठेवू इच्छिते. फेमिनिझम म्हणजे स्त्रियाच श्रेष्ठ आहेत किंवा पुरुषांवर वर्चस्व दाखवणं अशा प्रकारच्या चुकीच्या समजांना झुगारून द्यायची वेळ आता आली आहे. त्याच वेळी फक्त स्त्रियाच फेमिनिझमला सपोर्ट करू शकतात हाही समज हळूहळू मोडीत निघायला सुरुवात झाली आहे. आपल्याकडे स्त्री-पुरुष वाद अजूनही पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे इक्व्ॉलिटीचं ध्येय गाठायला अजून वेळ जावा लागणार आहे. याविषयी महाविद्यालयीन तरुणी मधुरा म्हणते, ‘स्त्री काय किंवा पुरुष काय, आपल्या हक्कांसाठी आपल्याला हवा तो चॉइस करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, परंतु त्या अधिकारांसोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीव मात्र सगळ्यांनी ठेवली पाहिजे. स्त्री-पुरुष समानतेसाठी, मुळात बायोलॉजिकली या दोन वेगळ्या जाती आहेत हे समजावून घेऊन एकमेकांच्या डिफरंन्सेसचा आदर करता आला पाहिजे. असं झालं तर फेमिनिझमची मूलभूत मूल्यं स्वीकारणं आपल्याला जड जाणार नाही.’
एखादीने याच विचारांना फेमिनिस्ट ही टर्म वापरली की ती मुलगी पुरुषसत्ताक संस्कृती झुगारून देणारी किंवा पुरुषांचा तिरस्कार करणारी वगैरे ठरवून सगळे मोकळे होतात. याविषयी मुलांचे विचार जाणून घेणं महत्त्वाचं वाटलं. पुण्याच्या महाविद्यालयातला आदित्य म्हणतो, ‘स्त्रियांच्या अन्यायाविरुद्धच्या उठावाला फेमिनिझम म्हणतात असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा अन्याय करणारा बऱ्याचदा पुरुष असतो, हे गृहीत धरलं जातं आणि मग त्यामुळे हे स्ट्राँग प्रिज्युडायसेस तयार होतात. परंतु पुरुषसत्ताक संस्कृती नाहीशी होऊन, फेमिनिझम ही टर्म वापरायचीसुद्धा गरज पडणार नाही अशा समाजात राहायला मला जास्त आवडेल.’
मुळात स्त्रीवादाचं उद्दिष्ट हे स्त्रियांचं सबलीकरण आणि एक व्यक्ती म्हणून स्त्रीला समान हक्क आणि आदर समाजाप्रति मिळवून देणं हे आहे. फेमिनिझमला विरोध किंवा पाठिंबा देणाऱ्यांनी कोणत्याही जेंडरशी किंवा व्यक्तिसमूहाशी हा मुद्दा मर्यादित न ठेवता, व्यापक विचार करणं गरजेचं आहे!
भक्ती तांबे