घरची परिस्थिती बेताची, विज्ञान संशोधनाची कुठलीही पाश्र्वभूमी नाही. सागरी पर्यावरण क्षेत्रात संशोधनाचं स्वप्न घेऊन धनश्री बगाडे यामध्ये उतरली.

गेल्या काही वर्षांमध्ये पर्यावरण संशोधन, संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात काम करण्याकडे मुलींचा ओढा वाढला आहे. अगदी नॉर्थ-ईस्टच्या जंगलापासून ते कच्छच्या रणातदेखील मुली कार्यरत आहेत. पण सागरी पर्यावरणाच्या कामात तुलनेने हे प्रमाण अगदी मोजकंच म्हणावं असं आहे. त्यातही फिशरीजसारख्या क्षेत्रात तर सारा भरणा पुरुषांचाच. इतकंच नाही तर आपल्याकडे सागरी पर्यावरण संशोधनात कामदेखील तसं कमीच झालं आहे. आपला सारा भर व्याघ्र संवर्धनावरच. अशा पाश्र्वभूमीवर धनश्री बगाडेसारखी एखादी मुलगी आवडीने ओशनोग्राफीत पदव्युत्तर शिक्षण घेते आणि त्यातच करिअर करण्यासाठी म्हणून ‘सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ूट’मध्ये गेली तीन वर्षे प्रोजेक्टवर कामदेखील करते.
वडील पोलीस कॉन्स्टेबल आणि दोन धाकटी भावंडं. घरची परिस्थिती तशी बेताचीच. प्राणिशास्त्रात बीएस्सी केल्यानंतर तिने जाणीवपूर्वक मास्टर्ससाठी ओशनोग्राफीची निवड केली. अर्थातच रिसर्चची आवड आणि योग्य मार्गदर्शन हा त्यामागचा भाग महत्त्वाचा होता. खरं तर प्युअर सायन्सकडे वळणाऱ्यांची संख्या कमी असताना तिने हे फिल्ड निवडलं. मास्टर्स पूर्ण केल्यानंतर ती जाणीवपूर्वक फिशरीजकडे वळली. खरं तर हे खुल्या आकाशाखालचं क्षेत्र. त्यातही पुरुषांचंच म्हणून ओळखलं जाणारं. सध्या ती इन्स्टिटय़ूटच्या ‘रिसोर्स मॅपिंग सिस्टीम (जीआरएफ)’ या पाच वर्षांच्या पायलट प्रोजेक्टवर काम करत आहे. समुद्रातील वेगवेगळ्या माशांच्या लोकेशनच्या जीपीएस नोंदी आणि त्या अनुषांगिक नोंदीचं विश्लेषण यात केलं जातं. एखादा विविक्षित मासा अथवा अन्य सागरी जीव विविक्षित काळात कोठे असतो, त्याचं चलनवलन काय असतं, त्या ठिकाणचं सागरी पर्यावरण कसं असतं असा त्याचा व्याप आहे. त्यासाठी बोटीवरून खोल समुद्रात जायचं, नियमित डेटाबेस अपडेट करण्यासाठी मच्छीमारांशी बोलायला डॉकवरदेखील फिरायचं आणि या साऱ्या नोंदीचं विश्लेषण करण्यासाठी पुन्हा प्रयोगशाळेत डोकं खुपसायचं.
२४ तास मासळीच्या भणभणत्या वासाने आणि मच्छीमारांच्या गोंगाटाने गजबजलेल्या अशा ससून डॉक, भाऊचा धक्का, वरळीचा कोळीवाडा, वसई, विरार, सातपाटी येथील मच्छी उतरवली जाणाऱ्या ठिकाणी वारंवार जात राहायचं म्हणजे महाकठीण काम. पकडून आणलेली मासळी पुढे पाठवण्याच्या लगबगीत अर्धी चड्डी अथवा लुंगी लावून वावरणाऱ्या पुरुषांमध्ये एखाद्या मुलीने जाऊन काम करायचं म्हणजे तसं अवघडच. समुद्रावरील त्यांनी केलेली सागरी जीवांची निरीक्षणं मिळवणं, त्यांची भाषा समजून घेणं असो तसं अवघडलेपणाचं आणि त्रासाचंच म्हणावं लागेल. माहितीची शहानिशा करावी लागायची. पण नेटाने ती हे काम करत आहे. बोटीवरचा अनुभव तर आणखीनच भन्नाट असतो. फिशिंगच्या रिसर्च व्हेसलवर जाऊन मासे, पाण्याचे नमुने, मायक्रो फ्लोरा फॉना असं सारं काही जमा करायचं. दिवसभरचा उद्योग. अशा प्रकारे बोटीवर जाणाऱ्या मुली अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच. पण धनश्री जिद्दीने बोटीवर जाते. आवडीचं क्षेत्र मिळणं आणि त्यात कामाचं स्वातंत्र्य मिळणं हे सर्वाना लाभतंच असं नाही. पण धनश्रीने या स्वातंत्र्याचा चांगला उपयोग केला. अर्थातच याचं सारं श्रेय ती अनेकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनला आणि घरच्या व इन्स्टिटय़ूटमधील वरिष्ठांच्या पाठिंब्याला देते. तिच्या या ऑफबीट करिअरबद्दल ती सांगते, ‘‘पुढील संशोधन, पीएच.डी. याच फिल्डमध्ये करायची आहे. ओशनोग्राफीला भविष्यात भरपूर वाव आहे. मुलींना हे काम कदाचित त्रासाचं वाटेल पण यातला अनुभव नक्कीच वेगळा आहे.’’
suhas.joshi@expressindia.com