19 February 2020

News Flash

‘फर्स्ट लेडी’ची फॅशन!

जगातील मोठमोठय़ा देशांचे जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या पत्नी ‘फर्स्ट लेडी’ म्हणून ओळखल्या जातात.

(संग्रहित छायाचित्र)

|| वैशाली शडांगुळे

जगातील मोठमोठय़ा देशांचे जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या पत्नी ‘फर्स्ट लेडी’ म्हणून ओळखल्या जातात. जगभर त्यांच्याबद्दल सर्वात जास्त चर्चा होते ती त्यांच्या फॅशनची..अमेरिकेतील आत्तापयंतच्या ‘फर्स्ट लेडी’ म्हणून नावाजलेल्या महिला या जागतिक पातळीवर ‘फॅशनआयकॉन’ म्हणून गणल्या गेल्या आहेत. रेट्रो फॅशनची संकल्पना जेव्हा विकसित होत होती तेव्हा नामवंत ‘फर्स्ट लेडी’कडे स्टाइल स्टेटमेंट याअर्थी पाहिले जायचे. त्या वेळी आज जसा फॅशनचा गाजावाजा होतो तसा होत नव्हता. त्यामुळे फॅशनडिझायनर्सचे अप्रतिम कलेक्शन हे अधिकारपदावरील स्त्री-पुरुषांसाठीच सादर होत होते. ‘फर्स्ट लेडी’च्या अंगावरील कपडेही तेव्हा एकाच वेळी साधे पण राजेशाही थाटाचे असायचे. रंगांच्या बाबतीत असंख्य प्रयोग करून तसे आऊटफिट्स शिवले जायचे. मुळात ‘फर्स्ट लेडी’च्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आऊटफिट तयार करणं हे एक आगळं कसब होतं. ‘फर्स्ट लेडी’ फॅशन नावारूपाला आली ती सतराशेपासून. त्या काळातील समाजकारण, राजकारण वेगळं होतं. तेव्हाचा बाजार आणि जीवनशैलीही बदलती असल्याने फॅशनहीमोठय़ा प्रमाणात बदलत गेली. त्यानंतर रेट्रोचा जमाना आला आणि आधुनिक जीवनशैली विकसित होत गेली. अमेरिकेतील अध्यक्ष जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला, इनॉगरेशनला, दुसऱ्या देशातील टूरवर किंवा नामवंत व्यक्तींशी भेटगाठ घेताना सपत्नीक उपस्थित राहत. अध्यक्षांबरोबरच त्यांची पत्नी कशी राहते, त्यांचे बोलणे-चालणे हा उत्सुकतेचा भाग असल्याने तो टिपला जाऊ लागला. त्यातूनच पुढे त्यांच्या फॅशनविषयीची वर्णने मोठमोठय़ा नियतकालिकांमधून प्रसिद्ध होऊ लागली. काळानुसार झालेला बदल इतकाच की सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही त्याची वर्णने पाहायला, वाचायला मिळतात.

फर्स्ट लेडी म्हणून आजवर अनेक मातब्बर स्त्रियांनी आपली फॅशन जगासमोर आणली आणि अजूनही त्यांची ओळख फॅशनआयकॉन म्हणून टिकून आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. के नेडी यांच्या पत्नी जॅकलिन केनेडी यांनी एक इतिहास रचला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण तो काळ (१९५० ते ६०) नव्या फॅशनचा होता. त्याआधीही फॅशनमध्ये वेगळे प्रयोग झाले असले तरी जॅकलिन यांची फॅशन तेव्हा खूप जास्त प्रमाणात चर्चेत होती. त्यांचा चेहरा ग्लॅमरस नव्हता, पण त्यांच स्मितहास्य विलक्षण होतं. त्या स्वत: स्कार्फच्या खूप शौकीन होत्या. न्यूड, केशरी रंग त्यांना मोहक दिसायचे. ‘पिलबॉक्स हॅट्स’ या तेव्हा बऱ्यापैंकी लोकप्रिय झाल्या त्या फर्स्ट लेडी जॅकलिन यांच्यामुळेच. ओव्हरसाईज्ड बटणचा गाऊन, त्यासोबत हातमोजे असा नितळ पांढऱ्या रंगाचा गाऊन अशा लुकमध्ये त्या खूप जास्त सोज्वळ वाटायच्या. त्या काळात एकाच रंगाचा संपूर्ण आऊटफिट वापरण्यावर जास्त भर होता, कारण तो लगेच हायलाइट व्हायचा.

