स्वप्निल घंगाळे

‘अरे हॉल तिकीट घेतलं का?’, ‘काळ्या रंगाचं पेन आहे ना? आणि ती पाण्याची बाटली टेबलवर ठेवलीय ती आठवणीने घेऊन जा..’ हे असले संवाद ऐकू येऊ लागले की काळ परीक्षेचा आहे हे आपोआप लक्षात येतं. बरं, यंदा मात्र या परीक्षांचं वेगळंच रूप पाहायला मिळतं आहे. अंतिम वर्षांला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येत आहेत. त्यामुळे थोडी उत्सुकता तर थोडी जास्त चिंता अशी सध्या विद्यार्थ्यांची स्थिती आहे. तर फारसे टेकसेव्ही नसलेल्या पालकांना मात्र या परीक्षा आपल्यासाठी अभ्यासक्रमाबाहेरचा विषय प्रकारातील असल्यासारखं आतापासूनच वाटू लागलंय.

करोनाच्या संकटामुळे परीक्षा होणार की नाही, या प्रश्नपत्रिकेचे उत्तर सोडवल्यानंतर आता पुढे या परीक्षांची प्रात्यक्षिकं म्हणजेच चर्चानंतर प्रत्यक्षात परीक्षा घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. काही ठिकाणी ऑनलाइन परीक्षांचा खेळ प्रत्यक्षात सुरूही झाला आहे. त्यामुळेच घरामध्येही आता परीक्षेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. ऑनलाइन परीक्षा नक्की कशी घेतली जाणार, मध्येच लाइट्स गेले तर काय, ते क ॉम्प्युटरच्या मेमरी वगैरेची काही भानगड आहे का? यापासून ते अगदी इन्व्हर्टर आणावा का? इथपर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा घरात सध्या सुरू आहेत. बरं, काही घरांमध्ये आई-बाबांनाच समजून सांगण्याची एन्ट्रन्स देत असणाऱ्यांना आजी-आजोबांच्या अतिरिक्त प्रश्नांनाही सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे ठरलेले ‘आमच्या वेळी नव्हतं असं काही’ किंवा ‘आमच्या वेळी बरं होतं बाबा.’ यासारखे संवाद कानावर पडतातच.

व्हॉट्सअ‍ॅपवरील रात्रशाळा

ऑनलाइन परीक्षेसंदर्भात आता हळूहळू वातावरणनिर्मिती होऊ लागली आहे हे व्हॉट्सअ‍ॅपवरील अधिकृत म्हणजेच शिक्षक असणारे आणि नसणारे ग्रुप पाहिल्यावरच लक्षात येत आहे. अधिकृत ग्रुप्सपेक्षा अनधिकृत म्हणजेच अनौपचारिक ग्रुपवर या परीक्षांसंदर्भातील तर्कवितर्काना उधाण आल्याचे चित्र दिसते आहे. यामध्ये काही जण अगदी गांभीर्याने चर्चा करतात तर काही जण अगदी डिजिटल बॅकबेंचर असल्यासारखे निवांत आहेत. या परीक्षांबद्दलच्या व्हॉट्सअ‍ॅप चर्चासत्रांमध्ये गांभीर्याने माहिती देणारे, बातम्यांच्या लिंक्स आणि संदर्भ पोस्ट करत ग्रुपला अपडेट ठेवणारे काही जण आहेत तर काही जण केवळ भंकस करण्यासाठीच ग्रुपमध्ये आहेत का, असा प्रश्न पडावा इतक्या मजेदार प्रतिक्रिया देतात. मग काय अशी एखादी प्रतिक्रिया आली की स्मायलीजचा पाऊसच पडतो आणि विषय भरकटतो. बरं, एखादा गैरहजर म्हणजेच ऑनलाइन नसेल तर त्याला पटापट साऱ्या घडलेल्या घटनांचा म्हणजेच अनरिड मेसेजेसचा गोषवारा घ्यावा लागतो. कारण या निवांत रंगलेल्या चर्चामध्ये कधी तरी एखादा महत्त्वाचा मुद्दा किंवा आपल्याला असलेली शंका वगैरे एखाद्याने विचारली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. बरं, हे वर्ग अनेकदा रात्री बेड टाइम स्टोरीजसारखे भरतात आणि मग ही रात्रशाळा अगदी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर एखाद् दोन तासांपर्यंत सुरू असते.

कॉपी करता येणार का?

