प्रियांका वाघुले

कोणत्याही गोष्टीची आवड असेल तर ती आपल्या जीवनाचा भाग व्हायला अधिक वेळ लागत नाही. किंवा अगदी सहजपणे आपण त्या गोष्टी स्वीकारतो. आपण फिट राहावं, असावं, असा विचार अगदी साहजिकपणे प्रत्येकाच्या मनात येत असतो. पण त्यासाठी जे परिश्रम घ्यायला हवेत, सातत्याने त्याचा पाठपुरावा करायला हवा. ते प्रयत्न करण्याची इच्छा आणि तशी मनाची तयारी करण्याचे कष्ट मात्र फार कमी जण घेताना दिसतात.

कलाकार म्हणून फिट राहणं ही व्यवसायाची गरज असली तरी त्यापलीकडे जात स्वत:ला फिट ठेवणे आवश्यक वाटल्याने त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता आशुतोष पत्की हे महत्त्वाचे नाव आहे. संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष याने अभिनय क्षेत्राची वाट निश्चित केली. मालिका आणि चित्रपटांमधून पुढे येणारा आशुतोष हा फिट राहण्यासाठी सलगता अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगतो. वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत स्वत:वर संयम ठेवणारा आणि व्यायामापासूनही बऱ्यापैकी दूर असलेला आशुतोष आता नियमितपणे आठवडय़ातील सहा दिवस जिममध्ये व्यायाम करतोच करतो, असं आग्रहाने सांगतो.

एका दिवशी शरीराचे दोन अवयव केंद्रित करून त्यानुसार व्यायाम करत असल्याचे तो सांगतो. बॅक बाय सेप, बाय सेप आणि ट्राय सेप अशा दोन अवयवांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून ते व्यायाम करत असल्याचे आशुतोष सांगतो. व्यायाम हा शरीरासाठी जितका महत्त्वाचा तितकेच महत्त्वाचे वॉर्म अप आणि स्ट्रेचिंग असते. व्यायाम करण्यापूर्वी वॉर्म अप करून पहिले शरीराला व्यायामासाठी तयार केले पाहिजे. त्यासाठी जवळपास रोजची पंधरा मिनिटे वॉर्म अप करत असल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर प्रत्येक बॉडी पार्टची झीज होण्याच्या दृष्टीने प्रत्येक व्यायाम प्रकाराचे १५, १२ आणि १० रिपिटचे तीन सेट करत असल्याची माहितीही आशुतोषने दिली.

viva@expressindia.com