सत्तरच्या दशकात फर्स्ट लेडी एलिझाबेथ एन ब्लूमर यांनी क्लोज्ड नेक आणि हाय नेक फॅशनआणली. त्यात फार काही नावीन्य नव्हतं, पण काही निवडक समारंभांत आणि खासकरून फोटोशूटसाठी त्या चायनीज कॉलर आणि फ्लेअर्ड गाऊन्स वापरयच्या. खासकरून बॉल डान्स किंवा डिनर ओकेजनच्या वेळी फ्लेअर्ड गाऊन्स वापरले जायचे जे आता आपण इंडियन वेडिंग सीझनला जास्त प्रमाणात पाहतो आहोत. तेव्हाच्या फॅशनचा उपयोग आपण आज सहजपणे करतो आहोत.

फर्स्ट लेडीची फॅशनही वेगाने बदलत नव्हती, पण फर्स्ट लेडी म्हणून नावारूपाला आलेल्या नॅन्सी रिगन यांनी फॅशनस्टायलिंगमध्ये आमूलाग्र बदल के ला, असं म्हणता येईल. त्या फॅशन आयकॉनहोत्याच, पण नाना तऱ्हेचे आऊटफिट्स त्यांनी ट्राय केले आणि त्याची झलक तेव्हा प्रत्येक मासिकातून उमटतही होती. सार्वजनिक ठिकाणी सर्रास आणि सहज वावरणाऱ्या नॅन्सी आत्मविश्वासू होत्या. सतत नवीन, वेगळ्या धाटणीच्या पेहरावात सार्वजनिक मंचावर आत्मविश्वासाने आणि आनंदाने वावरणं, हे तोवर कोणी केलं नव्हतं. त्यांचं लाल आणि पांढऱ्या रंगांवर विशेष प्रेम होतं. त्यांच्यानंतर हिलरी क्लिंटन यांच्याबाबतीत त्याचप्रकारचा आत्मविश्वास आणि धडाडी पाहायला मिळाल्याचे सांगितले जाते. हिलरी यांनीही स्वत:ची एक फॅशनस्टाईल विकसित केली होती. तरुण वयात हॅट्स सर्वात जास्त वापरणाऱ्या हिलरी क्लिंटन नंतर मात्र फॅशनच्या बाबतीत फार आग्रही राहिल्या नाहीत.