आता परीक्षा म्हटल्यावर कॉपी करण्यासारखे प्रकार तर कायमच चर्चेत असतात. त्यामुळेच या ऑनलाइन परीक्षांच्या पार्श्वभूमीवर या कॉपीच्या विषयावरही चर्चा जोरात आहे. म्हणजे घरून परीक्षा द्यायची तर कॉपी करता येणार का, किंवा आपण कुठे पाहिलं तरी समोरच्याला कसं कळणार? ही तर ओपन बुक टेस्टच झाली ना, यासारखे अनेक प्रश्न सध्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चर्चेत आहेत. तर दुसरीकडे कॉपी रोखण्यासाठी स्क्रीन रेकॉर्डिग होणार, किती क्लिक करतो हे मोजलं जाणार या आणि अशा प्रकारे एकाहून एक सरस विषय चर्चिले जात आहेत. खरं म्हणजे याबद्दल अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये सुरू असणाऱ्या या चर्चाना काहीही तथ्य नाही.

तयारी काय?

अनेक बातम्यांमध्ये अंतिम वर्षांची परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्न अशाप्रकारची असणार आहे असं सांगण्यात येतं आहे. मात्र हे प्रश्न ऑनलाइन माध्यमातून ठरावीक वेळेत सोडवावे लागणार, वगैरे असंही बोललं जात आहे. त्यामुळेच परीक्षा कोणत्याही माध्यमातून असली तरी इंटरनेट, कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन हे अत्यावश्यक आहेच. याचबरोबरच अनेक जण यंदा हॉल तिकीटची जागा पासवर्ड घेणार, वर्गाऐवजी सेशन्समध्ये लॉगइन करून परीक्षेला प्रवेश मिळणार, नावाऐवजी युझरनेम वापरावं लागणार असं सांगताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पालकांना मात्र वीज राहील का, नेटचा वेग मंदावणार नाही ना, तसं झालं तर काय करता येईल, असे तांत्रिक प्रश्न सतावतायेत.

आपला पॅटर्नच वेगळा

या ऑनलाइन परीक्षा कशा होणार या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना तरी बहुपर्यायी प्रश्नांची सवय असते. मात्र कला शाखेतील अनेकांना बहुपर्यायी प्रश्नांवरच परीक्षा द्यायची हे ऐकूनच धडकी भरली आहे. सविस्तर उत्तर लिहिण्याची सवय असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे असं अचानक ५० टक्के अभ्यासक्रमावर बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा द्यायला सांगितल्याने ते संभ्रमावस्थेत आहेत, असं शेवटच्या वर्षांला असणारी कांचन नानल सांगते. तर समृद्धी योगी ही कला शाखेतील विद्यार्थिनीही पहिल्यांदा एमसीक्यूवर परीक्षा देण्याचं दडपण आलं होतं, असं सांगते. समृद्धीनेच या संदर्भात पुढे बोलताना आधी परीक्षेचं खूप जास्त टेन्शन आलं होतं. त्यात आम्ही जी चाचणी परीक्षा दिली त्यादरम्यान अचानक पेपरचा वेळ संपल्याचं दाखवलं आणि पेपर स्क्रीनवरून गायब झाला. आम्हा सर्वाचा एकच गोंधळ उडाला आणि आता काय होणार वगैरे असं वाटू लागलं. मात्र टेक्निकल टीमने वेळीच आम्हाला माहिती दिली आणि पेपर पुन्हा दिसू लागला तेव्हा कुठे जीव भांडय़ात पडला, असं सांगितलं.

अंतिम वर्षच नाही, इतरही परीक्षांची तयारी जोमात

अंतिम वर्षांच्या परीक्षांची सध्या चर्चा असली तरी अनेक महाविद्यालयांनी आणि स्वायत्त विद्यापीठांनी आपल्या स्तरावर ऑनलाइन परीक्षा घेण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मग अगदी युनिट टेस्ट असतील किंवा लेक्चर्स ज्याप्रमाणे व्हिडीओच्या माध्यमातून होतात त्या पद्धतीने चर्चासत्र किंवा इतर उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेणं यासारख्याचा समावेश आहे. सध्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षांला असणारी गायत्री याचसंदर्भात बोलताना आमची परीक्षा नक्की कधी होणार आहे हे अद्याप पक्कं ठरलेलं नसलं तरी ती ऑनलाइन माध्यमातून होईल असंच वाटतं आहे, असं सांगते. आम्हाला या परिस्थितीमध्ये बाहेर पडावं लागणार नाही याचा पालकांना आनंद आहे. मात्र त्याच वेळी जेव्हा ते अंतिम वर्षांतील मुलांसंदर्भातील बातम्या बघतात तेव्हा त्यांना आमचीही काळजी वाटते. नाही म्हटलं तरी मुंबई, पुण्यासारख्या शहरांमधील मुलांकडे ऑनलाइन परीक्षांसाठीची व्यवस्था इतर भागांपेक्षा अधिक चांगली आहे. मात्र ज्यांच्याकडे नेट, मोबाइल, लॅपटॉप, वीज यांसारख्या मूलभूत गोष्टीच नाही त्यांचं काय होणार, हा विचार पालकांना अनेकदा सतावतो, हे त्यांच्याशी बोलताना जाणवतं, असं गायत्री म्हणते.

viva@expressindia.com