बार्बरा बुश यांना पाहताक्षणी आठवेल तो त्यांच्या गळ्यातील मोत्यांचा नेकलेस. हा नेकसेल त्यांनी कधीच बाजूला काढून ठेवला नाही, असं सहज मनात यावं इतकी ती त्यांची नेकलेस घातलेली प्रतिमा लोकांच्या मनात ठसली होती. समकालीन फॅशनचा योग्य वापर त्यांनी केला होता. त्यांची सून लॉरा बुश यांनीही सासूकडून आलेला हा नेकलेसचा वारसा पुढे नेला. त्यांनीही नेकलेसमध्ये विविध स्टाईल्स वापरल्या. त्या काळात आधुनिक पण समकालीन फॅशनजपणे ही फर्स्ट लेडी यांच्यावरची मोठी जबाबदारी होती आणि त्याचा योग्य तो समतोल त्यांनी राखला. सध्या मेलियाना ट्रम्प यांनीदेखील आधुनिक काळातील फॅशन विश्वातआपला ठसा उमटवला आहे. अगदी फिक्या रंगांचा वापर, जम्पसूट, कॉट, क्रेप गाऊन, शीअर गाऊन अशा प्रकारचे ड्रेस त्या परिधान करतात. क्रीम, व्हाईट, येल्लो, प्रिंटेड लुक्स त्यांना जास्त सूट होतात. त्या त्या ठिकाणांनुसार आपला आऊटफिट कसा मॅच होईल याकडेदेखील त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केले आहे. यात एअरपोर्ट लुक, गार्डन लुक, बॉल लुक यांना अनन्यसाधारण महत्त्व दिल्याचे नेहमीच त्यांच्या लुकवरून जाणवते. बऱ्याच आऊटफिट्सवर बेल्ट्स, सनग्लासेस, हॅट्स, ग्लोव्हज यांचा योग्य वापर त्या करतात. डार्क शेड्स वापरतानाही त्यांचा भर हा मॅचिंग लुकवर असतो. कॉन्ट्रास शेड्स निवडतानाही मॅचिंग अ‍ॅक्सेसरीजना ती प्राधान्य देते. आधुनिक विचाराने केली जाणारी फॅशनखरं तर लॉरा बुश यांच्यानंतर मिशेल ओबामा यांनी आणली. त्यांनी प्रिंट्समध्ये खूप आऊटफिट्स ट्राय केले. ‘फर्स्ट लेडी’ म्हणून त्या जितक्या प्रगल्भ होत्या, तितक्याच त्या आपल्या फॅशनच्या निवडीबद्दलही आग्रही होत्या. फर्स्ट लेडी असताना ट्राऊझर्सपासून बेलमेन सूटपर्यंत, अक्रिस सूट, पेनस्ट्राइप पॅन्टसूट, ब्लेझर, डेनिम, एसिमेट्रिक व्रॅप ड्रेस असे त्यांनी विविध आऊटफिट्स ट्राय केले आहेत. स्ट्राइप्स, सिल्क, क्रिस्टल असे फॅब्रिक्स आणि डिझाइन यांचा योग्य मेळ त्यांनी साधला.

वेस्टर्न साइड म्हणून अमेरिकेतील फॅशनही आजही सर्वात मोठी मानली जाते. प्रत्येक देशातील वस्त्रपरंपरा अनोखी असल्याने जगभरात त्यांची देवाणघेवाणही होते. विविध देशांतील पारंपरिक कपडे हे आता परदेशी नामवंत व्यक्तिमत्त्वंही परिधान करताना दिसतात. जपान, कॅनडा, चीन, ऑस्ट्रेलिया, युरोप, न्यूझीलंड या देशांतील फर्स्ट लेडी आणि त्यांची फॅशनही विशेष लक्षणीय आहे. तरीही अमेरिके तील नामवंत फर्स्ट लेडीजच्या फॅशनचा बोलबाला आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वात जास्त राहिला आहे. जगभरात त्यांची फॅशन नावाजलेली असल्यानेच फॅशन इंडस्ट्रीत ‘फर्स्ट लेडी’ फॅशनने आपली एक जागा निर्माण केली आहे. आज तर या फॅशनचा प्रभाव बाजारावरही पडत असल्याने त्याला जितके ऐतिहासिक मूल्य आहे. तितकेच आधुनिक काळातही त्यांचा आब कायम आहे.

रेट्रो ते मॉडर्न या परिघात फिरणारी आणि सामान्य माणसाला भुरळ घालणारी फॅशनम्हणजे ‘फर्स्ट लेडी’ फॅशन. जगभरातील मोठमोठय़ा देशांच्या अध्यक्षांच्या पत्नी आपल्या कामाएवढय़ाच त्यांच्या फॅशनकरताही नावाजल्या जातात. ही ‘फर्स्ट लेडी’ फॅशन कशी बदलत गेली, त्यांचं महत्त्व आणि आता ती कुठे आहे याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

viva@expressindia.com

First Published on August 23, 2019 12:04 am

Web Title: first lady fashion mpg 94
Next Stories
1 लज्जतदार महाराष्ट्र
2 ‘विंटर’ची झुळूक
3 ‘शनाया’ आणि ‘शेवंता’ भेटतात तेव्हा..
Just Now!
X